निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha)



पुस्तक - निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha)
लेखक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo) 
भाषा - मराठी 
पाने - 205
ISBN - 978-93-886493-54-5


प्रणव सखदेव या नव्या पिढीच्या लोकप्रिय लेखकाचा कथासंग्रह आहे. लेखकाबद्दल आणि पुस्तकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 


अनुक्रमणिका 


या कथांबद्दल थोडक्यात सांगतो


हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा
एक ऑफिस बॉय आपल्याशी बोलतो आहे ज्याला फेसबुक वर पोस्ट टाकून टाकता टाकता आपल्यात दडलेल्या लेखकाची जाणीव झाली आहे. तो आपल्याला गोष्ट सांगतोय त्याने निर्माण केलेल्या पात्रांची. या गोष्टीत एका माणसाची ओळख चोरले जाते म्हणजे दुसराच माणूस त्याचं रूप घेऊन वावरू लागतो वावरू लागतो.




कथा सांगण्याची गोष्ट 
यात दोन पात्र आहेत- नवरा-बायको. नवरा-बायको त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगतायत. लग्नानंतर सुरुवातीला मुल नको असं ठरवणारी; नंतर मूल हवं वाटू लागलं तेव्हा, होत नाही म्हणून झुरणारी आणि झाल्यावर त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या जोडप्याची ही गोष्ट आहे
पण दोघांचं वर्णन पूर्णपणे वेगळे आहे. मग नक्की काय खरं? असं वाचकाला कोड्यात टाकणारी कथा आहे.

कतरा कतरा जीते है 
एका विवाहित तरुणाच्या आयुष्यात एका दिवशी त्याची पूर्वीची प्रेयसी परत आली तर काय होऊ शकतं ?

पंख असलेल्या माणसाची गोष्ट 
पंख असलेला एक माणूस पृथ्वीवर वावरतो आहे तो खरा देवलोकातील शापित व्यक्ती आहे. देवलोकात त्यांनी असं काय केलं; ज्यामुळे त्याला हा शाप मिळाला मिळाला त्याची गोष्ट आहे.

निळ्या दाताची दंतकथा 
एक कल्पना कथा ज्यात एका माणसाच्या पापा साठी शिक्षा म्हणून त्याला निळा दात येतो. आणि तो दात कोणी बघितला की माणूस मारतो.

भूत. के. 
ज्याप्रमाणे सफाई कर्मचारी आपल्या घरातला गावातला कचरा गोळा करतात त्याप्रमाणे भूतकाळाच्या क्षणांचा कचरा गोळा करणारे "भूत. के." हे कर्मचारी आहेत अशी कल्पना मांडून सफाई कामगारांचे काम महत्त्वाचं असलं तरी त्यांना योग्य तो मान मिळत नाही हे सांगणारी कथा.

शे. उ. वा. ची अखेरची गोष्ट
"वाघ वाचवा, निसर्ग वाचवा" अशा घोषणा एकीकडे आणि निसर्गाचा ऱ्हास दुसरीकडे ह्या सद्यस्थितीवर बेतलेली ही कथा आहे.




डावे-उजवे पांडव
वेगवेगळ्या विचारधारांचे, पक्षांचे लोक एकमेकांविरुद्ध हिंसक पातळीवर उतरताना आपण पाहतो. आपल्या शरीरातले अवयव सुद्धा दोन विचारसरणीचे दोन गट बनून वागायला लागले, भांडायला लागले तर काय होईल !!

#मनकवडीनगरीडॉटएचटीएमएल
एक प्रियकर प्रेयसी स्वतःला हवं असलेलं जग कल्पनेत का होईना मिळावं; आपल्याला ज्या गोष्टी, जितक्या प्रमाणात, जेव्हा हव्या तेव्हा मिळाव्यात, म्हणून व्हिडीओगेम सारखं एक आभासी जग तयार करतात आणि त्यातच गुंगून जातात आणि हळूहळू त्याच्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात येतो असं कथाबीज आहे.



कथांच्या संक्षेपातल्या ओळखी वरून लक्षात आले असेल की ह्या कथा थोड्या फॅन्टसी/कल्पनारम्यते कडे झुकणाऱ्या आहेत. पण यातली फॅन्टसी ही तोंडी लावण्या पुरतीच आहे आहे. खरंतर लेखकाला सामाजिक वास्तव वगैरे मांडायचं आहे, त्यावर स्वतःची टीकाटिप्पणी करायची करायची आहे; त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार वाटतो.
उदाहरणार्थ "निळ्या दाताची दंतकथा" मध्ये लेखकाला राजकीय किंवा वैचारिक हिंसा कशी होते आणि ती पुढे पुढे कशी चालू राहते हे सांगायचं आहे त्यातल्या पात्राला स्वप्नात दिसतं की हिंसा करणाऱ्याला शिक्षा म्हणून निळा दात मिळालेला आहे. मग त्या पात्राच्या खऱ्या आयुष्यात काही गोष्टी घडतात. पण स्वप्नातला निळा दात, खऱ्या घटना, हिंसा ह्यांचा तसा काही अनोन्यसंबंध नाही.

"डावे-उजवे पांडव" या कथेत डावा भाग, उजवा भाग म्हणजे साधारणपणे डावी विचारसरणी व उजवी विचारसरणी किंवा दोन विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांच्यात होणारी हिंसा हा भाग स्पष्ट दिसतो. त्यामुळे ती फॅन्टसी ठरत नाही. तिला रूपककथा म्हणावं तर पंचतंत्र, हितोपदेशासारख्या गोष्टींमधून रूपकांचा वापर केला आहे तसा इथे दिसत नाही. जे सांगायचं, दाखवायचं आहे ते तसं स्पष्ट दाखवलं आहे. फक्त पात्रांची नावं वास्तव जगातली देण्याऐवजी काहीतरी बदल इतकंच.

"हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा" कथेमध्ये सुरुवात वेगळीच होते. एक माणूस फेसबुक वर काहीतरी लिहितोय आणि लोकांची आयडेंटिटी चोरतो. आधुनिक तंत्रज्ञानाशी, आधुनिक संकल्पनांशी निगडित अशा घटना घडतात. पण पुढे ती कथा टिपिकल परकायाप्रवेश वळणावर जाते. "व्यक्ती दिसते-वागते तशीच असते असे नाही. तिच्या मनात बरंच काय चाललेलं असतं. तिच्या वागण्यामागे बरीच कारणं असतात" इत्यादी नेहमीचे मुद्दे येतात. त्यामुळे सुरुवातीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भाचा पुढे विचकाच होतो.

"भूत. के." कथेमध्ये भूतकाळ वेचणारे लोक अशी भारी संकल्पना आहे पण पुढे त्या कल्पनेवर अचानक सफाई कामगारांच्या वास्तवाचं कलम होतं. लेखक आपली फॅण्टसी ची हॅट टाकून सामाजिक लेखनाची उबळ दाखवतो.

"मनकवडी नगरी"मध्ये ते जोडपं एक काल्पनिक जग तयार करतं आणि त्यात एका गोष्टीची कमतरता राहते. पण ती कमतरता का राहते? त्यांना ते का तयार करता आलं नाही? हे काही त्या गोष्टीत लेखक सांगत नाही. का ? तर, ती गोष्ट आयुष्यात महत्वाची आहे हे लेखकाला सांगायला सोयीचं जावं म्हणून.

गोष्टींमध्ये लैंगिक प्रसंगांची, अवयवांची उघड वर्णनं टाकून बोल्डपणा आणायचे प्रयत्न केला आहे. 

एखाद्या पाककृती प्रमाणे; दोन चमचे फँटसी, चार चमचे सामाजिक वास्तव, सेक्स "स्वादानुसार", वरून सामाजिक भाषेची फोडणी असं सगळं ठरवून केल्याप्रमाणे वाटतं. पण भट्टी काही जमत नाही. या कथा वाचताना सुरवात छान आणि पुढे निरस वाचन अशी अवस्था होते. कुठलीच कथा मला काही भावली नाही.

पुस्तकाच्या शेवटी लेखकाने स्वतः घेतलेली स्वतःची मुलाखत आणि माझा लेखन प्रवास, लेखनाच्या प्रेरणा वगैरे सांगितलं आहे. आत्मस्तुतीचा हा प्रकार पहिल्यांदाच वाचनात आला. 



पुस्तकाला बरेच पुरस्कार वगैरे मिळाले आहेत. त्यामुळे पुरस्कार प्राप्तपुस्तकांचं आणि काहीतरी वाकडं आहे हा "पॅटर्न" या पुस्तकाने सुद्धा चालू ठेवला ! गंमतच आहे !!



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

पांडेपुराण (Pandepuran)




पुस्तक - पांडेपुराण (Pandepuran)

लेखक - पीयूष पांडे  (Peeyush Pandey)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५५
मूळ पुस्तक - Pandeymonium (पांडेमोनिअम
)
मूळ पुस्तक भाषा - इंग्रजी (English) 
अनुवाद - प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
ISBN :978-93-86118-47-9

वाचनालयात हे पुस्तक बघितलं तेव्हा पीयूष पांडे कोण आहेत याबद्दल मी अज्ञानी होतो.

पण पुस्तकाच्या नावात "जाहिरात आणि मी" हा उल्लेख आणि मलपृष्ठावरची माहिती याच्यावरून जाहिरात विश्वाशी संबंधित ही एक मोठी व्यक्ती आहे आणि तिने आपले अनुभव पुस्तकात सांगितले आहेत हे कळलं. जाहिरातविश्वाशी माझा थेट संबंध नाही. म्हणूनच मला माहिती नसलेल्या या क्षेत्राबद्दल थोडेफार समजून घ्यायची संधी या पुस्तकातून मिळेल या अपेक्षेने हे पुस्तक घेतलं.

तुम्हाला पीयूष पांडे हे नाव माहिती असेल किंवा नसेल तरीही त्यांनी केलेल्या जाहिराती तुम्हाला नक्कीच माहिती असतील. फेविकॉल ची ती जाहिरात ज्यात राजस्थान मधला एका ट्रकवर सगळीकडे माणसं कोंबलेली आहेत ती पाहिली असेल.

फेविक्विची जाहिरात आठवतेय? एक माणूस गळ टाकून बसलाय पण मासे लागत नाहीत तेवढ्यात दुसरा येतो आणि काठीला फेविक्विक लावून एका मिनिटात मासे पकडून जातो. 


वोडाफोन झु झु !!
आठवल्या जाहिराती??

या सगळ्या मागचं कलात्मक डोकं पीयूष पांडे आणि त्यांच्या ऑगिल्वी कंपनीच्या टीमचं. अशा एकाहून एक सरस जाहिराती देणाऱ्या पांडे यांच्या बद्दल पुस्तकात दिलेली माहिती.


हे पुस्तक आत्मचरित्र नाही किंवा आठवणींचा प्रवास अशा पद्धतीने नाही. तर काही आठवणी, काही महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या कामावर परिणाम करणाऱ्या घटना, त्यातून शिकलेले धडे असं सरमिसळ पद्धतीचं आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.



पुस्तकाच्या पहिल्या भागात पांडे यांचे एकत्र कुटुंब; त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे त्यांचे भाऊ-बहिणी, भाचे, पुतणे इत्यादींमुळे लहानपणापासून आत्ता त्यांच्या पर्यंत त्यांचा अनुभवांचा आवाका आपोआप कसा वाढला हे आपल्याला दिसतं. आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार असा बहुरंगी असण्याचे फायदे त्यांनी सांगितले आहेत. आपला परिवार तसा नसेल तर किमान आपल्या मित्रपरिवार तरी आपण तसा तयार केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याशी संबंधित नसलेले, आपल्यापेक्षा अगदी वेगळेच वागणारे लोक यांच्याशी आपली गट्टी जमते आणि त्यांच्याशी बोलून आपल्याला नव्या संकल्पनांचा कस लावून बघता येतो असं ते म्हणतात.




पुस्तकाच्या पुढच्या भागात जाहिरात क्षेत्राशी संबंधित त्यांनी शिकलेले धडे आणि मार्गदर्शक सूत्र असे लेख आहेत. त्यातून वेळोवेळी केलेल्या जाहिराती आणि जाहिराती बनवण्याची प्रक्रिया यामध्ये आपल्यालाही तर डोकावून बघता येतं उदाहरणार्थ जाहिरात आपल्या दिसते तसेच ऐकू येते आणि तसे संगीत कसे आहे यावरून तिची परिणामकारकता कमी अधिक होत असते हे सोदाहरण सांगितलं आहे.




पुढचे लेख लाला कंपन्यांवर आहे. "लाला कंपनी" म्हणजे अशी कंपनी ज्यात सर्व कारभार कुटुंबीयांच्या हातात. तसं बघायला गेलं तर बिरला, रिलायन्स, पिडिलाइट या लाला कंपन्याच आहेत पण त्यांचा दृष्टिकोन बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखाच आहे असा पीयूष पांडे यांचा अनुभव आहे. त्यामुळे, कंपन्यांमध्ये अशी वर्गवारी लोक करतात आणि त्याचा कसा परिणाम होतो हे वाचणे मजेशीर आहे.

पुढच्या भागात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात कुठले गुण गुण असावेत याबद्दल सांगितलं आहे. या भागातल्या एका लेखात ते आपल्या मतांशी ठाम राहा असे म्हणतात तर आधीच्या प्रकरणात, आपली मतं दुसऱ्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यातून बदल घडवा असं सांगतात. बघायला गेलं तर हे परस्परविरोधी वाटतंय. पण यशस्वी व्हायचे असेल तर दोन्ही गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. तो त्यांना जमला म्हणूनच ते यशस्वी असे म्हणायला हरकत नाही.

जेव्हा चाकोरी मोडणारी काही संकल्पना आपण मांडतो तेव्हा त्याला विरोध होणे, त्यावर कोणी विश्वास न ठेवणे सहाजिक आहे. पण जर आपल्याला ती संकल्पना मनापासून आवडली असेल आणि तिचा पाठपुरावा केला तर लोक तोंडात बोट घालतीलअसे यश मिळू शकते. त्यामुळे जोखीम उचलण्याची तयारी सुद्धा पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांना ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ झु झु ची कल्पना मांडली गेली तेव्हा तिचा स्वागत कसं झालं पुढे त्याच्यावर काम कसं झालं त्याबद्दल हे वाचा.




व्यवसायिक काम करताना त्यातून मिळालेले व्यवसायिक यश,पैसा,प्रसिद्धी हे आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे मापदंड असतातच. पण जेव्हा या व्यावसायिक कामातून काहीतरी समाजोपयोगी घडतं तेव्हा त्याची मजा काही वेगळीच असते. पीयूष यांना राष्ट्रीय साक्षरता मिशन साठी पोलिओ अभियानासाठी काम करायची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी गायलेलं "मिले सुर मेरा तुम्हारा" या बहुसांस्कृतिक गीताची निर्मितीसुद्धा पांडे यांच्या टीमनेच केली आहे. अशी कुठली कामं त्यांना करायला मिळाली हे त्यांनी पुढच्या लेखात सांगितलं आहे

पुढचा विभाग "ऑगिल्वी आणि मी" हा त्यांची कंपनी, त्यातली नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा आहे.

प्रादेशिक बहुसांस्कृतिक वाद लेखात त्यांनी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांची टीम उत्कृष्ट काम करू शकते याची जाणीव करून करून दिली आहे. मल्टिनॅशनल कंपनी म्हणजे फक्त जगात अनेक ठिकाणी कचोर्‍या असणारी कंपनी नव्हे तर अनेक ठिकाणची माणसं अनेक संस्कृतीतली माणसं जिथे काम करतात अशी कंपनी. कारण एखादी जाहिरात एका देशात तुफान चालेल तर दुसऱ्या देशात ही संकल्पना वादग्रस्त ठरेल. एखादी गोष्ट एका राज्यात लोकांना भावेल दुसऱ्या राज्यात लोकांना त्याच्याशी रिलेट करता येणार नाही म्हणूनच बहुसंस्कृतिक टीम असेल तरच एका पठडीतला विचार होणार नाही.

२०१४ च्या निवडणुकीतली "आपकी बार मोदी सरकार", "अच्छे दिन आने वाले है" ह्या लक्षवेधी घोषणा सुद्धा पीयूष यांच्याच आहेत त्याबद्दल त्यांनी थोडे सांगितला आहे.

शेवटच्या भागात त्यांनी जाहिरात क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा वेध घेतला आहे. 



इतकं मोठं यश मिळवून सुद्धा त्यांनी स्वतःची कंपनी काढली नाही ogilvi शी एकनिष्ठ का राहिले राहिले याबद्दल स्वतःची प्रामाणिक व समाधानी भूमिका समोर ठेवली आहे. पत्रकारांच्या गोसीपिंगला उत्तर !!

असे एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत जाहिराती बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. कारण वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मथळ्याऐवजी पानभर जाहिरात असते आणि रात्री झोपताना मोबाईलवर फेसबूक चेक करताना जाहिरात बघत किंवा युट्युबवर गाणे ऐकताना ऐकताना सुद्धा शेवटची स्किप ऍड करूनच आपण झोपतो. या जाहिराती तयार होताना पडद्यामागे काय घडतं याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. पण पुस्तक फारच तुटक आणि त्रोटक पद्धतीने लिहिले आहे असं मला वाटलं.२०१४
 चा निवडणूक प्रचार आणि त्यात असलेला जाहिरातींचा वाटा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या जाहिराती कशा घडल्या; प्रत्यक्ष मोदींसह किंवा भाजपच्या दिग्गजांचे मार्गदर्शन कसे होते हे सविस्तर समजून घ्यायला आवडलं असतं. पण लेख तीन-साडेतीन पानांत गुंडाळला आहे. "मिले सुर मेरा तुम्हारा",फेविकॉल आणि इतर लक्षात राहिलेल्या जाहिरातींच्या अशा जन्मकथा सविस्तर वाचायला मिळतील ही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे एखाद्या उत्तम आचाऱ्याने आज स्वयंपाक काय केला आहे याचे नमुने आपल्याला दाखवावे, आपल्या तोंडाला पाणी सुटावं; आता जेवण कधी वाढतोय याची वाट बघावी तर पान पुढ्यात येतच नाही अशी भावना होते. ह्या विषयावर दुसरे पुस्तक त्यांनी लिहिलंय का हे बघायला पाहिजे. 

मराठी अनुवाद उत्तमच झाला आहे. अनुवादात कुठे ठेच लागत नाही. "पांडे"जी नव्हे तर "श्री. देशपांडे" आपल्याशी बोलतायत असंच वाटतं.

जाहिरातींच्या जुन्या आठवणींना उजाळा, कहाण्याची थोडीशी झलक, एका यशस्वी व्यक्तीच्या 'यशस्वी कसे व्हावे' व 'यशस्वी टीम कशी असावी' याबद्दलच्या टिप्स समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

मसालाकिंग (Masalaking)




पुस्तक : मसालाकिंग (Masalaking)
लेखक : धनंजय दातार (Dhananjay Datar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८१
ISBN : दिलेला नाही

मराठी माणूस सहसास धंद्यात पडत(!) नाही. पण पडलाच तर निग्रहाने पडतो. सर्वोत्तम व्यवसाय करण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी मेहनत घ्यायची इतकी तयारी असते की पुढे त्याचे यश सर्वांना अचंबित करते. अशा यशस्वी उद्योगपती पैकी  धनंजय दातार आहेत. दुबई आणि आखाती देशांमध्ये  त्यांचा मसाल्याचा व्यापार व्यापार आहे.  या व्यापाराचा दबदबा इतका आहे की प्रत्यक्ष दुबईच्या राजघराण्यातल्या व्यक्तीने त्यांना "मसालाकिंग" म्हणत गौरवले होते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली थोडी माहिती.



या पुस्तकात धनंजय दातार यांनी स्वतः त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रवास आठवणींच्या साखळीतून उलगडला आहे त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या घटना रंजक पद्धतीने सांगितले आहेत.

अनुक्रमणिका :


आज किंग झालेले झालेले दातार लहानपणी मात्र निम्न मध्यम वर्गीय वर्गीय गरीब घरातच वाढले लहानपणच्या परिस्थिती ची एक आठवण


परदेशी जाऊन आलेली माणसं खूप श्रीमंत होतात त्यामुळे गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर आपणही परदेशात जायला जायला आपणही परदेशात जायला परदेशात जायला जायला पाहिजे हा विचार किंवा वेड तरुण वयातच त्यांना प्रदेशाकडे खेचत होतं. त्यामुळे शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीपासूनच व्हायच्या आधीपासूनच परदेशात जायचं वेड त्यांच्या मनात संचारलं होतं. त्यांच्या वडिलांनी दुबई मध्ये जाऊन छोटासं दुकान काढलं होतं आणि ते ठीक-ठाक चालत होतं. त्यामुळे त्यांनाही दुबईला जाण्याचा मार्ग खुला झाला. वडिलांची फारशी संमती नसताना ते दुबईला वडिलांचा दुकानात कामाला गेले आणि मग खरा परदेश, परदेशातले कष्ट त्यांना दिसले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मालकाचा मुलगा म्हणून डोक्यावर न चढवता सर्व लहान-मोठी काम कष्टाचे काम करायला लावली आणि उमेदवारी सुरु झाली त्यावेळच्या वसुलीच्या कामाचा एक प्रसंग




ह्या सुरुवातीपासून त्यांचा आजपर्यंतचा खडतर प्रवास, आलेल्या अडचणी, काढलेले मार्ग, शिकलेले धडे, अपघात आणि शारीरिक व्याधींची संघर्ष इत्यादी त्यांनी पुढे पुस्तकात मांडले आहे. या सगळ्याचा उद्देश उद्देश स्वतःची शेखी मिरवणे नसून हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना हे अनुभव मार्गदर्शक ठरावे ही प्रामाणिक इच्छा इच्छा आहे.  म्हणून स्वतःच्या अनुभवावर आधारित काढलेले निष्कर्ष सुद्धा त्यांनी होतकरू व्यावसायिकांसाठी सांगितले आहेत हे काही सल्ले वाचा




पुस्तकात त्यांनी त्यांच्या आई-वडील पत्नी आणि मुलांबद्दल एक एक लेख लिहिला आहे त्यांच्या यशात या प्रत्येकाचा वाटा आहे आई-वडिलांच्या संस्काराचा, पत्नीने दिलेल्या साथीचा, मुलांनी वडिलांना आपल्याला जास्त वेळ देता येत नाहीये हे समजून घेतल्याचा...  दातारां बद्दल त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी लिहिलेले छोटे लेख पुस्तकात आहेत. धनंजय ज्यांची कुटुंबवत्सलता आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंबाचे पाठबळ सपोर्ट सिस्टीम अधोरेखित होते.



गरिबीतून श्रीमंत झाल्यावर, हातात पुरेपूर पैसा खेळू लागल्यावर काहीजण त्या पैशाने आंधळे होतात होतात तर काहीजण गरिबीच्या भीतीने कवडीचुंबक होऊ लागतात. ही दोन्ही टोके टाळत स्वतःच्या पैशाचा समाजासाठी उपयोग दातार करतात आणि संपत्तीचा तितक्यात आनंदाने उपभोग घेतात. पत्नीला दिलेली महागड्या गाडीची भेट, मुलांची विमानात लावलेली मुंज, लोकप्रिय कलावंतांच्या हस्ते दुकानांच्या शाखांचे उद्घाटन असे आनंदाचे क्षणही पुस्तकात पुस्तकात आहेत. यश आणि श्रीमंती कशी पेलावी हेसुद्धा त्यातून ते सांगतात.

या पुस्तकाची लेखनशैली चांगली आहे. अजिबात पाल्हाळ न लावता ठळक घटना पटापट सांगितल्या आहेत. लेखक अतिशय प्रांजळपणे आपले गुणदोष सांगतात. वाचकांच्या भावनांना हात घालण्यासाठी गरीबी आणि कठीण प्रसंगांचं उगाळत बसले नाहीयेत. आणि यशाच्या प्रसंगांत आत्मप्रौढी नाहीये.  

दातार यांना मिळालेले पुरस्कार



त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी दातार स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी जातात. असे मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर ठरेल. परदेशात भारताचे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धनंजय दातार यांच्या कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी पुस्तक अवश्य वाचा.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

वास्तविक (vastavik)




पुस्तक : वास्तविक (vastavik)
लेखक : सुहास शिरवळकर (Suhas Shirvalkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९२
ISBN : दिलेला नाही

"सुशि..", "सुशि.." अर्थात सुहास शिरवळकर हे नाव पुस्तक वाचकांच्या फेसबुक गटावर बऱ्याचवेळा ऐकलं होतं. पण अजूनपर्यंत मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. म्हणून यावेळी वाचनलयातून "सुशी आणायची" असं ठरवूनच गेलो होतो. वाचनालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा होता. आणि कादंबऱ्यांचा रतीब घातलेला दिसला. त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीचं नाव माहीत होतं. त्यावरचा चित्रपट बघितला असल्यामुळे ती सोडून वेगळं पुस्तक घ्यायचा विचार केला. शेवटी हे पुस्तक घेतलं.

जाहिरात क्षेत्रात अभिनय किंवा रूपदर्शन ( मॉडेलिंग ला मी सुचवलेला शब्द) करणाऱ्या एका युवकाची ही गोष्ट आहे. प्रेमकथा आहे. या क्षेत्रातला नायक म्हटल्यावर साहजिकच कादंबरीला आवश्यक असा देखणा, उमदा तरूण नायक. त्याच्या भोवती अपेक्षितपणे सुंदर मुली घोटाळणारच. त्या मुली सुद्धा या क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा फक्त ओळख किंवा फक्त मैत्री या पातळीवर न राहता शरीरसंबध ठेवण्यास तयार किंवा उत्सुक किंवा त्याबद्दल फार काही न वाटणाऱ्या अश्या आहेत. हा नायक एकीचं प्रेम अव्हेरतो, दुसरीच्या प्रेमात ठरवून पडतो, परिस्थितीमुळे तिसरीशी लग्न करायला लागतं म्हणून दुसरीचा त्याग वगैरे करतो आणि शेवटी चौथीला जवळ करतो. त्याचवेळी त्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पहिल्या दुसऱ्या बरोबर ये जा करतात. असं एकूण लफड्यांचं कथानक आहे. आणि हे सगळं घडवण्यासाठी बेतलेल्या घटना आहेत.

काही वेळा पात्र आणि घटना पटतात तर काही वेळा "काहीही हं ... सुशी" असं म्हणावं लागतं. हे तरूण तरुणी त्यांच्या आजूबाजूल घरचेदारचे, समाजातले लोक नसल्यागत सगळ्यांचं स्वैर वागताना दाखवलं आहे. ती पात्रं बेफिकीर आहेत असं नाही पण कादंबरीसाठी लेखकाने सभोवतालच्या परिस्थितीची फार फिकीर केलेली नाही.

तरीही प्रसंग पटापट पुढे जातात, खटकेदार संवाद, अजिबात पाल्हाळ न लावता पुढे जाण्याची शैली यामुळे वाचायला कंटाळा येत नाही. पॉकेटबुक आकारात छोटी कादंबरी असल्यामुळे एका बैठकीत पूर्ण करू शकता. चार घटका हलकेफुलके मनोरंजन म्हणून ठीक आहे.

काही प्रसंग.
 उदा. नायक एका नायिकेला जाहिरात क्षेत्रातले धोके आणी त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वास्तववादी कसं वागायला पाहिजे ते सांगतो









नायकाला खोट्या गुन्ह्यात गुंतवायचा प्रयत्न होतो तो प्रसंग






"दुनियादारी" हा चित्रपट आणि हे पुस्तक दोन्ही काही भावलं नाही. सुशिंबद्दल पूर्वग्रह होऊ नये म्हणून त्यांचं सर्वोत्तम पुस्तक कुठलं सुचवाल ? खाली कमेंटमध्ये किंवा पेसबुक पोस्टवर कमेंट करून सांगा.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

राशा (Rasha)






पुस्तक - राशा (Rasha)
लेखक - शरद वर्दे (Sharad Varde)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५९
ISBN - दिलेला नाही

एकोणीसशे ऐंशीच्या दशकातला रशिया तुम्ही पाहिला आहे का? त्यावेळी रशियाला जाण्याचा योग तुम्हाला आला असेल तर तुम्ही तिथली पर्यटन स्थळ पाहिली असतील.  पण तुम्हाला त्या वेळच्या एखाद्या रशियन कंपनीबरोबर वाटाघाटींसाठी कधी जावं लागलं होतं का? तुम्ही अशा कामासाठी रशियात गेला असता तर कम्युनिस्ट राजवट कशी होती, तिचा लोकांच्या वागण्यावर, विचारांवर रोजच्या जगण्यावर कसा परिणाम झाला होता हे तुमच्या लक्षात आलं असतं. असो ! आता ती संधी मिळाली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. कारण शरद वर्दे यांच्या या पुस्तकात आपल्याला ही संधी मिळणार आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती.


रशियन लोक आपल्या मातृभूमीचा जो उच्चार करतात तो आपल्या कानांना र शी या असा ऐकू न येता राशा असा ऐकू येतो  म्हणून पुस्तकाचं नाव राशा कंपनीच्या कामानिमित्त लेखकाने रशियाला अनेक वेळा भेट दिली. तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून आपल्या कंपनीच्या उत्पादनांसाठी ऑर्डर्स मिळवल्या. हे सगळं करताना रशियन बाबूंची खाबूगिरी, त्यांचा परदेशी वस्तूंचा सोस, रशियातले निर्बंध, परदेशी माणसांवर सतत ठेवली जाणारी पाळत अश्या नाना प्रकारच्या अनुभवातून त्यांना जावं लागलं. हे चित्र-विचित्र अनुभव त्यांनी राशा या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. तेही एका डॉक्युमेंटरी सारखे नाहीत तर एखाद्या कादंबरी प्रमाणे प्रसंगांच्या मालिकेतून.

त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगात भेटलेली माणसं आपल्याला पुढच्या प्रकरणात पुन्हा पुन्हा भेटत राहतात आणि गमतीजमती घडवत राहतात. त्या त्या प्रसंगात ते तसे का वागले हे थोडं थोडं स्पष्ट होतं आणि ती एकेक व्यक्तिरेखा म्हणून आपल्यापुढे साकार होऊ लागतात.

लेखकाची प्रसंग आणि माणसांचं वर्णन करायची शैली अफलातून आहे. शाब्दिक कोट्या, स्वतःवरचे विनोद, दोन प्रसंगांची गमतीदार तुलना अशा खुसखुशीत शैलीतून प्रत्येक पान अन् पान आपल्याला हसवतं आणि तरीही त्यावेळच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि कारुण्य आपल्यापर्यंत थेट पोचतं.पुढे दिलेले प्रातिनिधिक उतारे वाचले की तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते.

परदेशात उतरताना त्या देशाच्या सिस्टिमचा अनुभव पहिल्यांदा येतो तो इमिग्रेशन मध्ये. जरा हा रशियन इमिग्रेशनचा अनुभव बघा. संथ चाललेल्या कारभारात बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले आणि रांगेत नंबर लागल्यावर हे असं झालं..



रशियामध्ये कम्युनिझम किंवा साम्यवाद असल्यामुळे सर्वांना एकच पगार, सगळ्यांनी एकाच सरकारी दुकानातून एकाच पद्धतीच्या वस्तू विकत घ्यायच्या असा प्रकार त्यामुळे परदेशी मालाबद्दल प्रचंड आकर्षण तयार झालं होतं. मग एखादा परदेशी पाहुणा आपल्याकडे कॉन्टॅक्ट मिळवायला आला की हे सरकारी बाबू दारूसाठी, परदेशी वस्तूंसाठी अगदी चटावलेले असायचे. कंपनीच्या लोकांनी अशा स्वरूपात लाच देणे हे गृहीतच होतं. कोणी नाही दिली तर ते सरळ स्पष्टपणे मागत सुद्धा होते. अशा वस्तू मिळत राहाव्या म्हणून वेळकाढूपणा करत मीटिंग लांबविण्याचे प्रकार व्हायचे तशातला हा एक प्रसंग


लेखक जेव्हा रशियाला पुन्हापुन्हा जायला लागला तेव्हा साहजिकच तिथल्या लोकांशी जवळीक वाढली आणि वरवर दिसणारं हे दिसणारे चित्र असं का याबद्दल लोकांशी बोलणे होऊ लागलं. साम्यवादात लोकांची कशी कुचंबणा होते ते समजू लागलं. उदा. तरुण मुली सतत सुंदर राहण्याचा प्रयत्न करत होत्या ते चांगला परदेशी पाहुणा गटवावा आणि रशियातून एकदाच बाहेर बाहेर पडावं यासाठी.



पुढे रशियाचे विघटन झालं रशियातून छोटे छोटे देश निर्माण झाले साम्यवादी राजवटीचा पगडा कमी झाला इतके दिवस बंदिस्त वातावरणात राहणारे लोक अचानक खुल्या वातावरणात आले. खुलं वारं त्यांना सुरुवातीला आल्हाददायक वाटलं पण त्या वार्‍याचं हा हा म्हणता वादळात रूपांतर झालं. यंत्राप्रमाणे ठराविक पठडीत काम करणार्‍या माणसांना स्वातंत्र्य, स्पर्धा यांच्याशी जुळवून घेणं कठीण झालं. त्या स्थित्यंतराचा लेखकाने घेतलेला अनुभव.



पूर्वीची सरकारी मक्तेदारी गेली म्हणून लाचखोरीला चटावलेल्या अधिकाऱ्यांचे साधू झाले नाहीत. भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग त्यांनी धुंडाळले. लेखकाच्या भागीदाराच्या बोलण्यातून त्याची जाणवलेली झलक.




पुस्तकात रशियाच्या आणि लेखकाला भेटलेल्या व्यक्तींच्या- खरं म्हटलं तर वल्लींच्या- अशा कितीतरी सुरस चमत्कारिक कथा आहे आहेत. ते वाचायला मजा येते. हे पुस्तक विचारप्रवृत्त सुद्धा करतं. समाजात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव आहे; श्रमाला प्रतिष्ठा नाही असं आपल्याला दिसतं. पण म्हणून सगळ्यांना सारखं काम, सारखा पगार, सारखा मान असं द्यावं, तरी समाजाचं समाधान होत नाहीच. लोकांची झटून काम करण्याची वृत्ती जाते. नवं काही करायची उमेदच जणू नाहीशी होते. आणि "समानांमध्ये जास्त समान" असा वर्ग तयार होतो. त्याउलट भांडवलशाहीत काळाबरोबर पावलं न टाकणाऱ्याची असहाय्य फरफट होते. या दोन्हीचा तोल साधणारी समाजव्यवस्था कशी असेल, ती कशी येईल आणि कशी टिकेल यावर समाजशास्त्रज्ञ विचार करतच आलेत. आपल्याही मनात तो विचार सुरू होईल. शरद वर्दे यांचं हे पुस्तक म्हणून नक्की वाचा त्यांची मी आधी वाचलेली दोन पुस्तकही नक्की वाचावी अशीच आहेत. त्यांची परीक्षण इथे वाचू शकाल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

कॅडबरी (Cadbury)

पुस्तक - कॅडबरी (Cadbury) लेखक - निकेतन तावडे (Niketan Tawde) भाषा - मराठी (Marathi) पाने - २०४ प्रकाशन - राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २०२६ छापील क...