द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)




पुस्तक : द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ भाषा : इंग्रजी (English)
मूळ लेखक : डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick)
अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
पाने : ३९४

ISBN : 978-93-8617-517-5 

फेसबुक, व्हॉटसप, जीमेल, व्हॉटसप हे आता आपल्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. या परिक्षणाची लिंक सुद्धा तुम्हाला फेसबुक किंवा व्हॉटसप वरच मिळाली असेल. या तंत्रज्ञानाने दोन व्यक्ती एकमेकांशी कसा संपर्क करतील, माहिती आणि भावभावना यांची देवाणघेवाण कशी करतील याचं पूर्ण चित्रच  बदलून टाकलं आहे. हा बदल पूर्वीसारखा शतकांच्या अवधीत न होता दशकांच्या किंवा अर्धदशकांच्या अवधीत होतो आहे. असाच एक बदल आपल्या डोळ्यासमोर समोर घडला आणि जो घडवण्यात आपण सक्रिय सहभाग घेतला तो म्हणजे फेसबुकचा प्रसार, महत्त्व आणि परिणामकारकता. "द फेसबुक इफेक्ट" या पुस्तकात लेखकाने याच बदलाचा आलेख मांडला आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने हार्वर्ड मध्ये उच्चशिक्षण घेताना तिथल्या विद्यार्थ्यांना एकमेकांनी निवडलेल्या विषयांची माहिती मिळावी म्हणून "कोर्स मॅच" नावाचं सॉफ्टवेअर बनवलं आणि थोड्याच दिवसात ते तिथे लोकप्रिय झालं. इथून मार्कच्या कल्पकतेला आणि त्यावर लोकांच्या पडणाऱ्या उड्या यांना सुरुवात झाली. अशा नवनवीन संकल्पना राबवत एकेदिवशी फेसबुकची निर्मिती झाली. 2003 मधल्या "कोर्स मॅच" पासून 2010 पर्यंत फेसबुक ने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात आहे. मार्कला नवीन सहकारी मिळत गेले, नवीन सोयी फेसबुकवर आणल्या जाऊ लागल्या, फेसबुकची लोकप्रियता वाढून त्यात मिलियन डॉलर्स गुंतवायला लोक पुढे आले, जगभरातले लोक फेसबुक वापरू लागल्यावर त्यातून सामाजिक बदलाचीही सुरुवात झाली. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या वेगवेगळे पैलूंवर सविस्तर माहिती आणि चर्चा या पुस्तकात आहे.

मार्क चे हॉस्टेलमधील खोलीसोबती हे त्याचे पहिले सहकारी. नंतर फेसबुकचा व्याप जसा वाढत गेला तसं कोणी सर्वर मधील तज्ञ, कुणी डिझाइनिंग मधला तर कुणी कंपनी चालवण्यासाठी , मार्केटिंगसाठी उपयुक्त गुण असलेला; असे सहकारी त्यांनी जोडले. फेसबुकच्या प्रवासातले हे साथिदार आपल्याला पुस्तकात भेटतात. आधी हॉस्टेलची खोली, मग एक साधं घर असं करत करत फेसबुक वाढत गेलं. हे सगळेच तरूण विशीतिशीतले त्यामुळे फेसबुकचं सुरुवातीचं ऑफिस म्हणजे हॉस्टेलची खोलीच असावी असं वातावरण. कोणीही कुठेही लॅपटोप घेऊन बसलंय, कोक बर्गर खातायत, रात्री अपरात्री पर्यंत काम करतायत, स्विमिंग पूल जवळ बियरची पार्टी होत्ये, कोणी ऑनलाईन खेळ खेळतंय असं धमाल चालणारं. आयटी मध्ये काम करणऱ्यांना हेवा वाटायला लावणारं असं. त्याच्या गमतीजमती पण पुस्तकात आहेत.


तरीही ही तरूण मंडळी काहितरी भन्नाट काम करतायत हे जाणवल्यावर माध्यम आणि इंटरनेट विश्वातील मोठमोठ्यांना या कंपनीचं आकर्षण वाटलं. मायक्रोसॉफ्ट, गूगल, याहू आणि मुद्रितमाध्यमांतील उद्योग फेसबुक विकत घ्यायला उत्सुक होते. मार्क आणि त्याचा सहकारी शॉन पार्करची भेट घेऊन ते अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपला सौदा पुढे रेटायचा प्रयत्न करत होते. पण मार्कला ही कंपनी विकायची नव्हती. आपण जग बदलून टाकणारी व्यवस्था निर्माण करतोय याची त्याला जाणीव होती. चमकदार कल्पना प्रत्यक्षात आणायची, त्यावर कंपनी थोडी वाढवायची आणि चांगला सौदा मिळाला की ती विकून लाखो डॉलरचा फायदा खिशात टाकायचा ही त्याची मानसिकताच नव्हती. पण हे सौदे नाकारणं त्याच्यासाठी किती कठीण होतं. फेसबुक वाढवायचं तर पैसे पाहिजेत, गुंतवणूक तर पाहिजेच पण दुसऱ्याची मालकीही नको; वाटतंय तसं फेसबुक प्रगती करेल का? आणि नाही केली तर ? कंपनीतल्या अनेकांनाची सौदा करून नफा कमवावा ही स्वाभविक इच्छा नाकारल्याचा काय परिणाम होईल. अशा द्वन्द्वातून मार्क आणि त्याचे समविचारी सहकारी जात होते. असा सौदा आला फेसबुक कार्यालयातलं वातावरण कसं होत असे, मार्क ची तगमग कशी व्हायची हे लेखकाने व्यवस्थित दाखवलं आहे.

फेसबुक हे यशस्वी समूह माध्यम (सोशल मिडिया) ठरलं तरी ते पहिलंच नव्हतं, एकमेव नव्हतं आणि शेवटचंही नव्हतं. फेसबुक सुरु होताना मायस्पेस, फ्रेंडस्टर इ. माध्यमं कशी होती त्यांना प्रतिसाद कसा मिळत होता. फेसबुकने त्यांच्याशी गुणात्मक स्पर्धा कशी केली याचीही सविस्तर माहिती आहे. फेसबुकने अमेरिकेबाहेर पदार्पण करायचं ठरवल्यावर रशिया, चीन, जर्मनी इ. देशांतल्या स्थानिक समूहमाध्यमांशी लोकप्रियतेसाठी कडवी झुंज द्यावी लागली. काही ठिकाणी यश काही ठिकाणी अपयश आलं याचीही माहिती आहे. ऑर्कुट, ट्वीटर, लिन्क्ड-इन या समकालीन आणि प्रसिद्ध समाज माध्यमांचे फेसबुकशी साम्य, वेगळेपण, आणि स्पर्धा ही पुस्तकात मांडली आहे.

आज फेसबुक वापरताना आपण फेसबुक वॉल, न्यूजफीड, मेसेंजर, फोटो अल्बम, टॅगिंग इ. अगदी सहज वापरतो. फेसबुक पहिल्या दिवसापासून असं नव्हतं. एकेक नवीननवीन सोय तयार करताना फेसबुक मध्ये कशी चर्चा झाली, तिची सुरुवात झाल्यावर लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला, यूजरची संख्या कशी वाढत गेली ; हे आपल्यासमोर घडलेल्या घटनांचे पडद्यामागचे तपशील वाचणं खूपच मनोरंजक आहे. आज आपल्याला न्यूज फीड अर्थात मित्रांचे अपडेट्स फेसबुकवर समोर दिसत असतात. पण तुम्हाला विश्वास वाटणार नाही की जेव्हा ही न्यूज फीड सेवा सुरू झाली तेव्हा लोकांनी तिचा तीव्र विरोध केला. आमच्या प्रत्येक गोष्टी इतरांना सतत कळतायत, जणू आमच्यावर कुणितरी सतत पाळत ठेवतंय असं वाटतंय. असं म्हणत फेसबुक विरोधी गट फेसबुकवरच तयार झाले होते. फेसबुकने मागे न हटत ही सोय चालूच ठेवली. हळूहळू लोकांना त्याची सवय झाली आणि आवडूही लागली. दुसऱ्या एका प्रकरणात - गोपनीयतेच्या अटी फेसबुकने थोड्या बदलल्या - तेव्हाही असाच गदारोळ झाला. सगळ्यांची माहिती फेसबुककडे जमा होईल आणि फेसबुक तीचा अनियंत्रित वापर करेल या भितीतून मोठा वादंग झाला तेव्हा. फेसबुकला दोन पावलं माघार घेत नवीन सेवा-नियम-अटी सादर कराव्या लागल्या. अशाप्रकारे फेसबुकच्या प्रत्येक फीचरची जन्म कहाणी फेसबुकबद्दलच नाही तर त्याचा युजरच्या मानसिकतेवरही चांगलाच प्रकाश टाकते.



फेसबुकच्या कमाईचं मुख्य साधन हे जाहिराती आहे. फेसबुकने सुरुवातीपासून आत्तापर्यंत नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे ही कमाई कशी वाढेल हे बघितलं आहे. पण मार्क सुरुवातीपासून जाहिरातींच्या विरोधात आहे, ही त्यातली गंमत आहे. पण कमाईसाठी ते आवश्यक आहे याचीही त्याला जाणीव आहे. व्यावसायिक कंपनी चा प्रमुख आणि मार्कचं मन असं हे अजून एक द्वन्द्व आहे. म्हणूनच फेसबुकवर जाहिरातींचं प्रमाण कमी असावं, वापरणऱ्यांच्या अनुभवात बाधा येईल असं नसावं, त्याच्याशी संबंधित जाहिरातीच दाखवल्या जातील यासाठी प्रयत्न केले जातात. फेसबुकवर एखाद्या कंपनीने आपलं पेज बनवलं की त्याला कोण लाईक करतंय, कोण फॉलो करतंय, त्यांचा वयोगट, आवडीनिवडी, भौगोलिक स्थान अशी इत्थंभूत माहिती फेसबुक कडून जाहिरातदार कंपनीला विकली जाते ज्यातून त्या कंपनीला आपलं उत्पादन अजून आकर्षक बनवायला मदत होते. माहितीचा इतका खऱ्याच्या जवळ जाणारा आणि लोकांनी स्वतःहून भरलेला खजिना ही फेसबुकची मोठी मिळकत आहे. त्यातून "डेटा मायनिंग" चा व्यापारी वापर करून फेसबुक प्रचंड कमवू शकणार आहे. म्हणूनच या सगळ्याच्या बाबतीत मार्कचं म्हणणं काय हे त्याने आपल्या कृतीतून दाखवलं आहे भाषणांतही सांगितलं आहे वेगवेगळ्या प्रसंगात मार्कची विचार करण्याची पद्धत, त्याचं तत्वज्ञान, साधी राहणी त्याची भाषणं याचंही वर्णन आहे.





फेसबुकमुळे सामाजिक चळवळींची होणारी सुरुवात आणि मिळणारी चालना आपल्याला नवीन नाही. हे परिणाम फेसबुकच्या सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच दिसायला लागले.ओबामा आणि इतर अमेरिकन राजकारण्यांनी निवडणुकीत वापर केला. कोलंबियातल्या दहशतवादाविरुद्ध तिथल्या सामान्य युवकाने फेसबुक ग्रुप सुरू केलेला. त्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिलाच आणि त्यातून देहव्यापी आंदोलन सुरू झाले. नैसर्गिक संकटात सापडलेल्या लोकांचा ठावठिकाणा आणि त्यांना कशाची गरज आहे याची माहिती प्रशासनाला मिळाली. अशी बरीच उदाहरणं पुस्तकात आहेत. 

पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात म्हटलं तरी इतकं लिहून झालं. बरेच मुद्दे लिहिलेच नाहीत -फेसबुक इतर भाषांत भाषांतरीत करण्याचा प्रयोग, फेसबुक गेम्स, एपिआय, फेसबुकप्लॅटफॉर्म..खरंच, या चारशे पानी पुस्तकात खूप माहिती आहे. जी वाचायला अजिबात कंटाळवाणी नाही तर खिळवून ठेवणारी आहे. फेसबुक हा आपल्या आवडीचा विषय आहे म्हणूनच नव्हे तर लेखकाची गोष्टीरूप शैलीही याला कारणीभूत आहे. लेखकाने मार्क आणि त्याच्या सहकाऱ्यांशी, गुंतवणूकदारांशी प्रत्य्क्ष भेटून, बोलून माहिती घेतली आहे. ते संवादही पुस्तकात आहेत. पुस्तकाला त्यातून जिवंतपणा आला आहे. जे आयटी मध्ये काम करतात त्यांना पुस्तकातल्या तांत्रिक बाजू लगेच समजतीलच. पण जे आयटीमध्ये नाहीत अश्या तरूण असो वा वयस्कर, जे किमान फेसबुक वापरतात त्यांना हे समजून घ्यायला काही अडचण येणार नाही इतपतच तांत्रिक बाबी आहेत. 

अनुवादाही तितकाच ताकदीचा, नैसर्गिक आहे. मूळ भाषा मराठीच आसावी असं वाटायला लावणारा. वरच्या फोटोंमधून हे तुम्हालाही जाणवलं असेलच. म्हणूनच अनुवादिकेचं नाव मुखपृष्ठावर नाही हे मला खटकलं.

पुस्तकात एकही फोटो नाही हे पण खटकलं. फेसबुकच्या जुन्या ऑफिसचे, मार्कच्या कुटुंबाचे, सुरुवातीच्या सहकाऱ्यांचे, जुने फेसबुक प्रोफाईल कसे दिसायचे याचे, एखाद दुसऱ्या सामाजिक चळवळीचे फोटो आवश्यक होते.


मराठी पुस्तक २०१६ मध्ये प्रकाशित झालं असलं तरी इंग्रजी पुस्तक २०११ चं आहे आणि माहिती २०१० पर्यंतची आहे. गेल्या आठ वर्षांत फेसबुकची लोकप्रियता कितितरी पटीने वाढली आहे. पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षही आता फेसबुक वापरतात; नव्या पिढीशी सुसंवाद साधतात. भारतानेही सामाजिक आंदोलनांमध्ये फेसबुकचा सहभाग प्रत्यक्ष अनुभवला आहे. ट्विटर, यूट्यूब, ब्लॉग ची वाढही जोरात झाली आहे. हे सगळं लक्षात घेता २०१०-२०१७ या पुढच्या सात वर्षांवर "The Facebook effect continues (द फेसबुक इफेक्ट कंटिन्यूस)" असं पुस्तक लेखकाने लिहावं आणि वर्षाताईंनी ते अनुवादित करावं अशी मनापासून इच्छा आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

6 comments:

  1. कौशिक ! खूप छान पद्धतीने पुस्तक परिचय आहे . खरं तर फ़ेसबुक हे माझ्या आवडीचे आहेच ,त्यामुळे या लेखात जी माहिती आली त्यामुळे फ़ेसबुक विषयी ज्ञानात आणखी भर पडली .
    प्रदीप - ur whatsapp gr. group मेंबर @ राजहंस लेखन कार्यशाळा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. तुमच्या आवडीचा विषय आहे म्हणजे पुस्तक वाचायला नक्कीच मजा येईल तुम्हाला. तुमच्या साहित्यप्रेमींशीही शेअर करा

      Delete
  2. धन्यवाद आणि तुमचे अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद माऊली (प्रोफाइल फोटो ज्ञानेश्वरांचा आहे ना म्हणून )

      Delete
  3. छान आहे परिक्षण!
    पुस्तक आधीच वाचलं होत, परत उजळणी झाली.
    शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. तुमच्या साहित्यप्रेमींशीही शेअर करा

      Delete

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...