वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad)



पुस्तक - वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad)
लेखक - माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५८
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, जून २०२६
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-5650-108-9

हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ कुठला ? असा प्रश्न विचारला तर काहीजण म्हणतील "गीता". काहीजण म्हणतील "वेद". कोणी म्हणेल रामायण, महाभारत. कोणी भागवत पुराणाचं नाव घेईल. हिंदू धर्माचा कोणी एकच संस्थापक नाही, एकच एक धर्मग्रंथ नाही. त्यात खूप पंथ, उपपंथ आहेत. विविध चालीरीती आहेत, देवदेवता आहेत. हे सामान्य ज्ञान आहे. पण "श्रुती स्मृती पुराणोक्त" असं म्हणताना हे तिन्ही ग्रंथांचे प्रकार आहेत, पुराणांप्रमाणेच श्रुती म्हणजे सुद्धा काही ग्रंथ आणि स्मृती म्हणजे सुद्धा ग्रंथ आहेत ह्याची जाणीव फारच कमी लोकांना असेल. मनुस्मृती सारखे ग्रंथ पुन्हापुन्हा राजकीय चर्चेत येतात तेव्हा त्या ग्रंथांचं ह्या धर्मग्रंथांत नक्की स्थान काय असा प्रश्न येतो.

एखाद्या मोठ्या जमीनदाराच्या, संस्थानिकाच्या पुढच्या पिढीला आपल्या बापजाद्यांची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे हे माहीत नसतं. काही जमीन वापरात असते. काही कुठे कुठे असते पत्ता नसतो. काही जडजवाहीर रोजच्या वापरातलं असतं पण तर खजिन्यात अजून किती कोंडलं आहे ह्याची जाणीव नसते. खजिना म्हणून लपवून ठेवलंय ते खरंच आता तितकं मौल्यवान राहिलं आहे का जुनंभंगार झालंय ह्याची शहानिशा करायचीही उत्सुकता वाटत नाही. अशीच अवस्था आजच्या बहुतांश हिंदू समाजाची झाली आहे. ग्रंथपरंपरा मोठी आहे. मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. पण नक्की ग्रंथ किती? कुठले? त्यांचा परस्पर संबंध काय ? ते काहीवेळा एकमेकांच्या विरुद्ध उपदेश का करतात ? हे विचारलं तर किती जण पाच मिनिटं ह्यावर बोलू शकतील ? फारच थोडे. ह्या पार्श्वभूमीवर ज्ञानाच्या संपत्तीच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या आपल्याला, आपल्याच खजिन्याची जाणीव करून देणारे, खजिन्या पर्यंत पोचण्याचा नकाशा देणारे हे पुस्तक आहे.

अनुक्रमणिका



पुस्तकात एकूण तेरा अध्याय आहेत. प्रत्येकात एकेका ग्रंथप्रकाराची ओळख करून दिली आहे. ते ग्रंथ कोणाकडून आणि कधी रचले गेले असावेत ह्याबद्दलची तज्ज्ञांची मते आहेत. तिचा विषय आणि परंपरेतलं स्थान समजावून सांगितलं आहे. विषय समजावून सांगण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, ह्यातून विविध धर्मग्रंथ कसे उदयाला आले हे लक्षात येईल. तर काही वेळा एकाच सत्यापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातून विविध ग्रंथ उदयाला आले हे लक्षात येईल.

उदा. लेखक पुस्तकात लिहितात,
श्रुती म्हणजे 'ऐकून' प्राप्त झालेले - वेद - हिला विशेष स्थान दिले जाते कारण ती मानवी लेखकत्वापलीकडील - अपौरुषेय मानली जाते. ..श्रुती ही अनुभवांतून उमटलेली पण काळाच्या पलीकडील तत्वांचा निर्देश करणारी आहे ... स्मृती म्हणजे "स्मरणातून आलेले" मानवी अनुभवावर आधारित , समाज गुण्यागोविंदाने नांदावा यासाठीचे कायदे कानून म्हणजे स्मृती....काही स्मृती परस्परविरोधी दिसतात कारण समाज बदलतो, प्रश्न बदलतात..स्मृती म्हणजे दुय्यम दर्जाचे ग्रंथ नव्हेत. ...

यजुर्वेदाबद्दलचा काही मजकूर 



पुढे वेदांची रचना सांगितली आहे. महत्त्वाची सूक्ते, प्रसिद्ध ऋचा, चार वेदांचे विषय, उपवेद ह्यांचा संबंध सांगितलं आहे. वेदांची सहा अंगे - वेदांगे - वेदांच्या अध्ययनाला, आचरणाला आणि अर्थबोधाला पूर्णता देतात. वेद मौखिक परंपरेतून अचूक टिकवले जावेत ह्यासाठीची अत्यावश्यक अशी रचना आहे. शिक्षा (उच्चारशास्त्र), कल्प (विधी कसे करावेत), व्याकरण , निरुक्त (शब्दांची उत्पत्ती समजणे), छंद (मात्रांची लय, मात्रा समजणे ), ज्योतिष (कालगणना, खगोलशास्त्र). एवढं वाचल्यावरच लक्षात येतं की किती वेगवेगळं आणि कायस्वरूपी आवश्यक ज्ञान त्यात आहे.

रामायण आणि महाभारत हे नुसती काव्य नाहीत तर इतिहास आहेत. त्याचबरोबरीने पुस्तकातली आदर्श वर्तणूक, नियम आणि व्यक्तिगणिक बदलणारे त्याचे संदर्भ ह्यातून प्रत्यक्ष जगताना होणारे संघर्ष हे अधोरेखित केलं आहे. त्यामुळे धर्मग्रंथाचेच दर्शन रामायण - महाभारतात कसे घडते आणि त्यातून परंपरेतली पुढची साखळी ते कसे ठरतात हे लक्षात येते. महाभारताकडून ते आपल्याला सहज "भागवत"पुराणाकडे नेतात. ते म्हणतात; "महाभारत जिथे गुंतागुंत उलगडते , तिथे श्रीमद्भागवत त्या गुंतागुंतीतून शांततेचा मार्ग दाखवते. महाभारत जिथे कर्तव्याची जाणीव देते, तिथे भागवत त्या कर्तव्याला समर्पणाची आणि आनंदाची अनुभूती देते..."

पुढचा टप्पा पुराणांचा येतो. लेखक म्हणतात, "वेद "उच्च" आणि पुराणे "कनिष्ठ" असं नसून, तत्वज्ञान लोकांच्या अनुभवविश्वात आणण्यासाठी निर्माण झालेली एक सजीव परंपरा आहे....पुराणे म्हणजे धर्माचे लोकशिक्षण - सरळ, परिणामकारक आणि काळाच्या ओघात टिकून राहणारे....पुराणे विविध स्तरांवर उलगडतात - इतिहास आणि दंतकथा, तत्वज्ञान आणि भक्ती, भूगोल आणि खगोल, तसेच समाजरचनेचे प्रतिबिंब...त्यामुळे पुराणे ही केवळ धार्मिक आख्याने म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृतीची स्मृती जपणारे समृद्ध कोश ठरतात". ह्या भूमिकेतून अठरा पुराणांचा गोषवारा दिला आहे.

पुराणांच्या ताकदीबद्दल लेखकाचे विवेचन




वेदांमधल्या तत्वज्ञानातून पुराणातल्या कथांपर्यंत येऊन लेखक आपल्याला पुन्हा तत्वज्ञानाकडे घेऊन जात "दर्शनशास्त्रे - विचारांची शिस्तबद्ध मांडणी" उलगडतात. "मी कोण", "जगाचे स्वरूप काय", "सत्याचे तत्व काय" ह्या प्रश्नांना कठोर तर्कबुद्धीने, विश्लेषणात्मक प्रतिसाद म्हणजे दर्शने. सांख्य (विवेकातून मुक्ती), योग (अनुभूतीची शिस्त), न्याय (योग्य विचारांची शिस्त), वैशेषिक (विश्वाची रचना), मीमांसा (कर्म व कर्तव्य), वेदान्त (उपनिषदांचा तात्विक परिपाक) ही दर्शने एकाच प्रश्नांकडे बघण्याचे भिन्न मार्ग दाखवतात. आपले पूर्वज किती बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि म्हणूनच दुसऱ्याच्या विचारांचा आदर करणारे होते हे लक्षात येते. पुन्हा वेदान्तामध्ये अद्वैत, द्वैत आणि विशिष्टाद्वैत असे तीन मार्ग अनुक्रमे शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य ह्यांनी कसे सांगितले हे स्पष्ट केले आहे.

पुढच्या प्रकरणात सोळा संस्कारांचे अर्थ व त्याचे सामाजिक महत्त्व थोडक्यात सांगितले आहेत. अजून एक कमी चर्चिली जाणारी संकल्पना म्हणजे "आगम". लेखक लिहितात, "आगम म्हणजे जो परंपरेने आलेला आहे, जो गुरुशिष्य परंपरेतून प्रवाहित होतो. ही परंपरा केवळ लिखित शब्दांवर आधारित नाही; ती अनुभवांच्या सातत्यावर, साधनेच्या शिस्तीवर आणि श्रद्धेच्या ऊर्जेवर उभी आहे. म्हणून आगम समजणे म्हणजे एखादा ग्रंथ वाचणे नव्हे; तर एका सजीव परंपरेत प्रवेश करणे.". शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, कौमार आणि सौर ह्या मुख्य पंथांची तोंडओळख करून दिली आहे. पुढे "भक्ती परंपरा" मूळ धर्माच्या विपरीत नाही तर तिने धर्माला लोकाभिमुख केले हे सांगत हजारो वर्षांचा ज्ञानाचा प्रवास अगदी आत्तापर्यंत कुठल्या वळणापर्यंत पोचला आहे ह्याची जाणीव करून दिली आहे.

"दर्शनां"ची आणि "प्रस्थान त्रयी" ह्यांची ओळख



शेवटच्या प्रकरणात सगळ्याचा गोषवारा घेत अनेकातील एकरूपत्वाचा, विवेकाचा मार्ग अधोरेखित केला आहे. आपली परंपरा आंधळी नाही, तर ती विचार करायला सांगते, दुसऱ्याचे विचार ऐकायला सांगते. त्यात विरोधाभास दिसला तरी जवळून बघितल्यावर त्यात भिन्नतेचा सादर स्वीकार आहे. म्हणून समारोप करताना ते म्हणतात, "आपण विचार करणार का, प्रश्न विचारणार का, आणि विवेकाने जगणार का - यावरच या परंपरेचा खरा अर्थ अवलंबून आहे.".

माधव जोशींसारख्या कॉर्पोरेट क्षेत्र गाजवलेल्या आणि अजूनही त्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीने आपल्याला हा विषय समजावून सांगितला आहे.
माधव जोशींच्या पुस्तकात दिलेल्या माहितीचा थोडा भाग.


ते स्वतः वेदपारंगत पंडित किंवा धर्ममार्तंड असे नसल्यामुळे, कदाचित, बोजड - अगम्य अशी शब्दरचना त्यांनी केलेली नाही. तसंच अपेक्षित वाचकवर्ग आणि पुस्तकाच्या भूमिकेला साजेसे तपशीलच दिले आहे. ग्रंथ आणि त्यातला विषय ह्याकडे अंगुलीनिर्देश करून चर्चा थोडक्यात आटपली आहे. त्यामुळे निवेदनाचा ओघ कायम राहिला आहे. ह्या ग्रंथांवरच्या टीका (उणीवा दाखवणे, चूक ठरवणे ह्या अर्थी), समाजसुधारक किंवा परधर्मीयांनी दाखवलेले दोष हा भाग मात्र पुस्तकात घेतलेला नाही. ह्यावरही थोडं लिहायला हवं होतं असं वाटलं. तसंच स्वधर्मियांनी ग्रंथांचा चुकीचा किंवा स्वार्थी अर्थ लावल्याने झालेले नुकसान ह्याबद्दल थोडं लिहायला हवं होतं. जेणेकरून ह्या अभ्यासाची दुसरी बाजूही समजली असती.

आता काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे गणपती समोर भक्तीभावाने आरत्या म्हणताना तुम्ही या ओळी सहज म्हणाल ..

नेति नेति शब्द न ये अनुमाना ..

साही विवाद करिता पडले प्रवाही 
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ..

गुरुभजनाचा महिमा न कळे अगमानिगमासी...

पण या ओळीतले "नेति नेति" हे तत्वज्ञान, विवाद करणारी ती सहा म्हणजे सहा दर्शने कुठली, श्रमलेले चार म्हणजे चार वेद कुठले, ते विवाद करतायत म्हणजे काय, आगम-निगम म्हणजे कुठले ग्रंथ हे ह्या पुस्तकातून कळेल. लक्षात येईल की वरील आरत्यांमध्ये या ग्रंथांबद्दल अनादर दाखवलेला नाही तर त्या ग्रंथांत खूप चर्चा आहे तर कठोर वादविवाद आहे, ज्यांना तो झेपणार नाही त्यांच्यासाठी सोपा भक्तीमार्ग ह्याच ग्रंथांत सांगितललेला आहे. 

असे हे पुस्तक माहितीने भरलेलं आहे. मी ते पुस्तक उत्सुकतेने भराभर वाचले. पण त्यात आलेली ग्रंथांची नावे, परस्परसंबंध आणि संज्ञा नीट लक्षात राहण्यासाठी पुन्हा वाचणार आहे. काही काळाने पुन्हा वाचून उजळणीही करावी लागेल. हे पुस्तक वाचून हिंदू धर्मियांना आपल्याच धर्माची माहिती कळेल. अज्ञानाने सगळ्याच संचिताला नाकारण्याचा करंटेपणा टळेल. प्रत्येक शब्द तर्काच्या व अनुभवाच्या कसोटीवर घासून घ्यायला आपल्या ग्रंथांची ना नाही उलट तेच अपेक्षित आहे हे जाणवलं की आधुनिक विज्ञान आणि हिंदूधर्म ह्यांच्यात उभा दावा नाही हे जाणवेल. काही तर्कशुद्ध अभ्यासू ह्या अभ्यासाकडे वळू शकतील. तुम्हीही वाचा. तुमच्या पुढच्या पिढीच्या प्राथमिक प्रश्नांना उत्तरं तरी देता यावीत आणि प्रगत प्रश्नांसाठी काय वाचायला हवं हे समजेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

ग्रंथ स्पंदन (Granth Spandan)

पुस्तक - ग्रंथ स्पंदन (Granth Spandan) लेखक - चन्द्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८४ प्रकाशन - ऑगस्ट २०२६...