"डोंबिवलीकर" दिवाळी अंक २०२० (Dombivlikar Diwali edition 2020)



"डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार" दिवाळी अंक २०२० (Dombivlikar Diwali edition 2020)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४४

कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे गाडे मंदावले आहे, ते पुन्हा गतिमान करण्याच्या अनेक उपाययोजना सरकारी पातळीवर चालू आहेत.  काही आर्थिक पॅकेजेस दिली गेली आणि नियमांमध्ये बदल करण्यात आले. पण लोकसहभाग जिथे मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे ते म्हणजे ननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले "आत्मनिर्भर" भारताचे आवाहन. "व्होकल फॉर लोकल" म्हणजे स्वदेशी वस्तुंना प्राधान्य देण्याचे आवाहन. पंतप्रधानांचे आवाहन त्याचे विविधांगी पैलू आणि कृतीयोजना यावर देशभरात चर्चा झाली नसती तरच नवल. हीच संकल्पना मध्यवर्ती ठेवून ह्या वर्षीचा "डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार" चा दिवाळी अंक तयार केला गेला आहे. लेखांचा संग्रह आहे. 

लेखांचे ३-४ प्रकार आहेत. 
- भारत आत्मनिर्भर होणे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांत काय बदल घडले पाहिजेत ह्याचं उच्च स्तरीय विहंगावलोकन. 
- विशिष्ट क्षेत्रांत भारताने आत्मनिर्भरता कशी गाठली किंवा त्या दृष्टीने मोठी प्रगती कशी केली हे सांगणारे लेख. उदा. दूधउत्पादन, मासेमारी, साखर उद्योग 
- समाजातल्या वंचित घटकांना मुख्यप्रवाहात आणण्याचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची ओळख करून देणारे लेख उदा. अपंगांसाठी काम करणारी संस्था, नर्मदा नदी परिसरातील आदिवासींपर्यँत शिक्षण पोचवणारी संस्था. 
- कोरोना काळात जेव्हा सगळ्यांना घरी बसून राहावं लागलं त्यातून कितीतरी क्षेत्रांना फटका बसला. तरी "ऑनलाईन" माध्यमाचा नाविन्यपूर्ण वापर करत शिक्षण, मनोरंजन, कला क्षेत्रातल्या व्यक्तीनी स्वतःला सतत कामत ठेवलं. त्यातून लोकांचं मनोरंजन आणि आर्थिक प्राप्ती सुद्धा होत राहिली. त्याचा वेध घेणारे लेख. 
- आपल्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात उत्तम करियर करायचं असेल तर मेहनत घेऊन आत्मनिर्भर झालं पाहिजे. त्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तीनी केलेले मार्गदर्शन. 

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया 





आत्मनिर्भरतेचे पैलू सांगणारा लेख 





कोरोना काळात संगीत क्षेत्रातल्या तरुण पिढीने ओनलाईन मैफिलींसारखे प्रयोग केले. त्याबद्दलचा लेख





नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासिंच्या विकासासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेल्या भारती ठाकूर यांच्या कार्याचा परिचय 




"नवीन शैक्षणिक धोरण" केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले. शिक्षणक्षेत्रात त्यातून काय बदल अपेक्षित आहेत त्याचा मागोवा घेणारा लेख.







असा हा वैचारिक फराळ देणारा दिवाळी अंक आपल्याला वाचायला नक्की आवडेल. 




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

 

झाडाझडती (Jhadajhadati)






पुस्तक : झाडाझडती (Jhadajhadati)
लेखक : विश्वास पाटील (Vishwas Patil)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४७७
ISBN : 978-81-7434-813-5


प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित "झाडाझडती".

भारताचा विकास व्हायचा असेल तर रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी मोठमोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प - धरणे, महामार्ग, वीज निर्मिती केंद्र, कारखाने, शिक्षण संकुले इ. उभारणं आवश्यक आहे. पण हे ज्या ठिकाणी उभारलं जातं तिथल्या लोकांना मात्र विस्थापित व्हावं लागतं. देशाच्या भल्यासाठी हे लोक आपलं घरदार सोडतायत म्हटल्यावर त्यांचं पुनर्वसन तातडीने आणि योग्य रीतीने झालंच पाहिजे. पण आपल्याकडच्या सवयीनुसार प्रकल्प रखडत चालतात आणि पुनर्वसन त्याहून कूर्मगतीने.  धरणग्रस्तांच्या दयनीय अवस्थेवर , स्वतःच्या हक्कासाठीच्याच्या लढ्यावर ही कादंबरी आधारित आहे.

पुनर्वसनाचे नियम छान दिसतात - जागेच्या बदल्यात जागा किंवा मोबदला, विस्थापितांच्या कुटुंबियांना नोकऱ्या, नवीन गावठाण सर्व सोयींनी युक्त आणि बरंच काही. पण हे सगळं राहतं कागदावरच. सरकारी नोकरांचा कारभार म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करणे, त्याचा सोयीचा अर्थ लावणे, टाळाटाळ करणे आणि खाबुगिरी करत गरीबाला नाडणे. आपली हक्काची जमीन, पैसे मिळवण्यासाठी गरीबांची धडपड. जमीन, उत्पन्नाचं साधन गमावलेल्या या घरांमध्ये सोयरीक तरी कशी जुळायची ? शिक्षणं कशी व्हायची ? 

सुरुवातीची गोड गोड आश्वासने मिळण्याचा हा एक प्रसंग वाचा.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)




प्रत्यक्ष गाव उठेपर्यंतच पुनर्वसनाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे लक्षात येऊ लागतं. गाव उठणार म्हणून व्याकुळ झालेल्या गावकऱ्यांचा हा प्रसंग 









विकासासाठी पिढ्यानपिढ्या भकास होतायत. अश्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार द्यायचा. पण सगळेच तसे नाहीत ना. त्यातलाच कोणी स्वार्थी "गोतास काळ" बनत खोटी कागदपत्र, खोट्या साक्षीपुराव्यातून स्वतःचं चांगभलं करतो. तलाठ्याला हाताशी धरून स्वतःच्या सावत्र आईची जमीन हडप करणाऱ्या गुन्ह्याचा हा प्रसंग








पुनर्वसन जिथे होणार तिथले लोकही एका अर्थी प्रकल्पग्रस्त. आपली जमीन या पुनर्वसनाच्या कामात जाऊ नये, गेली तरी तिच्यावरचा प्रत्यक्ष हक्क जाऊ नये म्हणून धडपड. आधीच पैसा-सत्ता ज्यांच्या हातात ते मात्र यातून कायद्याच्या पळवाटांतून सहीसलामत सुटतात. वर आपल्या गावाची बाजू घेऊन भांडतो म्हणून शेखी मिरवायला सुद्धा मोकळे. दोन माकडांच्या भांडणात बोक्याचा लाभ तसा हा प्रकार. 
प्रकल्पग्रस्ताला जागा दिली , त्याने राबून त्यावर शेती पिकवली आणि आता मूळ मालकाला जमीन परत पाहिजे. गाववाल्यांची दादागिरी आणि विस्थापितांची कुचंबणा दाखवणारा हा प्रसंग








एखादा तडफदार अधिकारी काही बरं करायला बघतो. तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेली लागेबांध्यांची साखळी करतेच आपलं काम. अधिकाऱ्याचे हातपाय नियमाने बांधून पुन्हा "सिस्टीम" मध्ये ढकलायची तजवीज. ही साखळी गरीबाचा थेट गळा दाबून बंद आवाज बंद करायला मागेपुढे पाहत नाही आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या अब्रूवर घाला घालायला सुद्धा.
ह्या गुंडगिरीला विरोध करायची ताकद नाही आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन होत नाही. ह्या कात्रीत सापडलेल्यांचा हा करुण प्रसंग






धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे हे धिंडवडे, स्वार्थाने अनैतिकतेने बुजबुजलेली ग्रामीण समाजव्यवस्था, त्यातूनच तयार झालेले राजकारणी आणि सरकारी नोकर हे सगळं चित्र यथार्थ मांडणारी ही कादंबरी आहे. सुन्न करणारी. 
सुन्न करणारी. १९१९ साली ही कादंबरी प्रकाशित झाली. उद्या २०२१ साल उजाडेल. ३० वर्षं होतील. पण कादंबरी आजच्या काळाशीदेखील सुसंगत आहे हे तिचं मोठेपण आणि आपल्या समाजाचं खुजेपण... दुर्दैव. 

म्हणून ही कादंबरी अवश्य वाचा. आणि ह्या सामाजिक कोड्यातील कुठल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल याचा विचार करा, जमेल तितकी कृती करा
.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

आवाज दिवाळी अंक २०२० (Aavaj Diwali edition 2020)

 


"आवाज" दिवाळी अंक २०२० (
Aavaj Diwali edition 2020)
भाषा - मराठी (Marathi)

आवाजाचा विनोदी दिवाळी अंक नेहमी प्रमाणेच मजेशीर आहे. बाकी प्रत्येक दिवाळी अंकावर दिसणारं कोरोनाचं सावट या अंकावर नाही. कथा, विडंबन कविता, व्यंगचित्रे आणि चावट-द्वयर्थी खिडकी चित्रे हा नेहमीचा मसाला आहे. कथा प्रचंड हसायला लावणाऱ्या, लक्षात राहतील अश्या वाटल्या नाहीत, माफक निखळ मनोरंजन करणारी आहेत.  पाणचट विनोदी नाहीत.  त्यामुळे कोरोनामुळे कंटाळवाण्या झालेल्या दिवसांत पुन्हा कोरोना आणि त्याचे परिणाम असला गंभीर, कंटाळवाणा मजकूर वाचावा लागत नाही. 

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया. 


विडंबन कवितांचं एक उदाहरण


दिवंगत व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांची एक मालिका आहे 


शहरी आणि ग्रामीण बाजाच्या गोष्टी; प्रमाण भाषेतल्या गोष्टी तसेच मालवणी, वैदर्भी भाषेतल्या बोली वापरलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. कोकणातल्या एका गोष्टीची ही एक सुरुवात 



एकेका मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित व्यंगचित्र मालिका आहेत. उदा. सध्या ज्याचा सुळसुळाट झाला आहे ते ऑनलाईन शिक्षण, ट्रेनिंग इ. बद्दल 


कल्पना रंजन (फँटसी) स्वरूपाची विनोदी कथा सुद्धा आहे



आवाज, जत्रा या मासिकांची खासियत असणारी चावट, द्वयर्थी तरीही प्रत्यक्षात अजिबात अश्लील नसलेली खिडकी चित्रे आहेतच. पण थोडी कमी वाटली.


दोन क्षण मजेशीर घालवायला हा दिवाळी अंक नक्की वाचा. 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

"ऋतुरंग" दिवाळी अंक २०२० (Ruturang Diwali edition 2020)



"ऋतुरंग" दिवाळी अंक २०२० (Ruturang Diwali edition 2020)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८४
संपादक : अरुण शेवते (Arun Shevate)
किंमत २५०/-

कोरोना साथीमुळे २०२० चं वर्ष हे सगळ्या जगासाठी मोठं खडतर गेलं. आपली तब्येत, आपले कुटुंबीय, आपला नोकरी-व्यवसाय आणि आपली मनःस्थिती अश्या वेगवेगळ्या पातळीवर प्रत्येकाला आपापला संघर्ष करावा लागला. २०२०चा हा वेगळेपणाच "ऋतुरंग" दिवाळी अंकाने टिपला आहे. आणि वाचकांसमोर सादर झाला आहे "लढत" विशेषांक.  लढत, परिस्थितीशी संघर्ष ह्यावर आधारित लेखांचा हा संग्रह आहे. 

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया. 

"लढतीचा एपिसोड ५" मध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या उमेदवारीच्या काळातल्या धडपडीचा धावता आढावा २-३ पानी लेखांत घेतला आहे. त्यात गरीबीचे चटके, ते चटके सुसह्य करणाऱ्या आयुष्यातील व्यक्ती, स्वतःवर विश्वास ठेवत-गमावत आणि पुन्हा मिळवत केलेल्या प्रवासाची झलक पाहायला मिळते उदा. आयुष्मान खुराणा या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याचा हा लेख. 


"लढतीचा एपिसोड ४" मध्ये गेल्या ७-८ महिन्यांत लॉकडाऊन (टाळेबंदी),क्वारंटाईन (घरबंदी) मान्यवरांनी कशी स्वतः अनुभवली याचे स्वानुभवकथन आहे आणि भोवतालच्या परिस्थितीवरचे चिंतन या पद्धतीचे लेख आहेत. 

गांधीजी आज असते तर कोरोना महामाररीला कसे सामोरे गेले असते हा अभय बंगांचा लेख बोधप्रद आहे. स्थलान्तरित मजुरांची झालेली फरपट तीव्र शब्दांत मांडणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांच्या लेखातील एक पान 


कोरोनाची लस, त्यावरची औषधे, औषधनिर्माण कंपन्या सुद्धा सतत चर्चेत आहेत. "सिप्ला" ही कंपनी मूळ भारतीय आहे हे माहित आहे का ? स्वातंत्र्यपूर्व काळातल्या "स्वदेशी"च्या वातावरणात के.ए.हमीद यांनी सिप्ला ची सुरुवात केली. हमीद आणि त्यांचे कर्तृत्त्ववान पुत्र यांच्या कामाची थोडक्यात ओळख सचिन इटकर यांनी करून दिली आहे. त्यातली दोन पाने नमुन्यादाखल 

"लढतीचा एपिसोड ३" आणि ""लढतीचा एपिसोड १" मध्ये दीर्घ लेख आहेत. लावणी, कुस्ती, पर्यावरण, उद्योग, स्वयंरोजगार अश्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी स्वतः किंवा त्यांच्याबद्दल लेखकाने लिहिले आहे. आणि आपल्या जीवनाचा पट मांडला आहे. 

"मोल हंटर आणि सुटलेली शिकार"हा लेख वेगळीच लढत दाखवतो. भारताची गुप्तहेर संघटना - "रॉ" मधला एक उच्चपदस्थच फितूर झाला होता. त्याची फितुरी शोधून काढण्याच्या धडपडीवर आधारित हा लेख आहे. त्यातला एक भाग

 "लढतीचा एपिसोड २" जरा वेगळा आहे. १९२० साली भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या. म्हणजे २०२० ही निवडणुकीची शताब्दी. त्यातिमित्ताने निवडणुकांच्या लढतीचे विविध पैलू सांगणारे लेख या भागात आहेत. आचार्य अत्र्यांच्या आठवणी आहेत. आज निवडणूका जिंकण्यासाठी ज्यांचं नाव उठता बसता घेतलं जातं त्या बाबासाहेब आंबडेकरांना मात्र निवडणुकीत पुन्हा पुन्हा पराभव स्वीकारावा लागला होता. अगदी राखीव मतदारसंघातूनही. आज कोणाला सांगूनही हे खरं वाटणार नाही. पण हे विचित्र सत्य इतिहास मांडणाऱ्या लेखाची ही झलक. 



ऋतुरंग मध्ये बरेच लेख आहेत. त्यामुळे प्रत्येकाबद्दल लिहिणं कठीण आहे. पण या अंकाचं एकूण स्वरूप लक्षात आलं असेल. तुमच्या आवडीचे विषय, लेखक तुम्हाला यात दिसतीलच. 

 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...