संशयकल्लोळ (Sanshaykallol)



पुस्तक - संशयकल्लोळ (Sanshaykallol)
लेखक - गोविंद बल्लाळ देवल (Govind Ballal Deval)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११४
प्रकाशन - कॉन्टिनेन्टल प्रकाशन , १९७० (मूळ नाटकाचा प्रयोग १९१६ साली झाला)
ISBN - दिलेला नाही

मराठी संगीत नाटकांच्या युगात "संशयकल्लोळ" नाटक फार लोकप्रिय होतं असं मी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष कधी बघितलं नव्हतं. नुकत्याच डोंबिवलीत पार पडलेल्या पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात हे पुस्तक हाती लागलं. म्हणून उत्सुकतेने वाचायला घेतलं. आवडलंही. 

अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून काहीतरी संशय घ्यायचा आणि तो संशय खरा धरून त्याच्यावर पुढचे मनसुबे रचायचे. मग त्यातून संशयात अजून भर; त्यातून गोंधळ. ह्या सगळ्या प्रकाराला आपण मराठीत म्हणतो "संशयकल्लोळ". ते बहुदा ह्या नाटकाच्या नावावरूनच.

लेखक गोविंद बल्लाळ देवल ह्यांची पुस्तकात ह्यांची पुस्तकात दिलेली माहिती.


नाटकाची गोष्ट साधारण अशी आहे - फाल्गुनराव आणि कृत्तिका हे नवराबायको. दोघेही संशयी. आपला जोडीदार बाहेर लफडे करतो आहे अशी ह्यांची मनोमन खात्रीच. जोडीदाराविरुद्ध काही पुरावा सापडतोय का; त्याला रंगेहाथ सापडतोय का ह्यासाठी टपून बसलेले दोघे. त्यामुळे समोर घडणाऱ्या साध्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढतात - सुतावरून स्वर्ग गाठतात. अशाच स्वभावाचं अजून एक पात्र आहे अश्विनशेट. त्याचं रेवती नावाच्या नायकिणीवर प्रेम जडलं आहे. ते लग्न करणार आहेत. तरीही आतून थोडासा संशय आहे. योगायोगाने फाल्गुनराव आणि रेवतीची गाठ पडते. ती चक्कर येऊन पडत असताना फाल्गुनराव तिला सावरतो. कृत्तिका हे बघते. ह्या दोघांचं लफडं आहे असं तिची समजूत होते. त्यांना रंगेहाथ पकडायला जाते पण तिला ते दोघे दिसत नाहीत. त्याजागी पडलेला अश्विनशेटचा फोटो सापडतो. पुढे फाल्गुनरावला कृत्तिकेच्या हातात हा फोटो दिसतो आणि त्याचा समज होतो की ह्या दोघांचं लफडं आहे !! आणि अश्विनशेटला नंतर फोटो फाल्गुनरावच्या हातात दिसतो. आणि त्याला वाटतं की फाल्गुन आणि रेवती ह्यांचं लफडं आहे. आपल्या संशयाची खात्रीच करण्यासाठी हे तिघे अजून क्लृप्त्या लढवतात. योगायोगाने घटना अश्या घडतात की त्या खऱ्या घटनांचा वेगळा अर्थ काढल्यामुळे त्यांचा संशय बळावतच जातो. एका संशयातून दुसरा; दुसऱ्यातून तिसरा गैरसमज अशी धमाल फटाक्यांची माळ फुटत राहते. पण शेवटी सर्व संशय फिटतात आणि शेवट गोड होतो. 

वाचक म्हणून आपण त्यात रंगून जातो. आणि ह्या लोकांना मनोमन म्हणतो, "बाबांनो, जरा थांबा. दुसऱ्याचं पूर्ण एका. समजून घ्या. पूर्ण शहानिशा करा रे !!"

फाल्गुनराव आणि कृत्तिकेचा एकमेकांवर संशय आणि त्यासाठी नोकरांची साक्ष काढणे
 

अश्विनशेट रेवतीवर रागावतो तेव्हाचा प्रसंग



नाटक जुनं असलं तरी त्या कथानकातली मजा जुनी झाली नाही. मराठीतली अनेक प्रसिद्ध नाट्यगीतं/पदं ही "संशयकल्लोळ" नाटकातली आहेत हे मला वाचल्यावर कळलं. नाट्यसंगीताची जुजबी माहिती असणाऱ्या मलासुद्धा मुखडे ठाऊक आहेत अशी काही पदे म्हणजे - "सुकांत चंद्रनाना पातली", "कर हा करी धरिला शुभांगी ..", "संशय का मनी आला ..", "मजवरी तयांचे प्रेम खरे", "मृगनयना रसिक मोहिनी" इ.

ह्या पदांची एक गंमत वाटली की गाणं म्हणण्यासाठी काही विशेष कारण फार भावनिक प्रसंग लेखकाला लागला नाही. कुठल्याही प्रसंगात गाणी घातली आहेत. दारावर आलेल्या भिक्षेकऱ्याला हाकलवायला सुद्धा गाणं; तसबीर सापडत नाहीये; इथेच तर ठेवली होती हे सांगायला सुद्धा गाणं; संवाद चालू असताना मध्येच गाणं आणि पुन्हा पुढे तोच मुद्दा गद्यात सुरु. कदाचित तेव्हाचा प्रेक्षकांची मागणी असेल की भरपूर गाणी पाहिजेत. ही पदे सुद्धा संस्कृतप्रचुर मोठमोठ्या सामासिक शब्दांची. त्यावेळच्या लेखनशैलीची, सामाजिक स्थितीची आणि अभिरुचीची जाणीव होते.

जुन्या पुस्तकांच्या वाचनाचा माझा अनुभव असा आहे की आता वाचताना ती तितकी गमतीदार वाटत नाहीत (गडकरींचे बाळकराम किंवा चि.वि. चे चिमणराव इ.) कारण विनोदाची आपली अभिरुची बदलली आहे; आपली सामाजिक जीवनशैली बदलली आहे. म्हणून ती पुस्तके वाचताना आपल्याला जुन्या काळाचं भान ठेवूनच वाचायला लागतं. जुनी भाषा सुद्धा खूप क्लिष्ट आणि बोजड वाटते. त्यामानाने "संशयकल्लोळ" मधली गंमत आणि भाषा तितकी शिळी वाटली नाही. छोटे आणि खुसखुशीत संवाद आहेत. कृत्तिकेच्या तोंडाच्या म्हणींनी मजा आणली आहे. ह्यातल्या पुरुष पात्रांची नावं ही मराठी महिन्यांची - फाल्गुनराव , अश्विनशेट, भादव्या, आषाढ्या, कार्तिकस्वामी(देव) अशी तर स्त्री पात्रांची नावं नक्षत्रांची - रेवती, कृत्तिका, भरणीबाई इ. अशी वेगळी चमत्कृती आहे. भाषेची मजा लेखनात आहे.

हे नाटक एका इंग्रजी नाटकाचं भाषांतर आहे. हे देवलांनीच सांगून ठेवलं आहे. पण त्यांनी मूळ नाटकाचं नाव सांगितलं नव्हतं. नंतर लोकांनी संशोधन करून ते मूळ नाटक शोधून काढलं. ह्या पुस्तकात मूळ नाटकाचे संवाद आणि "संशयकल्लोळ"मधले संवाद बाजूबाजूला ठेवून त्यातलं साम्य दाखवलं आहे. भाषांतर किती अस्सल झालं आहे हे आपल्या मनावर ठसतं.

तुम्हालाही मराठी साहित्यातलं, नाट्यइतिहासातलं, सांगितिक इतिहासातलं मानाचं पान वाचायला नक्की आवडेल.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...