विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas)



पुस्तक - विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas)
लेखक - दिलीप महाजन (Dilip Mahajan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २४८
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, डिसेंबर २०२२
छापील किंमत - रु. २५०/-

गेल्या शुक्रवारी ९ डिसेंबरला डोंबिवलीत ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याला मी उपस्थित होतो.

प्रकाशनस्थळी पुस्तक विकत घेऊन आठवडाभरात हे परीक्षण लिहितो आहे. इतक्या ताज्या पुस्तकावर इतकं लगेच लिहिण्याची ही माझी बहुतेक दुसरीच वेळ. ह्याआधी माधव जोशी ह्यांच्या कॉर्पोरेट दिंडी बद्दल असे लिहिले होते. ते तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकाल. लिंक 

दोघेही लेखक डोंबिवलीकरच. दोन्ही पुस्तकांची मूळ संकल्पना सारखीच आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न आयुष्यातील बरेच अनुभव त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिले होते. ते लोकांना आवडले आणि पुस्तकरूपाने त्यांचं दीर्घकालीन दस्तऐवजीकरण व्हावे असा रास्त विचार पुढे आला. दिलीप महाजन ह्यांनी तरुणपणी ६ वर्षे "विवेकानंद केंद्र" ह्या देशव्यापी संस्थेत कामी केले. त्यातले अनुभव ह्या लेखनात होते. म्हणून हा अनुभवसंच आता विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

अनुक्रमणिका


पुस्तकात सुरुवाती
ला लेखकाने आपल्या बालपणाबद्दल सांगितले आहे. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची ओळख कशी झाली, कुठले प्रचारक त्यांना भेटले हा भाग आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांना विवेकानंद केंद्रात सहभागी व्हायचे होते - जे तेव्हा नुकतेच सुरु झाले होते. उच्चशिक्षित आणि ध्येयासाठी, देशासाठी आपली काही वर्षे देऊ इच्छिणाऱ्या युवकांना केंद्र बोलवत होतं. महाजनांनी तिथे जाण्यासाठी अर्ज केला. रीतसर मुलाखत होऊन त्यांची निवड देखील झाली. पण घरच्या अडचणींमुळे ते जाऊ शकले नाही. पुढे काही महिने दुसऱ्या सेवाभावी संस्थेत काम केल्यावर पुन्हा एकदा एकनाथजी रानडे ह्यांची भेट झाली. आणि ह्यावेळी केंद्रात प्रवेश झालाच.

त्यांच्या कामाची सुरुवात अरुणाचल प्रदेशमध्ये केंद्राने पाठवलेल्या शिक्षकाच्या रूपात झाली. दुर्गम भागातल्या खेड्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव त्यांना आला. तिकडे असतानाच त्यांचे लग्न झाले. आणि लग्नानंतर चौथ्या दिवशी हे नवविवाहित जोडपे पुन्हा अरुणाचलच्या खेड्यात दाखल. ही कार्यावरची निष्ठा आणि त्याला पत्नी सुरेखा महाजन ह्यांच्याकडून मिळालेली पहिल्यापासून कायम मिळत आलेली साथ !! मोठं समाजकाम उभं करण्यासाठी असे समरसून काम करणारे कार्यकर्ते तयार असावे लागतात हे ह्यातून जाणवतं.

दीडेक वर्षाने केंद्राने त्यांना कन्याकुमारीला यायला सांगितलं. थोडे दिवसच ट्रेनिंग झालं आणि त्यांची बदली झाली कलकत्त्याला. बंगाल, ओरिसा आणि बिहार ह्या प्रांतांचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून. गंमत म्हणजे त्यांच्या पत्नी कन्याकुमारीलाच ट्रेनिंग पूर्ण करणार होतया. पुढे त्याही आता पूर्णवेळ कार्यकर्त्या झाल्या होत्या. श्री. महाजन ह्यांनी केंद्रप्रतिनिधी म्हणून केंद्रासाठी निधी मिळवणे, केंद्राच्या नियतकालिकांसाठी वर्गणीदार मिळवणे, लोकांना केंद्र परिचय करून देणे ही कामे केली. त्यासाठी नवनवीन लोकांच्या भेटी कशा घेतल्या, कोण कोण सदगृहस्थ भेटले ह्याचा वृत्तांत पुढील प्रकरणांत आहे.

त्यांच्या कामाचा झपाटा लक्षात घेऊन काही वर्षांनी एकनाथजींनानी त्यांना कन्याकुमारीला बोलावले. आता बढती होऊन ते "assistant all india representitive" झाले. मुख्य कचेरी कन्याकुमारी असली तरी देशभर जाऊन लोकांच्या भेटी घेणं, निधी जमा करणं हे मुख्य काम असल्यामुळे प्रवास सतत चालूच. त्यांच्या कामाचे पुढचे पर्व मुंबईला सुरु झाले. ह्या सर्व प्रकरणांत महत्त्वाचे प्रवास, कुठल्या प्रसंगात कोण लोक भेटले, कोण उद्योगपती किंवा राजकारणी भेटले, कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला, कोणी मदत केली असे असंख्य नामोल्लेख आहेत.

एकनाथजींशी प्रसंगोपात भेटी होतच असत. त्यातून त्यांच्या स्वभावाचे लेखकाला दिसलेले कंगोरे आपल्यासमोर येतात. लोकांशी सतत संपर्क ठेवणे, पैशाच्या हिशेबापासून पत्रांमधल्या स्पेलिंग पर्यंत प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणा, घरातली एक व्यक्ती असावी अशी वावरण्यातली सहजता, दैनंदिन जीवनातला साधेपणा, निस्पृहता असे अनेक पैलू त्यातून मला दिसले.

श्री. महाजनांना प्रापंचिक आणि आर्थिक अडचणींमुळे विवेकानंद केंद्र सोडून नोकरी धरावी लागली. हा निर्णय किती जड अंतःकरणाने आणि नाईलाजाने घेतला असेल ह्या भावना आपल्यापर्यंत पोचतात. आणि पुस्तक पूर्ण होते.

आता काही पाने वाचून बघा.
केंद्राचे ट्रेनिंग




विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते म्हणून मिळणाऱ्या लोकांच्या स्नेहाचे आणि स्वागताचे एक उदाहरण



केंद्राला उद्योगपती, राजकारणी आणि प्रथितयश व्यक्तींनी मदत केली. त्यातले एक उदाहरण. उद्योजक श्री. मफतलाल ह्यांच्याशी झालेल्या भेटी.




कार्यकर्ता म्हणून राहायचं तर गरजा आणि खर्च कमीत कमी ठेवणं अनिवार्य ! त्यामुळे मुंबईत बदली झाल्यावर एका छोट्याशा जागेत संसार कसा थाटला. पण ह्या अडीअडचणींवर मात करता आली ती इतर कार्यकर्ते, स्नेही आणि कुटुंबीय ह्यांच्या मदतीमुळेच. त्या बद्दलचा एक प्रसंग.





पुस्तक काही अंशी एकसुरी होतं. प्रत्येक प्रसंगात कुठे गेलो, कोण भेटलं, कोण कार्यकर्ते आले होते, काय मदत केली... ह्या साच्यात बहुतांश प्रसंग आहेत. एका संस्थेच्या कामाचे दस्तऐवजीकरण म्हणून हे तपशील ठीक आहेत. पण त्रयस्थ वाचकाला थोडे कंटाळवाणे आहेत. 
त्यातही सगळे चांगले अनुभवच लिहिले आहेत. कुठे नकार मिळाला असेल, अपेक्षाभंग असेल, प्रसंगी अवहेलना झाली असेल ("संघा"चा माणूस म्हणून तरी असे अनुभव आले असतील ना?) ते लिहिलं नाहीये.
दुसरं म्हणजे म्हणजे दोन प्रसंगांमध्ये नक्की किती काळ गेला हे नीट कळत नव्हतं.

पुस्तकाची सर्वात मोठी उणीव ही वाटली की; ह्या सर्व कालावधीत विवेकानंद केंद्र काय काम करत होतं हे नीट उमगत नाही. योग वर्ग आणि एक मासिक इतपतच मला समजलं. ह्या उपक्रमांचा समाजावर काय परिणाम होत होता; त्यातून संस्थेची वाढ कशी झाली; संस्था वाढण्यात काही संघर्ष करावा लागला का ? हे काहीच समजत नाही. प्रसंगोपात ते सांगायला हवं होतं. पुढच्या आवृत्तीत असे प्रकरणे पुस्तकाच्या सुरवातीला जोडावे जेणेकरून अनुभवांचं महत्त्व अजून समजेल.

सामाजिक कार्यकर्त्यांचं पुस्तक म्हटल्यावर "सामाजिक संघर्ष", "अन्यायाविरुद्ध लढा" असा भाग असतो. तसं काही ह्या पुस्तकात नाही. पण संस्था चालवायची तर "पैसा /निधी" हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तो सन्मार्गाने, लोकवर्गणीतून मिळवणंही सोपं नाही. हा "आर्थिक संघर्षाचा" भाग पुढे आणणं हे मला ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य वाटतं. तसंच सामाजिक कार्य करणे म्हणजे प्रत्येक वेळी आंदोलन करायचे किंवा लाठ्याकाठ्या खायची तयारी ठेवायची असे नाही. त्या कामाच्या व्यवस्थापनाचे काम सुद्धा तितकेच महत्त्वाचे, क्लिष्ट असते. ते करूनसुद्धा आपण मोठा हातभार लावू शकतो हे जाणवतं. एक सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठी आपली मनोभूमिका कशी असली पाहिजे, काय तडजोडी कराव्या लागतात; त्यात इतरांची साथ मिळाली तर वाटचाल कमी त्रासदायक होऊ शकते हे पुस्तकातून दिसतं. त्यामुळे हे प्रांजळ आत्मनिवेदन वाचकांना आवडेल.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

झांझिबारी मसाला (Zanzibari Masala)



पुस्तक - झांझिबारी मसाला (Zanzibari Masala)
लेखक - उमेश कदम (Umesh Kadam)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०२
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, मी २०२२
ISBN - 978934258570
छापील किंमत  - रु. २५०/-

उमेश कदम ह्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. ह्या कथांचं वैशीष्ट्य म्हणजे परदेशात प्रवास किंवा परदेशी माणसांशी आलेला संपर्क ह्यातून घडणाऱ्या प्रसंगांभोवती कथांची गुंफण आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार उमेश कदम हे शिक्षण आणि आपल्या नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहिले आहेत. परदेश म्हणजे फक्त युरोप अमेरीका नाही तर आफ्रिकन देश आणि पौर्वात्त्य देश सुद्धा ! ह्या वास्तव्यात त्यांना आलेले स्वानुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्याकडून कळलेले किस्से ह्याला थोडी काल्पनिकतेची जोड देऊन त्यांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. त्यातून प्रवासवर्णन + किश्श्यांच्या गमतीजमती + लेख + मानवी संबंधाचे पैलू असा "मसाला" तयार झाला आहे. त्याला चपखल नाव दिले आहे "झांझिबारी मसाला"

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यावर त्यांच्या विद्वत्तेची आणि अनुभवसंपन्नतेची जाणीव होईल.

अनुक्रमणिका


प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो

जुई जपानला जाते
लग्नाच्या वयाची मुलगी करियरसाठी जपानला जाते. पोर परदेशात जाणार म्हणून. आईवडिलांची घालमेल. तिच्या साठी भारतात "स्थळ"दर्शन चालू असताना तिला तिकडेच कोणी आवडला तर .. ?
खंडेनवमी इन मॅनहॅटन - ही गोष्ट मला खूप आवडली. एकेकाळच्या संस्थानिक घराण्यातला पण आता इंजिनियर म्हणून एमएनसी कंपनीत काम करणार मालोजी आता नोकरीसाठी अमेरिकेत गेलाय. दिवस नेमके दसऱ्याचे. खंडेनवमीची शस्त्रपूजा करायची घराण्याची परंपरा. पण अमेरिकेत खरं शस्त्र कसं बाळगणार ? तो तर गुन्हाच. पण आले देवाजिच्या मना.. तर "खंडेनवमी इन मॅनहॅटन" होईल का ?
समीरचं समांतर जीवन - मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा "चावटपणा" करण्याचा सल्ला समीरला मिळतोय. काय घडणार त्यात ? क्रायसिस मधून सुटका की नवा क्रायसिस.
बाय बाय बिजू - कथा नायक रॉटरडॅम शहरात गेल्यावर त्याची राहायची सोय होत नाही. भाषेच्या अडचणीमुळे त्यात भरच पडते. तेव्हा त्याला योगायोगाने भेटतो भारतातून आलेला बिजू. गरीब घरातून येऊन आपलं नशीब काढण्यासाठी युरोपात कष्ट करणारा बिजू. त्याच्या वागण्यामुळे मदत झाली आणि पुढे त्याच्या वागण्यामुळे त्रासही. "बरं झालं 
हा भेटला" ते "कशाला हा भेटला" असा प्रवास करणारी हि कथा.
वजन कमी करण्याची गुरुकिल्ली - वजन कमी करण्याच्यासाठी "डाएट"च्या प्रयत्नांमध्ये येणारं यशापयश हा नेहमीचा विनोदी विषय. नायकाची जीभ त्याच्याबरोबर बोलतेय आणि चांगलं चुंगलं खायला लावतेय असं कल्पनारंजन आहे. 
पॅरिसची पोरगी पटवली पाटलानं - ही पण धमाल कथा आहे. पैशाने श्रीमंत पण परदेशाचा, परभाषेचा काही अनुभव नाही असे गावचे पाटील आपल्या मित्राबरोबर आलेत पॅरिस बघायला. त्यांना खास करून 
"रंगीन हसीन पॅरिस" बघायचंय. पण नुसतं बघायला गेले आणि जणू काही "बघायचा" कार्यक्रम करून आले की. पॅरिसची पोरगी पटवली. आता ही गोरी पोरगी कुठले रंग दाखवणार.
नायजेरियन (अ)सत्याचे प्रयोग - नायजेरियात काम कारणाऱ्या कथानायकाचा सहकारी त्याला त्याच्या बायकोच्या तक्रारी सांगतोय तर सहकाऱ्याची बायको नवऱ्याच्या. आता काय खरं आणि काय खोटं ?
कुस्कोचे पोलीस - कथा नायक दक्षिण अमेरिकेत गेला असताना त्याला विमानात चिनी "लियांग" भेटतो. गप्पागोष्टी होतात. आपल्या प्रवासाच्या गोष्टींची देवाणघेवाण होते. ओळख वाढते. मग ते पुढचे स्थलदर्शन एकत्र कारता
. पण पुढे प्रवासात दारू च्या अंमलाखाली पासपोर्ट हरवतो. आता "कुस्को" शहरातले पोलीसांना तो सापडतो. प्रवासातल्या "हरवले-सापडले" ची घालमेल दाखवणारा हा किस्सा.
रुसलेला किलीमांजारो नि धुसफुसलेला गोरोंगोरो - ही गोष्ट नाहीये तर "किलीमांजारो" पर्वत आणि "गोरोंगोरो" विवराच्या भेटीबद्दलचा लेख आहे. पर्वताच्या भेटीचा योग्य पुन्हा पुन्हा हुकत होता. त्यामुळे जणू तो रुसला होता असं लेखकाला वाटलं आहे. ह्या दोन ठिकाणांचं हे प्रवास वर्णन आहे.
डच पाहुणचार - दोन चिनी मित्र युरोपात फिरायला आलेत. एकाला इंग्रजी येते दुसऱ्याला फक्त चिनी भाषा. प्रवासात इंग्रजी येणारा मित्र एक दिवस लवकर परत निघतो. दुसऱ्याला फक्त एक दिवस थांबून चीनला जाणारं विमान पकडायचंय. हॉटेल मधून थेट विमानतळावर जायचंय. फार बाहेर जायचंच नाही म्हणजे भाषेची अडचण येणारच नाही. पण घालून दिलेली "लक्ष्मणरेषा" ओलांडल्यामुळे भोगावा लागला "विजनवास" - पोलीस कोठडीचा वास. असं काय केलं त्याने ? पुढे सुटका कशी होणार ?
किमया टोकियो कराराची - ही पण गोष्ट नाही तर एक माहितिरंजक लेख आहे. विमान हवेत असताना घोषणा होते की "आपण सौदी च्या हवाई हद्दीतून उडत आहोत. म्हणून पंधरा मिनिटे मद्य वितरण बंद राहील." सौदी जमिनीवर मद्यावर बंदी आहे म्हणून आकाशात पण ? असं कसं ? विमान आकाशात असताना कोणी गडबड केली, त्रासदायक कृत्य केलं तर त्याला कुठला कायदा लागू होणार विमान कंपनीच्या देशाचा का जिथून विमान उडतंय त्या देशाचा का आणि काही ? ह्यासाठी केला गेला "टोकियो करार" आणि तो करार होण्याआधी कसे मजेशीर खटले घडले होते. हे ह्या लेखात सांगितले आहे.

काही गोष्टींची पाने उदाहरणा दाखल पहा.
जुई चा जपान चा अनुभव




मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा "चावटपणा" करण्याचा सल्ला परदेशात शिरसावंद्य मानून 



 प्रवासात पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे बोलणारे दोन कथानायक ... ज्यातला एक नंतर पासपोर्ट हरवतो



लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करत. प्रवासवर्णन-परदेशाच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह हा ललित साहित्यातला वेगळा प्रयोग वाचकांनी नक्की वाचावा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मंदिर कसे पहावे (Mandir kase pahave)



पुस्तक - मंदिर कसे पहावे (Mandir kase pahave)
लेखक - गो बं देगलूरकर (G. B. Deglurkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९४
प्रकाशन - स्नेहल प्रकाशन ऑक्टोबर २०१९
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - रु. १८०/-


देवदर्शनासाठी आपण सर्वच देवळामध्ये जातो. ते मंदिर पुरातन ऐतिहासिक असेल तर त्याची भव्यता पाहून आपण दिपून जातो. त्याच्यावरचं कोरीव काम पाहून आपण मंत्रमुग्ध होतो. इतके वर्ष होऊन; पाऊस-वारा यांचा मार झेलत ते अजूनही कसे टिकून आहे हे बघून आपण अचंबितही होतो. पण बऱ्याच वेळा अशा मंदिरांमध्ये रांगेत उभे राहण्यातच वेळ जातो. प्रत्यक्ष मूर्ती समोरून तर आपण स्कॅन झाल्यासारखे "पुढे चला, पुढे चला" च्या गजरात ढकलले जातो. त्यामुळे इतक्या सुंदर वास्तूकडे डोळे भरून बघण्याची बराच वेळा आपल्याला सवडच नसते. त्याहून खरं म्हणजे मंदिराकडे डोळे भरून बघण्याची आपल्याला सवयच नसते. देवदर्शनाला गेल्यावर देवळाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा ही सवय सर्वसामान्य लोकांत कधी बघितली नाही. जे स्थापत्यशास्त्र धर्मशास्त्र इत्यादीत रस घेतात असेच लोक कुतूहलपूर्वक मंदिर पाहतात; इतर लोक क्वचितच. ही आपली एक सामाजिक चूकच आहे. मंदिर हा जसा आपल्या धार्मिक परंपरेचा एक मोठा भाग आहे त्याचप्रमाणे मंदिरांची वास्तुकला, स्थापत्यकला, सौंदर्यशास्त्र हे आपल्या परंपरेचेच भाग आहेत आणि त्याचा आस्वाद घेणं; ते समजून घेणे हे आपल्या परंपरेचं ज्ञान वाढवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यादृष्टीने आपल्याला सजग करण्याचं काम हे पुस्तक करतं. गो. बं. देगलूरकर हे या क्षेत्रातले जाणकार आणि अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांच्या लेखणीतून आपल्याला मार्गदर्शन होतंय हे आपलं भाग्यच.




लेखाकाबद्दल इंटरनेट वरून मिळवलेली माहिती
(https://www.mahamtb.com/Encyc/2018/8/17/Article-on-Dr-G-B-Deglurkar.html).

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा जन्म वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘देगलूरकर’ या घराण्यात झाला. त्यांच्यातल्या चिकित्सक आणि संशोधक वृत्तीला जोड मिळाली, ती संतसाहित्याचं सिंचन झालेल्या संस्कारित मनाची आणि आध्यात्मिक वृत्तीची. लहानपणी झालेल्या संस्कारांची जोड त्यांच्या पुढील आयुष्यात केलेल्या संशोधनाला, अभ्यासाला उपयोगी ठरली. डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्र, मंदिरस्थापत्त्य यांचा अभ्यास करून इथल्या पुरातत्त्वशास्त्रात मोलाची भर घातली. मूर्तींकडे, मंदिरांकडे पाहाण्याची नवी दृष्टी दिली. जी सर्वसामान्य माणसं ईश्वरभक्तीसाठी मूर्तिपूजेचा मार्ग चोखाळतात ते यासाठी मंदिरांमध्ये जातात. त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचविण्यासाठी त्यांना समजतील अशा भाषेत त्यांनी लेख लिहिले.

पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगातही ज्या डेक्कन कॉलेजचं नाव आदराने घेतलं जातं, त्या कॉलेजमधून डॉ. देगलूरकर यांनी पीएच.डी. पूर्ण केली. १९९३ पर्यंत तिथे अध्यापनही केलं आणि या कॉलेजला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यावर पहिले कुलपती होण्याचा मान त्यांना मिळाला. दोन वेळा डी.लिट. ही सन्मान्य पदवी मिळवणारे ते डेक्कन कॉलेजमधले पहिले प्राध्यापक. बालपणापासून झालेल्या संतसाहित्याच्या संस्कारांमुळे, संतांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या विचारांचा आणि मूर्तिशास्त्र व मंदिरस्थापत्य यांचा परस्परसंबंध आहे का? हे तपासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी ते पुरातत्त्वशास्त्राकडे वळले आणि मग या विषयात आपल्याला काही नवं संशोधन करता येईल का, या विचाराने त्यांनी अभ्यास सुरू केला. पुरातत्त्वशास्त्र विषय घेऊन एम.ए. झाले. डॉ. शांताराम भालचंद्र तथा शां. भा. देव हे त्यांचे या विषयातले गुरू होते.




देऊळ, देवालय या संकल्पनेबद्दल आपल्या पुरातन वेदवाङ्मयात काय उल्लेख आहेत इथपासून त्यांनी विषयाला सुरुवात केली आहे. असं दिसतंय की वेदकाळात देवळे नव्हती. देवळे ही गेल्या काही शतकांमधलीच ही नवनिर्मिती आहे.
 


देगलूरकर यांनी या पुस्तकात मंदिराचे वेगवेगळे भाग कुठले असतात, त्याला शास्त्रीय नावं कुठली आहेत, त्या त्या भागाचं महत्त्व किंवा वेगळेपण काय हे समजावून सांगितलं आहे. देवळाच्या पायापासून कळसापर्यंत आणि देवळाच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत असा पूर्णविस्तार त्यांनी घेतलेला आहे. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली की तुमच्या हा भाग लक्षात येईल.
 

हे तपशील त्यांनी थोडक्यात मांडले आहेत ते कसे याची काही उदाहरणे बघूया. देवळाच्या पायाचा भाग अधिष्ठान आणि त्यावरची रचना कशी असते त्यांची नावं काय हे सांगणारी ही काही पाने.




कळस आणि इतर काही भागांवर भागांची माहिती देणारी काही पाने.




अशा पद्धतीने पुस्तकात वेगवेगळ्या भागांची माहिती चित्रांसकट आणि आकृत्यांसकट दिलेली आहे. 

देवळाच्या भिंतीवर देवांचे अवतार, पुराण कथांमधल्या गोष्टी असतातच. तशीच काही स्त्री, पुरुष, अप्सरा, प्राणी ह्यांची शिल्पे असतात. ही शिल्पे प्रतीकात्मक असतात. म्हणजे आपल्या षड्रिपूंवर मात करावी, मन एकाग्र करावे इ. संदेश ह्यातून शिल्पकाराला द्यायचा असतो. गंगा-यमुना ह्यांच्या शिल्पातून भक्त शुचिर्भूत झाला आहे हे ध्वनित केलं जातं इ. ह्या मुद्द्याला थोडक्यात स्पर्श केला आहे.

आवर्जून पहावीत अश्या मंदिरांची माहिती दिली आहे. उदा.




पुस्तकाच्या शेवटी पारिभाषिक संज्ञांची सूची आहे. तसंच मंदिर स्थापत्य विषयावर महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या अलीकडच्या काळातल्या आठ अभ्यासकांची माहिती आणि संदर्भ ग्रंथांची सूची आहे.

पुस्तकाचा विषय नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि तांत्रिक आहे. त्यामुळे खूप अपरिचित तांत्रिक संज्ञा येतात. एका संज्ञेचे विश्लेषण करताना त्यात अजून चार संज्ञा येतात. त्यामुळे पुस्तक थोडं किचकट होतं. एका वाचनात सगळं लक्षात आलंय; सगळ्या संज्ञा लक्षात राहिल्या आहेत असं होणार नाही. एखाद्या संज्ञेचा संदर्भ पुढच्या पानात आला की तो वाचल्यानंतर मागचा भाग जास्त स्पष्ट होतो. त्यामुळे एकदा-दोनदा-तीनदा हे पुस्तक वाचलं की हे पुस्तक नीट समजेल असं मला वाटतं. मजकूर असणारी पृष्ठे कमी असल्यामुळे हे सहज शक्यही आहे.

पुस्तक अजून सोपं करता आलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटलं. एखादी संज्ञा स्पष्ट करून सांगताना त्यात अजून आकृती घ्यायला हव्या होत्या. पुनरावृत्ती असली तरी काही भाग नव्या मजकुराच्या अनुषंगाने पुन्हा द्यायला हवा होता असं मला वाटलं.

मंदिरात काय काय पाहता येईल हे या पुस्तकातून लक्षात येतं. पण पुस्तकातल्या शीर्षकातला "मंदिर कसे पहावे" ह्याचे थेट उत्तर दिलेले नाही. मंदिर पाहण्याचा निश्चित क्रम लेखकाने दिलेला नाही. त्याबद्दल काही विशेष मार्गदर्शन नक्कीच हवं होतं. पण लेखकाने सुरुवातीला म्हटलं आहे की आपल्या धर्मशास्त्रानुसार आधी देवळाला प्रदक्षिणा घालावी. देवळाचं बाहेरून दर्शन घ्यावं. देवळाच्या बाहेर चितारलेल्या पुराणकथा, देवाचे अवतार समजून घ्याव्या. प्रतिमांमधून दिलेला संदेश आत्मसात करावा.

हे पुस्तक वाचून जेव्हा आपण एखाद्या देवळात दर्शनाला जाऊ तेव्हा त्याच्या रचनेकडे आपण जास्त डोळसपणे बघू. ते कुठल्या शैलीतलं आहे; त्याच्या "मंडोवर" म्हणजे बाह्य भिंत किती "जंघांचा" आहे; "मंडप" आहे का? "अंतराल", "शुकनासिका", "तोरण" आहे का नाही; द्वारपाल आहेत; गंगायमुना कशा चितारल्या आहेत; इ शोधायचा आपण प्रयत्न करू. काय आढळते काय आढळत नाहीये; आधी बघितलेल्या मंदिरांपेक्षा काय वेगळं आहे याचं आपण रसग्रहण करू असं मला वाटतं. त्यादृष्टीने हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी एक नवे ज्ञानदालन उघडणारे आहे. त्यात पुढे जाऊ इच्छूक संदर्भग्रंथ वचातीलच.

पण सुरुवात तरी नक्की करा. त्यासाठी पुस्तक आवर्जून वाचा. हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे मी ऑनलाईनच मागवलं होतं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...