हास्यमुद्रा (Hasymudra)




पुस्तक - हास्यमुद्रा (Hasymudra)

लेखक - मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)

भाषा - मराठी (Marathi)

पाने - २३६

मुकुंद टाकसाळे यांच्या विनोदी कथांचा हा संग्रह आहे. मध्यमवर्गीय मराठी माणासांच्या घरी घडणाऱ्या घडू शकणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून, गमतीजमतीतून प्रसंग खुलवले आहेत. चारुहास पंडित यांची कथांना साजेशी व्यंगचित्रे या गोष्टींना अजूनच खुलवतात.

अनुक्रमणिका -



टकले अंकलची ट्रॅजेडी - रोजचा पेपर टाकणारा पोऱ्या चुकीचा पेपर टाकतोय म्हणून त्याला सकाळी गाठून निरोप सांगायचा. इतकी साधी गोष्ट; पण एकातून एक गोंधळ कसा घडतो आणि तो निस्तरताना अजून काय गोंधळ घडतो. ते सांगणारी कथा. "तारक मेहता का ऊल्टा चष्मा" ची आठवण येईल.

हिप्नोटिझम - संमोहन करून माणसाला वश करता येतं,त्याच्या कडून हवं ते करवून घेता येतं, त्याच्या मनातलं काढून घेता येतं असं म्हणतात. पण खरंच कोणी मनातला राग उघड उघड बोलला तर कठीण प्रसंग ओढवतो. आणि अशातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा हिप्नोटिझम कसं कामी आलं याची गोष्ट.






कबूतर जा जा जा - घरात घुसलं कबूतर आणि घरच्यांची पळापळ

नाट्यपरीक्षक काकाजी - तऱ्हेवाईक नाट्यपरीक्षकाचा नमुना आणि त्याच्या तऱ्हा  

सखूची डायरी - समाजसेवा म्हणून आपल्या मोलकरणीला लिहालया शिकवणारी मालकीण आणि ही मोलकरीण मग "काय काय" लिहून ठेवते याची धमाल





शिंकामोर्तब - बोलताना आपण काही विधान केलं आणि तेवढ्यात कोणी शिंकलं तर आपण "सत्य आहे" असं म्हणतो. या योगायोगामुळे कथा नायकाचं लग्न ठरतं का आणि शिंका गेल्यावर मोडतं की काय; बघा वाचून.

चोरीचा मामला - इन मीन चार बिऱ्हाडं असणाऱ्या सोसायटीत चोरी होते - चपलांची, बादल्यांची. आणि त्यातून या सभासदांचे तात्विक वाद होतात, वॉचमन ची योजना होते आणि फसते !

मरावे परी ... - एका होतकरू अभिनेत्याचा स्ट्रगल

लॅचकी चं रामायण - किल्ली घरात आणि आपण बाहेर. आणि पुढचा गोंधळात गोंधळ. 

आमची माती आमचं चांदणं - १९९८ साली प्रकाशित या पुस्तकातल्या कथेला तेव्हाच्या सरकारी दूरदर्शनच्या भोंगळ कारभाराची पार्श्वभूमी आहे. काहीही विषय, कसेतरी दिग्दर्शित केलेले कार्यक्रम यातून टीव्हीवर दिसण्याच्या इच्छापूर्तीचा सुद्धा कसा विचका होतो त्यावरची गोष्ट

हात दाखवून अवलक्षण - स्वीमिंग पूल मध्ये पोहताना एका गृहस्थाला आपली जुनी मैत्रीण दिसली. तिला हात दाखवून "हाय" केलं पण. तिच्या नवऱ्याला कळल्यावर "हाय रे कर्मा" म्हणायची पाळी आली.

रात्रंदिन आम्हा परीक्षेचा प्रसंग - लहानपणापासून मुलांच्या मागे लागणारे, मुलांना चतुरस्त्र करण्याच्या नादात कितीतरी क्लासेसला घालणारे, परीक्षेला बसवणऱ्या पालक व त्यातून मुलांची होणारी कुचंबणा

पैसे दो जूत लो - "हम आपके है कौन" च्या चित्रपटाच्या प्रभावामुळे लग्नात नवरदेवाचे बूट लपवले खरे पण लोकांना वाटलं खरंच चोरी झाली. मग तिरसट पाव्हणे आणि भांडखोर मंगलकार्यालय मालक यामुळे सूतावरून स्वर्ग कसा गाठला गेला याची विनोदी गोष्ट.




देणे-घेणे - साहित्यिक संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी खरंच साहित्यप्रेमी आणि प्रामाणिक असतील असं नाही. अशा लोकांच्या बेजबाबदार कारभारामुळे एखाद्या होतकरू लेखकाचीच कारकीर्द संपू नये. पण इथे असं झालं खरं.

टीव्ही व्हिडिओ वर्ल्ड - या गोष्टीला पण ९० च्या दशकातल्या मालिका, केबल टीव्हीचे वाढते प्रमाण आणि टीव्ही-सिनेमात गुंग झालेली माणसं याची पार्श्वभूमी आहे. त्याचाच वापर करून लग्न जमण्याची ही गोष्ट आहे.


अश्या या साध्या सोज्वळ विनोदी कथा आहेत. पोट धरून हसायला लावणाऱ्या नसल्या तरी वाचताना मजा. टेन्शन फ्री होण्यासाठी, निखळ करमणूक म्हणून वाचायला आवडेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

When only love remains (व्हेन ओन्ली लव्ह रिमेन्स )









पुस्तक : When only love remains (व्हेन ओन्ली लव्ह रिमेन्स )

लेखक : Durjoy Datta (दुर्जोय दत्ता) 

भाषा : English (इंग्रजी) 

पाने : २७८

ISBN : 978-0-14342264-8



एक एअर होस्टेस तरुण मुलगी एका गिटार वाजवणाऱ्या, गाणाऱ्या मुलाची गाणी त्याच्या युट्यूब वर ऐकते. गाणी बेताचीच असली तरी तिला ती खूप भावतात. ती त्याच्या प्रेमातच पडते. मग त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळते. ते प्रेमात पडतात. लगेच एकत्र राहायला लागतात. मग अचानक वाईट प्रसंग. प्रेमाने एकमेकांची साथ देणं होतं. सगळं टिपिकल प्रेमकहाणी सारखं. सगळं सोपं गोडगोड. व्यवसाय-धंदे, जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी याचं टेन्शन नाही, आजूबाजूचे लोक - घरची मंडळी यांच्या भूमिका गृहीतच धरलेल्या. आणि मग ओढूनताणून नाट्य.

पुस्तकाची भाषा सोपी आहे. पण कथा , पात्र रचना, पात्र रंगवणे काही जमलेलं नाही. चार ओळींचं कथाबीज आहे. त्यामुळे लेखकाची खरी कमाल ती फुलावण्यातच होती. पण ते काही जमलेलं नाही. चाळत चाळत पुस्तक वाचलं तरी काही राहून गेल्यासारखं वाटलं नाही.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

वाट तिबेटची (Vat Tibetachi)



पुस्तक - वाट तिबेटची (Vat Tibetachi)
लेखिका मीना प्रभु (Meena Prabhu) 
भाषा मराठी (Marathi)
पाने 335 
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांच्या प्रवास वर्णनाच्या प्रसिद्ध लेखमालेतील वाचलेलं हे दुसरं पुस्तक . त्याच्याआधी चिनीमाती  पुस्तक वाचलं होतं. हे पुस्तक त्याचा पुढचा भाग असावा असं, तिबेट वरचं. तिबेट म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेला बर्फाळ,  रेताड, पहाडी, पठारी प्रदेश. हजारो वर्ष निसर्गप्रिय, शांतताप्रिय आणि आपल्या कोशात रममाण असणाऱ्या लोकांचा प्रदेश. पण चीनची वाकडी नजर त्यावर पडली आणि तो भाग त्यांनी बळाने स्वतःत विलीन करून घेतला. जुन्या धर्मसत्ता, राजसत्ता, परंपरा यांचा विध्वंस केला आणि त्याला "तिबेट मुक्ती"चे गोंडस नाव दिले. त्यामुळेच तिबेटी लोकांचे धर्मगुरू दलाई लामा यांना परागंदा होत भारतात आश्रय घ्यावा लागला. 

चीनची दडपशाही अनेक वर्षे चालूच आहे. त्यामुळे तिबेट जगापासून दुरावलेल्या अवस्थेत होता. आता चीनचे धोरण स्वतःच्या फायद्यासाठी थोडे बदलते आहे. त्यांनी केलेल्या विध्वंसातून सांस्कृतिक जी स्थाने टिकली, जेवढी जगाने बघितलेली चीनला चालतील आणि त्यामाध्यमातून चीनची भलावण साधता येईल तितके पर्यटन चीनने सुरू केले आहे. या संधीचा फायदा घेऊन मीना प्रभु यांनी तिबेटवारी साधली. 

फक्त तिबेटच नव्हे पण चीनचा व्हिसा मिळवणे, मग तिबेटला जायचे परमीट मिळवणे हा सुद्धा एक अनुभवच होता लेखिकेने तिथपासून आपल्या वर्णनाची सुरुवात केली आहे. पण तिबेटला पोचण्यापूर्वी त्या अमेरिकेतील हवाई बेटे आणि चिनच्या काही शहरांना भेटी देणार होत्या. खास खग्रास सूर्यग्रहण बघायला शांघायला. त्यामुळे पुस्तकात सुरुवातीला हवाई बेटे, पर्ल हार्बर यांचे वर्णन आहे.  तिबेटवर हवाई फ्री !! पुढे चीनमधल्या शहरांना दिलेल्या भेटी, त्यांनी शांघायला बघितलेल्या ग्रहणाचे, आधी बघितलेल्या ग्रहणाचे भावस्पर्शी अनुभव आहेत. डॉ. कोटनीस यांचे स्मारक त्यांनी शोधाशोध करून बरीच खटपट करून बघितलेच.



बीजिंग पासून ल्हासा पर्यंत चीनने रेल्वे सुरू केली आहे. डोंगर-दऱ्या नदी-नाले पठारे ओलांडत हजारो फूट उंचीवरून जाणारी रेल्वे चीनच्या दृढनिश्चय याचं तंत्र कौशल्याचा आणि विस्तार वादाचं संमिश्र उदाहरण. या रेल्वे प्रवासापासून आपली लेखिकेबरोबरची तिबेट सफर खऱ्या अर्थाने सुरू होते. त्याची ही एक झलक. 
(फोटो वर क्लिक करून झूम करून वाचा.)


तिबेट मधल्या प्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळांना लेखिकेने भेटी दिल्या. या स्थळांच्या आजूबाजूचा निसर्ग, प्रत्यक्ष वास्तू आणि त्यांचं ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लेखिकेने अतिशय रोचक पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे तिबेट बद्दल फार काही वाचलं असेल तरी संदर्भ स्पष्ट होतात आणि त्या स्थळांचे महत्त्व आणि रुपडे आपल्या नजरेसमोर उभे राहते. एका मंदिराचं हे वर्णन वाचा.




तिथल्या लोकांशी, गाईडशी बोलता बोलता तिथली संस्कृती, लोकांची जीवनशैली सुद्धा लेखिका समजून घेत होत्या. माणसांच्या अंत्यसंस्कारांची वेगळीच पद्धत तिकडे आहे. मृतदेहाचे तुकडे करून त्याच्या मासाचे गोळे  गिधाडांच्या स्वाधीन करून मरण्याची "स्काय बरीयल" बद्दल पुस्तकात वाचायला मिळेल. तिबेट मधल्या भटक्या जमातीबद्दलची ही काही माहिती.




पुस्तकात बरेच रंजीत फोटो सुद्धा आहेत.



तिबेट मधली चिनी दडपशाही ठायी ठायी दिसतेच. अर्थातच, त्याबद्दल बोलायला लोकांना परवानगी नाहीच. पाठीवर सतत पोलीस नाहीतर चिनी लष्कराची गस्त आणि हेरगिरी यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था. तरीही लेखिकेने जमेल तसं लोकांना बोलतं करायचा प्रयत्न केला. ते अनुभवकण पुस्तकात वाचायला मिळतील. 



प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एव्हरेस्ट शिखराच्या तिबेटच्या बाजूच्या बेस कॅम्पला भेट दिली. जगातलं सर्वात उंच शिखर बघण्याचा क्षण म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव देणारा क्षण. एकीकडे अत्यानंद देणारा तर दुसरीकडे धीरगंभीर करणारा तो अनुभव त्यांच्या शब्दात वाचाच. 

तिबेटचं हे वर्णन वाचून एक जाणवत की तुम्ही फक्त चांगले असून भागत नाही. तुम्ही कणखर सुद्धा असायला हवं. नाहीतर चांगुलपणा, अहिंसा यांचा गैरफायदा घेणारं जंगली जग आहे हे. जर हरीण म्हणले मी वाघाला खात नाही मग तो कशाला मला खाईल ? तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही. सावरकरांच्या शब्दात सद्गुणविकृती ! भारतही अश्याच प्रकारे परकीय आक्रमणांचा बळी पडला असेल का?

चीनमध्ये येणारी भाषेची अडचण, खाण्यापिण्याची अडचण व चीनची धोरणे यामुळे चीनचा प्रवास करणारे  पर्यटक कमीच. तिबेट बघण्याची संधी आणखी कमी. त्यामुळे या पुस्तकाच्या रूपाने का होईना आपल्याला  तेथे प्रवास करून आल्याचा आनंद मिळेल. हे पुस्तक वाचा आणि जाणून घ्या तिबेट मधली - प्रकृती, संस्कृती आणि विकृती !!


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...