Friday, 23 June 2017

संपूर्ण कालिदास-कथा ( sampoorna kalidas-katha )
पुस्तक :- संपूर्ण कालिदास - कथा ( sampoorna kalidas - katha )
लेखक :- वि.वा.हडप (V.V. Hadap) 
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २२४ 


आज(२४ जून २०१७).. आषाढ प्रतिपदा.. आषाढाचा पहिला दिवस... महाकवी कालिदास दिन !!

संस्कृत भाषेबद्दल ज्यांना थोडीशीही माहिती आहे त्या प्रत्येकाने "कालिदास", "मेघदूत" हे शब्द निश्चितच ऐकलेले असतील. कालिदास हा संस्कृत भाषेतील सर्वांत लोकप्रिय कवी. इतका लोकप्रिय की त्याचा उल्लेख आदराने "कविकुलगुरु" असा केला जातो. त्याची नाटके आणि काव्ये फक्त भारतीयच नाहीत तर जगभरातील काव्यरसिक वाखाणतात. जर्मन भाषेतील महान कवी गटे याला देखील कालिदासाच्या काव्याने वेड लावले होते. आमच्या शाळेतल्या संस्कृतच्या बाई सांगायच्या की म्हणे कालिदासाचे "शाकुंतल" डोक्यावर घेऊन तो अक्षरशः नाचला होता. कालिदासाच्या "मेघदूत" या काव्यातील "आषाढस्य प्रथमे दिवसे.."; अर्थात "आषाढाच्या पहिल्या दिवशी..." या काव्यपंक्ती अजरामर आहेत. म्हणूनच या दिवसाला कलिदास दिन म्हटलं जातं

ज्यांना संस्कृत भाषा चांगली येते किंवा तिचा अभ्यास केला आहे अश्यांनी कालिदासाची नाटके, काव्ये थेट संस्कृतातूनच वाचली असतील. पण माझ्यासारख्या ज्यांना संस्कृतची केवळ तोंडओळख आहे;ज्याला कालिदासाच्या काव्याचा थेट संस्कृतातून आनंद घेणं शक्य नाही अशांसाठी त्याचं भाषंतर हाच पर्याय आहे. म्हणूनच "रिया पब्लिकेशन/अजब डिस्ट्रिब्युटर्स"च्या "कुठलेही पुस्तक फक्त ६० रुपयांत" अशी सवलत असलेल्या प्रदर्शनात जेव्हा मला "संपूर्ण कालिदास-कथा" हे पुस्तक दिसलं तेव्हा मी ते लगेच विकत घेतलं. 

२२४ पानी पुस्तकात  "मालविकाग्निमित्रम्", "अभिज्ञान शाकुन्तलम्", "विक्रमोर्वशीयम्"  ही नाटके; "कुमारसंभवम्","रघुवंशम्" ही महाकाव्ये आणि "मेघदूतम्" हे खंडकाव्य यांच्या कथा आहेत. हे पुस्तक म्हणजे श्लोकशः भाषांतर नव्हेच पण स्वैर भाषांतरही नाही. तर या कलाकृतींच्या कथा सोप्या मराठी भाषेत सांगितल्या आहेत.या पुस्तकात कालिदासाचा कालखंड आणि त्याच्या जीवनाबद्दलच्या काही आख्यायिका यांचीही माहिती आहे. ख्रिस्तपूर्व पहिले शतक हा कालिदासाचा कालखंड असावा असा अंदाज आहे. म्हणजे कालिदास साधारण दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला. पण दोनहजार वर्षांनंतरही भारतीय समाजाची अभिरुची अजून तशीच आहे याची गमतीदार जाणिव होते. 

"रघुवंशा"त रघुकुलात उत्पन्न राजांचे  - रघु, दिलीप, अज, दशरथ, राम, कुश-लव आणि पुढच्या पिढ्यांतील वर्णन आहे. 
"अभिज्ञान शाकुन्तलम्" मध्ये राजा दुष्यंत आणि आश्रमवासी शकुंतला यांची भेट, प्रेम, विरह आणि पुनर्मिलन अशी कथा आहे.
मालविकाग्निमित्रम्‌ मध्ये राजकन्या असूनही दुर्दैवाने एक आश्रित म्हणून राहावे लागलेल्या मालविकेची कथा आहे. अग्निमित्र राजाला ती आवडू लागते आणि तिचे प्रेम तो कसे मिळवतो हे या नाटकात आहे.
विक्रमोर्वशीयम्‌ मध्ये राजा शंतनु आणि अप्सरा ऊर्वशी यांची प्रेमकथा आहे. 
"कुमारसंभव" ही शिवपार्वती विवाह, भगवान कार्तिकेयाच्या जन्म आणि पराक्रमाची कथा आहे. 

पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर "मेघदूत" आधारले आहे. यात त्या मेघाला वाटेत कुठले पर्वत, नद्या, शहरे, लोक दिसतील याचे सुंदर वर्णन आहे

सर्व कथा मनोरंजक तर आहेतच पण चमत्कृतीपूर्णही आहेत. देवलोक आणि मानवलोक, त्यांतील चमत्कार, शाप-उःशाप अश्या अनेक गोष्टी  वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचताना सध्या गाजत असलेला "बाहुबली" चित्रपटाची आठवण झाली आणि फँटसी लँडचं माणसाचं आकर्षण कालिदासापासून आजपर्यंत टिकून आहे याची गंमत वाटली. 

सध्याची हिंदी चित्रपट सृष्टी आणि या कथांचं दुसरं साधर्म्य म्हणजे "प्रेमकथा". हिन्दी चित्रपटांप्रमाणेच या सगळ्या देखील "लव्हस्टोरीच" आहेत. बहुतेक सर्व गोष्टी या राजांच्या "पाहताक्षणी प्रेम"-लव अ‍ॅट फर्स्ट साईट अशा प्रकारच्या आहेत. राजा कुणाच्या तरी प्रेमात पडतो आणि ते प्रेम मिळवण्यासाठी धडपडतो - सध्याच्या हीरोंसारखाच. फरक इतकाच की हे राजे आधीच्या बायका/पत्नी असूनही नव्याने कुणा तरुणीच्या प्रेमात पडतात. आणि आधीच्या बायका कधी रागाने तर कधी आनंदाने सवतीची आणि राजाची भेट घालून द्यायला मदत करतात. आजच्या सारकखं माझी Ex(माजी प्रेयसी), breakup (प्रेमभंग) अशी भानगड नाही. 

हे राजे सगळे विलासी असले तरी प्रत्येकजण पूर्णपुरुषोत्तम-सर्वगुसंपन्न-प्रजाहितदक्ष असेच आहेत. राज्याची-प्रजेची सगळी व्यवस्था चोख लावूनच आता प्रेमाचे उद्योग फुरसतीत करतायत असं जाणवतं. तर नायिका म्हणजे सौंदर्याचा अजोड नमुना; सौंदर्य-बुद्धिमत्ता-शालीनता यांचा त्रिवेणिसंगम अशा आहेत. एकूणच सगळा महाआदर्शवादी मामला आहे बुवा !

असो ! या साहित्यकृतींबद्दल मी इथे फार लिहित नाही. इंटरनेट वर तुम्हाला त्याबद्दल खूप विस्तृत वाचायला मिळेल. 

पुस्तक वाचून कथांची ओळख झाली पण मूळ काव्य संस्कृतमधून वाचल्याशिवाय कालिदासाच्या भाषासौंदर्याची जाणीव होणार नाही हे खरंच. संस्कृत काव्यवाचन करून रसग्रहण करता येईपर्यंत तुम्हाला मला अशा भाषांतरावरच अवलंबून राहावं लागणार. पण भारताची ओळख जगभरात ज्यासाठी आहे अशा विविध नाममुद्रां(brands)पैकी कालिदास या नाममुद्रेची जवळून ओळख करून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा.


पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे श्लोक आणि त्यांचा अर्थ

पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्टिकाधिष्ठित कालिदास: ।
अद्यापि ततुल्य कवेरभावात्‌ अनामिका सार्थवती बभूव ॥

पूर्वी कधीतरी कवींची मोजणी करण्याला सुरुवात झाली तेव्हां कालिदास पहिला म्हणून करंगळी उघडली. पण त्याच्याशी बरोबरी साधू शकेल असा दुसरा कोणी डोळ्यासमोर येईना. त्यामुळे पुढच्या बोटाला "अनामिका" हे नाव सार्थ ठरले.

पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या ,
नादत्ते प्रिय मण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् |
आद्ये वः कुसुमुप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः ,
सेयं याति शकुन्तला पति-गृहं सर्वेरनुज्ञायताम् ||

कण्व मुनी आपल्या मुलीची - शकुंतलेची - ऋषिआश्रमातून पतिगृही पाठवणी करताना वृक्षवेलींना उद्देशून म्हणतायत :
जिने तुम्हाला पाणी घातल्याशिवाय कधी स्वतः पाणी प्यायले नाही;
जिला स्वतःला नटण्याची आवड असली तरी तुमच्यावरच्या प्रेमापोटी जिने कधी तुमचे पान-फूल तोडले नाही;
तुमचे पहिले फुलणे किंवा पहिली फलधारणा हा जिच्यासाठी उत्सव होता;
अशी शकुंतला आज पतिगृही चालली आहे; तुम्ही सगळे तिला अनुज्ञा द्या, निरोप द्या.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Monday, 12 June 2017

कैफा हालक ओमान (kaiphaa halak oman)
पुस्तक :- कैफा हालक ओमान (kaiphaa hAlak omaan )
लेखक :- सुप्रिया विनोद (supriyA vinod)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- ३३६कैफा हालक ओमान - ही ओमान मध्ये राहणाऱ्या भारतीयांवरची कादंबरी आहे. १९९१ सालच्या आसपासचा काळ आणि तेव्हा नोकरी निमित्त भारतातून गेलेले वेगेवेगळ्या वयाचे भारतीय हे या कादंबरीचे नायक आहेत. या कादंबरीचा फॉर्म थोडा वेगळा आहे. या कादंबरीचे नायक-नायिका अर्थात अश्विनी, विक्रम, श्रीकांत, बानी, वसंत, कुमार, शमिका - प्रत्येक जण आत्मनिवेदन करतो आहे असे स्वरूप आहे. या स्वनिवेदनातून कथानक पुढे सरकते.

ही सगळी पात्रं मध्यमवयीन; नुकतीच लग्न झालेली किंवा थोडाफार संसार झालेली अशी आहेत. चांगली नोकरी, चांगला पैसा मिळावा म्हणून ते इकडे आले आहेत. ओमानात त्यांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आहेत पण परक्या देशात, ओमानी माणसांच्या हाताखाली त्यांची मर्जी सांभाळत जगावं लागतंय याची टोचणीही आहे. ओमानातली शिस्त, स्वच्छता, सुरक्षितता बघता आपण भारतातील गर्दी, घाण, भोंगळ कारभार यातून स्वतःची तरी सुटका करून घेऊ शकलो याचा त्यांन आनंद आहे. आलिशन घरं, महागड्या गाड्या असं सुखवस्तू आयुष्य जगायला मिळतंय याचं समाधान आहेच पण आपली जिवाभवाची माणसं दूर सोडून आल्याचं दुःखही आहे. नवऱ्यामागे इकडे आलेल्या स्त्रियांना आपलं करीयर सोडून यावं लागल्याची नाराजी आहे; पण नवऱ्याचा विरह सहन करावा लागत नाहिये याचा आनंद आहे. साधं सोपं आयुष्य मिळालंय पण भारतात असते तशी मोकळीक महिलांना नाही याची घुसमटही आहे. 

अशा द्विधा अवस्थेत हि मंडळी आपल्यासारख्याच समसुखी-समदुःखी-समविचारी भारतीयांच्या जवळ नाही आली तरच नवल. ती तशी एकत्र येतात, एकेमेकांना आधार देतात, आपले सणवार साजरे करतात, दुःखद प्रसंगी-संकटकाळी आधार देतात; आणि ओमानचं वास्तव्य संपलं की जड अंतःकरणाने परत जातात याची ही कहाणी आहे. 

९१ साल असो की आजचं २०१७ साल; ओमान असो की अमेरिका नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक असणाऱ्या भरतीयांची द्विधा अवस्था आजही बहुतांश अशीच असेल. म्हणूनच भौगोलिक पार्श्वभूमी किंवा साल बदलूनही ही कादंबरी तशीच्या तशी वाचली तरी फरक पडणार नाही. पण हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे का कच्चा दुवा हे प्रत्येक वाचकाने ठरवायचं. या कादंबरीत मला "ओमान" दिसेल या अपेक्षेने मी ही कादंबरी वाचायला घेतली. पण यात ओमान दिसतो तो भावनिक प्रसंगांची पार्श्वभूमी म्हणुन, मागे तोंडी लावण्यापुरता. नवरा-बायकोमधले, जुन्या प्रियकर-प्रेमिकांमधले रुसवेफुगवे आणि वर म्हटलं तसे द्विधा मनःस्थितीतले प्रसंग हेच पुस्तकात ठळक आहेत. कदाचित माझ्या  पूर्वग्रहामुळे/अपेक्षेमुळे मला वाचताना तितकी मजा आली नाही. कदंबरीतली "अनपेक्षित" वळणे तितकी अनपेक्षित किंवा नाट्यमय वाटली नाहीत. मी भराभर पुढे वाचत राहिलो.

तुम्ही अनिवासी भारतीयांबद्दलची अशी काही कादंबरी किंवा आखाती-मुस्लिम जागातल्या वास्त्यव्यबद्दल काहीच वाचलं नसेल तर ही कादंबरी वाचायला हरकत नाही.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Friday, 3 March 2017

पेशवाई (Peshwai)
पुस्तक :- पेशवाई (Peshwai)
लेखक :- कौस्तुभ कस्तुरे (Kaustubh Kasture)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- ३५६

छत्रपती शिवरायांच्या स्वप्नाची -सिंधू नदीपासून कावेरी नदी पर्यंत पूर्ण भारतभर हिंदवी स्वराज्य साकारण्याचा स्वप्नाची -बऱ्याच अंशी पूर्ती ज्या काळात झाली तो कालखंड म्हणजे पेशवाई. मराठा साम्राज्यच नव्हे तर भारताच्या इतिहासातही हा कालखंड दूरदर्शी परिणाम साधणारा आहे. पण या कालखंडाची जेवढी माहिती व अभिमान सर्व मराठी समजात असायला हवा तेवढा दिसत नाही. केवळ ब्राह्मण राज्यकर्ते म्हणून या शतकाला अनुल्लेखाने मारायचं किंवा जातीयवादी टीका करून कलंकित करायचं असाच उद्योग सामान्यपणे दिसतो. अशा परिस्थितीत पेशवाईचा अभ्यास करून तथ्याच्या आधारावर ३५० पानी पुस्तक लिहायचं हे धाडसाचं आणि श्रमाचं काम केल्याबद्दल लेखकाचं मनापासून अभिनंदन.

पेशवा अर्थात पंतप्रधान हे राजदाराबारातलं नेहमीचं पद. पण एकाच घराण्याकडे ते वंशपरंपरागत राहण्याचा हा काळ म्हणजे पेशवाई. हे घराणं "भट" आडनावाचं. या घराण्यातले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पासून शेवटचे पेशवे बाजीराव(दुसरे) यांच्यापर्यंत सर्व पेशव्यांबद्दल या पुस्तकात माहिती आहे. 

बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला, बादशहाकडून दख्खनच्या सुभ्यांमधून महसूल गोळा करण्याचा हक्क मिळवला, कैदेत असलेल्या महाराणी येसूबाईंची सुटका केली. या स्वपराक्रमातून त्यांना पेशवाई मिळवली. या घटनांची, त्यामागच्या राजकारणांची महत्त्वाची माहिती पुस्तकात मिळते.

पुढे सर्व पेशव्यांच्या काळात झालेल्या महत्त्वपूर्ण लढाया, राज्य वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी करावे लागलेले दरबारी राजकारण हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. 

बाजीरावांच्या वेगवान हालचाली,राघोबा दादांनी 'अटक' पर्यंत मारलेली मुसंडी, नानासाहेब पेशव्यांचे मुत्सद्दी राजकारण व पुण्याची नियोजनबद्ध वाढ, पानिपतचे युद्ध, माधवराव-निजाम यांच्यातली राक्षभुवनची लढाई, नारायणरावांची हत्या, पेशवाईतली भाऊबंदकी, इंदूर-उज्जैन-झांशी-बडोदे ही मराठ्यांची ठाणी (व पुढची संस्थाने) कशी विकसित झाली, निजमावरचा विजय आणि तरी त्याच्या पुन्हा पुन्हा चालणाऱ्या कुरापती, पेशवे आणि आंग्रे यांच्यातला वाद, होळकर-शिंदे-भोसले-दाभाडे-गायकवाड यांची कधी पेशव्यांच्या बाजूची तर कधी विरोधी भूमिका, पेशवाई राखण्यासाठी नाना फडणवीस आणि त्र्यंबकजी डेंगळे यांच्या सारख्या कारभाऱ्यांचं कर्तृत्व व चतुराई, इंग्रजांचा चंचूप्रवेश आणि धूर्ततेने हातपाय पसरणे, अँग्लो-मराठा वॉर,टिपू-निजाम-हैदर या कट्टर शत्रूंनी इंग्रजांविरोधात एकत्र येणं आणि कारण झालं की पुन्हा संघर्ष करणं.....बापरे काही महत्वाच्या गोष्टी लिहितानाही थकायला झालं . इतका मोठा पट आहे पुस्तकाचा.

एकापाठोपाठ एक लढाया, संघर्ष आणि वेगवान घडामोडी वाचताना आपण पुढेपुढे कसे जातो कळतच नाही. पुस्तक वाचताना कंटाळा येण्याचा संभवच नाही. तारखांची, व्यक्तींची, ठिकाणांची इतकी माहिती सतत मिळत राहते की आधी 'पुढे काय घडतंय' हे वाचूया आणि माहिती लक्षात ठेवायला पुन्हा एकदा वाचूया असं वाटतं.

काही गैरसमजांचं खंडनही पुस्तकात केलंय उदा. पेशव्यांनी छत्रपतींकडून राज्य जबरदस्ती बळकावलं,ध-चा-मा, नानांवरचा घाशीराम कोतवालाच्या वेळचा किटाळ, पानिपत चालू असताना स्वतःच्या मौजेसाठी नानासाहेबांनी लग्न केलं, दुसऱ्या बाजीरावांच्या चारित्र्याबद्दल किटाळ इ. 

लढायांमध्ये मराठी आणि शत्रूच्य फौजेच्या हालचाली दाखवणारे नकाशे आणि सर्व छत्रपती व पेशव्यांच्या राजमुद्रा पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ पुस्तकांची सूची दिली आहे. 

पण पेशव्यांच्या काळात राज्यकारभार कसा चालू होता, रायतेसाठी काय बरा-वाईट फरक पडला हे कळत नाही. उदा. शिवरायांनी राज्यव्यवहारकोश बनवला, शेतसारासारा पद्धतीत सुधारणा केल्या इ.; त्याप्रमाणे पेशवाईत काय घडले?
पेशवाईत ब्राह्मणेतरांवर अन्याय झाला असं का म्हटलं जातं ते खरं का खोटं या बद्दल फार उहापोह नाही. ते असणं आवश्यक होतं.

सारख्या चालणाऱ्या लढाया आणि एक मुलुख जिंकला तोच हरला तोच पुन्हा जिंकला , मराठी मुलुख निजामाने लुटला-जाळला म्हणून मराठ्यांनी त्याचा लुटला हे उल्लेख सतत पुस्तकात येतात. तेव्हाची राजकीय परिस्थिती बघता एक सर्व साधारण नागरिक म्हणून आपण किती शांततेत जगतो आहोत याची जाणीव होते. 

जहागिरीसाठी-आपल्या वसुलीच्या हक्कासाठी पेशवे विरुद्ध भट घराण्यातले इतर, पेशवे वि. इतर सरदार, एक मराठा सरदार वि. दुसरा सरदार अश्या लाढायांचाही अनेकदा उल्लेख आहे. यांना म्हणायचं मराठे पण खरंच छ. शिवाजी महाराजांचं स्वप्न या सरदारांना कळलं होतं का? खरंच स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी राजा व्हायचंय, उपभोगशून्य स्वामी व्हायचंय हे उच्च मूल्य  थोड्याच पेशव्यांना आणि सरदारांना कळलं होतं हे बघून वाईट वाटतं. विशेष म्हणजे आजची परिस्थितीही बदललेली नाही हे विदारक चित्र जाणवतं.

पेशवे युद्धमोहिमा चालवण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेत. त्याची त्यांना पातफेड करावी लागे. हा व्यवहार साधण्यासाठी, जास्त कर्ज मिळण्यासाठी पेशवे घराण्यातल्या मुलांची सावकारांच्या मुलींशी लग्ने लावली जात. गंमतच वाटली मला वाचून!! राजाला कर्ज?लोकांसाठीच लढायचं पण पण तेही लोकांकडून खाजगी कर्ज घेतल्यासारखं करून !! आज आपण संरक्षणासाठी सरकारला कर्ज देत नाही तर ती आपलीच जबाबदारी आहे असं समजून कर रूपाने सहभागी होतो. तेव्हा अशी पद्धत का नसेल? मग सुभ्यांकडून मिळणाऱ्या महसूलाचा, खंडणीचा काय कामात वापर व्हायचा? कळत नाही.

एकूणच पेशवाई पर्वाबद्दल समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं महत्त्वाचं ठरतं. इथलं प्रत्येक ऐतिहासिक पात्र स्वतंत्र शोधग्रंथ लिहिण्याएवढं प्रभावशाली आहे. त्यांचा ३५० पानात वेध घेणं परिपूर्ण ठरणार नाहीच. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्याबद्दल आणखी सखोल वाचायची उत्सुकता वाटेल हे निश्चित.

लेखकाबद्दल 
कौस्तुभ कस्तुरे हे तरूण लेखक आहेत. प्रकाशकांच्या मनोगतात म्हटले आहे की कौस्तुभ कस्तुरे यांनी वयाच्या १८-१९ व्या वर्षीच लिहून पूर्ण केले होते.
लेखकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे लेखक इतिहासकार किंवा इतिहास संशोधक नाही तर इतिहासाचा अभ्यासक आहे.
पण इतिहास वाचनाची, संशोधनाची आवड असल्यामुळेच इतक्या तरूण वयात हे लेखन होऊ शकले. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी १५-२० पुस्तकांची संदर्भसूची दिली आहे. त्यामुळे लेखक नवोदित तरूण असला तरी अभ्यास दांडगा आहे हे जाणवतं. 
पुस्तकाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आशिर्वादपर प्रस्तावना आहे. 


पुस्तक आवर्जून वाचा हे आता वेगळं सांगायला नको; तरी सांगतोच :) ------------------------------------------------------------

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

लेखकासाठी काही अभिप्राय
1 पुस्तकातले नकाशे खूप काळपट असल्यामुळे नीट समजत नाहीत. त्या ऐवजी साध्या पांढऱ्या पृष्ठभागावर नकाशे हवे होते. सध्याच्या महाराष्ट्राच्या/देशाच्या सीमा दाखवून त्यात ठिकाणं दाखवायला पाहिजेत म्हणजे ते ठिकाण नक्की कुठे आहे ते कळलं असतं. माळवा, राजपुताना, गुजरात, निजामाचे राज्य इ.च्या सीमा दाखवल्या असत्या तर सुभ्यांची व्याप्ती सुद्धा नीट कळली असती.
प्रत्येक पेशव्याच्या प्रकरणाच्या शेवटी मराठा साम्राज्य केवढं होतं, किती भागाचा चौथाईचा हक्क होता हे दाखवणारा नकाशा हवा होता म्हणजे प्रगती चट्कन ध्यानात अली असती.

2 कुठला भाग सार्वभौम स्वराज्यात होता (ज्याच्यावर बादशहाचा/मुसलमानी सारदाराचा अधिकार नव्हता) आणि कुठला बादशहाच्या(पण खंडणी मराठे वसुली करत) हे नक्की कळत नाही. 

3 पेशवाईचा समाजावर परिणाम काय झाला; राजकाराभराच्या पद्धतीत काय बरेवाईट बदल झाले याचा उहापोह हवा होता.

4 पुस्तकात वारंवार चौथाई, खंडणी, अमुक अमुक लक्ष उत्पन्नाचा मुलुख, सावकारांकडून कर्ज इ महसूला संबंधी उल्लेख येतो. नक्की महसूल/कर कोणाकडून वसूल केला जायचा, कोण गोळा करायचं, राजाला तो कसा पोचायचा, खंडणी कोण द्यायचं हे समजत नाही. ही माहिती पुस्तकाचा मुख्य विषय नाही पण हे नीट समजलं तर त्या लढायांचं फलित समजायला मदत होईल. 

5 इंग्लिश पुस्तकांमध्ये असतो तसा शेवटी index पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती, ठिकाण, घटना, तत्व याचा संदर्भ कुठल्या कुठल्या पानावर आहे ते लगेच समजतं.

6 समज- गैरसमज प्रकरणात आधी आलेली माहितीच पुन्हा दिली आहे त्यापेक्षा नवीन मुद्द्यांचा समावेश करता आला असता.

7 दुसऱ्या बाजीरावांच्या चारित्र्याबद्दलच्या शंकांना उत्तर देताना आधी आलेल्या काही मुद्द्यांच्या विरुद्ध विधानं आली आहेत. उदा. मस्तानी च्या संदर्भात लिहिलं आहे की ब्राह्मणांमध्ये बहुभार्या पद्धत नाही. पण दु.बाजीरावांबद्दल म्हटलं आहे की राजांमध्ये बाहुभार्या पद्धत होती, त्यात गहजब करण्याचे काय कारण?दु. बाजीराव स्त्रीलंपट नव्हते असं म्हटलंय पण आधीच्या प्रकरणात त्यांच्या वाईट चालीचे उल्लेख आले आहेत. Sunday, 29 January 2017

जडणघडण ( दिवाळी अंक २०१६ ) Jadanaghadan Diwali edition 2016पुस्तक :- "जडणघडण" या मासिकाचा दिवाळी अंक २०१६
पृष्ठ संख्या :- २४८
किंमत  :- रु. १५०/-

या वर्षीच्या (२०१६च्या) दिवाळी अंकांमध्ये आणखी एक वाचनीय आणि संग्राह्य दिवाळी अंक वाचण्यात आला. "जडणघडण" या मासिकाचा दिवाळी अंक.
अंक मुख्यत्वे दोन संकल्पनांमध्ये तयार केलेला आहे. एक संकल्पना आहे "बापमाणसं" आणि दुसरी संकल्पना "स्पर्धा परीक्षांचे दिवस".

"बापमाणसं" एखाद्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याच्या आईबरोबर वडिलांचाही वाटा असतो. आई विषयीचं लेखन बऱ्याच वेळा केलं जातं पण "बाप"माणसाकडेही दुर्लक्षून चालणर नाही. या भूमिकेतून "बापमाणसं" ही लेखमाला घडली आहे. "बापमाणसं" या संकल्पनेत २४ लेख आहेत. यात काही नामवंतांनी आपल्या वडीलांबद्दल लिहिलं आहे उदा. जयंत नारळीकर, अभय बंग, माधव गाडगीळ, रवी परांजपे इ. तर बऱ्याच नामवंतांबद्दल त्यांच्या मुलांनी लिहिलं आहे. उदा. एस.एम.जोशी, रघुनाथ माशेलकर, ग.दि.माडगुळकर, व.पु.काळे इ.
पुढे दिलेल्या छायाचित्रांमधून पूर्ण यादी आपल्यासमोर उलगडेल. 

वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या वडीलांचा प्रभाव कसा होता हे यातून समजतं. तर यशस्वी व्यक्ती एक वडील म्हणून, एक माणूस म्हणून कश्या होत्या/आहेत हे पण आपल्या समोर उलगडतं. 
या व्यक्ती किंवा त्यांचे वडील हे प्रत्येक जण सर्वगुणसंपन्न व्यक्ती नव्हेत. कुणी रागीट आहे; कुणी विसराळू, कुणी फार कडक शिस्तीचे तर कुणी मुलांशी मित्रत्त्वाने वागणारे. म्हणून "यशस्वी बाप" असा काही साचा नाही. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" प्रमाणे प्रत्येकाने आपला मार्ग स्वतः शोधायचा आहे याची याची जाणीव होते. साहजिकच आपल्यातल्या "बापा"ला आत्मपरीक्षण करायला लावणारे हे लेख आहेत. मी एक "बाप" म्हणून माझ्या मुलांना असं समृद्ध करतो आहे का (किंवा करीन का) आणि माझ्या यशापयशात माझ्या वडीलांचा वाटा जाणतो आहे का असा दोन्ही अंगांनी विचार करायला लावणारे आहेत.


"स्पर्धा परीक्षांचे दिवस" ही सुद्धा १७ लेखांची लेखमाला आहे. आणि यात १७ यशस्वी आय.ए.एस. ,आय.पी.एस, आय.आर.एस. अधिकाऱ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षांच्या दिवसाबद्दल सांगितलं आहे. उदा. अविनाश धर्माधिकारी, लीना मेहेंदळे, अश्विनी भिडे इ. सर्व लेखकांची नावं पुढील छायाचित्रात दिसतीलजे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे लेख खास मार्गदर्शनपर आहेतच पण इतरांनाही ते तितकेच रोचक वाटतील. कारण अधिकारी होण्यामागच्या प्रत्येकाच्या ऊर्मी वेगळ्या, प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी, यशापयशाची साखळीही वेगळी. परीक्षा/ध्येय एकच पण त्यापर्यंत पोचण्याचा प्रवास खूपच वेगळा. त्यामुळे दुसऱ्या यशस्वी व्यक्तीच्या आचार-विचाराची नक्कल करून यशस्वी होता येईलच असं नाही. तर त्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला, क्षमतेला साजेसा असा स्वतःचा मार्ग प्रयेकाने शोधला पाहिजेच. हा नवा बोध यातून होतो. फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे लागू पडेल. "’मृत्युंजयचे’ मंत्रभारले दिवस" या दीर्घ लेखात संपादक सागर देशपांडे यांनी ’मृत्युंजय’ कादंबरी कशी घडली, लेखक शिवाजी सावंत यांनी कशी तयारी/संशोधन केले, या कादंबरीचं स्वागत मराठीजनांनी कसं केलं हे सगळं विस्ताराने सांगितलं आहे. काही जुने फोटोही आहेत. कादंबरी मागची ही कथाही निश्चित वाचनीय.

मासिकाच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळाशी मोठीमोठी नावं जोडली गेली आहेत.एकूणच मी सुरुवात करताना म्हटलं त्या प्रमाणे एक वाचनीय आणि संग्राह्य अशा दिवाळी अंक वाचण्यात आला. तुम्हीही वाचा; तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे.

हे परीक्षण त्या मासिकाच्या मार्चच्या अंकात वाचकांच्या प्रतिसादाअंतर्गत पूर्णपानभर प्रसिद्ध झालं आहे
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Saturday, 28 January 2017

તત્ત્વમસિ / तत्त्वमसि / tattvamasi
पुस्तक :- तत्त्वमसि /તત્ત્વમસિ / tattvamasi 
लेखक :- ध्रुव भट्ट ધ્રુવ ભટ્ટ/ Dhruv Bhatt 
भाषा :- गुजराती / ગુજરાતી / Gujarati
पाने :- २३२

शहरात वाढलेला, अमेरिकेत शिकायला गेलेला एक तरूण आपल्या अमेरिकन प्रोफेसरांच्या सांगण्यावरून भारतातल्या आदिवासींबद्दल संशोधन करायला येतो. काहीसा अनिच्छेनेच. जरी भारतीय असला तरी त्याला भारताबद्दल विशेषतः या जंगलात राहणाऱ्या आदिवासींबद्दल काहीच आकर्षण वाटत नसतं. तरी काही महिने भारतात राहून आदिवासींमध्ये राहून फिरून माहिती गोळा करायची जबाबदारी त्याच्यावर येते. आता जातोच आहोत तर आदिवासींसाठी एखादी शाळा वगैरे सुरू करून त्या "अडाण्यांना" थोडं शिकवावं असा तो विचार करतो. 

सरांच्या ओळखीने तो नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातल्या आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो. आदिवासींचं जीवन त्याला जवळून पहायला मिळतं. 

आदिवासी दगडाला, झाडांना देव मानणारे. या अडाणीपणाचा त्याला राग येतो. पण या निबिड अरण्यात राहताना या श्रद्धाच कश्या बळ देतात हे त्याला उमगतं. आदिवासी एकेमेकांना कशी साथ देतात, प्रामाणिकपणे व्यवहार करतात, परंपरेने आखून दिलेल्या मार्गावर कसे निष्ठेने चालतात हे त्याला अनुभवायला मिळतं. 

हे आदिवासी नर्मेदेला देवी मानणारे. नर्मदेच्या जंगलात नर्मदा परिक्रमा करणऱ्या "परिकम्मा"वासींची जशी जमेल तशी सेवा करण्यात समाधान मानणारे. परिक्रमेबद्दल जेव्हा त्याला कळतं तेव्हा एका नदीला प्रदक्षिणा करणं म्हणजे त्याला मागासपc वाटतो. पण परिक्रमावासी आणि आदिवासी केंद्रातले काही जाणते लोक यांच्या मुळे त्याला कळतं की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाद्वारे सर्व प्रदेशातले लोक कसे परस्परांना भेटतात, ज्ञानाची देवाण्घेवाण होते. आसेतुहिमाचल पसरलेल्या या भूप्रदेशात आचार-विचार-उपासना पद्धती इतक्या भिन्न आहेत पण त्यामागचा आत्मा,मूल्य मात्र समान आहेत. 
नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांना नर्मदा भेटते म्हणे; पण ते भेटणं सांगून कळणारं नाही. दुसऱ्याला दाखवतो म्हणून दाखवता येणारं नाही. मनात श्रद्धा ठेवून परिक्रमा करतानाच ते अनुभवायला हवं हे त्यालाही उमगतं आणि त्यालाही अनुभवायला मिळतं.

असा एकूण पुस्तकाचा अवाका आहे. त्यातले प्रत्यक्ष प्रसंग सांगून तुमची मजा घालवत नाही. पण आदिवासींबद्दल आपल्यालाही वस्तुनिष्ठ विचार करायला लावणरी ही कादंबरी आहे. लेखक भारतीय संस्कृतीच्या, रीतीरिवाजांच्या आणि महानतेच्या प्रेमात आहे हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे पुस्तकात भारतीय संस्कृतीबद्दल महान, गोडगोड असंच वाचायला मिळतं. बऱ्यावाईटाचा साक्षेपी ऊहापोह नाही. तरी काही पैलू नव्याने सापडू शकतील.

एक कथा म्हणून कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. 

या पुस्तकाचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. अंजली नरवणे यांनी तो केला आहे. ------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------