दारा शिकोह (Dara Shikoh)




पुस्तक - दारा शिकोह (Dara Shikoh) 
लेखक - काका विधाते (Kaka Vidhate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ८४०
ISBN - 978-81-87549-81-9
प्रकाशक -  प्रफुल्लता प्रकाशन (दुसरी आवृत्ती २०१६)
छापील किंमत - रु. ७८०/-

सर्वप्रथम हे पुस्तक मला वाचायला उपलबद्घ करून दिल्याबद्दल  "ग्रंथप्रेमी.कॉम" द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.

ऐतिहासिक लेखांत हे वाचलं होतं की औरंगजेबाने त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं, भावांची हत्या केली आणि गादी बळकावली. त्याने मारलेल्यापैकी
 दारा शिकोह हा त्याचा भाऊ विद्वान होता. ह्या कादंबरीच्या रूपाने दारा शिकोह, त्याचे वैचारिक धोरण आणि त्याला सामोऱ्या जावे लागलेल्या युद्धांबद्दल सविस्तर वाचायला मिळाले.

कादंबरीची सुरुवात होते दारा शिकोह चा आजोबाच्या - जहांगीराच्या - मृत्यूपासून. जहांगीरानंतर वारस कोण; पुढचा बादशहा कोण होणार हे ठरवण्यासाठी जहांगीराची बायको, मेव्हणा, मुलं, जावई ह्यांच्यात रससीखेच सुरू होते. त्यात बाजी मारतो शहाजहान. आपल्या भावंडानां, पुतण्यांना ठार मारून तो गादीच्या सगळ्या दावेदारांचा काटा काढतो. हे सर्व बघत होता त्याचा मोठा मुलगा दारा शिकोह. स्वभावाने धार्मिक, मनमिळावू दाराला बापाचं हे रूप धक्कादायक होतं. पण लहान वयातल्या दाराची शहाजहान ने कशीबशी समजूत काढतो.

दारा मोठा होताना त्याचा धार्मिक, अध्यात्मिक विशेषतः तत्त्वज्ञानात रस असणारा पिंड उघड होऊ लागला. घरच्या इस्लामची शिकवण त्याला मिळत होती. सूफी संप्रदायांतल्या ध्यानधारणा, नामस्मरण आणि अध्यात्म तो वेगाने आत्मसात करत होता. पण प्रजेतले, सरदारांतले बहुसंख्य हिंदू असल्यामुळे त्यांच्या धर्माबद्दलसुद्धा त्याला आकर्षण वाटू लागले. हिंदू पंडित, कवी, भाषातज्ज्ञ ह्यांच्याशीही त्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाषा वेगळ्या असल्या तरी अंतिम सत्य एकच आहे हे त्याला उमगू लागलं होतं. अंतिम सत्य साधण्याची पद्धत सुद्धा थोड्याफार फरकाने सारखीच आहे. हे जाणवून उपनिषदे, योगवासिष्ठ इ. हिंदू धर्म ग्रंथांचं फारसी मध्ये भाषांतर करवून घेतलं. स्वतः अध्यात्मावर ग्रंथ, भाष्य काव्य लिहिले.

राजदरबाराच्या कामात लक्ष घालायची संधी मिळाल्यावर राज्यधोरण हिंदूना जाचक नसावे, धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत अशी भूमिका तो घेऊ लागला. इस्लामच्या नावाने राज्य चालवणाऱ्या मुघलांच्या हे विरुद्ध होतं. त्यामुळे बादशहा, मुल्ला मौलवी, दरबारातले धर्मवेडे सरदार आणि औरंगजेब ह्याच्या मनात त्याच्या विरुद्ध चीड निर्माण होऊ लागली. भविष्यात होणाऱ्या संघर्षाची बीजे नियतीने पेरली होती.

शाहजहानच्या चार मुलांना वेगवेगळ्या जहागिरी मिळाल्या. आपल्याला दिलेली जहागीर संभाळायची प्रत्येकाची पद्धत वेगळी. दिलेली जहागिरी दारा चांगली सांभाळत होता. पण फार स्वाऱ्यांचा अनुभव त्याला आला नव्हता. मग त्याला मिळाली काबुल-कंदाहारची मोहीम. अशी मोहीम ज्यात स्वतः बादशहा तसंच योद्धा औरंगेजबसुद्धा पूर्वी दोनदा पराभूत झाले होते. दाराला मोहिमेवर जावे लागले पण अपयशी होऊन तोही परत आला. सरदारांमधला बेबनाव, राजकारणातली अनिश्चितता त्याने जवळून बघितली. पराभूत झाला तरी शहाजहानने त्याला वारस म्हणून त्याला नेमले आणि त्याच्या विरोधकांचे पित्त खवळले. औरंगजेबाकडे दख्खन, महाराष्ट्राचा सुभा होता. त्याचं कामकाज आपल्या मनाप्रमाणे दारा करू देत नाही; बादशाहा आता त्याच्या सल्ल्याने करतात ही जखम त्याला सतत खुपू लागली.

शाहजहान आजारी पडल्यावर औरंगजेब, मुराद आणि शुजा ह्या तिघांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. औरंगजेबाने त्यादोघांना आपल्याबरोबर घेतले आणि दाराच्या विरुद्ध फितवले. आणि सुरु झाली स्वार्थाची लढाई. कोणी सरदार ह्याच्या बाजूने, कोणी त्याच्या बाजूने; कोणी जड होणाऱ्या पारड्याकडे. असं करत करत लढायांमागे लढाया होऊ लागल्या. महत्त्वाच्या लढाईत पराभूत दारा झाला. पळून जाऊन पुन्हा लढाईसाठी तयार होत राहिला. औरंगजेबाचं सैन्य किंवा त्याचे सरदार त्याचा मागावर. माळवा, दिल्ली, पंजाब, सिंध, कच्छ, गुजरात, पुन्हा राजस्थान, सिंध, बलुचिस्तान अशी महिनोन्महिने परागंदा अवस्थेत काढून शेवटी एकदाचा तो पकडला गेला. औरंगजेबाने त्याची धिंड काढली. त्याचा शिरच्छेद केला.  त्याच्या बायका औरंग्याच्या बायका झाल्या. मुलगा सुद्धा तुरुंगात खितपत पडून मारला गेला.

"सुलह-इ-कुल" म्हणजे सर्वांशी सामोपचाराचं धोरण ठेवण्याची इच्छा असणाऱ्या ह्या ज्योतीचा अंत झाला आणि औरंग्याच्या रूपाने मुघली धर्मांधतेचा मूळचा अंधार अजूनच गडद झाला. शोकांतिका पूर्ण झाली.

काका विधाते ह्यांनी ही शोकांतिका तितक्याच ताकदीने आपल्यापुढे मांडली आहे. आठशे पानी कादंबरी वाचताना आपण अक्षरश: मुघल काळात वावरत असतो. प्रसंगांचे तपशीलवार वर्णन; योग्य संवाद ह्यातून आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभे राहते. पात्रांच्या तोंडात फारसी शब्दयुक्त मराठी भाषा आहे. त्यातल्या अनोळखी फारसी शब्दांचे शब्दार्थ शेवटी दिले आहेत. त्यामुळे वाचताना अडत नाही. वातावरण निर्मिती छान होते.

काही पाने वानगीदाखल वाचून बघा. 

शहाजहानच्या आज्ञेने इतर शहाजाद्यांचा खातमा करण्यात आला तो प्रसंग 


आपल्या सूफी पंथीय उस्तादाशी दाराची धार्मिक चर्चा


हिंदू तत्त्वज्ञानाच्या फारसी भाषांतराच्या महान कार्याबद्दलचा एक प्रसंग


दारा बद्दलची औरंगजेबाची बादशाहकडे तक्रार आणि पक्षपाती दरबारी राजकारणाची एक झलक 

दाराची धिंड 

कादंबरीच्या पूर्वार्धात दारा शिकोहला तत्त्वज्ञानात कसा रस वाटत होता; त्यात तो प्रगती करत होता, त्यामार्गावर जिज्ञासू वृत्तीने कसे प्रश्न विचारत होता हे दाखवणारे खूप प्रसंग आहेत. अध्यात्मातल्या जड-जड अमूर्त संकल्पनांवर चर्चा कशी चालली असेल हे अगदी सविस्तपणे उभे केले आहे. तसंच हिंदू-मुस्लिम तत्त्वज्ञानाच्या संकल्पना कशा सारख्या आहेत हे दाखवणारा सुद्धा खूप मजकूर आहे. त्यातून दारा ह्या पात्राच्या ज्ञानाची, गांभीर्याची आणि प्रामाणिकपणाची भूमिका वाचकाच्या मनावर निश्चितपणे ठसते. आपण सुद्धा त्याच्या बाजूने उभे राहतो. मात्र, हा भाग वाचायला खूप जड आहे. संस्कृत आणि फारसी शब्द खूप येतात. मूळ संकल्पनाच माहित नसल्यामुळे त्यांच्यावरची चर्चा डोक्यावरून जाते. ही चर्चा पुस्तकाचा मूळ उद्देश नाही. तो भाग थोडा कमी करायला हवा होता.

बाकी एका दीर्घ कादंबरीसाठी आवश्यक असा सगळा सविस्तारपणा त्यात आहे. दाराची प्रेमप्रकरणे, युद्धात चढाईतले डावपेच, दरबारी लोकांचे स्वार्थ, हिंदू राजांची साथ किंवा विरोध, दाराच्या भावभावनांचा कल्लोळ ह्यातून वाचकही कथेत समरसून जातो.

मुस्लिम समाजात चुलत भावांची लग्न होतात हे ऐकलं होतं. ह्या मुघल घराण्यात हे पदोपदी दिसतं. इतकंच काय बाईच्या पाहिल्या लग्नापासूनच्या मुलीचं दुसऱ्या लग्नापासूनच्या मुलाशी लग्न झालेलं दिसतं. त्यामुळे दोनजण एकमेकांचे भाऊ तेच व्याही कधी मेव्हणे तर कधी सासरे-जावई असली भलतीच गोंधळात टाकणारी नाती तयार होतात. पुस्तकाच्या शेवटी कादंबरीत आलेल्या पात्रांची थोडक्यात ओळख आणि परस्परसंबंध सांगितले आहेत त्याची मदत होते.

संदर्भ ग्रंथांची यादी, दाराच्या पलायनाचा पूर्ण मार्गाचा नकाशा, मुघल वंशावळ, जुनी चित्रे ह्यामुळे ही कादंबरी एक कल्पित कादंबरी राहत नाही तर कलात्मक पद्धतीने मांडलेला एक ऐतिहासिक अभ्यासग्रंथ ठरतो. 

दारा शिकोहचं आयुष्य हे दाखवतं की भारतातल्या सर्वधर्मसमभावाचा स्वीकार मुस्लिम धर्माभिमानी व्यक्तीनेसुद्धा करणं किती सोपं आहे. मात्र अश्याप्रकारे विचार करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या स्वधर्मियांकडून किती धोका आहे आणि झगडा किती मोठा आहे हे सुद्धा हे चरित्र दाखवतं. मुघलांना आक्रमक न मानणारे, त्यांचं गौरवगान करणारे लोक सुद्धा दारा शिकोहला सोयीस्करपणे विसरतात हेच आपलं दुर्दैव. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचून, विशेषतः मुस्लिम वाचकांनी वाचून आपला दृष्टिकोन विस्तारला पाहिजे. 

हे पुस्तक पुढील लिंकवर ऑनलाईन विकत घेता येईल 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)


पुस्तक - I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)
लेखक - Shnatanu Naidu (शंतनू नायडू)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - २१६
ISBN - 978-93-9032-752-2

काही दिवसांपूर्वी एक छोटी चित्रफित बघितली होती त्यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा वाढदिवस साजरा करतानाचे दृश्य होते.

https://youtu.be/n87nYuuZiDo

अतिशय साधेपणाने सगळं चाललं होतं. एक छोटासा कपकेक त्यावरील छोटी मेणबत्ती. एखाददुसरी व्यक्तीच तिथे उपस्थित आहे. तिथे आपल्याला एक तरुण मुलगा दिसतो पंचवीशीतला. ह्या वाढदिवसाचा एक फोटो सुद्धा पसरला होता. त्यात असं म्हटलं होतं की होतं की हा रतन टाटा यांचा स्वीय सहाय्यक आहे त्याचं नाव शंतनु नायडू. त्याची आणि रतन टाटा यांची ओळख कशी झाली ह्याचा किस्सा असा दिला होता की; शंतनू नायडू हा तरुण प्राणीप्रेमी. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या अंगावरून वाहने गेल्यामुळे त्यांचे होणारे मृत्यू बघून त्याला वाईट वाटलं. ह्यावर काहीतरी उत्तर शोधावं म्हणून त्याला एक कल्पना सुचली. कुत्र्यांच्या गळ्यात "रिफ्लेक्टर बँड" -प्रकाशपरावर्तन करणारे पट्टे - बांधण्याची. ह्या पट्टयांमुळे वाहनचालकाला लांबूनच समोर काहीतरी आहे ह्याचा अंदाज येऊन तो वेग कमी करेल व अपघात टळेल. पट्टे लावण्याच्या कामाची माहिती त्याने रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचवली. प्राणीप्रेमी रतन टाटा यांना हे काम आवडलं आणि त्यांनी त्यांच्या व्हेंचर कॅपिटल फंडातून शंतनूला प्रायोजकत्व दिलं. अशा पद्धतीने टाटा पुरस्कृत स्टार्टअप सुरू झाली. पुढे ह्या ओळखीचं रूपांतर घनिष्ठ मैत्री झालं. शंतनू परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर टाटांनी त्याला नोकरी दिली तेही स्वतःच्या ऑफिसमध्ये, स्वतःचा स्वीय सहाय्यक/ मॅनेजर म्हणून.

इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही त्यामुळे हे खरं आहे का हे पडताळून बघितले. कळलं की हे खरं आहे. इतकंच नाही तर शंतनुने स्वतःच्या आयुष्यातल्या ह्या टाटा पर्वावर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. योगायोगाने माझ्या वाचनालयात (डोंबिवलीची पै'ज फ्रेंड्स लायब्ररीमध्ये) मला हे पुस्तक सुद्धा काही दिवसात नजरेस पडलं. तेच हे पुस्तक " आय केम अपॉन अ लाईटहाऊस".

शंतनूने पुस्तकाची सुरुवात भटक्या कुत्रांच्या अपघाती मृत्यूची समस्या त्याला कशी जाणवली ह्या प्रसंगापासून केली आहे. चमकणाऱ्या पट्ट्यांचा उपाय कसा सुचला, त्याच्या मित्रांबरोबर पुण्यात असे पट्टे बांधण्याची मोहीम त्यांनी राबवली हे सांगितलं आहे. ही बातमी टाटांना कळवावी असे त्यांच्या घरच्यांच्या मनात आलं. कारण चार पिढ्यांपासून त्या कुटुंबातले गृहस्थ टाटांच्या वेगवेगळ्या कंपन्यात काम करत होते. टाटा समूहाच्या योगदानाबद्दल, औदार्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. श्रद्धा होती. पण रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीला रोज हजारो पत्रे येणार. त्यात आपलं पत्र त्यांच्या पर्यंत पोहोचेल का नाही. पोचले तरी त्यांना ते बघता येईल; त्याला उत्तर देतील अशी खात्री अजिबात वाटत नव्हती. ह्या सगळ्या वेळातली हुरहूर शंतनूने छान शब्दबद्ध केली आहे. पण टाटांचे उत्तर आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी कामातही गुंतवणूक केली आणि शंतनुच्या आयुष्यातल्या टाटा पर्वाची सुरुवात झाली. ती भेट कशी झाली असेल टाटा काय बोलले असतील ह्याची उत्सुकता आपल्या मनातही जागी होते. ह्या भेटीचं आणि टाटांचा साधेपणाचं नेमकं वर्णन पुस्तकात आहे,.

टाटांनी गुंतवणूक केल्यामुळे "मोटोपॉव" ह्या स्टार्टअपच्या कामाचा अहवाल देण्यामुळे दोघांचा संबंध पुन्हापुन्हा येऊ लागला. ऐंशीच्या पुढे टाटा आणि तिशीच्या आतला शंतनू ! पण वयाचा, मानाचा, पदाचा अजिबात गर्व नसलेले टाटा ह्यांनी शंतनुचा एक मित्र म्हणून, मुलासारखा किंवा नातवंडासारखा त्याचा स्वीकार केला. शंतनूला उच्चशिक्षणासाठी कॉलेजला जायचं होतं त्यासाठी त्याची तयारी चालू होती. अपेक्षित होता तसा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून तो निराश झाला. पण नंतर कॉर्नेल कॉलेजमध्ये मिळाला. या सगळ्या उतार-चढावांत तो टाटांच्या संपर्कात होता. टाटांनी त्याला प्रेरित ठेवलं. तेव्हा त्याने ठरवलं की उच्च शिक्षण घेऊन परत आल्यावर जर टाटांनी परवानगी दिली तर टाटा ट्रस्ट मध्येच काहीतरी सामाजिक काम करायचं. अमेरिकेत असतानाही टाटा त्याला प्रोत्साहित करायचे. न्यूयॉर्कला गेल्यावर तिकडे भेट घ्यायचे. दोघे बाहेर फिरायला, शॉपिंग ला जायचे. एकमेकांची थट्टा मस्करी करायचे. दोघांमधला हा खेळकर जिव्हाळा मोहित करतो.

अमेरिकेतून परतल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिस मध्ये स्वतःचा स्वीय सहाय्यक मॅनेजर म्हणून नोकरी दिली. आत्तापर्यंत मैत्री, दिलदार व्यक्तिमत्व असणारे टाटा आता त्याचे साहेब सुद्धा झाले! पूर्वी कधी केलं नाही अश्या कामाच्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर पडल्या. टाटांच्या कामाच्या जबाबदाऱ्या, कामातले ताण-तणाव याच्यातून आणि कामातली शिस्त याच्यामधून कधीकधी टाटा आपल्याशी कठोरपणे वागत आहेत; आता पूर्वीचा मित्र राहिला नाही का असंही त्याला वाटायचं. पण काम झालं की पुन्हा थोड्या वेळाने दोघांच्या गप्पा गोष्टी सुरु व्हायच्या. त्याला लक्षात आलं की टाटा त्याला नोकरीसाठी तयार करत आहेत; आयुष्यासाठी तयार करत आहे. ह्या प्रसंगांत स्वतःच्या भावभावनांचं प्रामाणिक चित्रण त्याने केलंय. त्यामुळे योग्य तिथे टाटा कसे शिस्तशीरपणे वागत होते; मैत्रीत वाहवत गेले नव्हते हे आपल्याला देखील बघायला मिळतं.

शंतनूला स्वीय सहाय्यक म्हणून त्याला वेगवेगळ्या मीटिंगमध्ये उपस्थित राहायला जायचं. टाटा गोष्टी कश्या पारखतात, त्यांना कुठली माहिती लागते; माहिती अचूक आणि वेळेवर कशी लागते याचे त्याला धडे मिळाले. नवा असल्यामुळे कधीकधी कामाचा ताण वाटायचा हे सुद्धा त्याने प्रांजळपणे कबूल केलं आहे. असे ताणाचे बरेच प्रसंग पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक म्हणजे "टाटा टाटा गोड गोड" असं होत नाही. मोठ्या व्यक्तीबरोबरचा सहवास, त्याच्याबरोबर काम हे त्रासदायकसुद्धा असतं हे कळतं.

"जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण" म्हणतात त्याप्रमाणे सतत कामात गर्क असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. सतत कामाचे दौरे आणि गाडीतही काम करत टाटांबरोबर प्रवास करायला मिळाला. फार क्वचितच ते सुट्टी घेत. पण त्यांच्याबरोबर सुट्टी घालवण्यासाठी ही मजा त्याला अनुभवता आली. काम बंद ठेवून पूर्ण मजा कशी घ्यायची हेही त्याला दिसलं. वेगवेगळ्या विषयात रस असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. इतक्या उच्च पदावर राहूनही टाटा साधेपणा वागतात. बॉडीगार्ड ठेवणं, लोकांना टाळणं त्यांना आवडत नाही. टाटांनी हाताला धरून "असं वाग" हे कधी शिकवलं नाही पण त्यांच्या 
त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते खूप काही शिकवत होते. सगळ्या अनुभवांचे, किश्श्यांचे सुंदर वर्णन शंतनू नायडू यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 


अनुक्रमणिका

पहिल्या भेटीतच टाटा शंतनू आणि त्याच्या मित्राला आपल्या बंगल्यावर घेऊन जातात. त्यांच्या दोन कुत्र्यांशी ओळख करून देतात तो प्रसंग

अमेरिकेत शंतनू कुत्रा पाळतो आणि जगण्याला नवी उमेद मिळवतो. त्या कुत्र्याबद्दलचा हा प्रसंग

कामात झालेल्या चुकांबद्दल टाटांकडून कानउघडणी


टाटाच नव्हे तर ऑफिसमधल्या इतर महिला सहकारी सुद्धा त्याला अगदी मायेने वागवत, शिकवत होत्या त्यांचा विशेष उल्लेख पुस्तकात आहे. त्यातली ही दोन पाने

विशेष म्हणजे रतन टाटा ही मध्यवर्ती कल्पना असली तरी शंतनूचे स्वतःचं व्यक्तिमत्व पुस्तकात निश्चितपणे अधोरेखित होतं. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर त्याला एकटेपणा वाटायला लागला तेव्हा त्याने फोटोग्राफीचा आधार घेतला; तिथे कुत्रा पाळला आणि कुत्रा पाळल्यावर त्या कुत्र्याच्या निमित्ताने त्याला मित्र मिळाले असे इतर प्रसंगही ह्यात आहेत. त्याचं हे व्यक्तिमत्व कळत गेल्यामुळेच त्यामुळेच तिशीतला शंतनू आणि ऐंशी पार टाटा यांचं समीकरण कसं जुळतंय हे बघायला मजा येते. एक खोडकर मुलगा आणि तर एक मोठे गंभीर उद्योगपती. कधी कधी उदास, निराश होणारा होणारा मुलगा तर आयुष्यातले चढ-उतार बघितलेले पोक्त आजोबा. मोठ्या व्यक्तिमत्त्वाची सादर भीती बाळगणारा मुलगा तर मोठेपणाची झूल ना बाळगता थट्टा मस्करी करून त्याला आश्वस्त करणारं मिश्किल व्यक्तिमत्त्व !

शंतनू हा तुमच्या आमच्या सारख्या साध्या घरातला एक मुलगा. पण वेगळ्या कल्पनेमुळे त्याच्या आयुष्याला सुंदर कलाटणी मिळू शकली हे वाचणं सुखदायक आहे. प्रोत्साहित करणारं आहे. कदाचित आपल्या हातूनही असं काहीतरी काम घडू शकतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीला ते आवडेल आणि त्यातून आपले स्नेहबंध जुळतील असा आशावाद जागवणारं पुस्तक आहे. दुसरीकडे रतन टाटा यांच्यासारख्या व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे कळतं. जर आपण आत्ता आपल्या क्षेत्रात यशस्वीतेच्या पायऱ्या चढत असू, सेलिब्रिटी होण्याच्या मार्गावर असू तर मोठं झाल्यावर कसं वागलं पाहिजे हे जाणवतं. "अत्युच्चपदी थोरही बिघडतो" ह्या उक्तीला छेद देणं शक्य आहे हे सुद्धा आपल्याला कळतं.

शंत
नू ची भाषा खिळवून ठेवणारी, खेळकर, मिश्किल आणि अतिशय प्रामाणिक आहे. त्यात कुठेही अभिनिवेश नाही. एखादी गोष्ट मुद्दामून मोठी करून सांगितली आहे असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. रमत राहतो.

पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात पानोपानी प्रसंगांची रंगीत चित्रे आहेत. छायाचित्रे नव्हेत अर्कचित्रे. त्यामुळे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर छान उभा राहतो. एखाद्या लहान मुलांच्या पुस्तकासारखं रंगीबेरंगी आणि सचित्र पुस्तक आहे. विषय आणि मांडणी गंभीर असली तरी या पुस्तकामुळे या चित्रांमुळे पुस्तकाला एक वेगळा हलकेपणा आला आहे. वाचनीयता वाढली आहे. संजना देसाई ह्यांनी ही चित्रे काढली आहेत. सर्वसाधारणपणे मोठ्यांच्या पुस्तकात छायाचित्रं असतात किंवा एखाद दुसरं स्केच असतं. पण कादंबरी मध्ये खरंच अशी चित्रं असतील तर वाचकाला अजून समरसून वाचता येईल. हा प्रयोग जास्तीत जास्त लेखकांनी, प्रकाशकांनी करून बघावा असं मला वाटलं.


चांगली लेखनशैली असणारा नवीन लेखक, वेगळा विषय, पुस्तकाची मांडणी सजावट सर्वच उत्कृष्ट आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेलच.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

ही रात चांदण्याची (Hee raat chandanyaachi)

 


पुस्तक - ही रात चांदण्याची (Hee raat chandanyaachi)
लेखक - निनाद म्हात्रे (Ninad Mhantre)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - 126
ISBN - 978-93-5446-619-9

माझ्या अभिप्रायार्थ स्वतःहून पुस्तक पाठवल्याबद्दल सर्वप्रथम लेखक निनाद म्हात्रे ह्यांचे आभार.

हे पुस्तक एका दोन मित्रांच्या मनमोकळ्या गप्पांचं आहे. कॉलेजात एकत्र असणारे मित्र बऱ्याच वर्षांनी फिरायला जायचा प्लॅन करतात. एकत्र भेटतात. आणि निवांत गप्पा मारतात. गप्पांच्या ओघात जुना अबोला, गैरसमज निवळतात.
जुन्या आठवणी निघतात. नोकरी धंद्यानिमित्त काय अनुभव आले असतील त्याची देवाणघेवाण होते. विषयांतून विषय निघतात, थट्टामस्करी होते. शेवटी सहल संपल्यामुळे त्यांना थांबावं लागतं ...ह्या गप्पांचं चांदणं मनात रेंगाळत ठेवत. असं पुस्तकाचं स्वरूप आहे.

जुने मित्र हल्ली भेटत नाहीत, आणि त्यांच्याशी फोनवर बोलणं होत नाही हे सांगणारा प्रसंग.


क्रिकेट आवडतं म्हणून मैत्रीण थट्टा करते. मग क्रिकेट आणि खरं आयुष्य ह्यात कसं साम्य आहे हे मित्र तिला समजावून सांगतो.


एक गाणं सांगायचं आणि त्या गण्याबद्दलची एक आठवण सांगायची अश्या "आठवणींच्या भेंड्यां"चा अभिनव खेळ ते खेळतात. त्यातला एक प्रसंग.




ह्यातले मित्र हे साधारण सुखवस्तू मध्यमवर्गीय घरांतले आहेत. त्यांची आयुष्यही तशी सरधोपटच आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी प्रचंड वेगळ्या नाहीत. तुम्ही आम्ही जेव्हा जुन्या मित्रांशी गप्पा मारू त्या अश्याच होतील. म्हणून पुस्तकाशी आपण रिलेट करू शकतो. परंतु काही आगळं वेगळं वाचलंय असं होत नाही. आठवणींच्या गुंफणीतून काही कथा समोर ठेवायची आहे, "फ्लॅशबॅक" मध्ये रहस्य उलगडून दाखवायचं असं सुद्धा 
काही नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंग आपापल्या जागी वाचायला ठीक असला तरी ते सलग एकत्र वाचून पुस्तक वाचल्याचं समाधान वाटत नाही. छोट्या छोट्या ब्लॉगपोस्ट सलग वाचल्यासारखं वाटतं.

पुस्तकात मुद्रित शोधनाच्या आणि व्याकरणाच्या चुका बऱ्याच आढळल्या. 

पण पहिल्याच पुस्तकाच्या मानाने निनाद म्हात्रे ह्यांचं लेखन चांगलं आहे. ते ते प्रसंग वाचायला चांगले वाटतात. पात्रांचे संवाद, शब्दांची निवड चांगली आहे. एकमेकांची थट्टामस्करीचा माहोल छान जमला आहे. निनाद म्हात्रे ह्यांच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा !


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————


शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman)






पुस्तक - शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman)
लेखक - रिचर्ड फाईनमन (Richard Feynman)
भाषा - मराठी  (Marathi)
अनुवाद - माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
पाने - ४२३
मूळ पुस्तक - Surely you are joking Mr. Feynman
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
ISBN - 978-81-938036-4-6

रिचर्ड फाईनमन हे भौतिकशास्त्रात संशोधन करणारे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ होते. 

एखाद्या शास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला माहिती नसेल तर आपल्या डोळ्यासमोर एखादी साचेबद्ध प्रतिमा उभी राहील. सतत काहीना काही प्रयोग करणारी ; विचारात गढलेली; प्रयोगशाळेत आणि वाचनात रमणारी अशी व्यक्ती डोळ्यासमोर येईल. मुलांना शिकवणे, चर्चासत्रात भाग घेणे, वैज्ञानिक पेपर मांडणे अशा वेळीच त्यांचा इतर लोकांशी संपर्क हा होत असेल. शास्त्रज्ञाच्या गप्पांचा विषय सुद्धा विज्ञानतंत्रज्ञान या भोवतीच फिरत असेल असा आपल्याला वाटेल. 

पण रिचर्ड फाईनमन मात्र या प्रतिभेपेक्षा खूप वेगळे होते हे आपल्याला त्यांचं पुस्तक वाचून कळतं. ते गप्पिष्ट होते. लोकांच्या खोड्या काढण्यात त्यांना मजा यायची. वेगवेगळ्या कलांमध्ये त्यांना रस होता. इतकंच काय अगदी पार्ट्यांमध्ये जाणं, बारमध्ये जाऊन पोरी पटवणे इथपर्यंत त्यांची मजल जात होती. पण ह्या सगळ्यामागे थिल्लरपणा नव्हता तर एखादी गोष्ट कशी चालते, त्यामागे काय तर्क असतो हे समजून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात होती. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचं कुतूहल आणि त्याचा कार्यकारणभाव समजून घेणे त्यासाठी स्वतः प्रयोग करणं हे कुठल्याही शास्त्रज्ञासाठी आवश्यक गुण त्यांच्यात होते. कुशाग्र बुद्धीमत्ता, आकलनशक्ती, आकडेमोडीतला वेग उपजतच होते. त्यामुळे त्यांचे किस्से हे "माहिती-रंजक" (इन्फोटेनममेंट) प्रकारचे वाटतात. 


पुस्तकात सुरुवातीला त्यांनी लहानपणच्या आठवणी सांगितल्या आहेत. खेळणी, वस्तू तोडणे, मोडणे पुन्हा जोडणे ह्या त्यांच्या आवडीतून भविष्यातल्या शास्त्रज्ञाची चुणूक दिसते. जगप्रसिद्ध एम.आय.टी. विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. आणि पुढच्या शिक्षणासाठी ते प्रिन्स्टन मध्ये गेले. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलांच्या खोड्या काढल्या. आणि संशोधन करण्यासाठी काहीतरी अचाट प्रयोग करताना प्रयोगशाळेची खोलीच उद्ध्वस्त होण्याचा पराक्रम देखील केला. 

तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु होण्याच्या मार्गावर होते. अमेरिकेने अणुबॉम्ब बनवायची गुप्त योजना आखली. त्यात फाईनमन ह्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळात संगणक असे नव्हते पण गणनयंत्रे होती. इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी आकडेमोड करायला मशिनरी कशी आणली; तिच्यावर "उचापती" करून आकडेमोडीचा वेग कसा वाढवला हे वाचणं मजेशीर आहे. पण इथेही त्यांच्यातला "खोडकर मुलगा" गप्प बसला नाही. गोपनीय प्रकल्प असल्यामुळे इथे काम करणाऱ्या लोकांचा पत्रव्यवहार "सेन्सॉर" होऊन जात असे. फाईनमन यांना कुठली गोपनीय माहिती फोडायची नव्हती. पण "सेन्सॉर"ला टाळून पत्र बाहेर पाठवायचा उद्योग त्यांनी केला. पत्रात असं काहीतरी लिहायचं की तपासनीसांना संशय वाटावा आणि मग त्यांनी डोंगर पोखरून उंदीर काढावा. असल्या खोड्या ते करत. इतकंच काय कपाटांना कुलुपं लावलेली असतात. ती कुलुपं आणि एकूणच कपाटं कशी तकलादू आहेत हे दाखवून देण्यासाठी ते चक्क पिनांनी कुलूप उघडायला शिकले. "नंबर लॉक" असेल तर क्रमांक कसा शोधून काढता येईल ह्याची तंत्र पुस्तकं वाचून शिकले. लोकांची गोपनीय पत्रं चोरून पुन्हा त्यांनाच देऊन चकित करायला लागले. ह्या सगळ्यांचं वर्णन त्यांनी पुस्तकात केलं आहे. 

पुढे ते सुट्टीसाठी म्हणून किंवा प्राध्यापकीच्या कामासाठी बरेच महिने ब्राझीलला होते. तिकडे ते वाद्य शिकले. बार मध्ये जाऊन मुलींबरोबर नाचगाणी केली. "मुली कशा पटवायच्या" आणि त्यासाठी सोज्वळपणा टाकून जरा धटाई कशी दाखवायची" हे त्यांच्या मूळ स्वभावाशी विसंगत असलं तरी एक आव्हानासारखं ते शिकले. 

ब्राझील मधली घोकंपट्टीवर आधारित शिक्षणपद्धतीबद्दलचे त्यांचे अनुभव वाचताना भारतात आजही तीच परिस्थिती आहे हे जाणवतं. 

त्यांचा एक चित्रकार मित्र होता. त्याला विज्ञानात काही रस नव्हता आणि ह्यांना चित्रकलेत काही गती. एकदा त्यांनी ठरवलं की मित्राने ह्यांना चित्रकला शिकवायची आणि ह्यांनी त्याला विज्ञान. फाईनमन ह्यांची ग्रहणशक्ती आणि एखादा किडा डोक्यात शिरला की त्याचा पाठपुरावा करायची वृत्ती इथे चांगली दिसते. ते चित्रकलेच्या वर्गाला जाऊ लागले, चांगली चित्रं काढू लागले इतकं की त्यांची चित्रं विकली जाऊ लागली. प्रदर्शन भरवलं गेलं. पण खोडकर स्वभाव आणि चक्रमपणा तिथेही डोकावलाच. एका "मसाज पार्लरच्या" मालकाला जरा उत्तान चित्र काढून द्यायचं कबूल केलं. पुढे काही कारणामुळे ते रद्द झालं तर थेट वेश्यागृहापर्यंत जाऊन ते ह्यांनी विकायची खटपट केली. 

कर्मठ धार्मिक ज्यू लोक धर्म आणि विज्ञान ह्यात कशी गल्लत करतात, शाळेच्या अभ्यासक्रमासाठी पाठयपुस्तकांची निवड कशी अवैज्ञानिक पद्धतीने होते ह्याचेही त्यांचे अनुभव आहेत. 

हॉटेलात टीप देताना वैज्ञानिक तत्त्व वापरून वेटरची काढलेली खोडी 

एखादी नवीन संकल्पना कळली की स्वतः प्रयोग करून त्याची खात्री करून घ्यायची फाईनमन ह्यांची वृत्ती अनेक प्रसंगांत दिसते. त्यातला एक प्रसंग

लास वेगास मधल्या नाईट क्लबचा अनुभव

कर्मठ धार्मिक ज्यू लोकांबरोबर चर्चेचा एक प्रसंग

मोठ्या विद्यापीठातली भक्कम पगाराची नोकरी कशी "टाळली"

असे आंबट-गोड-कडू-तिखट अनुभवांनी, किश्श्यांनी भरलेलं पुस्तक आहे. लेखकाची शैली सुद्धा पुस्तकाला साजेशी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. तरी पुढच्या प्रकरणात काय असेल हे वाचायची खूप उत्सुकता वाटत नाही. म्हणूनच हे पुस्तक पूर्ण करायला मला खूप दिवस लागले. "बौद्धिक खोड्यां"चं वेगळेपण जाणवतं. पण "हसून हसून पुरेवाट" असं काही होत नाही. पुस्तकात मध्येमध्ये विज्ञान डोकावतं पण ते इतकं प्रगत पातळीवरचं आहे की ते समजत नाही. खूप सकस, माहितीपूर्ण वाचल्याचं समाधानही मिळत नाही. ४००+ पानांनऐवजी दीडशे/दोनशे पानांत केलं असतं तर ते जास्त वाचनीय झालंअसतं.

अनुवाद फार बोजड झाला आहे. काही वेळा शब्द, वाक्यरचना खटकतात. अनुवाद वाचतो आहोत हे सतत जाणवत राहतं. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

टाकाची मोडी पत्रे (Takachi modi patre)



पुस्तक - टाकाची मोडी पत्रे (Takachi modi patre)
लेखक - मंदार लवाटे आणि सौ. भास्वती सोमण (Mandar Lawate & Bhaswati Soman)
भाषा - मराठी (Marathi)

पाने - ११२
ISBN - 978-81-933412-4-7


ऐतिहासिक मोडी लिपी शिकण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढत आहे. त्यादृष्टीने नवीन पुस्तके व युट्युब चॅनल सुद्धा हळूहळू पुढे येतायत. ह्या आधी अश्या काही पुस्तकांची माहिती मी दिली होती. (त्यांच्या लिंक्स ह्या परीक्षणाच्या शेवटी दिल्या आहेत). लवाटे-सोमण जोडीने लिहिलेल्या "सोपी मोडी पत्रे" पुस्तकानंतर त्यांचं पुढचं पुस्तक आहे "टाकाची मोडी पत्रे". ब्रिटिशकाळात लिहिण्यासाठी बोरू ऐवजी "टाक" वापरायला सुरुवात झाली. मोडी लिपीत बदल झाला नसला तरी तिच्या दृश्यस्वरूपात बदल झाला. अक्षर छोटे झाले. त्यामुळे वाचन कठीण झाले. म्हणून मोडी सरावासाठी ह्या प्रकारची पत्रे वाचणे सुद्धा आवश्यक आहे.

पुस्तकाच्या पाठपानावर आणि मनोगतात ह्याबद्दल अजून माहिती कळेल.



पुस्तकात ५०/६० पत्रे आहेत. कुलमुखत्यारपत्र, करारपत्र अशी पत्रे थोडी आहेत. जास्त पत्रे ही दोन व्यक्तींच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातली; भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद/पदाधिकारी ह्यांच्यातला पत्र व्यवहार आहे. भाषा शंभर वर्षांपूर्वीची असल्यामुळे मजकूर समजायला कठीण जात नाही. पण टाकाने लिहिताना अक्षरांच्या गाठी नीट येत नाहीत त्यामुळे बरीच अक्षरे सारखी दिसतात. थोडा गोंधळ होतो. शब्द नीट सुरू करून अर्ध्याच्या पुढे काहीतरी गिचमिड लिहून सोडून द्यायचा; वाचणारा समजून घेईल; अशी तेव्हाची लेखन पद्धती दिसते.


डाव्या पानावर मोडीतील पत्र आणि उजव्या बाजूला देवनागरी लिप्यांतरण दिलेलं आहे. कठीण शब्द लगेच तळटीपेच्या स्वरूपात दिले आहेत. एक दोन उदाहरणे देतो.

सरकारी दफ्तरातील तक्रार आणि निवारण ह्या संदर्भातले पत्र 

भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद/पदाधिकारी ह्यांच्यातले पत्र 

ह्या पुस्तकासाठी पत्रे गोळा करणे, त्यांतल्या योग्य पात्रांची निवड करणे, मग सगळ्यांचे लिप्यंतर करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. कमी प्रचलित विषयावर पुस्तक छापणे हे सुद्धा धाडसाचे काम आहे. पण मंदार लवाटे आणि सौ. भास्वती सोमण ह्यांनी हे सर्व कष्ट मोडीप्रेमापोटी उचलले आहेत. त्याबद्दल त्यांना सादर प्रणाम. मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांनी ह्या अभ्यासनीय आणि संग्राह्य पुस्तकाचा नक्की लाभ घेऊन लेखकांना दाद दिली पाहिजे.


पुस्तक कुठे मिळेल ?
हे पुस्तक मी फ्लिपकार्ट वरून घेतले. फ्लिपकार्ट, अमेझॉन, सह्याद्रीबुक्स ह्यांच्यावर ऑनलाईन उपलब्ध आहे. 

छापील किंमत - रु. १८०/-

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मोडी लिपीवरची इतर पुस्तके

पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat)

पुस्तक - पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat) लेखिका - सुधा मूर्ती (Sudha Murty) अनुवादिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) मूळ पुस्तक - The old ...