अनंतानुभव (Anantanubhav)

पुस्तक - अनंतानुभव (Anantanubhav)
लेखक - डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni)
शब्दांकन - सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५२
प्रकाशन - स्नेहल प्रकाशन. पहिली आवृत्ती सप्टेंबर २०२०
छापील किंमत - ३०० रु.


सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचायला दिल्याबद्दल मी श्री. सुधीर जोगळेकर ह्यांचे आभार मानतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशभर असंख्य सेवा प्रकल्प राबवते. त्यातल्या वनवासी समाजासाठीच्या आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्या डॉ. अनंत कुलकर्णी ह्यांचे हे अनुभव कथन आहे.
पुस्तकात दिलेली त्यांची माहिती


पुस्तकात दिलेली श्री. जोगळेकर ह्यांची माहिती


अनंत कुलकर्णी ह्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या तरुण वयातच स्वतःला ह्या कामात झोकून दिलं. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी समाजासाठी प्राथमिक आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. डोंगराळ, दुर्गम ठिकाणे, दळणवळणाची साधने कमी, लोकांमध्ये साक्षरतेचा अभाव, गरीबी अशी कितीतरी आव्हाने. संघविरोधी कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा विरोध हेही होतंच. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना कधीकधी मारहाणीचा सामनासुद्धा करावा लागला. अश्या थरारक अनुभवांचं वर्णन अनंतरावांनी पुस्तकात केलं आहे. ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत डगमगून ना जाता उभं राहण्याची ताकद त्यांना संघाच्या वरिष्ठांनी कशी कशी दिली ह्याचंही सविस्तर वर्णन त्यात आहे.

वनवासी क्षेत्रात काम केल्यावर सांसारिक जबाबदारी आणि संघाचं सामाजिक काम दोन्ही करता यावं म्हणून त्यांना नाशिक कार्यक्षेत्र देण्यात आलं. महिंद्र कामपणी मधली नोकरी सांभाळून ते काम करत होते. काही वर्षांनी महिंद्र कंपनी सोडून ते पुन्हा एकदा पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरले. "जनकल्याण समिती" आणि इतर संस्थांच्या माध्यमातून रक्तपेढी, रुग्णालये, आरोग्य प्रशिक्षण केंद्रे ह्यांचे जाळे त्यांनी महाराष्ट्रभर उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतर राज्यातल्या लोकांना, संस्थांना व्हावा म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. ३३ वर्षे काम पूर्ण करून त्यांनी ठरवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. अलिप्तपणे बाजूला झाले.

अनंत अनुभव घेतलेल्या अनंतरावांचं हे कथन म्हणून ... "अनंता"नुभव. अगदी सार्थ शीर्षक.

अनुक्रमणिकाडॉक्टरकी चं शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी त्यांनी आदिवासी भागातल्या आरोग्य केंद्रातच स्वतःहून मागून घेतली. तेव्हाचा विदारक अनुभव.
दुर्गम भाग आणि अपुऱ्या सुविधा असल्यामुळे डॉक्टर, नर्स हवंय त्या प्रमाणात हव्या तेव्हा उपलब्ध नसत. त्यामुळे प्राथमिक उपचारांसाठी तिथल्याच लोकांना प्रशिक्षण देऊन; "आरोग्यपेटी"तून औषधे पुरवून कामाला गती दिली गेली. त्याच धर्तीवरचा "दाई प्रशिक्षण" चा अनुभव.
राजकीय विरोधाचा मुकाबला; प्रेमाने, संयमाने तरीही खंबीरपणे
रक्तपेढीचं काम जोरात सुरु होतंच. त्यातून पुढे आलं एड्स विषयी जनजागृतीचं काम. ते सुद्धा खास संघविचारानुसार भारतीय संस्कृतीततल्या संस्कारांचा आधार घेऊन.

अनंतरावांच्या कामाचं दस्तऐवजीकरण हा संघ परिवारातल्या व्यक्तींसाठी मोठा ठेवा आहेच. पण त्या वर्तुळाबाहेरच्या पण समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या कोणालाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल; ह्यात शंका नाही. संघाबद्दल कुतूहल, आक्षेप आणि शंका असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्या पुस्तकाच्या वाचनातून संघाच्या विचारपद्धतीचं कार्यान्वयन प्रत्यक्ष कसं होतं हे बघणं नक्कीच आवडेल.

शब्दांकन आणि पुस्तकाची मांडणी करताना ती कालानुक्रमे केली आहे. तरी काही वेळा प्रसंगांची पुनरुक्ती झालेली आढळते. आरोग्याच्या कामाच्या विस्ताराची माहिती देताना व्यक्तींची नावे, संस्थांची नावे, त्यांच्या वाढीतले छोटे टप्पे ह्यांचा तपशील जरा जास्त झाला आहे असं वाटतं. पण मूळ कामाचं हे दस्तऐवजीकरण असल्यामुळे ते अनिवार्य देखील आहे. त्यामुळे त्रयस्थ वाचकाने तो तो भाग थोडा झरझर वाचून पुढे जायला हरकत नाही.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

टारफुला (Tarphula)

पुस्तक - टारफुला (Tarphula)
लेखक - शंकर पाटील (Shankar Patil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८९
ISBN - 978-81-7766-829-2

टारफुला ही जुनी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरी आहे. खेडेगावातल्या सत्ताकारणावर आधारित आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, कोल्हापूर संस्थानातलं हे खेड. पाटील, तलाठी, कुलकर्णी, चावडी, त्यावरचे सनदी , तराळ वगैरे पारंपरिक गावगाड्याची रचना तिथे आहे, गावचा पाटलाची सत्तेवर बळकट पकड. त्यामुळे गावातले लोक आणि आजूबाजूच्या डोंगरदर्यांत राहणारे गुन्हेगार लोक हे सुद्धा त्याला वचकून असत. पण अश्या पाटलाच्या आकस्मिक निधनामुळे पाटीलकीची खुर्ची रिकामी होते. सत्तेची ही पोकळी भरून काढण्यासाठी गावातले बलाढ्य लोक सरसावतात आणि त्यातून पुढे काय घडतं; हा ह्या कादंबरीचा मुख्य विषय.

पाटील गेल्यावर "कुलकर्णी" पद सांभाळणारे पंत कारभार हाकायचा प्रयत्न करतात. पण सत्ता राबवायची तर जे सामर्थ्य असलं पाहिजे ते नसल्यामुळे ते दुबळे ठरतात. पुढे गावात एक बदली पाटील येतो. तो आधीच्या पाटलासारखा कर्तबगार, शूर त्यामुळे गावाच्या दुफळीवर, टग्यालोकांवर जरब बसावी म्हणून तो आपलं बळ दाखवतो. त्यातून काही सुखावतात तर काही दुखावतात. मग दुखावलेली मंडळी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून तो स्वतःची तागे मंडळी जमवतो. सत्ता डोक्यात जाऊन नको ते धंदेकरतो. गावातली परंपरागत हाडवैरं उफाळून येतात. त्यात ह्या गटाला त्या गटाशी झुंजवून आपलं स्थान टिकवण्याची त्याची धडपड चालू राहते. त्यामुळे कधी दोन गट एकत्र येऊन तिसऱ्या गटातल्या व्यक्तीचा खून करतात तर नंतर हेच विरोधी दोघांचं जमून पहिल्या विरुद्ध कारस्थान करतात.

सामर्थ्य नाही म्हणून सत्ता गेलेले कुलकर्णी गावाने पहिले तसे अतिसामर्थ्याच्या नादात सत्ता कशासाठी हेच विसरलेला पाटील गावाला बघावा लागतो. सत्तेसाठी बेभरवशी आणि हिंसक खेळ रंगतो.

"टारफुला" वाचताना नेमकं महाराष्ट्रातलं सत्ता नाट्य घडतं आहे. आज २६ जून २०२२ आहे. शिवसेनेचे आमदार बंड करून गुवाहाटीला गेले आहेत. आणि कुठला गट कोणाबरोबर. कोणाची सत्ता जाणार कोणाची येणार. हा निर्णय अधांतरी आहे  कालचे विरोधी आजचे मित्र. आणि कालचे मित्र आज हाडवैरी. संघर्ष आणि बाचाबाची. त्यामुळे आज राज्यात जे घडतं आहे तेच गावपातळीवर कसं घडतं हेच "टारफुला" ने दाखवलं आहे. 

पहिल्या पाटलांच्या वचकाचं वर्णन


आबा कुलकर्णीची भीती दाखवणारा प्रसंग


बदली पाटील कशी जबरदस्ती करतो तो प्रसंग . एक परीट त्याची बायको विहिरीत पाय घसरून पडली म्हणून सांगायला येतो. तर तूच तिला मारलीस असा बनाव करून पाटील त्याला लुबाडायला बघतो. 

गावातलं हाडवैर दाखवणारा पाटील आणि गावकऱ्यातला एक संवाद 


खेडं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं; टुमदार घरांचं; परस्पर जिव्हाळा असणाऱ्या माणसांचं असा माझ्यासारख्या शहरी लोकांचा समज असतो. पण खेड्यातही राजकारण आहेच. तेही जहरी आणि हिंसक. आजच नाही तर ७० वर्षांपूर्वी सुद्धा (आणि त्या आधी सुद्धा असेलच). सत्ता-सामर्थ्य ह्यांचा सनातन खेळ मराठी खेड्याच्या नेपथ्यावर दाखवणारी ही कादंबरी आहे.

कादंबरीत पटापट प्रसंग घडतात. कुठेही पाल्हाळ लावलेला नाही. विनाकारण स्थलवर्णन, पात्रवर्णन केलेलं नाही. त्यामुळे एकही पान रटाळ नाही. पाहिल्या पानापासून कादंबरी जी पकड घेते ते शेवटच्या पानापर्यंत. प्रसंगांचं वर्णन परिणामकारक आहे. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत. पात्रांच्या संवादात साहजिकच तिथली ग्रामीण बोली येते. तिची मजा घेत खटकेबाज संवाद वाचताना आणि धमाल येते. त्यामुळेच कादंबरी एकीकडे रंजक आणि दुसरीकडे विचार करायला लावणारी आहे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

द्विदल (Dwidal)


 

पुस्तक - द्विदल (Dwidal)
लेखक - डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondake)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३८
ISBN -978-93-861-175519 / 
978-93-861-175526(E book)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती ऑक्टो २०१६
छापील किंमत - १७०/- रु. 

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञानकथालेखक 
बाळ फोंडके ह्यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती. 


ह्या पुस्तकात दोन दीर्घ कथा आहेत. "नार्सिसस" आणि "कोव्हॅलंट बॉंड"ह्या नावाच्या. पोलीस तपासाच्या उंत्कंठावर्धक कथा आहेत. पोलीस तपासात आधुनिक विज्ञानाची जोड घेऊन गुन्ह्याचा शोध घेतला जातो त्यामुळे विज्ञानकथा देखील आहेत.


"नार्सिसस" ही कथा प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स ह्यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वावर बेतलेली आहे.
 

डॉ.बोस हे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ. दुर्धर आजारामुळे शरीर विकलांग झालं आहे. चालण्याफिरण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठीसुद्धा यंत्राची मदत घ्यावी लागते आहे अशी अवस्था. पण मेंदू, बुद्धी, समरणशक्ती अगदी तेजतर्रार ! बोस एक सिद्धांत मांडत असतात की माणूस म्हणजे त्याचा मेंदू. इतर शरीर हे केवळ साहाय्य्यभूत; मुख्य नव्हे. ह्याच सिद्धांतावर व्याख्यान देण्यासाठी बोस अमेरिकेतून भारतात येतात. त्यांच्या पत्नीसह. एके रात्री त्यांच्यावर हॉटेल मध्ये हल्ला झाल्याची तक्रार त्यांची पत्नी नोंदवते. आणि पोलीस तपास सुरु होतो.
एका वृद्ध विकलांग शास्त्रज्ञावर हल्ला का बरं केला गेला असेल; ह्याचा तपास असिस्टंट कमिशनर अमृतराव आणि गुन्हेशोधतज्ञ कौशिक करतात. नेहमीच्या तपासाला विज्ञानाची जोड देखील मिळते. संशयाची सुई ह्याच्याकडून त्याच्याकडे असं करत करत योग्य हल्लेखोरापर्यंत कशी पोचते हे वाचण्यासारखं आहे.
त्या कथेतील पाने 


"कोव्हॅलंट बॉंड" ह्या कथेत दोन बायका एकाच मुलीबद्दल "मी तिची आई" असा दावा करतात. नेहमीच्या कागदपत्रांच्या छाननीतून कधी मुलगी आहे हे जाणवतं तर कधी दुसरीची. मग विचार येतो डीएनए टेस्ट करायचा. त्या चाचणीच्या निकालातून घोळ वाढतो पण चित्र काहीतरी वेगळंच आहे हे कळतं. आणि जेव्हा सगळा उलगडा होतो तेव्हा येतं की आधुनिक विज्ञानामुळे जीवन सुखकर झालं आहे, पोलीस तपास सोपा आहे तसेच दुसरीकडे ह्या विज्ञानातून नवे नैतिक प्रश्न सुद्धा आपल्यासमोर उभे केले आहेत. पूर्ण तपासामध्ये दोन्ही महिलांची पारडी वरखाली होत राहतात; तपासात सतत नवे पैलू; वैज्ञानिक अंगे येतात हे अतिशय रंजक आहे.


ह्या शोधकथांचा शेवट पूर्णपणे सयुक्तिक आहे. वाचकाला काहीतरी धक्का द्यायचा म्हणून तपासात किंवा शेवटी काहीही "ट्विस्ट" दाखवायचा प्रकार केलेला नाही. विज्ञान सुद्धा अतिरंजित किंवा अद्भुत नाही तर आज जे शोध उपलब्ध आहेत किंवा शक्य वाटतायत त्यांचाच आधार घेतला आहे. त्यामुळे त्यातूनही गोष्टींचा खरेपणा मनाला भिडतो. वैज्ञानिक परिभाषा बेतानेच वापरल्यामुळे लेखन बोजड झालेले नाही उलट भाषा, वाक्यरचना, संवाद अगदी चपखल आहेत. त्यामुळे वाचायला घेतलं की आपण रंगून जातो.


साहित्यप्रेमी,विज्ञानप्रेमी, लहान मोठे सर्वांना आवडेल असे हे पुस्तक आहे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

Yes! I am corrupt (येस! आय अॅम करप्ट )पुस्तक - Yes! I am corrupt (येस! आय अॅम करप्ट )
लेखक - Arun Harkare (अरुण हरकारे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १२४
ISBN - दिलेला नाही 

लेखक श्री. अरुण हरकारे ह्यांनी हे पुस्तक मला वाचण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. 

भ्रष्टाचार हा भारतीय समजाला जडलेला असाध्य रोग. सरकारी काम म्हणजे त्यात दिरंगाई, कामाची कमी गुणवत्ता आणि संबंधितांची पैशाची बेगमी हे कटू वास्तव. रोज वृत्तपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवर नवनवीन घोटाळे आपण वाचत असतो. अश्याच एका घरबांधणी घोटाळ्यावर आधारित ही कादंबरी/दीर्घ कथा आहे. ह्यात सरकारी गृहनिर्माण खात्यातर्फे गरीबांसाठी घरं बांधली जातात पण ती घरं अतिशय वाईट दर्जाची असतात. निकृष्ट माल वापरून कंत्राटदार पैसे कमावतो. ह्याकडे कानाडोळा करण्याचे पैसे सरकारी अधिकारी, राजकारणी, मंत्री घेतात. कोणी नियमानुसार काम करायला गेले तर त्याला ह्या व्यवस्थेत टिकून दिले जात नाही. एका प्रामाणिक कंत्राटदाराला प्रामाणिकपणाचं फळ मिळतं. खोट्यानाट्या तक्रारी दाखवून त्याच्याकडून काम काढून घेतलं जातं. जबर दंड वसूल केला जातो. बिचारा देशोधडीला लागतो. त्याचा मुलगा मोठा होऊन दुसऱ्या बिल्डर कडे नोकरीला लागतो. नाईलाजाने त्याला भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते. पण ह्या व्यवस्थेची माहिती मिळवून, आपल्या वडिलांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो.
तो यशस्वी होतो का? आणि झाला तर ही भ्रष्ट व्यवस्था त्याला सुखासुखी जगू देईल का? हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर कळेल.

भ्रष्टाचार कसा होतो त्याचा एक प्रसंग

भ्रष्ट अधिकाऱ्याने बांधलेल्या इमारतीत अपघात होतो. ह्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी कादंबरीचा नायक लोकांना उकसावतो

कादंबरीची कथा तशी साधी आहे. पात्रे द्विरंगी आहेत. भ्रष्टाचारी हे "निखळ भ्रष्टाचारी" आहेत. सरळ सरळ पैसे मागतात नाहीतर काम करणार नाही म्हणतात. सरळमार्गी माणसं सरळ वागतात. त्यामुळे भ्रष्टाचार लपवायच्या क्लृप्त्या, बेरकीपणा, खोटेपणा उघड करण्यासाठी करावे लागलेली शोध मोहीम; सज्जनाची अगतिकता असलं काही नाट्य किंवा चढउतार नाहीत. पात्रांची मनोभूमिका रंगवायचा प्रयत्न नाही. पुस्तकाच्या शेवटी शेवटी तर एखाद्या घटनेचे वृत्त सांगावे तसे दुसरे पात्र घटनांची जंत्री सांगते. पेपरात आलेल्या खऱ्या खऱ्या बातम्यांची यादी दिली आहे. त्यामुळे कथा-कादंबरीचा बाज पूर्णपणे निघून जातो.

परीक्षणाच्या सुरुवातीला म्हटलं तसं, भ्रष्टाचाराच्या बातम्या नेहमी वाचनात येत असतात. त्या बातम्याही सुरस-चमत्कारिक-रम्य(!) असतात(दुर्दैवाने). त्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक काही सत्य खणून वाचकांसमोर मांडत नाही; संबंधितांच्या जाणिवांचा वेध घेत नाही किंवा ही समस्या सोडवण्याचा एखादा नावा मार्ग सांगत नाही. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

रामकथामाला (Ramkathamala)
पुस्तक - रामकथामाला (Ramkathamala)
लेखिका - दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११२
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग. फेब २०२१
छापील किंमत - रु. २००/-

ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव श्री. सुधीर जोगळेकर ह्यांनी मला हे पुस्तक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.

रामायण आणि महाभारत हे ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास. आपल्या संस्कृतीचे आदर्श कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवणारी महाकाव्ये. साहित्य म्हणून अत्युत्कृष्ट. हजारो वर्षे झाली तरी ग्रंथांतील कथा शिळ्या तर वाटत नाहीत उलट त्यातल्या पात्रांचे, घटनांचे नवनवीन अर्थ पुढे येत असतात; त्यांच्याकडे बघण्याचे नवनवीन दृष्टिकोन पुढे येत असतात. कथाकार, कादंबरीकार, चित्रकार, गीतकार, नाटककार, शिल्पकार अश्या प्रत्येक कलावंताला आपल्या कलेतून ही कथा सांगावीशी वाटते. इतिहास संशोधकाला त्याच्यातून भारताचा इतिहास किती पुरातन आहे ते शोधावंसं वाटतं. साधू संतांना त्यातून नीतिमत्तेचा आदर्श शिकवता येतो. आदर्श राजा कसा असावा हे राजकारणी व्यक्तीला कळू शकतं. अश्या कितीतरी अंगांनी ही महाकाव्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहेत; कणाकणात आहेत.

रामायण- महाभारताचं प्रेम आणि आकर्षण फक्त भारतातल्या व्यक्तीलाच नाही, तर जिथे जिथे भारतीय पोचले, भारतीय संस्कृती, धर्म, विचारधारा पोचल्या, रुजल्या त्या देशोदेशी आहे. अफगाणिस्तानापासून-ब्रह्मदेशापर्यंतचा सांस्कृतिक भारतीय उपखंड, आग्नेय आशिया(इंडोनेशिया, कमोडिया इ.), जपान, मॉरिशस असा विशाल प्रदेश ह्या प्रेमात आहे. रामायणाच्या ह्या लोकप्रियतेची साधारण कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे. पण त्याबद्दलची तथ्ये, ग्रंथांची नावे, कलाप्रकार, त्यांचा इतिहास ह्याची सविस्तर माहिती कदाचित नसेल.ती माहिती एका ठिकाणी, एका पुस्तकात गुंफून रामकथेच्या दिग्विजयाचे दस्तऐवजीकरण करण्याचं मोठं काम दीपालीजींनी ह्या पुस्तकात केलं आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका

प्रकारणांबद्दल थोडक्यात

- पहिल्या ५ प्रकरणांमध्ये वेद, पुराणे महाभारत ह्यांमध्ये रामकथा कशी सांगितली गेली आहे हे दाखवलं आहे.

- पूर्ण रामायण किंवा त्यातल्या काही भागांवर आधारित नाटके, काव्ये संस्कृत मध्ये आहेत. भारतातल्या अनेक संतांनी आपल्या भाषेत - आपल्या शैलीत रामायण सांगितलं आहे. अशी कुठली रामायणे वेगवेगळ्या प्रांतांत प्रसिद्ध आहेत ते सांगितलं आहे.

- जैन, बौद्ध, शीख ह्या भारतीय उपासना पद्धतीतही रामकथा ही आदर्शच मानली गेली आहे. धर्मग्रंथांत रामायणातल्या किंवा रामाच्या वंशातल्या राजांच्या गोष्टी येतात. आणि त्या त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यात बदलही केलेला आढळतो. म्हणजे अहिंसक राम ! घटना भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत अश्या स्वरूपातल्या जातक कथा इ.

-"विदेशातील रामायण"मध्ये कुठल्या कुठल्या देशांत कश्याप्रकारे रामायण हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा मनाला जातो. ते सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट केलं आहे.

- ही गोष्ट फक्त कथा-कादंबऱ्यांतच मर्यादित राहिली नाही. तर चित्र, शिल्प, नृत्य कलावंतांना देखील तिने मोहित केलं आहे. म्हणूनच अनेक लेण्यांमध्ये दगडांवर रामायणातले प्रसंग कोरलेले आहेत. शिल्पे आहेत. भारतात आणि भारताबाहेरही.

- लोकगीते, लोकनृत्ये, म्हणी, वाक्प्रचार ह्यातही रामायण आहे. त्याचा थोडा मागोवा एका प्रकरणात आहे.

- हनुमान उड्डाण करून लंकेत सीताशोधाला गेला. तिथे त्याने सीतेला रामाचा निरोप सांगितला. "वायुमार्गे जाणारा निरोप्या", "ओळखीची खूण सांगून स्वतःची ओळख सांगणारा निरोप्या" ह्या संकल्पनेतून प्रेरित होऊन अनेक काव्यांमध्ये तो प्रकार नाना रूपांत वापरला आहे असे लेखिकेचे निरीक्षण आहे. ते सोदाहरण पटवून दिलं आहे.

- रामायणात लिहिलेली ठिकाणे शोधायला गेलं तर ती प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत. काही ठिकाणी उत्खननातून जुने अवशेष सापडले आहेत. ह्या सगळ्या ठिकाणांचा शोध घेऊन, त्यांचा विकास केल्यास मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध होईल.

- रामायणावरच्या महत्त्वाच्या ग्रंथांची कालानुक्रमे सूची

- ह्या पुस्तकासाठीच्या पुस्तकांची संदर्भ सूची

हे पुस्तक कॉफीटेबल बुक आकारातील रंगीत आणि देखणे पुस्तक आहे. काही पाने नमुन्यादाखल

रामरक्षा हे वेदांतील मंत्रांचे संकलन आहे. त्यात रामकथा कशी अनोख्या पद्धतीने सांगितली आहे ते पहा. अजून एका मंत्रात थोडक्यात रामकथा कशी सांगितली आहे ते बघा.

विदेशातील रामायण
इतर पंथांमध्ये रामायणकथा
देशी विदेशी नृत्यांतून रामायण

रामायणातील स्थळे आणि आज त्यांचा मग काढला तर ...

रामायणाच्या महत्त्वाचे, व्याप्तीचे थोडक्यात आणि आकर्षक पद्धतीने दस्तऐवजीकरणाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. इतिहास, संस्कृती, भाषा, कला ह्यातल्या एकात जरी रस असेल तरी त्या अंगाने रामायणाचा विचार तुम्हाला वाचायला आवडेल. पुस्तकाची भाषा आणि स्वरूप बोजड शोधनिबंधासारखे ना ठेवता सर्वसामान्य वाचकाला ते वाचावंसं वाटेल, हाताळायला आवडेल असं साधं सचित्र आणि छोट्या छोट्या प्रकरणाचं आहे. त्यातून मुद्द्याची व्याप्ती लक्षात येते आणि आपण पुढे वाचत राहतो. त्यामुळे हे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक आहे.

पुस्तक कुठे मिळेल ?
  • पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
  • आपल्या शहरातल्या विवेकानंद केंद्राच्या शाखेशी संपर्क साधा 
  • अथवा पुढे दिलेल्या चित्रातल्या तळाशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

अनंतानुभव (Anantanubhav)

पुस्तक - अनंतानुभव (Anantanubhav) लेखक - डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni) शब्दांकन - सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar) भाषा - मराठी (M...