पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)
लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson
अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat)
भाषा - मराठी
पाने - २०७
प्रकाशन - एप्रिल २०२१
मूळ पुस्तक - Nine man eaters and one rogue (नाईन मॅन ईटर्स अँड वन रोग)मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
ISBN - दिलेला नाही
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शिकारी केनेथ अँडरसन याचे शिकारीचे अनुभव ह्या पुस्तकात त्याने शब्दबद्ध केले आहेत. नरभक्षक वाघांच्या, बिबळ्यांच्या ह्या शिकारी आहेत. एक-दोन गोष्टी पिसाळलेल्या हत्तींबद्दलसुद्धा आहेत. दक्षिण भारतातल्या जंगलांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नरभक्षक वाघांचा उपद्रव सुरू होत असे. वाघ गुरं-ढोरं तर खात होतेच पण ते माणसंसुद्धा खाऊ लागले की गावातले लोक सरकार कडे तक्रार करत. वाघाचा बंदोबस्त करण्याची विनंती करत. मग सरकार शिकाऱयांना पाचारण करत. अशा प्रकारच्या अनेक विनंत्या अँडरसन ला मिळाल्या आणि त्याने या वाघांच्या उपद्रवी प्राण्यांच्या शिकारी केल्या. या शिकारीचे थरारक अनुभव या पुस्तकात आहेत.
केनेथ अँडरसन बद्दल पुस्तकात दिलेली माहिती.
अनुक्रमणिका
वाघांची दहशत दाखवणारे हे काही प्रसंग
हा अजून एक
वाघामुळे बळी पडू लागले की सरकारी विनंतीवरून त्या गावात जायचं. तिथला जंगल आणि परिसर फिरून त्या भागाची माहिती घ्यायची. आणि मेलेल्या माणसाचे आवशेष पडलेल्या ठिकाणापासून वाघाचा माग काढणं सुरू व्हायचं. रक्ताचे थेंब कुठे कुठे पडले आहेत; वाघाच्या पावलांचे ठसे कुठे दिसत आहेत; झाडं-झुडपं कुठे दाबली गेली आहेत यावरून या वाघाने आपलं सावज कुठे फरपटत नेलं असेल, तो कुठे लपला असेल याचा अंदाज बांधायचा. लोकांना वाघ कुठे कुठे दिसला; त्याने कशा पद्धतीने हल्ला केला यावरून त्या वाघाच्या वागण्याचा आक्रमकतेचा आणि हालचालींचा अंदाज घ्यायचा. प्रत्येक वाघ वेगळा तशी त्याची आक्रमकता आणि वागायची पद्धत सुद्धा. वेगळी त्यामुळे हा माग काढणे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन आव्हान होतं. पुस्तकात ते वाचणं थरारक आहे. हा एक प्रसंग वाचा.
माग काढत एखादं ठिकाण ठरवायचं जिथे वाघ याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी एखादी गाय किंवा बैल बांधून वाघाला आकृष्ट करायचं आणि मग मचाण बांधून किंवा लपायला जागा करून वाघाची वाट बघायची हा अतिशय कंटाळवाणा आणि शारीरिक दृष्ट्या थकवणारा भाग. वाघ कधी येईल याची खात्री नाही. कधी तासंतास एका जागी बसून राहायचं. काही वेळा दिवसेंदिवस हा दिनक्रम बने. हा तितकाच मानसिकदृष्ट्या थकवणारा भाग सुद्धा. कारण वाघ कधी, कुठून, कसा येईल याचा नेम नाही. रात्री अपरात्री जरा डोळा लागला किंवा थोडंसं दुर्लक्ष झालं तर वाघच शिकाऱ्याच्या नरडीचा घोट घ्यायचा. रानातली इतर श्वापदे, साप यांचाही त्रास आहेच.
वाट बघण्याच्या शेवट मात्र वाघाला मारण्यात व्हायचा. ती झटापट मात्र अगदी सेकंदाच्या अवधीत संपे. कारण शिकाऱ्याला सटकन योग्य आणि गोळ्या घालता आल्या तर वाघ खल्लास आणि त्याचा नेम चुकला तर वाघाच्या झेपेत शिकारी खलास. अशा अनेक थरारक झटापटीचं वर्णन या पुस्तकात आहे. एक जीवावर बेतलेला प्रसंग.
पुस्तकाच्या ओघात लेखक सांगतो की वाघ नरभक्षक बनतो तो बऱ्याच वेळा माणसाच्या चुकीमुळेच. अर्धवट सोडलेल्या शिकारीमुळे वाघाला झालेल्या जखमा चिघळतात. तो जायबंदी होतो आणि शिकार करू शकत नाही. अशावेळी माणसांवरच्या रागामुळे किंवा सोपी शिकार म्हणून तो माणसांचा बळी घेऊ लागतो. काहीवेळा गाईगुरांची शिकार करताना त्यांना वाचवायला येणाऱ्या माणसाशी त्याची झटापट होते आणि चुकून नारामांसाशी, नररक्ताशी त्यांना ओळख होते. ही एक चूक अनेकांना महागात पडते. एकूणच मानवी हस्तक्षेप हाच नरभक्षकांच्या जन्माचे कारण दिसते.
रानातल्या जनावरांच्या सवयी, त्यांची ओरडण्याची पद्धत याचे पण किस्से पुस्तकात येतात. लेखकाची शैली नेमक्या शब्दांत परिस्तिथीचं गांभीर्य आणि थरार मांडणारी आहे. त्यामुळे वाचण्याची उत्सुकता टिकून राहते. जंगलाबद्दल, प्राण्यांबद्दल नवीन माहिती कळते पण खूप तांत्रिक भाषा, अतितपशिल नसल्यामुळे ते वाचायला सुद्धा मजा येते.
मूळ पुस्तकाच्या मजकुराइतकंच श्री. बापट यांनी केलेल्या अनुवादाला सुद्धा १००% श्रेय दिलं पाहिजे. इतकं सहज सुंदर आकर्षक भाषांतर केलं आहे. पुस्तकात दिलेली अनुवादकाची ओळख.
पुस्तकातली प्रसंगांची पेन्सिल स्केचेस विशेष लक्षवेधी आहेत. त्यातून पुस्तक खुललं आहे. माझ्या चार वर्षांच्या पुतण्याला मी चित्र दाखवून ह्या गोष्टी सांगितल्या. तर त्यालासुद्धा चित्र आणि गोष्टी खूप आवडल्या. तो सुद्धा चित्रावरून तो प्रसंग सांगू लागला. चित्रकार कोण हे खास बघितलं. म्हणून चित्रकार देवीदास पेशवे ह्यांचा विशेष उल्लेख मला करावासा वाटतो.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-