गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil)




पुस्तक : गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil)
लेखक : राजेंद्र बनहट्टी (Rajendra Banahatti)
भाषा : मराठी (Marathi)

ISBN : दिलेला नाही


राजेंद्र बनहट्टी यांच्या लहानपणच्या आठवणींचा हा संग्रह आहे. त्यांचे बालपण नागपुरात गेले. वडील कॉलेजात प्रोफेसर होते. त्याकाळच्या मानाने वडिलांचा पगार बराच चांगला असल्याने सुबत्तेत एका टोलेजंग वास्तूत त्यांचे बालपण गेले. वडील विद्वान म्हणून प्रख्यात असल्याने विद्याभ्यासाचे महत्त्व आणि आईची शिस्त आशा सुसंस्कारांचा त्यांना लाभ झाला. नऊ भावंडे, घरात वेगवेगळ्या कामांसाठी नोकरचाकर, शाळेतले मित्रमंडळी अशा मुलामाणसांनी भरलेल्या सुंदर बालपणातले वेगेवेगळे किस्से त्यांनी सांगितले आहेत.

त्यांच्या मोठ्या घराचं वर्णन आहे. लहान मुलांनी चालवलेल्या सार्वजनिक गणपती मधल्या गमती आहेत. 
घराजवळच्या रेल्वे यार्डात केलेल्या खोड्यांच्या गमती आहेत.

त्यांचे वडील स्वतःचं घर बांधायचं ठरवतात तेव्हा या विद्वान पण व्यावहारिक जगात कच्च्या माणसाची कशी फसवणूक होते तो घटनाक्रम मुलांच्या नजरेतून कसा दिसला ते या लेखात आहे.

एकदा त्यांचे वडील ही मानाची नोकरी सोडून गांधींच्या कामात स्वतःला झोकून द्यायचं ठरवतात. इतकी चांगली कमाई, मानसन्मान सोडून ओढगस्तीचं जगणं वाट्याला येईल म्हणून त्यांच्या आईची होणारी घालमेल होऊ लागली. त्यांच्या आप्तस्वकीयही त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करतात. याचं गांभीर्य लहानमुलांच्या लक्षात येत नाही. त्यांना गंमत वाटत असते ती खूप पाहुणे येतायत आणि येताना काहीतरी खाऊ नाहीतर मुलांसाठी भेटी आणतायत. एकच प्रसंग मोठ्यांसाठी काळजीचा तर मुलांसाठी मौजमजेचा कसा झाला हे वाचायला खूप मनोरंजक आहे.

पुस्तकात काही व्यक्तिचित्र पण आहेत.

"हवा खराब आहे" असं पालुपद लावत रुग्णाला धीर देत उपचार करणारे जुन्या जमान्यातील डॉक्टर; शाळेतले शिस्तप्रिय , छड्या मारणारे शिक्षक तर काही अगदी रडवेले होऊन शिकवणारे शिक्षक (अगदी पुलंच्या लेखातल्यासारखे. "खबरदार जर टाच मारुनी" हे रडत शिकवणारे). सारखा नापास झाल्याने थोराड झाला तरी शाळेतच राहिलेला टारगट बंडू आणि त्याच्या उचापती. त्यांच्या कडे सणासुदीला खास फराळाचे पदार्थ, पक्वान्ने करायला येणारे तेलंगी ब्राह्मण आचारी इ.

अनुक्रमणिका :


त्यांच्या आईची शिस्त दाखवणाऱ्या प्रसंगातला एक उतारा :




तेव्हाच्या काळी मोठ्या घरी  देवघर कसे असायचे त्याचे वर्णन :



पूर्ण पुस्तक वाचायला मनोरंजक आहे. किस्से वाचायला कुणाला नाही आवडणार? एखाद्या मंगलकार्यासाठी घरात पाहुणे मंडळी जमलीयेत आणि रात्री गप्पा गोष्टी चालल्यात; कुणी जुन्या घराच्या, जीआजोबांच्या आठवणी सांगतंय, आमच्यावेळी असं नव्हतं किंवा आमच्या वेळी तसं नव्हतं हे कुणी सांगतंय, कुणी आपल्या भावंडांच्या लहानपणच्या खोड्या आणि झालेल्या फजितीबद्दल सांगतंय ... अशा गप्पा तासंतास रंगू शकतात. विषयाचे रूळ भराभर बदलत गप्पा मारणाऱ्यांना खिळवून ठेवू शकतात. या पुस्तकाचं रूप साधारण तसं आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाला समांतर अशी आठवण तुमची, तुमच्या आईवडीलांची असेल. म्हणून हे पुस्तक वाचल्यावर वेगळं काही, सकस काही वाचल्याचं समाधान वाटणार नाही. विरंगुळा म्हणून छान आहे. १९४० च्या आसपासचा काळ म्हणजे खूप जुना काळही नाही. बरेचसे वाचक तो काळ जगलेले असतील. तरूण वाचकांनी इतर पुस्तकांमधून आपल्या ज्येष्ठ नातेवाईकांकडून ऐकलं असेल. त्यादृष्टिनेही पुस्तक फार आकर्षक नाही. कदाचित अजून शंभर दोनशे वर्षांनंतर १९४० च्या आसपास सधन घरांची कुटुंबव्यवस्था, मूल्यव्यवस्था कशी होती हे चित्र उभं करण्यासाठी हे पुस्तक एक चांगला सामाजिक दस्तैवज ठरेल हे मात्र नक्की.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...