तुकाराम (Tukaram)




पुस्तक - तुकाराम (Tukaram)
लेखक - शफी पठाण (Shafi Pathan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१६
प्रकाशन - न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, जुलै २०२६
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-81-69805-01-8

सध्या (२०२६ मध्ये) गाजत असलेले आयएएस अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. मे २०२६ मध्ये महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी अन्न व औषध भेसळीविरोधात राज्यभर अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम उघडली आहे. त्यांच्या कडक कारवायांमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक, तसेच अन्न व औषध उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ह्या आधीही तुकाराम मुंढे ह्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या तिथे तिथे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ख्याती झाली होती. सहकारी, वरिष्ठ आणि राजकारणी ह्यांच्या नाराजीला व दबावाला न जुमानता जे काम नियमानुसार आहे ते काम ते प्रामाणिकपणे आणि शिस्तशीरपणे करत आले आहेत. साहजिकच त्यांची कारकीर्द वादळी ठरली आहे. सामान्यतः एका आयएएस अधिकाऱ्याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो, परंतु तुकाराम मुंढे यांच्या अवघ्या २१ वर्षांच्या सेवेत २५ पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. खोटेनाटे आरोप झाले आहेत. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे ज्यांचे अवैधधंदे बंद झाले अशा "सामान्य जनतेनेही" त्यांना हटवण्यासाठी खटपटी केल्या आहेत. पण ह्या कुठल्याही दबावाला न जुमानता त्यांनी आपला शिस्त आणि नियम ह्यांचा मार्ग सोडला नाहीये.

त्यांची कारकीर्द अजून बरीच बाकी आहे. परंतु राजकारणी - समाजकारणी - प्रशासन - जनसामान्य ह्या प्रत्येक बाबतीत "सारेच दीप कसे मंदावले आता" अशी अवस्था अनुभवाला येत असताना असताना मुंढे साहेबांसारखे काही एकांडे शिलेदार पाय रोवून उभे राहतात ही अपूर्वाईची, कौतुकाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता वाटते की हे मुंढे साहेबा इतरांपेक्षा असे वेगळे का वागतात ? दबाव झुगारून देण्याचं आत्मिक बळ कसं आलं ? मुळात त्यांना प्रशासकीय अधिकारी का व्हावंसं वाटलं ? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील शफी पठाण लिखित "तुकाराम" ह्या चरित्रात.

तुकारामजींच्या जन्मापासून ते त्यांना आयएएस अधिकारी म्हणून पाहिलं पूर्णवेळ पोस्टिंग मिळालं तिथपर्यंतचा काळ ह्या पुस्तकात आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावी १९७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. घरची शेती होती पण त्यातून पुरेसं उत्पन्न नसल्यामुळे परिस्थिती अतिशय हलाखीचीच. तुकारामजींचे वडील अतिशय कष्टाने तरी प्रामाणिकपणे कुटुंब चालवत होते. पिढीजात परंपरेनुसार मुलंही शाळकरी वयाची झाली की त्यांनी शेतीच्या कामात स्वतःला जुंपून घ्यावं हीच त्यांची अपेक्षा. त्यानुसार तुकारामजींचा मोठा भाऊ - अशोक -काम करू लागला. लहान तुकारामही शाळा आणि शेतीकाम असं दोन्ही संभाळू लागला. पण गरीबीचं दुष्टचक्र थांबत नव्हतं. मोठ्या अशोकने वेगळा विचार करायचं ठरवलं, शिक्षणासाठी घर सोडलं. छ. संभाजीनगरला गेला. पुढे वडिलांचा विरोध पत्करून तुकारामलाही संभाजीनगरला नेलं.

दोघांनी अर्धपोटी, उपाशीपोटी राहून शाळा, महाविद्यालय पूर्ण केलं. इंग्रजी सुधारलंशहरात आल्यापासून एक ध्येय अशोकरावांनी तुकारामजींच्या मनात बिंबवलं होतं की "तुला कलेक्टर व्हायचंय". ते कसं व्हायचं हेही ते ठरवत गेले. त्यामुळे मोठ्या भावाने सांगितलं त्याप्रमाणे शाळा, कॉलेजची निवड, विषयांची निवड तुकारामजी करत गेले. वर्षानुवर्षे प्रयत्न केले. आयएएसची मुख्य परीक्षा पुन्हा पुन्हा अनुत्तीर्ण होण्याच्या नामुष्कीलाही तोंड द्यावं लागलं. खर्च भागवण्यासाठी काही नोकरी करायची आणि दुसरीकडे अभ्यास करत राहायचा अशी काही वर्ष गेली. स्वतःचं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची शैली, मुलाखत देण्याची पद्धत, आक्रमकता ह्या प्रत्येक बाबतीत स्वतःत आवश्यक बदल घडवत गेले. टाकीचे घाव सोसून शेवटी ते आयएएस झाले.

प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असतानाही अनधिकृत बांधकामे पडण्याची कारवाई, डान्सबारवर अचानक छापा घालणे ह्यातून त्यांनी पुढच्या वाटचालीची चुणूक दाखवली. राजकारण्यांनी हा संदेश बरोबर ओळखला. पूर्णवेळ सेवा सुरु होण्याआधीच व्यवस्थेला नकोशी व्यक्ती ते ठरले. त्यातून अगदी पहिला नियुक्ती आदेश सुद्धा दोनदा रद्द झाला !

हा सगळा जीवनप्रवास लेखकाने अतिशय सविस्तरपणे मांडला आहे. लहान लहान प्रसंग कसे घडले असतील ह्याचं मनोज्ञ वर्णन आहे. त्यामुळे पुस्तक थोडं संथ लयीत आणि बरेच तपशील सांगत चालतं. काहीवेळा थोडं एकसुरी झालं तरी पण आपण पुढे पुढे वाचत राहतो. गरीबी, साधनांची कमतरता, भूक ह्याला तोंड देतानाचे प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी येतं. गावातून शहरात आल्यावर होणारा गोंधळ - फजीती वाचताना थोडं हसू येतं. ह्या सगळ्यावर मत करत प्रचंड मेहनत घेऊनही जेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा अपयश येतं तेव्हा ते जितके निराश झाले तितकेच आपणही आपण निराश होतो. यश मिळतं तेव्हा आपणही मनात "पेढे वाटा" असं म्हणतो. अधिकारी म्हणून नियमानुसार काम करूनही राजकारणी दबाव येतो तेव्हा आपणही त्रस्त होतो. ह्या नव्या तरुण अधिकाऱ्याची आपल्याला काळजी वाटते. ह्याचं कारण तुकारामजींच्या जीवनातील आशा-निराशा, यश-अपयश, वडिलांचा विरोध - भावाची साथ, स्वतःच्या आवडीनिवडी आणि भावाने सांगितलं तसंच वागायचं हे सगळे ताणेबाणे लेखकाने आपल्यासमोर जिवंत केले आहेत. समरसून लिहिले आहे. जणू एक कादंबरीच आपण वाचतो आहोत असे आपण त्यात गुंगून जातो. हे लेखकाच्या निवेदनाचे यश आहे.

तुकारामजींची सेवा अजून सुरु आहे म्हणून कदाचित पुढचा कालखंड पुस्तकात घेतला नसावा. तसंच जो भाग घेतला आहे तिथेही संबंधित राजकारणी, अधिकारी ह्यांची थेट नावे न लिहिता सूचक उल्लेख केले आहेत.

काही पाने उदाहरणादाखल

घरच्या परिस्थितीची एक झलक आणि वडिलांना विरोध


परीक्षेत यश मिळवण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न आणि पुन्हा पुन्हा हुलकावणी


आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून राजकारण्यांचे पहिले दर्शन



तुकारामजींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, बालपणाबद्दल उत्सुकता म्हणून हे पुस्तक वाचायला घेणं स्वाभाविकच आहे. पण त्या व्यतिरिक्तही खेडोपाड्यांतल्या मुलांनी हे पुस्तक विशेष वाचलं पाहिजे. आर्थिक दुर्बल परिस्थितीशी झगडताना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा शिक्षण हाच मुख्य मार्ग आहे, शिक्षणाची हेळसांड करता कामा नये हा विचार त्यांच्या मनात रुजेल. त्याचवेळी "स्पर्धा परीक्षा" ह्याबद्दल वाढता "रोमँटिसिझम" कमी व्हायलाही मदत होईल. "स्पर्धा परीक्षा" देणं, त्यात उत्तीर्ण होणं किती खडतर, वेळखाऊ आणि शरीर-मन-बुद्धी ह्यांचं शोषण करणारं आहे हे लक्षात येईल. जर आपली आवड, बौद्धिक क्षमता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जनसेवेची भावना मनात नसेल तर ह्या परीक्षांच्या नादी लागू नये, ह्याचं भान येईल. पुस्तक वाचून असं जाणवतं की "कलेक्टर हो" ही मोठ्या भावाची महत्त्वाकांक्षा होती. तुकारामजींचा स्वतःची निवड नव्हती. सध्या बालसंगोपन आणि करियरनिवड ह्याबद्दल समुपदेशन करताना पालकांना सांगतात की आपली स्वप्न, आपली आवड मुलांवर लादू नका. त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना शिक्षण घेऊ द्या, करियर निवडू द्या. दुर्दैवाने तुकारामजींना हे स्वातंत्र्य मिळालं नाही, ही भावना मनात येते. आयएएस ऐवजी ते इतर काही शिक्षण घेऊ शकले असते तर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लवकर आणि जास्त चांगलं देऊ शकले असते. कदाचित एखादा चांगला संशोधक, पत्रकार किंवा नवउद्यमी मिळाला असता, कुणी सांगावं !


असं हे प्रेरणादायी, विचारप्रवृत्त करणारे आणि अगदी ताज्या विषयावरचं पुस्तक वाचकांना नक्की आवडेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad)

पुस्तक - वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad) लेखक - माधव जोशी (Madhav ...