The Log of Christopher Columbus ( द लॉग ऑफ ख्रिस्तोफर कोलंबस )




पुस्तक : The Log of Christopher Columbus (द लॉग ऑफ ख्रिस्तोफर कोलंबस)
लेखक : Christopher Columbus ख्रिस्तोफर कोलंबस
भाषा :  English इंग्रजी 
पाने : २५०

ISBN : 0-87742-951-0

युरोपाच्या पूर्वेला भारत आहे. युरोपातून पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून गेलं तर पृथ्वी गोल असल्याने भारतात पोचता येईल. या तर्कातून कोलंबसाने साहसी प्रवासाला सुरुवात केली. भारताच्या ऐवजी तो पोचला एका नव्या भूप्रदेशात. आणि कोलंबसाला अमेरिकेचा शोध लागला. इतपतच माहिती आणि कोलंबसाचे गर्वगीत ही कविता एवढंच साहित्य आत्तापर्यंत कोलंबसाबद्दल वाचलं होतं. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी शिडाच्या जहाजातून अज्ञात प्रवासाला निघणारा कोलंबस आणि त्याचे साथी, त्यांच्या प्रवासातला थरार, नव्या भूप्रदेशाशी तिथल्या आदिवासींशी (शब्दशः) आलेला संपर्क हे सगळं थेट कोलंबसच्या शब्दात जाणून घ्यायची संधी या पुस्तकाने दिली. वाचनालयात एका कोपऱ्यात धूळ खात पडलेलं हे पुस्तक खूप मोठा ऐतिहासिक दस्तऐवजआहे.





३ ऑगस्ट १४९२ ला कोलंबस स्पेनमधून निघाला. दोन महिन्यांनी तो नव्या भूमीत पोचला. ऑक्टोबर ते जानेवारी तो नवीन प्रदेश, नवीन बेटं बघत तिथल्या आदिवासींशी भेटत राहिला. जानेवारीत परतीचा प्रवास सुरू करून मार्च १४९३ ला तो स्पेनला परत आला. भारताचा नवा मार्ग सापडल्याची बातमी घेऊन. या सर्व प्रवासात त्याने रोजच्या रोज डायरी लिहून या प्रवासाचा अहवाल स्पेनच्या राजाला सादर केला. मूळ स्पॅनिश मधल्या या डायरीचं हे इंग्रजी भाषांतर आहे. रोज किती प्रवास केला, समुद्रात नवीन काय दिसलं, बोटीवर काय घडलं हे कोलंबस सांगतो आणि आपणही त्याच्या बरोबर हा प्रवास करायला लागतो. कित्येक दिवस झाले तरी जमीन काही दिसत नाही यामुळे वैतागलेले आणि जिवंत काही परत जात नाही असं वाटून निराश झालेले नाविक आणि बाकी कर्मचारी यांना कोलंबसाने धीर कसा दिला हेही वाचायला मिळतं. आपण घरापासून खूप दूर आलोय असं वाटू नये म्हणून बोटीने कापलेल्या अंतरांची नोंद चक्क खोटी, कमी अंतर दाखवण्याची शक्कलही त्याला लढवायला लागली. त्याच्याच शब्दांत वाचा : 

(फोटो मोठा करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)



पहिली भूमी लागल्यावर तो तिथे उतरला. त्या भूमीचा स्पेनच्या राजाचा प्रतिनिधी म्हणून आपण आता ताबा घेतला अशी त्याच्या लोकांच्या साक्षीने कागदपत्रं केली आणि या नव्या भूमिला नाव दिलं "सान साल्वादोर". कोलंबसाला जी नवीन बेटं लागली त्या सगळ्यांना आपल्या कल्पनाशक्ती आणि राजभक्तीनुसार राजपरिवारातल्या व्यक्तींची, देवांची, ग्रहांची वगैरे नावं तो ठेवत गेला. काही स्थानिक नावांचे अपभ्रंश झाले. पुढे पोर्तुगिजांनी मुंबई बेटाचं नाव "Bom Baim  म्हणजे "good little bay"" ठेवलं तो प्रसंगही असाच घडला असेल नाही. 


तिथल्या आदिवासी - "इंडियन" लोकांनी हे जहाज, गोरे लोक बघून हे 
लोक जणू स्वर्गातूनच आले आहेत अशा भावनेने, भीती आणि आदराने त्यांनी यांचं स्वागत केलं. खाणाखुणांच्या भाषेने एकमेकांचं बोलणं कसंबसं समजून घेतलं. कोलंबसाने त्यांचं वर्णन कसं केलंय पहा.




तिथली वनराजी, नद्यांचं पाणी बघून तो हरखून गेला. डायरीत जागोजागी त्याने इथल्या सौंदर्याचं, वनस्पती वैविध्याचं, त्यातून स्पेनला कसा व्यापरात फायदा होऊ शकेल याचं वर्णन केलंय. त्याचा मुख्य शोध होता सोनं. भारत सोन्याची खाण आहे या ज्ञानामुळे इथे कुठे सोनं दिसतंय, कुठल्या आदिवासींना याची माहिती आहे याचा शोध घेत तो आजूबाजूची बेटं आणि मोठा भूप्रदेश शोधत पुढे पुढे जात राहिला. आदिवासीही त्यांच्या बरोबर येऊन आपला भूप्रदेश त्यांना दाखवत होते. त्या बिचाऱ्यांना काय कल्पना; की स्वर्गातून आलेली ही माणसं एक दिवस आदिवासींसाठी नरकाहून भयंकर स्थिती उभी करणार आहेत. आज ज्यांचं स्वागत अतिथी म्हणून करतोय तेच उद्या आपल्याला गुलाम करणार आहेत. त्यांना काय कल्पना की दोन संस्कृतींचा, दोन जगांचा संगम आणि संघर्ष याची ही नांदी होती. कारण भोळेपणाने स्वागत करणऱ्या या लोकांच्याबद्दल कोलंबसाच्या मनात मात्र त्यांना धर्मांतरित करून ख्रिस्ती धर्मप्रचार करण्याची, गुलाम बनवून स्पेनच्या राजाच्या सेवेत आणण्याची स्पष्ट इच्छा होती. कोलंबसाच्या शब्दातच वाचा.




ही इच्छा डायरीत जागोजागी वाचायला मिळते. ईशान्य भारताच्या निसर्गपूजक आदिवासींमध्ये झालेल्या धर्मांतरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

पुढे डायरीत आदिवासींशी झालेल्या भेटी, त्यांची राहण्याची पद्धत, दिसलेली झाडं, प्राणी याचं वर्णन पुन्हा पुन्हा येतं तो भाग थोडा एकसुरी होतो. परतीच्या प्रवासात पोर्तुगीज अखत्यारीतील एका बेटावर त्याच्या काही खलाशांना पोर्तुगीज लोक पकडतात. तेव्हा एका योद्ध्याप्रमाणे तो पोर्तुगिजांना आव्हान देतो. जहाजातून न उतरता, त्यांच्या ताब्यात न सापडता केलेल्या खेळीमुळे शेवटी ते लोक माघार घेतात आणि खलाशांची सुटका होते. युरोपात परतताना मात्र त्याला वादळामुळे पोर्तुगाल जवळ जावं लागतं. तिथेही बार्थोलोम्यू डायस या प्रसिद्ध खलाशी योद्ध्याबरोबर त्याचा संघर्ष होतो. शेवटी तो निवळून पोर्तुगालच्या बंदरात उतरतो. तिकडे त्याचं स्वागत होतं आणि शेवटी तो स्पेनला परततो. या सगळ्या नाट्यमय घडामोडींचही वर्णन आहे.


पुस्तकाच्या पहिल्या ५० पानांत कोलंबसाचं लघु चरित्र आणि या डायरीचा इतिहास आहे. डायरीची भाषांतरं, रूपांतरं कशी झाली आणि त्यावर संपादकीय प्रक्रिया काय करावी लागली आहे हे सविस्तर सांगितलं आहे. त्या काळाच्या नौकावहन शास्त्राची स्थिती कशी होती, काय साधनं वापरली जायची, काय अडचणी होत्या हे समजावून दिलं आहे. त्यामुळे कोलंबसाच्या साहसाचं गांभीर्य अजूनच वाढतं. उदा. वेळ मोजण्यासाठी वाळूचं घड्याळ वापरलं जायचं. नौकेचा वेग मोजण्यासाठी एक लाकूड जहाजाच्या सुरुवातीला पाण्यात टाकून पूर्ण जहाज पुढे जायला किती वेळ लागला ते बघायचं असा प्रकार! जहाज 
शिडाचं ! त्यामुळे प्रगती सगळी वाऱ्यावर अवलंबून. गंमत म्हणजे त्यांनी लिहिलंय की हे साहस ते करू धजले याचं कारण एक भौमितिक चूक. टोलेमी या शास्त्रज्ञाने पृथ्वीचा व्यास किती असावा याचा अंदाज केला होता. तो प्रत्यक्ष व्यासाच्या एक चतुर्थांशच होता. त्यामुळेच हजारभर मैल गेलं उजवीकडे की आलाच की भारत अशी कल्पना या लोकांची झाली. आणि त्यातून हे साहस सुचलं.

पुस्तकाच्या उपसंहारातही कोलंबसाच्या आधीच्या सफरी, कोलंबसाचं नंतरचं जीवन, काही नकाशे इ. आहे. पुस्तकात जागो जगी नंतरच्या चित्रकारांनी काढलेली प्रसंगांची रेखाचित्रं आहेत. प्रवास दाखवणारे नकाशे आहेत. पुस्तक जिवंत, अधिक बोलकं झालंय.


कोलंबसाने तोफेचा बार उडवून आदिवासींना आपलं सामर्थ्य दाखवलं तो प्रसंग


त्याकाळत भारताबद्दल किती आकर्षण होतं आणि भारत किती मोठा देश असेल याबाद्दल काय समजुती होत्या हे पण पुस्तकातून कळतं. त्याची एक झलक या नकाशावरून येईल. भारत किती मोठा आणि पसरलेला दाखवलाय पहा.




अडीचशे पानांचं आडवं (चित्रकलेच्या वह्यांसारखं)हे पुस्तक एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवजआहेच पण डायरीच्या आधी-नंतर दिलेल्या माहिती मुळे ते माहितीचा खजिनाही आहे. एका दमात वाचणं शक्य नाही. जो या नौकावहन क्षेत्राशी संबंधित नाही त्याला माहितीचा भडिमार झाल्यासारखं वाटेल. जरा धीराने, चिकाटीने पुस्तक पूर्ण वाचलंत तर एका अद्भुत सत्यइतिहासाची सफर केल्याचा आणि ज्ञानात भर पडल्याचा दुहेरी आनंद मिळेल. हे पुस्तक मराठीतही यायला हवं.



----------------------------------------------------------------------------------

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...