ट्विटरसंमेलन २०१८ अध्यक्ष कौशिक लेले (स्वघोषित :) ) यांचे भाषण
व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. प्रत्येकाचं नाव घेऊन नमस्कार करत नाही. कारण या संमेलनात सर्वजण ट्वीटर व्यासपीठावरच बसले आहेत. हजार जणांची नावं घेऊन अभिवादन करणं शक्य नाही. आपल्यात कोणी उद्योगपती किंवा राजकारणी प्रायोजक म्हणूनही नाही. त्यामुळे तोही उपचार नाही.
तरीही काही उद्योगपतींची नावं मात्र घेतलीच पाहिजेत. संमेलनाचे हे व्यासपीठ मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल ट्वीटरचे संस्थापक सीईओ जॅक डॉर्सी, ब्लॉग आणि यूट्यूब च्या रूपात साहित्य लेखनाला मोफत व्यासपीठ देणारे गूगलचे लॅरी पेज व सर्गी ब्रिन, वर्डप्रेस ब्लॉगिंगचे पदाधिकारी, फेसबुकच्या आणि व्हॉट्सपच्या माध्यमातून साहित्य वितरणाची मोफत सोय करून देणारे मार्क झकरबर्ग यांना अभिवादन नक्कीच करायला हवे. जर तुम्ही स्वस्तातला डेटा प्लॅन वापरत असाल तर आपापाल्या प्लॅनप्रमाणे श्री. अंबानी, श्री. मित्तल, श्री. बिर्ला, श्री. टाटा यांनाही त्यांच्या अप्रत्यक्ष सहाय्यासाठी अभिवादन. भारतातल्या समस्त राजकीय आणि न्यायपालिकेला अभिवादन. इतर विकसनशील देशांप्रमाणे भारतात समाजमाध्यमांवर बंदी न घातल्याबद्दल, अतिरेकी सेन्सॉरशिप न लादल्याबद्दल त्यांनाही अभिवादन.
तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल मला अध्यक्ष कोणी केलं? कुणीही नाही. माझा मीच झालो. खरं म्हणजे इथे अध्यक्षपदाची निवडणूक काय हे पदच नव्हतं. मग मीच जरा जागा साफसूफ केली, पद निर्माण केलं आणि झालो अध्यक्ष. आता तुम्ही म्हणाल ट्विटरसंमेलनाला लाभलेला अध्यक्ष हा कोण ? हा प्रश्न हल्लीच्या अ.भा.सा.सं च्या गेल्या काही वर्षांच्या परंपरेला धरूनच आहे. संमेलनाध्यक्षांची निवड झाल्यावर सर्वसामान्य वाचकाला हाच प्रश्न पडतो. मग त्या व्यक्तीबद्दल माहितीची शोधाशोध होते. तसंच इथेही. माझी माहिती फार नसल्याने तुम्हाला शोधायला फार कष्ट पडणार नाहीत. (टाळ्या :) :) )
असो! आपल्या पैकी बहुतेकांचं लिखाण हे कथा, कविता, प्रवासवर्णन, अनुभवाकथन असं ललित आणि भावनिक आहे. मला मांडायचे आहेत ते मुद्दे मात्र भावना बाजूला ठेवून, कोरडेपणाने विचार करायचे आहेत.
१) भाषा - एक साधन. साध्य नव्हे
समजा एका पन्नाशिच्या माणसाकडे त्याच्या तारुण्यात घेतलेली मारुती गाडी आहे. ती त्याने पैपैसा जमवून घेतली आहे. त्या गाडीने तो खूप लांबलांब प्रवास करून आला आहे. ती गाडी त्याच्या कर्तृत्त्वाचं आणि आठवणींचं प्रतिक आहे. पण आता ही गाडी जुनी झालिये, सारखं "काम काढते", स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत. मुलासाठी त्याला हे मॉडेल जुनाट वाटतं. त्याला अद्ययावत गाडी पाहिजे; ज्यात खूप सोयी असतील, मायलेज जास्त असेल, प्रदूषण कमी होईल, दिसायला खूप आकर्षक असेल अशी. केवळ भावनेपोटी तो गाडी सोडू शकत नाहीये. पण एक ना एक दिवस त्याला ही गाडी विकून टाकावी लागेल. कदाचित भंगारातही द्यावी लागेल.
आज त्या माणसाचा मुलगा जुनी गाडी विकून नवी गाडी कदाचित मारुती कंपनीचीच घेईल. कदाचित होंडा, फोक्स्वॅगन किंवा आणि कुठल्या कंपनीची घेईल. जर मारुती कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञान, सोयींनी युक्त आणि वाजवी किंमत अशी गाडी बजारत आणली असेल तरच ती घेतली जाईल. वडीलांचीच गाडी पुढे चालवत राहणं शहाणपणाचं नाही; वडीलांची मारुती गाडी होती म्हणून मारुतीचीच गाडी घेतली पाहिजे हेही गरजेचं नाही.
गाडी हे साध्य नाही तर प्रवास हे साध्य आहे. तो सुखकर आणि जलद ज्यामुळे होईल ते वाहनच ग्राहक विकत घेईल.
भाषेचं तसंच आहे. मी मराठी का बोलतो? माझी मातृभाषा मराठी का आहे? तर योगायोगाने मी ज्या घरात जन्माला आलो त्या घरची भाषा मराठी आहे. पण भाषा हे संवादाचं, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचं साधन आहे. साध्य नाही. जर हे साधन जुनं झालं असेल तर ते सोडून देण्याचं, नवीन उपयुक्त साधन स्वीकारणं नैसर्गिक नाही का? माझ्या घरची गाडी मारुतीची म्हणून मी आणि पुढच्या पिढिने तीच वापरत राहिली पाहिजे हा अट्टाहास जसा चुकीचा तसाच. केवळ घरची भाषा मराठी म्हणून माझ्या पुढच्या पिढ्याही मराठीच झाल्या पाहिजेत हा अट्टाहासही चुकीचा नाही का?
ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे (मीही त्यातच आहे) त्यांना हे खूप निर्दयी वाटेल. पण आजच्या व्यवहारिक युगात ते खरं आहे.
२) भाषा टिकवण्याची जबबादारी भाषाप्रेमींची
मराठी अद्ययावत नसेल तर नवीन पिढी ती नाकारणार हे मी आधी सांगितलं. मग प्रश्न असा पडेल की मराठीला अद्ययावत कोण ठेवेल? मराठी समाजच ना? याचं उत्तर पूर्णपणे "हो" असं नाही. मराठीला अद्ययावत ठेवायची जबबदारी पूर्ण मराठी समाज घेणार नाही तर त्या समाजातील फक्त भाषाप्रेमींनी जबबदारी घ्यायची आहे. गाडीचंच उदाहरण पुढे घेऊया. मारुती कंपनीला जर असं वाटत असेल की नव्या ग्राहकांनीसुद्धा आपलीच गाडी विकत घ्यावी; तर त्या कंपनीला सतत नवं संशोधन करून प्रगतीत सर्वांच्या पुढे राहिलं पाहिजे. ग्राहकांसाठी गाडी हे साधन आहे तर मारुती कंपनी आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी गाडी हे साधन आहे.
तद्वतच सर्वसाधारण समजासाठी भाषा हे साधन आहे तर "मराठी भाषप्रेमी कंपनी" साठी मराठी भाषा हे साध्य आहे. भाषा अद्ययावत, अकर्षक ठेवणं हे या कंपनीचं साध्य अहे. जर ही कंपनी स्पर्धेत "इंग्रजी भाषाप्रेमी कंपनी ", "जपानी भाषाप्रेमी कंपनी" इ. कंपन्यांच्या मागे पडली आणि समजाने "इंग्रजीकंपनीचं" मॉडेल, "जर्मनप्रेमी" कंपनीचं मॉडेल जोरात विकत घ्यायला सुरुवात केली तर दोष ग्राहकाचा नाही कंपनीचा आहे.
३) सध्या मराठी ज्ञानभाषा नाही आणि होणं शक्य वाटत नाही.
मराठी ज्ञानभाषा आहे की नाही हा मुद्दा बऱ्याच वेळा चर्चिला जातो. माझं असं म्हणणं आहे की मराठीच काय आजच्या घडीला कुठलीच भारतीय भाषा ज्ञानभाषा नाही. मराठी भाषेमध्ये आवश्यक शब्द असतील. इंग्रजीत तयार झालेलं ज्ञान मराठीत व्यक्त करता येईलही पण. ते भाषांतर झालं. ज्या वेगाने ज्ञान निर्माण होतंय त्या वेगाने भाषांतर होत नाहीच आहे पण तितक्या वेगाने होणंही कठीण आहे. असं म्हणतात की दरवर्षी मनवजातीने मिळवलेलं ज्ञान आत्तपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाच्या दुप्पट आहे. इतक्या महाप्रचंड माहिती विस्फोटाच्या समोर मराठीतील शब्द आणि भाषांतराचा वेग नगण्य आहे. आत्ताच असलेला अनुशेष आणि तयार होणारा अनुशेष लक्षात घेता आपण ही लढाई हरलो आहोत हे प्रामाणिक मान्य केलं पहिजे.
४) इतर भाषिकांना जमलं मग मराठीला का नाही.
इंग्रजीला स्पर्धा करणाऱ्या जपानी, कोरियन, जर्मन, हिब्रू भाषांची आणि त्यांच्या देशांची उदाहरणं लगेच आपल्या डोळ्यासमोर येतील. पण ते देश भारतापेक्षा फार लहान आहेत, समाज म्हणून खूप एकजिनसी आहेत. भारत इतका मोठा आहे की दोन भारतीयांना बोलायलाही एक मध्यस्थ भाषा - हिंदी किंवा इंग्रजी - लागते. तिथे सगळा समाज एकभाषी होऊन शिकतोय, ज्ञाननिर्मिती करतोय हे अशक्य आहे.
भारतात मुळात ज्ञाननिर्मितीच कमी होत्येय आणि तीही एखाद्या भाषेतच झाली ( मराठी, बंगाली इ.) तरी परदेशी आणि देशी अशा सगळ्यांशी संवाद साधत तंत्रज्ञान, विज्ञान पुढे न्यायला करायला मध्यस्थ भाषा इंग्रजीच लागणार. म्हणून मराठी आणि इतर कुठल्याही भाषेला हे जमणार नाही हे कटू सत्य आपण स्वीकारायला हवं
५) मग मराठी शाळा बंद पडू देत का ?
नाही. इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून मराठी शाळा बंद पाडण्याची गरज नाही. मराठीशाळाप्रेमी कार्यकर्ते म्हणात की "इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजीतून शिकणं वेगळं. मातृभाषेतून शिकणं अधिक आनंददायी आहे, मुलं लवकर आत्मसात करतात. मनोवैज्ञानिकांनी हे संशोधनाअंती सिद्ध केलं आहे". यातला पहिल्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे. इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजीतून शिकणं वेगळं. इंग्रजी चांगलं येण्यासाठी इंग्रजीतून शिकण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो. चांगला इंजिनिअर झालो. एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला आहे. माझे शाळूसोबत्यांनी पण चांगली प्रगती केली. अमेरिकेत एम.एस. केलं. तिकडे सेटल झाले. मराठी माध्यमातून शिकले म्हणून त्यांचं काहीच अडलं नाही. परंतु मला हेही जाणवतं की माझ्या बरोबर काम करणारे कितीतरी आज इंग्रजी माध्यमातून शिकल्ले आहेत. तेही चांगली प्रगती करतायत. मातृभाषेतून शिकले नाहीत म्हणून त्यांचही अडलं नाही. आनंददायी शिक्षण म्हणाल तर त्यांचं शिक्षण रडतखडत झालं असंही नाही.
माझ्या वर्गातल्या अभ्यास न आवडणाऱ्या मुलांसाठी मराठीत शिकणंही आनंददायी नव्हतं. मराठीतून शिकणंच काय मराठी शिकणं हेही आनंददायी नव्हतं. उलट पु.लंच्या बालपणावरच्या आत्मकथनात ते विनोदाने म्हणतात "बिगर यत्ते पासून मॅट्रिक होईपर्यंत माझं सारं आयुष्य मोठ्या हलाखीत गेलं.. मी पाढे भराभर म्हणत असे, पण ते भिऊन". वाचनाचं म्हणल तर माझे कितितरी मराठी मित्र रोअजहा पेपरही वाचत नाहीत तर माझे इंग्रजी भाषेत शिकलेले, अगदी कॉन्वेंट मध्ये शिकलेले मित्रही मराठी वाचतात, धार्मिक तत्त्वज्ञानाची पुस्तकं वाचतात. "मराठी अभिमानगीता"चा संगीतकार कौशल इनामदार हा इंग्रजी माध्यमात शिकलाय असं विकिपिडिया वरील माहिती वरून दिसतंय.
परदेशी - पाश्चिमात्य असो की पौर्वात्य - लोकांपेक्षा आपण भारतीय आणि त्यातही मराठी लोक शताकानुशतकं बहुभाषिक समाजव्यवस्थेत वावरत आलो आहोत. पूजापाठाची भाषा संस्कृत, घरातली मराठीची बोली (मालवणी, आग्री, धनगरी, अहिराणी इ.), शाळेत प्रमाण मराठी, शेजारी पाजारी कानडी, गुजराती, उ.भारतीय, द. भारतीय लोक, सिनेमा-कार्टून हिंदी, सरकारी, बॅंकेचे फॉर्म्स इंग्रजीत अशी मिश्र व्यवस्था आपली आहे. एकभाषी समाजाला दुसऱ्या भाषा जितक्या परक्या वाटतात तितक्या आपल्याला नाहीत.
त्यामुळे मातृभाषा का इंग्रजी माध्यम हा निर्णय वाटतो तितका सरळ विषय नाही. तो पूर्णपणे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून आहे असं मला वाटतं. आणि लोकांवर निर्णय सोडला की ते इंग्रजी माध्यमाकडेच जाणार हे उघड दिसतंय. कारण जास्त चिकित्सा न करता अंधानुकरण करणे, प्रवाहाच्या मागे वाहत जाणे हा आपल्या समाजाचा गुणधर्म आहे. इंग्रजी माध्यमात घातल्याने काही फायदा होणार नाही हे तो पटवून घेणर नाही. म्हणून मराठीशाळा प्रेमींनी तात्त्विक चर्चा करून मराठी समाजाला हे पटवून देण्याचा प्रयत्न न करता असा काय भावनिक मुद्दा आहे जो मराठी पालकांना आकर्षित करेल हे शोधलं पाहिजे. उदा. विकासाचं राजकारण करू असं म्हाणणऱ्या प्रत्येक पक्षाला शेवटी जातीच्या, धर्माच्या असा कुठलातरी भावनिक मुद्दाच घ्यावा लागतो. कारण अपरिपक्व मतदार त्यालाच भुलतात. तसंच इथेही आहे.
६) सगळेच इंग्रजी माध्यमाकडे वळले तर मग?
ही भीती आहेच. मराठी भाषाप्रेमींची जबाबदारी इथे सुरू होईल. ज्ञानभाषा इंग्रजी पण भावभाषा मराठी हे धोरण आपण राबवलं पाहिजे.
इंग्रजीतून शिकलो नाही तर मागे पडू ही भीती वाटत्ये ना, ठीक आहे. शिका इंग्रजी माध्यमातून. पण त्यासाठी मराठी विसरायची गरज नाही. आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही, नीट बोलता येत नाही हे सांगताना कमीपणा वाटणं सोडाच एक सुप्त अभिमान अनेकांच्या बोलण्यात जाणवतो. ही विकृती आहे. आणि ही विकृती समाजघातक आहे. इथे थोड्या कठोर भूमिका घेण्याची गरज मला वाटते. त्यासाठी महाराष्ट्रात पहिली ते बारावी मराठी अनिवार्य असावं. ही मागणी नवी नही. साध्या कार्यकर्त्यांपासून, साहित्यिकांपर्यंत सगळ्यांनी ती मागणी केलेली आहे. मला त्यात आणखी एक तपशील घालावासा वाटतो की. "लोअर मराठी", "लोअर इंग्लिश" हा प्रकार बंद केला पाहिजे. अत्ता होतंय काय की दहावी पर्यंत मराठी शिकूनही "कमळ नमन कर, छगन घर बघ" च्या पुढे गाडी गेलीच नाही असं वाटतं. मराठी माध्यमात जसं पहिलीपासून इंग्रजी आहे तसं अमराठी माध्यमांत पहिलीपासून मराठी हवं. आणि तो अभ्यासक्रम असा चढत्या भाजणीचा हवा की पाचवी पासून माध्यम कुठलंही असो मराठीचा अभ्यासक्रम, इंग्रजीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती सगळ्यांना सारखीच. "लोअर स्टॅंडर्ड" गोष्ट कुणाचीच नाही. मराठी लेखन, वाचन, संभाषण उत्तमच असलं पाहिजे. इंग्रजी लेखन, वाचन, संभाषण उत्तमच असलं पाहिजे.
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यात सूट नसावी. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा असला पाहिजे. उदा. जर एखाद्या मुलगा चौथीत असतना महाराष्ट्रात आला तर त्याला चौथी , पाचवी , सहावी अशा तीन वर्षांत पहिल्या सहा वर्षांचा अभ्यास पूर्ण करता येईल आणि सातवी पासून तो सगळ्याच्या बरोबर येईल. एखादा आठवीत आला तर ८,९,१०,११,१२ अशा पाच वर्षांत तो दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करेल. तो मागून ११ वी १२ वीचं मराठी परीक्षा उत्तीर्ण होईई. तोपर्यंत "प्रोव्हिजनल सर्टिफिकिट" मिळेल. म्हणजे त्याचा नोकरी किंवा पुढचं शिक्षण अडणार नाही. पण सरकारी मराठीच्या द्रुष्टीने तो अजून बारावी पास नाही हे ठळक दिसेल.
इतिहास, मूल्यशिक्षण हे विषय तरी मराठीतून शिकवले पाहिजेत. "नमस्कार करा" मधला भाव "join your hands" मध्ये नाही; "शिवरायांनी मावळे जमवून तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं" मधला भाव "Shivaji gathered youngsters, conquered Torana fort and started his kingdom" मध्ये नाही. आपली संस्कृती, संस्कार, भावना नव्या पिढीपर्यंत पोचवायला आपलीच भाषा हवी. अन्यथा त्यांना शिवाजींची कोरडी माहिती मिळेल "स्वराज्य" स्थापन केलं म्हणजे काय हे कळणार नाही.
या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी दबावगट तयार करायला चालना दिली पहिजे.
७) शालेय शिक्षणातच नाही तर राजभाषा म्हणून मराठीचं स्थान बळकट करणे
मराठी ज्ञानभाषा म्हणून मागे पडली असली तरी राजभाष म्हणून ती सक्षम आहे. राजभाषा मराठी आणि त्रिभाषासूत्री यातून मराठीचं पहिलं आणि मानाचं स्थान कायदेशीरदृष्ट्या पक्कं आहे. असं स्थान वास्तवातही मिळालं पाहिजे यासाठी "मराठी बोला चळवळ" हा उपक्रम दोन-तीन वर्षांपासून सुरू झालं आहे. राज्य शासकीय, केंद्र शासकीय, निमशासकीय असो अथवा खाजगी जिथे जिथे मराठी डावलली गेल्याचं दिसतंय तिथे संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करणं, पाठपुरावा करून बदल करून घेणं आणि तसा बदल होत नसेल तर कायदेशीर आव्हान देणं असं या चळवळीचं स्वरूप आहे. त्या बरोबरीने ग्राहकांचा दबावगाट तयारकरून मराठीला योग्य स्थान दिलं नाही तर मराठी लोक बहिष्कार घालतील आणि तुमच्या उद्योगावर, उत्पन्नावर परिणाम होईल हा कायदेशीर मार्गापेक्षा कमी वेळखाऊ आणि जास्त परिणामकारक मार्गही या चळवळीचा आहे. जास्तीत जास्त मराठी माणसांनी या दबावगटात सहभाजी होऊन त्याची परिणामकारकता वाषवली पाहिजे. मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरला की "भाषा जोडनेका साधन है, तोडनेका नही" असं अमराठी लोक म्हणतात. की खरंच आपण संकुचित, देशाच्या एकात्मतेला विरोध करतोय की काय असा विचार करून संवेदनशील मराठी माणूस लगेच स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण मराठीच्या स्थानाचा आग्रह म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं नाही; संकुचितपणा नाही तर दुसऱ्यांचा मराठीद्वेष उघड करून, संकुचितपणा उघड करून आपण उलट देशकार्यच करत आहोत; बेकायदा कारवाईला आळा घालण्यात व्यवस्थेला मजबूत करत आहोत हे समजून घेतलं पाहिजे.
८) मराठीची शब्दसंख्या वाढवणं
मराठीत इंग्रजी आणि इतर भाषांतले शब्द येणं अपरिहार्य आहे. परभाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द घडवायची प्रक्रिया मात्र चालू राहिली पाहिजे. मूळ इंग्रजी शब्द आणि त्याला समानार्थी नवीन मराठी शब्द यांच्या रस्सीखेचेतून जो शब्द बहुसंख्यांना आवडेल तो आपोआप स्वीकारला गेला पाहिजे. या दृष्टीने मी स्वतः फेसबुकवर "नवीन मराठी शब्द " ह गट तयार केला आहे. ज्याची सुरुवात करताना मी म्हटलं होतं.
चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!.
हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील.
साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. :)
एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा.
१) दुकानांवरच्या पाट्या
२) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस् करते" ई.
३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई.
४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड
५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती
तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !!
तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे !
https://www.facebook.com/groups/494409877351095/
आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील.
http://navin-marathi-shabda.blogspot.in/
म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!
हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील.
साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. :)
एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा.
१) दुकानांवरच्या पाट्या
२) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस् करते" ई.
३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई.
४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड
५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती
तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !!
तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे !
https://www.facebook.com/groups/494409877351095/
आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील.
http://navin-marathi-shabda.blogspot.in/
म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!
कुठला इंग्रजी शब्द आता अधिकृतरित्या मराठीत आहे, कुठला नवा शब्द अधिकृतरित्या मराठीत आहे हे ठरवण्याची ही व्यवस्था शासनाने निर्माण केली पाहिजे. आणि अद्ययावत शब्दकोश प्रसिद्ध केले पाहिजेत. शासन करत नसेल तर आपल्या पैकीच कुणितरी तो प्रयत्न नेटाने सुरू ठेवला तर ऑक्स्फर्ड डिक्शनरीप्रमाणे आपण आपलं स्वयंभू स्थान निर्माण करू शकू.
९) ई-साहित्याची साठवण.
आपल्या समाजात इंटरनेटस्नेही लोक वाढत आहेत. तरूण आणि मध्यमवयीनच काय शहरातील ज्येष्ठ सुद्धा आता फेसबुक, व्हॉटसप सहज वापरतायत. मराठीत टायपिंग करतायत. आपले अनुभव, भावना व्यक्त करतायत. हे नुसतं टाईमपास म्हणून केलेलं लिखाण नाही. अभ्यासपूर्ण, संदर्भ, फोटो दिलेलं आणि उत्तमशैलीतलं लेखन पण मी मिसळपाव, मायबोली सारख्या संकेतस्थळांवर वाचलं आहे. अशी खूप संकेतस्थळं स्वतंत्रपणे काम करतायत. पण संकेतस्थाळांची रचना अशी असते की सगळ्यात नव्या पोस्ट किंवा लेख वरती दिसतात आणि जुन्या पोस्ट त्याखाली गाडल्या जातात. जुनं चांगलं लिखण दृष्टीआड होतं व विस्मृतीत जातं. कुणी उत्साहाने शोधाशोध केली किंवा योगायोगाने लिंक बघण्यात आली की एखादं घबाड हाती लगल्याचा आनंद मिळतो. माझी या सर्व सकस लिखाण करण्यांना विनंती आहे की आपल्या लिखाणाचं ई-बुक अवश्य तयार करा. तुमचं लिखाण एकाठिकाणी राहील. वाचकांशी शेअर करणं सोपं जाईल. तुमच्याच नावावर एक-दोन किंवा दहा बारा पुस्तकं आहेत याचं समाधान मिळेल. ई-बुकची संकल्पना मराठीत रुजायला वाढायला मदत होईल. याचा अवश्य विचार करा.
१०) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार आहे माहीत नाही.
आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख
हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी जागतिक पातळीवरचे लेखन केले पण आज आम्ही ज्ञाननिर्मिती न करत स्वतःला आणि भाषेलाही मागे नेले आहे. आजीच्या भरजरी साडीच्या सोन्याची जर वितळवून दिवस काढतो आहोत असं वाटायला लागतं.
हा दर्जा मिळाला तर केंद्रसरकार कडून काही निधी मिळत असेल. एकाबाजूला राज्याकडे, मराठी माणसाकडे आहे त्याच निधीचा योग्य वापर होतोय का नाही ही शंका असताना अजून निधी म्हणजे फक्त संख्येत वाढ. गुणत्मक नाही. पण येत्या लक्ष्मीला आणि मिळ णाऱ्या मानाला नाही का म्हणा? म्हणून या कामाला शुभेच्छा.
पण आता ही लिपी वापरात नसल्याने ही लिपी वाचू शकणारे लोक खूप कमी राहिले आहेत. जुने-जाणते लोक, इतिहाससंशोधक किंवा जुन्या लिपी-भाषांचे अभ्यासक यांपुरतीच ती मर्यादित राहिली आहे. शिवकाल-पेशवेकाल या मराठी माणसाला अभिमानस्पद असणाऱ्या कालखंडाचा इतिहास या मोडीलिपीत कुलुपबंद होऊन पडला आहे. सर्वसामान्य वाचक थेट जुनी कागदपत्रे वाचू शकत नाही.
पण आता मनु बदलतो आहे. मोडीलिपीचं महत्त्व जाणून तिच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मोडी जाणणारेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तरूण आणि मध्यमवयीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून या प्रसार-प्रचाराला गती देत आहेत. ही आनंदाची बाब आहे.
११) मोडीलिपी चे जतन संवर्धन
अभिजात मराठी बद्दल बोलताना ऐतिहासिक मराठीचं मोठं लेखन मोडी लिपीत झालं आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष होतं. १२व्या शतकापासून शिवकाल, पेशवेकाल, ब्रिटिशकाल यांमध्ये मोडीलिपी मोठ्याप्रमाणवर वापरली जात असे. जिथे राजभाषा मराठी होती तिथे राजकीय पत्रसंवाद, व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी, जमिनीची इनामे, खरेदीविक्री यांच्या नोंदींसाठी मोडीलिपीचा वापर होत असे. माझ्या वडिलांनी सांगितलं की ४०-५० वर्षांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांकडे घरगुती पत्रं पण मोडी लिपीत लिहिलेली त्यांनी बघितली आहेत.
पण आता ही लिपी वापरात नसल्याने ही लिपी वाचू शकणारे लोक खूप कमी राहिले आहेत. जुने-जाणते लोक, इतिहाससंशोधक किंवा जुन्या लिपी-भाषांचे अभ्यासक यांपुरतीच ती मर्यादित राहिली आहे. शिवकाल-पेशवेकाल या मराठी माणसाला अभिमानस्पद असणाऱ्या कालखंडाचा इतिहास या मोडीलिपीत कुलुपबंद होऊन पडला आहे. सर्वसामान्य वाचक थेट जुनी कागदपत्रे वाचू शकत नाही.
पण आता मनु बदलतो आहे. मोडीलिपीचं महत्त्व जाणून तिच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मोडी जाणणारेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तरूण आणि मध्यमवयीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून या प्रसार-प्रचाराला गती देत आहेत. ही आनंदाची बाब आहे.
१२) भाषाप्रेमींनी कर्तृत्त्वान झालं पाहिजे.
मराठीची शब्दसंख्या, इतिहास, साहित्य, देवाणघेवाण या बाबींचा विचार केला. पण भाषेचं अस्तित्त्व ती बोलणाऱ्या समाजामुळे आहे. तिची वाढ ती बोल णा ऱ्या समाजाच्या वाढीमुळे आहे. आणि तिचं स्थान,मान ती बोलणाऱ्या समजाच्या स्थान-मानामुळे आहे. जो समाज सत्ताधारी असतो (राजकीय, सामाजिक, धार्मिक) त्याचं म्हणणं लोक ऐकतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे "राज्यकर्ती जमात व्हायला" पाहिजे.
मराठी माणसाने श्रीमंत व्हायला पाहिजे. क्रयशक्ती वाढवली पाहिजे. सर्वोत्तम वैज्ञानिक, सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम गुंतवणूकदार श्रीमंत, सर्वोत्तम कंपनी संचालक हे जेव्हा अस्खलित मराठीत बोलताना दिसतील तेव्हा "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते" या उक्तीप्रमाणे मराठी भाषेलाही सगळे गुण अपोआप चिकटतील.
समृद्ध मराठी, सकस मराठी यशवी मराठी भाषा शिकायला अमराठी लोक रांगा लावतील
१३) अमराठी लोक मराठी शिकू शकतात आणि शिकताहेत. ऑनलाईन, मोफत.
हो. हे खरं आहे.
मी अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी ऑनलाईन ट्युटोरियल्स तयार केली आहेत; जी माझ्या ब्लॉग्स च्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/
Learn Marathi from English मध्ये १३९ धडे आहेत.
Learn Marathi from Hindi मध्ये १०१ धडे आहेत.
या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे.
मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या २०६ साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर “Kaushik Lele” नावाच्या चॅनल वर टाकल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
You Tube Channel name :- Kaushik Lele
https://www.youtube.com/c/KaushikLele_Learn_Marathi
मे २०१२ मध्ये मी या उपक्रमाची सुरुवात केली.
माझ्या ट्युटोरियल्स वापरून मराठी शिकत असल्याचे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी ईमेलवर कळवले आहे. तर यूट्यूब चॅनलचे तीन हजार तीनशे हजार हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
त्यात महाराष्ट्रात शिक्षणासाठी किंवा कामनिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचा अभ्यास करणाऱ्या अमराठी व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत.
दोन्ही ब्लॉग आणि यूट्यूब चॅनलना सुमारे सात लाख वेळा लोकांनी भेट दिली आहे.
"क्रियापद रूपावली" अर्थात एका क्रियापदाची प्रत्येक काळातली, प्रत्येक सर्वनामासाठीची, वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रुपे दाखवणारे संकेतस्थळ मी तयार केले आहे. मराठी शिकणाऱ्यांसाठी नामाचे लिंग, अनेकवचन, सामान्यरूप देणारा शब्दकोश ही तयार केला आहे.
या सर्व उपक्रमांना फारच छान प्रतिसाद मिळाला असला तरी अजूनही मराठी शिकण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नाही असाच (गैर)समज सगळीकडे आहे. वेबसाईट अधिकाधिक उपयुक्त व्हावी आणि प्रत्येकापर्यंत तिची माहिती पोचावी असा माझा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नात तुमच्या सूचना, टीकांचे मी स्वागत करतो आणि प्रसारात तुमच्या सहकार्यासाठी नम्र विनंती करतो.
१४) समारोप
लिहिता लिहिता भरपूर लिहिलं आता थांबतो. तुम्ही इथपर्यंत वाचत पोचला असाल तर तुमच्या संयमाला आणि मराठीप्रेमाला मी दाद देतो. माझ्या या विचारांवर, कामावर साधकबाधक चर्चा होईल; मलाही काही गोष्टी नाव्याने कळतील अशी अपेक्षा आहे. अध्यक्षीय भाषणात कुठल्याही महापुरुषांना वंदन, जुन्या साहित्यकांना वंदन असं काही केलं नाही रागावू नका. त्यांना आपल्या कृतीतूनच आपण सगळे वंदन करणार आहोत.
तरी न्यून ते पुरतें। अधिक तें सरतें। करूनि घेयावें हें तुमतें। विनवितु असे
आपला,
कौशिक लेले
Abhinandan.great.mala manapasun patale.pan news pepar madhe de.sarv vachtil.aani vinod tavde na pathav.
ReplyDelete