वाट तिबेटची (Vat Tibetachi)



पुस्तक - वाट तिबेटची (Vat Tibetachi)
लेखिका मीना प्रभु (Meena Prabhu) 
भाषा मराठी (Marathi)
पाने 335 
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांच्या प्रवास वर्णनाच्या प्रसिद्ध लेखमालेतील वाचलेलं हे दुसरं पुस्तक . त्याच्याआधी चिनीमाती  पुस्तक वाचलं होतं. हे पुस्तक त्याचा पुढचा भाग असावा असं, तिबेट वरचं. तिबेट म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेला बर्फाळ,  रेताड, पहाडी, पठारी प्रदेश. हजारो वर्ष निसर्गप्रिय, शांतताप्रिय आणि आपल्या कोशात रममाण असणाऱ्या लोकांचा प्रदेश. पण चीनची वाकडी नजर त्यावर पडली आणि तो भाग त्यांनी बळाने स्वतःत विलीन करून घेतला. जुन्या धर्मसत्ता, राजसत्ता, परंपरा यांचा विध्वंस केला आणि त्याला "तिबेट मुक्ती"चे गोंडस नाव दिले. त्यामुळेच तिबेटी लोकांचे धर्मगुरू दलाई लामा यांना परागंदा होत भारतात आश्रय घ्यावा लागला. 

चीनची दडपशाही अनेक वर्षे चालूच आहे. त्यामुळे तिबेट जगापासून दुरावलेल्या अवस्थेत होता. आता चीनचे धोरण स्वतःच्या फायद्यासाठी थोडे बदलते आहे. त्यांनी केलेल्या विध्वंसातून सांस्कृतिक जी स्थाने टिकली, जेवढी जगाने बघितलेली चीनला चालतील आणि त्यामाध्यमातून चीनची भलावण साधता येईल तितके पर्यटन चीनने सुरू केले आहे. या संधीचा फायदा घेऊन मीना प्रभु यांनी तिबेटवारी साधली. 

फक्त तिबेटच नव्हे पण चीनचा व्हिसा मिळवणे, मग तिबेटला जायचे परमीट मिळवणे हा सुद्धा एक अनुभवच होता लेखिकेने तिथपासून आपल्या वर्णनाची सुरुवात केली आहे. पण तिबेटला पोचण्यापूर्वी त्या अमेरिकेतील हवाई बेटे आणि चिनच्या काही शहरांना भेटी देणार होत्या. खास खग्रास सूर्यग्रहण बघायला शांघायला. त्यामुळे पुस्तकात सुरुवातीला हवाई बेटे, पर्ल हार्बर यांचे वर्णन आहे.  तिबेटवर हवाई फ्री !! पुढे चीनमधल्या शहरांना दिलेल्या भेटी, त्यांनी शांघायला बघितलेल्या ग्रहणाचे, आधी बघितलेल्या ग्रहणाचे भावस्पर्शी अनुभव आहेत. डॉ. कोटनीस यांचे स्मारक त्यांनी शोधाशोध करून बरीच खटपट करून बघितलेच.



बीजिंग पासून ल्हासा पर्यंत चीनने रेल्वे सुरू केली आहे. डोंगर-दऱ्या नदी-नाले पठारे ओलांडत हजारो फूट उंचीवरून जाणारी रेल्वे चीनच्या दृढनिश्चय याचं तंत्र कौशल्याचा आणि विस्तार वादाचं संमिश्र उदाहरण. या रेल्वे प्रवासापासून आपली लेखिकेबरोबरची तिबेट सफर खऱ्या अर्थाने सुरू होते. त्याची ही एक झलक. 
(फोटो वर क्लिक करून झूम करून वाचा.)


तिबेट मधल्या प्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळांना लेखिकेने भेटी दिल्या. या स्थळांच्या आजूबाजूचा निसर्ग, प्रत्यक्ष वास्तू आणि त्यांचं ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लेखिकेने अतिशय रोचक पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे तिबेट बद्दल फार काही वाचलं असेल तरी संदर्भ स्पष्ट होतात आणि त्या स्थळांचे महत्त्व आणि रुपडे आपल्या नजरेसमोर उभे राहते. एका मंदिराचं हे वर्णन वाचा.




तिथल्या लोकांशी, गाईडशी बोलता बोलता तिथली संस्कृती, लोकांची जीवनशैली सुद्धा लेखिका समजून घेत होत्या. माणसांच्या अंत्यसंस्कारांची वेगळीच पद्धत तिकडे आहे. मृतदेहाचे तुकडे करून त्याच्या मासाचे गोळे  गिधाडांच्या स्वाधीन करून मरण्याची "स्काय बरीयल" बद्दल पुस्तकात वाचायला मिळेल. तिबेट मधल्या भटक्या जमातीबद्दलची ही काही माहिती.




पुस्तकात बरेच रंजीत फोटो सुद्धा आहेत.



तिबेट मधली चिनी दडपशाही ठायी ठायी दिसतेच. अर्थातच, त्याबद्दल बोलायला लोकांना परवानगी नाहीच. पाठीवर सतत पोलीस नाहीतर चिनी लष्कराची गस्त आणि हेरगिरी यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था. तरीही लेखिकेने जमेल तसं लोकांना बोलतं करायचा प्रयत्न केला. ते अनुभवकण पुस्तकात वाचायला मिळतील. 



प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एव्हरेस्ट शिखराच्या तिबेटच्या बाजूच्या बेस कॅम्पला भेट दिली. जगातलं सर्वात उंच शिखर बघण्याचा क्षण म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव देणारा क्षण. एकीकडे अत्यानंद देणारा तर दुसरीकडे धीरगंभीर करणारा तो अनुभव त्यांच्या शब्दात वाचाच. 

तिबेटचं हे वर्णन वाचून एक जाणवत की तुम्ही फक्त चांगले असून भागत नाही. तुम्ही कणखर सुद्धा असायला हवं. नाहीतर चांगुलपणा, अहिंसा यांचा गैरफायदा घेणारं जंगली जग आहे हे. जर हरीण म्हणले मी वाघाला खात नाही मग तो कशाला मला खाईल ? तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही. सावरकरांच्या शब्दात सद्गुणविकृती ! भारतही अश्याच प्रकारे परकीय आक्रमणांचा बळी पडला असेल का?

चीनमध्ये येणारी भाषेची अडचण, खाण्यापिण्याची अडचण व चीनची धोरणे यामुळे चीनचा प्रवास करणारे  पर्यटक कमीच. तिबेट बघण्याची संधी आणखी कमी. त्यामुळे या पुस्तकाच्या रूपाने का होईना आपल्याला  तेथे प्रवास करून आल्याचा आनंद मिळेल. हे पुस्तक वाचा आणि जाणून घ्या तिबेट मधली - प्रकृती, संस्कृती आणि विकृती !!


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

जगातील अद्भुत, चमत्कारी गावे (Jagatil adbhut, chamatkari gave)





पुस्तक : जगातील अद्भुत, चमत्कारी गावे  (Jagatil adbhut, chamatkari gave)
लेखक : प्रा. चंद्रकुमार नलगे  (Pro. Chandrakumar Nalage)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १०४
ISBN : दिलेला नाही 

आपली पृथ्वी नानाप्रकारच्या भौगोलिक रचनांनी भरलेली आहे. जमिनीचे, हवामानाचे , वनस्पतींचे कितीतरी प्रकार आहेत. मानवजातही निसर्गाचाच भाग. त्यामुळे पोशाख , खाणेपिणे, भाषा, चालीरीती, समजुती यांचे वैविध्य जगभर आढळते. काहीवेळा हे वैविध्य वैचित्र्याकडे झुकते. काहीवेळा कल्पनेपलीकडचे वाटते. 
अश्या अनोख्या ठिकांणांचा, गावांचा, लोकांचा अगदी थोडक्यात ओळख करून घेता येईल "जगातील अद्भुत, चमत्कारी गावे" या पुस्तकात . 

एका पानात एक छायाचित्र, थोडी माहिती असं प्रत्येक लेखाचं स्वरूप आहे. वानगीदाखल ही काही पाने वाचा.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)




 

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली की अंदाज येईल की अजून काय गमतीजमती आहेत.






प्रस्तावनात दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व माहिती लेखकाने जमवलेली कात्रणे, त्यांच्या वाचनात आलेला मजकूर यांचे संग्रहण आहे. त्यामुळे खुद्द लेखकाने याची शहानिशा केलेली नाही. किंवा संदर्भसुद्धा दिलेले नाही. 

सगळ्याच गोष्टी काही अद्भुत म्हणाव्या अशा नाहीत उदा. मुंबईजवळच्या बदलापूर या शहरावरसुद्धा ह्यात लेख आहे. पण त्यात केवळ गावाची माहिती दिलेली आहे. आश्चर्य वाटायला लावणारं त्यात काही नाही. "जगातील सुंदर वाळवंट" म्हणून इराण मधल्या एका वाळवंटाचा उल्लेख आहे आणि त्याची भौगोलिक तथ्ये दिलेली आहेत. पण त्याला सुंदर म्हणण्याचं कारण काय ते दिलेलं आहे.

असं हे हलकं फुलकं माहिती-मनोरंजनात्मक पुस्तक आहे. सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात या पुस्तकात वाचलेल्या ठिकाणांचा मागोवा नेटवर घेणे, अजून माहिती मिळवणे, व्हिडीओ बघून त्याची इ-सैर करणे ओघाने आलंच. सहज विरंगुळा म्हणून वाचायला पुस्तक चांगलं आहे. 


---------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------





---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

मनोगती (Manogati)






पुस्तक : मनोगती (Manogati)
लेखक : डॉ. आनंद नाडकर्णी(Dr. Anand Nadkarni)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८६
ISBN : दिलेला नाही

डॉ. आनंद कुलकर्णी हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. आयपीच संस्था, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र इ सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय असतात. त्यांच्या वेध या उपक्रमाद्वारे समाजातल्या चांगल्याला, कर्तृत्त्वाला ते पुढे आणत असतात. ही त्यांची अगदी वरवरची ओळख आहे.

पाश्चात्त्य मानसोपचार तज्ञ अल्बर्ट एलिस यांची मांडणी आणि महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने मांडलेले तत्वज्ञान यांच्यातली साम्यस्थळे समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचताना एकीकडे आपल्याला एलिस यांच्या मांडणीची, त्यांनी पुढे आणलेल्या संकल्पनांची,  मानसशास्त्रातील संज्ञांची ओळख होते. तर दुसरीकडे भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञानाकडे "कसं वागावं" हे मार्गदर्शन करणारं; "सेल्फ हेल्प" साधन म्हणून कसं बघता येईल हा दृष्टीकोन मिळतो. चर्चा मनाची, मनोव्यापारांची होत असल्यामुळे मनावर नियंत्रण, विचारांचे व्यवस्थापन, स्वसंवाद सुधारणे अशा कितीतरी उपयुक्त गोष्टी शिकता येतात. त्याबद्दलची नवनवीन तंत्र समजतात.

अनुक्रमणिका 



मानसशास्त्रातील ABC ची संकल्पना (Activating event, belief, consequences) समजावून सांगताना ओघात अल्बर्ट एलिस यांची REBT आणि भारतीय तत्त्वज्ञानातील ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग ही त्रिसूत्री यांच्यातलं हे साम्य समोर येतं.



स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वागण्याची  प्रतिक्रिया म्हणून आपण त्या व्यक्तीला लेबले चिकटवत बसतो. हा स्वार्थीच आहे; हा खूप हुशार आहे; मी मूर्खच आहे इत्यादी. अशी लेबले लावून आपण स्वतःला दुसऱ्याबद्दल आणि स्वतःबद्दल सर्वअंगाने विचार करण्यापासून जणू रोखतच असतो. या बाबतीत सुद्धा एलिस आणि विनोबा दोघांनाही काही सांगायचंय.






लेखक मानसोपचार तज्ञ आहे म्हणून तो स्वतः अगदी आदर्श वागत असल्याचे त्याचे म्हणणे नाही. उलट स्वतःमध्ये बदल घडवून आणणे किती कठीण आहे; याचा त्याला स्वानुभव आहे. म्हणूनच तो त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांशी रिलेट करू शकतो. त्यासंदर्भात स्वतःच्या रागाचं वर्णन त्यांनी कसं केलं ते बघा. अशा उदाहरणांमुळे ते केवळ पुस्तकी बोलत नाहीत तर स्वानुभवाचे बोल आहेत हे जाणवून त्यांचं लेखन आपल्याला भिडतं.



नामस्मरणाचा, मंत्रजपाचा पुण्य मिळवण्यासाठी जो फायदा असेल तो असो; पण मानसशास्त्रामध्ये सुद्धा जप किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणे हे एक तंत्र आहे.



वरच्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे तांत्रिक संकल्पना मांडणारे बोजड पुस्तक नाही तर तांत्रिक संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगणारे पुस्तक आहे. आपली धार्मिक कर्मकांडे यांच्याकडे डोळस पद्धतीने  बघायला लावणारे पुस्तक आहे. आमच्या वेदात सगळं होतं असा अभिनिवेश न बाळगता आमच्या पूर्वजांनी हे आधीच सांगितलं होतं याचा सुखद अनुभव देणारं पुस्तक आहे. 

थोडक्यात काय; देवा-धर्माने सांगितलं म्हणून म्हणा किंवा पाश्चात्य विज्ञान सांगतंय म्हणून म्हणा; पण आपल्या मनाबद्दल, त्याच्या ताकदीबद्दल समजून घेणं किती आवश्यक आहे याबद्दल हे पुस्तक आपली जागरूकता वाढवतं. मी आणि माझ्या मनातले विचार हे वेगळे आहेत, माझ्या विचारांकडे मला त्रयस्थपणे बघता आले तर खूप मोठा पल्ला गाठता येईल हे बिंबवतंम्हणून हे पुस्तक वाचा, चावा, पचवा असं मी म्हणेन.


---------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
---------------------------------------------------------------------------------





---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

ही ’श्री’ची इच्छा Hi 'Shri' Chi Ichcha






पुस्तक : ही 'श्री'ची इच्छा 
लेखक : डॉ. श्रीनिवास (श्री) ठाणेदार 
भाषा : मराठी 
पाने : २०५
ISBN : दिलेला नाही 

गरिबी आणि प्रतिकूलतेशी झगडून काही जण आपली परिस्थिती सुधारतात. काहीजण फक्त या सुधारणेवर थांबत नाहीत तर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक म्हणजे अमेरिकेतले भारतीय उद्योजक श्रीनिवास ठाणेदार. बेळगावात निम्न मध्यवर्गीय परिस्थिती वाढलेल्या श्रीनिवास यांनी स्वतःच्या मेहनतीवर आपलं उच्चशिक्षण घेतलं. पुढच्या प्रगत शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. ते शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला नोकरी आणि नंतर केमिकल लॅब शी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज ते यशस्वी उद्योजकांपैकी आहेत. आणि दुसरीकडे अमेरिकेतल्या मराठी सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहेत. या पुस्तकात त्यांनी या संघर्षाची , आशा-निराशेच्या खेळाची, खाजगी आयुष्यात आलेल्या हादरवून टाकणाऱ्या संकटांची आणि पुन्हा पुन्हा उभारी घेणाऱ्या त्यांच्या जिद्दीची कहाणी सांगितली आहे. 





उदा. ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरी आणि पुढचं शिक्षण आणि कॉलेज संपवून पहिला इंटरव्यू द्यायला गेले तेव्हाची स्थिती वाचा 
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा )



बेताची परिस्थितीशी दोन हात एकीकडे चालू नशीब सुद्धा फिरकी घेत होतं. अमेरिकेचा व्हिसा पुन्हापुन्हा नाकारला जाण्याचे प्रसंग आधी घडले होते. आता अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रीन कार्ड हुलकावण्या देत होतं. त्याचा हा किस्सा 




शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरीकेत नोकरी केली त्यातसुद्धा आपल्या हुशारीची चमक दाखवली. त्यातूनच पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु करायच्या स्वप्नाने जन्म घेतला. त्यांच्या पहिल्या व्यवसायाची सुरुवात अशी झाली 





पुढे त्यांनी व्यवसाय कसा वाढवला. पत्नीच्या आकस्मिक निधनातून स्वतःला आणि घराला कसं सावरलं हे लिहिलं आहे. झालेल्या चुका, चुकलेले आडाखे सुद्धा प्रांजळपणे काबुल केले आहेत. व्यवस्थापनात स्वतःचा असा खास मार्ग त्यांनी निवडला याबद्दल ते लिहितात 



लेखकाची शैली अतिशय ओघवती आहे. (शब्दांकन शोभा बोन्द्रे यांचं आहे ) पुस्तकात महत्वाचे प्रसंगच सांगितले आहेत. कटुप्रसंग नक्कीच सांगितले आहेत पण त्याचा वापर वाचकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला नाही. अजिबात पाल्हाळ न लावताही त्यांचं गांभीर्य अधोरेखित होतं. 

हे पुस्तक प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. स्वतःवर विश्वास ठेवून, जिद्दीने आणि मेहनतीने काम करत राहिलं तर आयुष्याचा कायापालट घडवण्याची खूप मोठी क्षमता प्रत्येकात आहे हा विश्वासाचा अंकुर जागवणारं आहे. 

पुस्तकात २००५ पर्यंतचे प्रसंग आहेत. त्यानंतरची गेली १५ वर्षांची वाटचाल सुद्धा वाचनीयच असेल. त्यांनी अमेरिकेत निवडणूक सुद्धा लढवलेली आणि आत्ताही एका निवडणुकीसाठी ते उभे आहेत. काही वर्षांनी हा पुढचा भाग देखील आपल्याला वाचायला मिळेल. 



---------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
---------------------------------------------------------------------------------





---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

काचेपलीकडचे जग (kAchepalikadache jag)




पुस्तक : काचेपलीकडचे जग (kAchepalikadache jag)
लेखक :विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
भाषा :मराठी (Marathi)
पाने : २३८
ISBN : दिलेला नाही

"आत्मनिर्भर" हा सध्या चर्चेत असलेला शब्द आहे. आत्मनिर्भर असणं, स्वावलंबी असणं हे कुठल्याही देशासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे स्वदेशीची चळवळ आपल्या देशात बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही स्वराज्य, स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी चतु:सूत्री आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी सांगितली होती. लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तत्कालीन तरुणांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली होती.  क्रांतिकार्य, समाजकार्य  आणि शिक्षणकार्यात भाग घेतला होता. तर काहींनी स्वदेशी उद्योग सुरू करून या पुनरूत्थानाला गती दिली होती. ओगले ग्लास वर्क हा असाच ध्येयवादाने प्रेरित झालेल्या तरुणांचा अभिनव आणि यशस्वी उपक्रम होता.

ओगले कुटुंबातल्या तरुणांनी या उद्योगाची स्थापना केली. औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांना जागा आणि भांडवल उपलब्ध करून दिलं. आणि काही महिन्यांतच परदेशी काचेच्या तोडीस तोड काच महाराष्ट्रात बनू लागली. पूर्वी घरोघरी दिसणारे "प्रभाकर" ब्रँडचे कंदील हे त्यांचं लोकप्रिय उत्पादन. या उद्योगाच्या संस्थापकांच्या तिसऱ्या पिढीतले विद्याधर म्हैसकर यांनी या उद्योगाच्या सुरुवातीची आणि पहिल्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीची वाटचालीची वाटचालीची कहाणी सांगितली आहे या पुस्तकात सांगितली आहे आहे. ओगले कुटुंबातल्या व्यक्ती गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यांच्या आठवणीतून कथनातून हा सगळा प्रवास उलगडतो.

जागेचा प्रश्न राजाश्रयामुळे सुटला आणि पुढची लढाई सुरू झाली. उजाड माळरानावर असलेला निवडुंग साफ करून ती जागा वसतीयोग्य करण्यापासून सुरुवात होती. गावापासून दूर असल्यामुळे आजूबाजूला जे लोक उपलब्ध होते त्यांनाच घेऊन, मार्गदर्शन करत, शिकवत, त्यांच्या चुका सांभाळत कारखान्याची उभारणी सुरू झाली झाली. त्या दिवसांबद्दलच्या आठवणी जरा बघा.



ओगले बंधूंपैकी एक जण काच निर्मिती तंत्रज्ञान तंत्रशाळेतून शिकून आले शाळेतून शिकून शाळेतून शिकून आले होते पण त्याच ज्ञानावर  थांबणं हे काही त्यांच्या स्वभावात नव्हतं या तंत्रज्ञानात नवं काय काय घडत आहे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या कारखान्यात ते आलं आलं आपल्या कारखान्यात ते आलं आलं पाहिजे हा त्यांचा ध्यास कायम राहिला कायम राहिला तू नच त्यातूनच परदेशी मालाला टक्कर देऊ शकेल अशी काच तयार झाली.  काचेची निरनिराळी उत्पादने आणि जोडउत्पादनांची भरभराट झाली. त्याबद्दलचा हा एक प्रसंग पहा.





"ह्यूमन रिसोर्सेस" हा हल्लीच शब्द कदाचित त्यावेळी रुळलेलाही नसेल पण ओगल्यांसाठी त्यांचे कामगार, अधिकारी हे ह्यूमन रिसोर्सेस होते. आपल्याकडे काम करणाऱ्या, कामगार वस्तीतल्या रहिवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे एका माळरानाचे एका औद्योगिक वसाहतीत रूपांतर झालं.

पुस्तकातल्या कथनाच्या प्रवाहात फक्त ह्या उद्योगाचीच नाही तर ओगले कुटुंबीयांमधल्या परस्पर स्नेहाची आणि त्या वेळच्या परिस्थितीची सुद्धा नकळत ओळख होते. एका प्रसंगात सोन्याचा हार पोस्टाने मागवला हार पोस्टाने मागवला होता याचा उल्लेख आहे! इतका इंग्रजी व्यवस्थेवर विश्वास होता. गावोगावी डॉक्टर तेव्हा उपलब्ध नव्हते. साध्या सध्या उपचारांसाठीही दुसऱ्या गावी जाऊन औषध आणायचं किंवा दुसऱ्या गावावरून डॉक्टर येणार अशी परिस्थिती. ओगले कुटुंबातील ज्येष्ठ- प्रभाकर ओगले (ज्यांनी आयुर्वेदावर "चिकित्सा प्रभाकर" हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे) त्यांचा हा किस्सा वाचा.



ओगल्यांनी आपल्या उत्पादनांत विविधता आणली तसाच व्य्वसायाचा भौगोलिक विस्तारसुद्धा केला. नागपूर, म्हैसूर, केरळ आणि श्रीलंकेत सुद्धा त्यांचा कारखाना सुरू झाला. महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमानास्पद आणि मार्गदर्शक अशी ही कहाणी आहे आणि ती सांगितली सुद्धा आहे समर्पक रोचक-रंजक शैलीत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे या उद्योगाचा पुढचा प्रवास कसा झाला हे वाचायची उत्सुकता आपल्याला लागते. लेखकाकडून हा पुढचा भाग लिहून झाला तर मजा येईल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------




भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)

पुस्तक - भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon) लेखक - कोबी शोशानी (Kobbi Shoshaani) अनुवादक - गौरी जोशी (Gauri Joshi) भाषा - म...