Elon Musk:How The Billionaire CEO Of SpaceX and Tesla is shaping our future (एलॉन मस्क :हाऊ द बिलियनर सीईओ ऑफ स्पेसएक्स अ‍ॅंड टेस्ला शेपिंग अवर फ्यूचर)




माझा मित्र अमर पाठक याने लिहिलेले परीक्षण. त्याच्या परवानगीने आणि सौजन्याने, साभार सादर

पुस्तक : Elon Musk :How The Billionaire CEO Of SpaceX and Tesla is shaping our future (एलॉन मस्क : हाऊ द बिलियनर सीईओ ऑफ स्पेसएक्स अ‍ॅंड टेस्ला शेपिंग अवर फ्यूचर)
लेखक : Ashlee Vance (अ‍ॅश्ली वान्स)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ४००
Hardback ISBN: 9780753555620
Trade Paperback ISBN: 9780753555637


काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीच्या Falcon Heavy या आजपर्यंतच्या सर्वात जड आणि शक्तिशाली रॉकेट ने अवकाशात झेप घेतली. त्या रॉकेटमध्ये त्यांनी त्यांच्या Tesla या कंपनीची Roadster नावाची Electric कार पेलोड (पोचवायची आहे अशी वस्तू) म्हणून पाठवली. रॉकेटने यशस्वी उड्डाण केले व ती कार अलगद अवकाशात सोडली. तिचे व्हिडिओ viral झाले आणि लोकांमध्ये SpaceX विषयी अजून जास्त उत्सुकता निर्माण झाली. त्याच उत्सुकतेतून मी हे पुस्तक वाचायला घेतलं. एलॉन मस्क यांच्या जीवनावर अ‍ॅश्ली वान्स यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे.

मस्क सध्या जगप्रसिद्ध असले तरी सगळ्या वाचकांना त्यांच्याबद्दल बरंच ठावूक असेल असं नाही. म्हणून आधी हा माणूस कोण आहे हे समजण्यासाठी पुस्तकात वाचलेल्या माहितीद्वारे थोडी ओळख करून देतो.

अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगात तंत्रज्ञानाची आवड असलेल्या युवकांवर सध्या एलॉन मस्क यांनी भुरळ पाडली आहे. त्यांच्या निर्णयाविषयी, त्यांच्या कंपनीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींविषयी, उत्पादनाविषयी आज सर्वांमध्ये एक प्रकारची उत्सुकता दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या संकल्पनावरती मस्क यांच्या कंपनीमध्ये काम चालले आहे ते तांत्रिकदृष्ट्या क्रांतिकारी आहे. रॉकेट्स हे तंत्रज्ञान नवीन नाही परंतु आजपर्यंत रॉकेट्स अवकाशात सोडणे या क्षेत्रात फक्त मोठ्या मोठ्या देशांची मक्तेदारी होती परंतु पहिल्यांदाच कुठल्यातरी एका कंपनीने ही किमया करून दाखवली होती आणि तीही अतिशय कमी खर्चात. त्यामुळे ही घटना अभूतपूर्व अशी ठरते.

मध्यंतरी अजून अशीच एक बातमी आली होती, ज्यामध्ये Tesla या कंपनीच्या Roadster या इलेक्ट्रिक कार ने सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या बुगाटी या पेट्रोल वर चालणाऱ्या कारला शर्यतीमध्ये मागे टाकले.  ही घटनाही क्रांतिकारीच होती कारण आजपर्यंत इलेक्ट्रिक कार्स या पेट्रोल वर चालणाऱ्या कार पेक्षा अत्यंत कमी ताकतीच्या, एखादे खेळणे वाटावे अश्या वाटत होत्या. तो समज Tesla ने खोडून काढला व गाड्यांच्या क्षेत्रात एक सशक्त, पर्यावरणासाठी कमी हानिकारक असा पर्याय उपलब्ध करून दिला. एलॉन मस्क हा कल्पक आणि दूरदृष्टीचा आहे व त्याने ही संधी आधीच ओळखून मागच्या दशकातच या क्षेत्रात काम करणारी कंपनी सुरू केली.दोन दशकांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्याची स्वप्ने खरी होताना दिसत आहेत. 

तर अशा एलॉन बद्दल पुस्तकात खूप सविस्तर वाचायला मिळते. पुस्तकात काय काय वाचायला मिळालं हे पुढे मी सांगताना एलॉन बद्दलही अजून माहिती तुम्हाला मिळेलच.

एलॉन मस्क यांचे पूर्वज कॅनडाचे व जन्म दक्षिण आफ्रिकेतला. त्याचे बालपण आफ्रिकेत आणि बऱ्यापैकी श्रीमंत अशा कुटुंबात गेले. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे दोघेही प्रचंड मोठी जोखीम घेऊन, त्यात झोकून देऊन काम करण्याच्या प्रकारातले होते आणि एलॉनवर त्यांच्या या गुणांचा मोठा प्रभाव जाणवतो. त्याच्या बालपणीचा विक्षिप्त स्वभाव, लहान असतानाच आई वडिलांचा झालेला घटस्फोट, वडिलांचा तुसडा स्वभाव याचा त्याच्या बाल मनावर परिणाम होत होता. लेखकाने त्याचे काही किस्से या पुस्तकात दिले आहेत. 

आपण सर्वांनीच लहानपणी परग्रहावर भ्रमंती करू शकणाऱ्या मानवाच्या काल्पनिक विज्ञानकथा वाचल्या आहेत त्याच प्रकारे एलॉन मस्क यांनाही लहानपणी अशाच प्रकारे Science Fiction वाचण्याचे वेड लागले होते. त्यातूनच त्यांना आपणही पुढे जाऊन अशाच प्रकारे काहीतरी जगावेगळे करावे, मानवाला सहजपणे परग्रहावरती जाता येता येऊ शकेल असे काहीतरी करावे असे वाटू लागले. परंतु हे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण झाले इतके काही सोपे नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होतीच. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे ठरवले, त्यासाठी प्रथम प्रचंड आर्थिक तरतूद करावी लागणार होती ज्याची त्यांना प्रथम तयारी करावी लागणार होती. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची वाट धरली. अमेरिकेत त्याने स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये विज्ञानाची पदवी घेतली व नंतर काही दिवस कंपनी मध्ये काम करून स्वतः ची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि X.com नावाची कंपनी एका साध्या घरात त्याने आणि त्याच्या भावाने मिळून सुरू केली. X.com कंपनी ने त्याकाळचे आधुनिक असे Google Map सारखे सॉफ्टवेअर बनवले. पुढे त्यांनी Paypal या कंपनी सोबत merger केले त्यामध्ये एलॉन पुढे CEO झाला व Payapal कंपनी त्यांनी ebay ला विकून टाकली. हे सर्व करताना आलेल्या अडचणी, आव्हाने व त्यावर केलेली मात यांची लेखकाने विस्तृत मांडणी केली आहे. 

Paypal विकण्यामुळे एलॉन च्या संपत्तीत मोठी वाढ झाली जिच्यामुळे आता तो त्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करू शकणार होता.. त्याचे पहिले स्वप्न होते ते म्हणजे मानवाला इतर ग्रहावरती सहजपणे संचार करता यावा अशी Rockets technology बनवणे. त्यासाठी त्याने Paypal च्या पैशातून SpaceX ही कंपनी सुरू केली. जिच्यामध्ये त्यांनी अत्यंत कमी खर्चात रॉकेट्स बनवता यावे असे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. त्याचवेळेस एलॉनने आणखी एका Tesla नावाच्या Electric Cars बनवण्यासाठी सुरू झालेल्या Startup मध्ये गुंतवणूक केली आणि पुढे तो तिचाही CEO झाला.

आज जी SpaceXआणि Tesla कंपनीची प्रगती आपल्याला दिसते तिचा प्रवास म्हणजे गुंतवणूक केली, लोक कामाला लावले आणि रॉकेट्स किंवा विजेवर चालणाऱ्या मोटरी बनवल्या इतका साधा सोपा नाही. अत्यंत खडतर अवस्थेतून या कंपन्या गेल्या, अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला, कंपनीचे जे भागीदार होते त्यांच्याशी एलॉन चे संघर्ष झाले, त्याचवेळेस त्याचा बायकोसोबत घटस्फोटही झाला, कित्येक Rockets Launch चे प्रयोग अपयशी ठरले, इलेक्ट्रिक कारच्या बॅटरींचे स्फोट झाले, दोन्ही कंपन्या एकाच वेळेस Bankrupt होण्याच्या उंबरठयावर होत्या, एक वेळ अशीही आली की एलॉन दोन्हीं पैकी फक्त एकच कंपनी सांभाळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अश्या परिस्थितीत कुठलाही सामान्य माणूस खचून जाऊन त्याने माघार घेतली असती परंतु हार मानेल तर तो एलॉन कसला! या सर्वांतून त्याने कसा मार्ग काढला आणि आजच्या सुस्थितीत या कंपन्यांना कसे आणले याची अत्यंत रंजक आणि विस्तृत माहिती लेखकाने पुस्तकात दिली आहे. 

पुस्तकात साधारणतः 2013-14 पर्यंतच्या घटना आहेत. लेखकाने हे पुस्तक संतुलितपणे लिहिलेले आहे. जरी या पुस्तकाचा नायक एलॉन असला तरीही लेखकाने त्याच्या नकारात्मक बाजूही तितक्याच स्पष्टपणे मांडल्या आहेत. कधी कधी पुस्तकात एलॉन हा खलनायकाप्रमाणेही भासू लागतो तर कधी युद्ध जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा एक आक्रमक योद्धा. एलॉनच्या विक्षिप्त स्वभावामुळे, त्याच्या अधिकारशाही गाजवण्याच्या पद्धतीमुळे, काहीही करून ठरलेलं काम पूर्ण करून घेण्यासाठी कंपनीतील सर्वांकडून अतोनात मेहनत करून घेण्याच्या स्वभावामुळे तो त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी कधी कधी समोरून खलनायक वाटू लागतो तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूने तो त्याच कर्मचाऱ्यांना कंपनीला भेडसावणाऱ्या आर्थिक विवंचनेची जाणीव होऊ न देता त्यांच्या पुढच्या पगाराची व्यवस्था लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. कर्मचारी जितके काम करतात त्यांच्याइतकेच; कधी कधी जास्तच तो स्वतः सुद्धा मेहनत घेताना दिसतो. ज्याप्रकारच्या जग बदलवणाऱ्या गोष्टींवर तो सध्या काम करत आहे व कमीत कमी वेळेत त्यांना जे उद्दिष्ट साध्य करायचे आहेत त्यासाठी कदाचित त्याला असं Hard Task Master बनावं लागत असू शकतं.

लेखक हा Columnist आणि Reporter आहे. त्याने NewYork Times , The Economist मध्ये काम केलेले आहे. त्याला माहिती देण्यास सुरूवातीला एलॉन ने खूप टाळाटाळ केली. परंतु त्याने एलॉन चा पिच्छा सोडला नाही. शेवटी एलॉन ने त्याला एके दिवशी बोलावून permission दिली. पुस्तक लिहिताना त्याने अनेकांचे interviews घेतले. ज्या लोकांनी एलॉन बरोबर काम केले त्याचे, त्याच्या घटस्फोटित बायकोचे , ज्यांच्याशी त्याचे भांडण झाले त्यांचे सर्वांचे. त्यामुळे एलॉनच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू दिल्या आहेत. आणि हो, त्याने घटस्फोट झाल्यानंतर UK मधून Pride And Prejudice चित्रपटात काम केलेल्या , आपल्या पेक्षा 15 वर्षे लहान असलेल्या मॉडेल ला कसे पटवले व तिच्याशी लग्न केले; त्याच्या बयकोने त्याची प्रतिमा डागाळाण्याचा प्रयत्न कसा केला; हे पण दिले आहे. एवढ्या आकर्षक विषयावरच्या पुस्तकात छायाचित्रे मात्र नाहीत.

पुस्तक वाचताना थोड्या फार प्रमाणात रॉकेट सायन्स , इलेक्ट्रिक कार्स या तंत्रज्ञानाचीही ओळख होते परंतु याच्या जास्त खोलात जाण्याचे लेखकाने टाळले आहे आणि त्याचा वर वरचा संदर्भ दिला आहे. तंत्रज्ञानापेक्षा जास्त भर त्याने तंत्रज्ञान विकसित करताना आलेल्या अडचणी, अपयश व त्यातून काढलेला मार्ग यावर दिला आहे त्यामुळे जास्त टेक्नोसॅव्ही नसणाऱ्या लोकांना सुद्धा पुस्तक समजण्यास सोपे जाते. कधी कधी लेखक खूपच जास्त तपशिलात गेल्यामुळे काही गोष्टी जास्त लांबवल्यासारख्या वाटतात परंतु एकंदरीत पुस्तक छान लिहिले आहे आणि त्याचे वाचन हे सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच वाचावे. 

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...