टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird )







पुस्तक - टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird )
लेखिका - हार्पर ली (Harper Lee)
अनुवादक - विद्यागौरी खरे (Vidyagauri Khare)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - To kill a mockingbird (टु किल या मॉकिंग बर्ड)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - २४६
ISBN - 978-81-95235-05-6


१९६० साली प्रकाशित झालेल्या पुरस्कारप्राप्त इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. १९३० च्या आसपासच्या कालखंडात ग्रामीण अमेरिकेतील एका लहानश्या गावात घडणारे हे कथानक आहे. ॲटिकस नावाचा वकील आपल्या दोन शाळकरी मुलांबरोबर राहत आहे. ह्या मुलांच्या लहानपणीच त्यांची आई वारल्याने, कॅलपुर्निया नावाची एक कृष्णवर्णीय महिला मुलांना सांभाळायला घरी काम करते आहे. गोऱ्या लोकांकडून कृष्णवर्णीयांना कमी लेखण्याचा, वंशभेदाचा हा काळ. परंतु ॲटिकस मात्र कृष्णवर्णीयांशी सहृदयतेने वागतो आहे. एक माणूस म्हणून काळ्या लोकांनासुद्धा गोऱ्यांसारखाच सन्मानाने जगण्याचा, न्यायाचा अधिकार आहे हे तो मनोमन मानतो. वंशभेदाला विरोध करण्यासाठी तो बंड करून उठला नसला तरी 
त्याच्या वागण्यातून हे दिसतं. म्हणूनच आपल्या मुलांवर सुद्धा तो संस्कार करतो आहे आपल्या वागण्यातून, मुलांच्या नकळत. सहृदयता, सद्सद्विवेकबुद्धी, ज्ञानाची आस, दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची वृत्ती, क्षमा करण्याची वृत्ती, वाचनाची आवड अश्या कितीतरी गोष्टी तो स्वतः जगतो आहे. मुलांशी बोलताना, त्यांना समजावून सांगताना, वेळप्रसंगी रागे भरताना तो संवेदनशीलपणे वागतोय. वडिलांशी मैत्रीचं, आदराचं नातं म्हणूनच निर्माण झालंय. त्याची मुलं - जेम आणि स्काऊट - अश्या मोकळ्या वातावरणात घरी वाढत असले तरी गाव तितकं मोकळ्या विचारांचं नाही. वंशभेद तर आहेच पण "व्यक्ती तितक्या प्रकृती" ह्या उक्तीप्रमाणे गावात सगळंच काही आदर्श नाही. त्यामुळे घरचे आदर्श आणि गावाचे आदर्श ह्यात मुलांचा गोंधळ होत राहतो. ते गावात काय बघतात; त्यांचे शाळूसोबती काय म्हणतात, त्यांचे नातेवाईक काय टिप्पण्या करतात त्यावर ॲटिकस काय बोलतो ह्यातून त्यांच्या बालबुद्धीचा विकास होत राहतो.

हे सगळे प्रसंग लहानगी स्काऊट आपल्याला सांगते. कादंबरीच्या पहिल्या अर्ध्या भागात लहान मुलांच्या खोड्या, गावात घडणारे प्रसंग ह्यातून वेगवेगळ्या पात्रांची नकळत ओळख होते. नेपथ्यरचना साधली जाते. त्यांच्या घराशेजारी राहणारा, कधीही घराबाहेर ना पडणारा रहस्यमय "बू रॅडले" हा त्यांच्या कुतूहलाचा, भीतीचा विषय. काहीतरी करून त्याला बघितलं पाहिजे, त्याला घराबाहेर काढलं पाहिजे ह्यासाठी त्यांच्या खोड्या चालू असतात. अश्याच गमतीजमती चालू असताना त्यांना कळतं की लोक आपल्या वडिलांबद्दल कुसकटपणे बोलतायत. त्याला "निगर-लव्हर" (काळ्या लोकांना विशेष आपुलकीने वागवणारा) म्हणून टोमणे मारतायत. ॲटिकस मात्र लोकांना काही उत्तर द्यायच्या भानगडीत न पडता आपलं काम करत राहतो. एका काळ्या माणसाचा गोऱ्या माणसाविरुद्धचा खटला दाखल झालेला असतो.  त्यात काळ्याच्या बाजूने लढायचं काम न्यायालयाने त्याला दिलेलं असतं. लोकांची अपेक्षा अशी असते की त्याने थातुरमातुर खटला लढून गोऱ्याची बाजू जिंकू द्यावी. पण सद्सद्विवेकबुद्धीला प्रमाण मानत तो काळ्या व्यक्तीची बाजू कशी न्याय्य आहे हे पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आपल्या वडिलांचा आदर्शवाद, त्याला गावाचा विरोध, तरीही गावावर प्रेम करत राहण्याची वृत्ती मुलं बघत असतात. नकळत शिकत असतात. वयाने मोठी होत असतात. आणि नकळत जाणीवेनेही. ह्या सगळ्यात कधी त्यांच्यावरही संघर्षाचा प्रसंग येतो. तेव्हा लहान मुलांना जितकं झेपेल तितक्या जोरकसपणे विरोधाचा प्रयत्न करतात अगदी इतर मुलांशी मारामारी सुद्धा करतात. पण ॲटिकस कसा वागला असता; ॲटिकस काय म्हणेल ही फूटपट्टी मनात लावूनच.

वडिलांचा मुलांवर आणि मुलांचा वडिलांवर होणारा हा मानसिक परिणाम हे ह्या कादंबरीचं गर्भित सूत्र मला वाटलं. "जग काय म्हणेल" ह्याबद्दल पूर्ण बेपर्वाई करता आली नाही तरी त्यातूनही आपलं स्वत्व जपायचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ह्या सोज्ज्वळ कुटुंबाबाची ही नाट्यमय गोष्ट आहे.

काही पाने वाचा. 
घरातून कधीही बाहेर ना पडणाऱ्या "बू रॅडले" ला घराच्या बाहेर आणण्यासाठीचे पोरांचे चाळे 





निग्रोच्या खटल्याबद्दल वडिलांशीमुलांचा संवाद. दुसऱ्याबद्दल आगपाखड किंवा स्वतःबद्दल कुठलीही प्रौढी न या मिरवता निखालस तथ्य तेवढं ॲटिकस मुलांना सांगतो तो प्रसंग. (माझ्या मनात विचार आला ह्या खटल्याची माहिती आजच्या वृत्तवाहिन्यांनी दाखवली तर किती मीठ मसाला आणि नाटकीपणा करून सांगतील; नाही का ?)
खटला सुरु झाल्यावर फिर्यादी गोऱ्या माणसाची साक्ष. 'आपण गोरे, आरोपी काळा; मग आपलं कोण काय वाकडं करणार" ह्या गुर्मितली त्याची साक्ष 

कादंबरीचा पहिला भाग मुलांच्या खोड्या आणि गावगप्पा हा थोडा कंटाळवाणा आहे. कथानक पुढे जातच नाहीये असं वाटतं. पण एकदा खटल्याचा भाग आला की खूप वेगाने घटना घडतात. न्यायालयातील प्रसंग, तुरुंगातील प्रसंग, त्यातून दिसणाऱ्या वल्ली आणि मानवी स्वभावाचे कंगोरे हे सगळं आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवतं. आधी वाचलेले प्रसंग किंवा लोक ह्यांची सांगड घालता येते. शेवट तर थरारक आणि नाट्यमय वळण घेणारा आहे.

लेखकाच्या वर्णन शैलीतून आपण त्यावेळच्या अमेरिकन खेड्यात जातो. जुन्या अमेरिकेतलं ग्रामीण वातावरण कसं आपल्या गावांसारखंच सारखंच खेडवळ होतं; आपल्याकडे जातींची उच्चनीचता तर तिकडे वर्णांची आणि घराण्याची उच्चनीचता; शेती आणि गावातल्या घडामोडी हेच विश्व असणारे लोक हे साम्य जाणवतं.

विद्यागौरी खरे ह्यांनी उत्तम दर्जाचा अनुवाद केला आहे. सहज, रसाळ. कुठेही कृत्रिमता नाही. "मूळ पुस्तक मराठीच असेल असं वाटतंय" हे अनुवादासाठी ठरलेलं प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे. ही सुंदर साहित्यकृती मराठीत आणल्याबद्दल त्यांचे आणि प्रकाशकांचे आभार.

 पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सोपी मोडी पत्रे (Sopi Modi Patre)



पुस्तक - सोपी मोडी पत्रे (Sopi Modi Patre)
लेखक - मंदार लवाटे आणि भास्वती सोमण (Mandar Lawate & Bhaswati Soman)
भाषा - मराठी
पाने - १०४
ISBN - दिलेला नाही


प्राथमिक मोडी लिपी शिकण्यासाठी आवश्यक पुस्तकांबद्दलची माहिती आधीच्या परीक्षणांत आपण बघितली आहे. (त्यांच्या लिंक्स ह्या परीक्षणाच्या अखेरीस दिलेल्या आहेत). मोडी मुळाक्षरं, बाराखडी आणि छापील मजकूर वाचता येऊ लागला की हस्तलिखित कागदपत्रांच्या वाचनाकडे वळायची उत्सुकता वाढते. अश्यावेळी काही जुनी कागदपत्रे अभ्यासाला मिळाली पाहिजे असं वाटतं. पण अभिलेखागार, संग्रहालय, ऐतिहासिक वारसा संस्थांशी संबंध साधून ती कशी मिळवायची हे माहीत नसतं. काही जुन्या कागदांचे ऑनलाईन फोटो मिळाले तरी ते वाचताना एखाद्या शब्दावर गाडी अडली की ती अडलीच. कोणीतरी ते वाक्य खरं काय आहे हे समजावून सांगेपर्यंत प्रगती होत नाही. नुसतं वाचलं तरी त्यातला बारकावा, संक्षिप्त रूपाचा अर्थ कळला नाही तर पुढच्यावेळी पुन्हा हाच गोंधळ होऊ शकतो. प्राथमिक पातळीवरच्या विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी "सोपी मोडी पत्रे" हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. 

लेखकांचे मनोगत 

ह्या पुस्तकात ५२ मोडी पत्रे आणि त्यांचे देवनागरी लिप्यांतरण दिलेले आहे. त्या पात्रात वापरलेले कठीण फारसी शब्द, तारीख आणि संक्षिप्त रूपे ह्यांचा उलगडा लगेचकेलेला आहे. त्यामुळे श्री. लवाटे  व सौ. सोमण जणू आपल्या बाजूला बसूनच आपल्याला मोडीची शिकवणी देत आहेत असे वाटते. 
उदा. 






बहुतेक पत्रे मराठेशाही-पेशवाई कालखंडातली आहेत. काही पत्रे घरगुती पत्रव्यवहार अश्या स्वरूपातली सुद्धा आहेत. पुस्तक लॉन्ग बुक आकारातील असल्यामुळे मोडी लेखन मोठ्या आकारात बघता येत. देवनागरी लिप्यांतरणांच्या पानावर मात्र "सोपी मोडी लिपी" हे  वाटरमार्क फारच मोठे आणि ठळक आहेत. त्यामुळे ते वाचायला थोडा त्रास होतो. पण ते फार विशेष नाही. तरी पुढच्या आवृत्त्तीत तो बदल करावा असं वाटतं. 

देवनागरी लिप्यांतरणाबरोबरच सध्याच्या मराठीत "भाषांतर" दिले असते तर अजून छान झाले असते. म्हणजे जुन्या शब्दांचा अर्थ डोक्यात पक्का बसायला अजून मदत झाली असती.    

श्री. लवाटे  व सौ. सोमण ह्यांनी "टाकाची मोडी पत्रे" हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. त्याबद्दल पुढच्या परीक्षणात लिहीन. मोडी शिकणाऱ्यांसासाठी फार मोठे काम ह्या दोघांनी केले आहे. त्याबद्दल दोघानांही सादर प्रणाम. 

पुस्तक कुठे मिळेल ?
SahyadriBooks.org, Amazon.com, Flipkart.com वर उपलब्ध आहे. 

छापील किंमत - रु. १७०/-

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————


मोडी लिपी संबंधित इतर पुस्तकांची परीक्षणे 


सहज सोपी मोडी लिपी (Sahaj Sopi Modi Lipi)

 


पुस्तक - सहज सोपी मोडी लिपी (Sahaj Sopi Modi Lipi)
लेखक - श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक (Shrikrushna Lakshman Tilak)
भाषा - मराठी  (Marathi)
पाने - १००
ISBN - दिलेला नाही 

मराठी भाषेची शीघ्र लिपी असणाऱ्या मोडी लिपीबद्दल उत्सुकता वाढत आहे. बरेच फेसबुक ग्रुप आणि युट्युब चॅनल उपलब्ध होत आहेत. काही चांगली पुस्तकं सुद्धा पूर्वीपासून उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वी मी ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकावरून मोडी मुळाक्षरे शिकलो. छापील मोडी वाचता येत होते. पण खरी मोडी पत्रे, दस्तऐवज वाचता येत नाहीत. कारण छापील मोडी सुवाच्च्य असते. पत्रे हस्तलिखित असतात त्यामुळे लिहिणाराच्या हस्ताक्षरावर ते अवलंबून राहते. काय लिहिले आहे ते बऱ्याच वेळा संदर्भावरून वाचावे लागते. त्यावेळची भाषा, वाक्प्रचार, संक्षिप्त रूपे इ. माहिती असेल तर ते शक्य होते. त्यादृष्टीने शोधाशोध केल्यावर काही पुस्तकांची माहिती कळली. त्या पुस्तकांबद्दल माहिती ह्या आणि येत्या काही परीक्षणांत देईन. आजचे पुस्तक आहे "सहज सोपी मोडी लिपी".



लेखकाची माहिती 

अनुक्रमणिका 

पुस्तकात मोडी मुळाक्षरे,  त्यातले बारकावे, साम्य आणि फरक समजावून सांगितला आहे. 


ऐतिहासिक मोडी कागदपत्रांत बरीच लघुरूपे वापरली जातात. ती माहिती असणे आवश्यक आहे. काही नेहमीचे शब्द ह्या पुस्तकात दिले आहेत. 

जुन्या कागदपत्रांत आढळणारा आणि नव्या वाचकाला कठीण वाटणारा भाग म्हणजे कालगणना. पात्रांमध्ये इस्लामी कालगणनेत त्या पत्राचा दिवस वार सांगितलेला असतो. काहीवेळा इस्लामी आणि हिंदू अश्या दोन्ही प्रकारे लिहिलेले असते. सध्या आपण जानेवारी-फेब्रुवारी हे महिने आणि इसवी सन वापरतो. त्यामुळे जुनी कालगणना समजून घेणं आवश्यक आहे. ह्या पुस्तकात ते छान  समजावून सांगितलं आहे. 

पूर्वी वजनांसाठी मन, शेर, रत्तल अशी मापं होती. लांबीसाठी/क्षेत्रफळासाठी  मीट-फूट ऐवजी वार, काठी, गुंठे इ. वापरायचे. त्यांची यादी पुस्तकात आहे. पै, आणे , रुपये लिहिण्याची पद्धत वेगळी होती. ".||. , .|||." असं लिहिलं जायचं. ती पद्धत नीट समजावून सांगितली आहे. 
उदा.  


जुन्या विशिष्ट शब्दांची सूची आहे. 


सरावासाठी पाच सहा पाने मोडी मजकूर आहे. पण त्याचे देवनागरी लिप्यांतर दिलेले नाही. ते हवे होते म्हणजे शिकणाऱ्याला आपले वाचन बरोबर आहे का ते ताडून बघता आले असते. 






असे पुस्तकाचे स्वरूप आहे. केवळ मुळाक्षरे आणि बाराखडी न देता जुन्या कागदांच्या वाचनासाठी आवश्यक असणारे संदर्भ दिल्यामुळे पुस्तक खूप उपयुक्त आहे. मोडी वाचनाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी ह्या पुस्तकावरून नक्की अभ्यास करा. 

पुस्तक कुठे मिळेल ?
मी हे पुस्तक डोंबिवलीच्या "मॅजेस्टिक बुक गॅलरी"तून घेतले. ऑनलाइनसुद्धा (Amazon.com, Flipkart.com) वर उपलब्ध आहे. 

छापील किंमत - रु. १२०/-


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————



जत्रा दिवाळी अंक २०२१ (Jatra Diwali Edition 2021)



पुस्तक - जत्रा दिवाळी अंक २०२१ (Jatra Diwali Edition 2021)
भाषा - मराठी
पाने - १७४

विनोदी दिवाळी अंकांमध्ये अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे जत्रा. "चावट खिडकी चित्रे", विनोदी कथा, वात्रटिका, व्यंगचित्रे असं नेहमीचं अंकाचं स्वरूप ह्यावर्षी सुद्धा आहे. खिडकी चित्र एकच आहे. पण विनोदी गोष्टी आणि व्यंगचित्रे भरपूर आहेत. 

अनुक्रमणिका



उळन खटिया - वऱ्हाडातल्या गावातले दोन कारागीर खाटेला पंखा लावून ती उडवण्याची शक्कल लढवतात. मग ती खाट खरी कशी उडते, तिचं उदघाटन करायला गावातलं राजकारण कसं रंगतं ह्याची धमाल सांगणारी ही कथा आहे. विनोदी प्रसंग आणि त्याला खास वऱ्हाडी बोलीचा मजा अशी दुहेरी धमाल ह्यात आहे. 
नमुन्यादाखल त्यातली दोन पाने. 




गेले काही वर्ष आपल्याकडे शालेय शिक्षणांत नवनवे निर्णय आणि त्यांची धरसोड चालू आहे. शिक्षणाचं हसं झालं आहे. ह्या ताज्या घडामोडींना एका काल्पनिक सूत्रात गुंफून सादर केलं आहे  प्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांनी.   

सिद्धहस्त लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत कथा सादर केली आहे. अमेरिकेतून भारतात आलेल्या मराठी पण आता जणू "अनिवासी अमेरिकन" कुटुंबातल्या गृहिणीची "वृंदावन" शोधताना होणारी धावपळ. 

बागेत शिरलेल्या किड्यांमुळे बागेची झाली. पण बागेत किडे (घोंघे) शिरलेच कसे ह्याचा शोध घेताना भेटलेल्या वल्ली दाखवल्या आहेत "घोंघ्यांनी मज पछाडले" गोष्टीत. 


वाढलेले वजन कमी करायचे असफल प्रयत्न;अठरापगड जाती धर्माचे लोक असणारी चाळ, बायकोची त्रासदायक आई, प्रेयसीला पटवण्याचे प्रयत्न अश्या विनोदासाठी सदाबहार विषयांवरच्या गोष्टी आहेतच.

लग्न ठरवताना मुलामुलींची पत्रिका बघितली जाते पण खरं तर दोन्ही कुटुंबाचे सुद्धा गुण जुळले पाहिजेत कारण लग्नामुळे शेवटी दोन्ही कुटुंब देखील एकत्र येतात. पण त्यासाठी सगळ्यांच्या पत्रिका कशा मिळवायच्या ? पण एक लग्न जुळवणारे गुरुजी नवीन व्यवसाय सुरु करतात की आम्हाला कंत्राट द्या आम्ही सगळं हे जुळवून आणतो. ते हे सगळं कसं करतात त्याची गमतीशीर गोष्ट आहे "... पेगासस हेरगिरी "


दोन लेख भाषाविषयक आहेत. इंग्रजीतल्या अनियमिततेमुळे खरं तर किती हास्यास्पद भाषा तयार झाली आहे हे सोदाहरण मांडणारा एक लेख आहे. 
एकीकडे इंग्रजी स्पेलिंग्स इतकी अनियमित तरी आपण ती पाठ करतो. इंग्रजी वापरताना स्पेलिंगची चूक झाली किंवा व्याकरणाची चूक झाली की आपण दुसऱ्यांना हसतो. मात्र आपली मातृभाषा वापरताना प्रमाणलेखन, व्याकरण, शब्दांचे अर्थ ह्याचा आपण तितका विचार करतो का ? फेसबुक व्हॉट्सप वरच्या लेखनात तर लोक असंख्य चुका करतातच पण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या ह्यांच्या बातम्या सुद्धा बऱ्याच वेळा "भयंकर मराठी"त लिहिलेल्या असतात. अश्या मराठीच्या मारेकऱ्यांचा समाचार घेतलाय मिलिंद शिंत्रे यांनी. मराठी लेखनातल्या चुकांची उदाहरणे आणि त्यावर शिंत्रे ह्यांची तिरकस शेरेबाजी असं लेखाचं स्वरूप आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर अजून बरीच उदाहरणं वाचता येतील. https://www.facebook.com/milind.shintre.5
उदा. 





असा हा खुदुखुदू हसायला लावणारा, कधी गुदगुल्या करणारा तर कधी चिमटे काढणारा; "ताण विरहित"करणारा दिवाळी अंक आहे. सभ्यतेची पातळी फार घसरु न देता, सामाजिक भावना न दुखावता हसवणं - जे हल्ली कमी झालंय - तसा हसवणारा हा "जत्रा" अंक आपल्याला जत्रेतल्या पाळण्यात बसल्याची मजा देईल. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

नवल दिवाळी अंक २०२१ (Naval Diwali Edition 2021)

 


पुस्तक - नवल दिवाळी अंक २०२१ (Naval Diwali Edition 2021)
गूढकथा, रहस्यकथा , विज्ञानकथांनी भरलेला अंक. 

बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातही बऱ्याच दीर्घकथा आहेत. त्यामुळे सगळ्यांबद्दल सांगणं कठीण आहे. पण अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर तुम्हाला अंदाज येईल. 

अनुक्रमणिका :


काही काही गोष्टी छान आहेत. एक दोन उदाहरणं देतो. 

एका माणसाला अचानक भविष्यातल्या घडामोडी आधीच समजायला लागतात. ते का आणि कसं होतं त्याचं चित्रण करणाऱ्या गूढ कथेचा एक भाग. 




मृत माणूस प्लँचेट द्वारे बोलू लागला तर .. अशी ही भयकथा 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Colorless Tsukuru Tazaki and His years of Pilgrimage (कलरलेस त्सुकुरू ताझाकी अँड हिज इयर्स ऑफ पिलिग्रिमेज )






पुस्तकाचे नाव - Colorless Tsukuru Tazaki and His years of Pilgrimage (कलरलेस त्सुकुरू ताझाकी अँड हिज इयर्स ऑफ पिलिग्रिमेज )
भाषा - English (इंग्रजी )
मूळ पुस्तक - 色彩を持たない多崎つくると、彼の巡礼の年, Hepburn: Shikisai o motanai Tazaki Tsukuru to, kare no junrei no toshi
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी (Jaapnese )
लेखक - Haruki Murakami (हारुकी मुराकामी)
अनुवादक - Philip Gabriel (फिलिप गॅब्रिएल)
पाने - 298
ISBN - 978-0-099-59037-8

कादंबरीचा नायक त्सुकुरू आणि त्याचे ४ मित्र असा माध्यमिक शाळेपासून एक घट्ट मैत्री असलेला ग्रुप असतो.  फिरणं, गप्पागोष्टी, छोटी सामाजिक स्वयंसेवकगिरीकरणं इ. सगळं एकत्र करत असतात. त्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, करियरबद्दलचे कल वेगळं असूनही त्यांना एकत्र सहवासाची मजा येत असते. पण शाळा संपल्यावर उच्च शिक्षणासाठी गाव सोडून टोकियोला जायचं त्सुकुरू ठरवतो. सुट्टीत गावाला येत राहतो. पण एका सुट्टीत त्याला असं कळतं की चारही मित्रांनी त्याच्याशी संबंध पूर्णपणे तोडून टाकले आहेत. त्यांना त्याच्याशी भेटणं तर सोडाच फोनवर बोलायचं सुद्धा नाही. ह्या प्रसंगाने तो उद्ध्वस्त होतो. विषादस्थितीत स्वतःचं काही बरंवाईट करून घ्यावं असं वाटायला लागण्यापर्यंत मजल जाते. अगदी त्या टोकाच्या परिस्थितीत जाऊन तो हळूहळू परत येतो. स्वतःला सावरतो सगळं विसरायचा प्रयत्न करतो. पण मनात सल राहतो. मित्रांच्या दुराव्याचं कारण कळत नाही आणि तो आता शोधायलासुद्धा जात नाही. 
बरेच वर्षांनी त्याची गर्लफ्रेंड त्याला हे शोधायला लावते. जुन्या मित्रांशी भेट घडवते. आणि धक्कादायक कारण कळतं. ही कादंबरीची गोष्ट आहे.

त्सुकुरूच्या मित्रांबद्दलचा हा प्रसंग 


त्सुकुरुला पडणारी विचित्र स्वप्न 



बऱ्याच वर्षांनी मित्राला भेटतो तो प्रसंग 



ही कादंबरीची गोष्ट आहे. तिचा जीव अगदीच लहान आहे. आणि त्यात जे "धक्कादायक कारण" आहे ते अगदीच अतार्किक आहे. 

कादंबरीचा पहिला भाग त्सुकुरू कसा विषण्ण आहे, मृत्यूबद्दल विचार करतोय हे दाखवण्यात घालवलेत. मग ह्या मुलांचं व्यक्तिमत्त्व उभं करण्यात घालवलाय. मग त्सुकुरू च्या नव्या गर्लफ्रेंड, त्याला पडणारी विचित्र स्वप्न, नव्या मित्रांशी काहीतरी गंभीर गप्पा ह्यात घालवलाय. शेवटी सगळ्या मित्रांशी भेट आणि ते कारण कळणं ह्याचा आहे. 

सगळाच फापटपसारा. मुख्य कारण का घडलं कसं घडलं हे शेवटपर्यंत कळत नाही. धक्कादायक कारणाचा, त्सुकुरुवर झालेल्या आरोपांचा तो आणि त्याचे मित्र इतक्या सहजपणे स्वीकार करतात की मग एवढं रामायण सांगितलं कशाला असा विचार आपल्याला पडतो. लोकांच्या विचारात, स्वप्नांत आणि गप्पांमध्ये आयुष्य व मृत्यू ह्याबद्दल विनाकारण काहीतरी तात्त्विक चर्चा, गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचा मूळ गोष्टीशी, मूळ गोष्ट पुढे नेण्यात संबंध नाही. किंवा गूढाकडे अंगुलीनिर्देश करून वाचकाला चकवण्यातही काही वाटा नाही. 

त्यामुळे भराभर पानं गाळून किंवा महत्त्वाचा मजकूर तेवढा वाचून पुढे गेलो. पुस्तक पूर्ण करून काही हाती लागलं नाही.  मुराकामी हे नाव खूप ऐकलं होतं; हे पुस्तक "बेस्टसेलर" आहे म्हणून उत्सुकतेने वाचायला घेतलं. पण अगदीच निराशा झाली. तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं होतं ते मला सांगा. त्यातल्या गूढ गोष्टींना काही अर्थ होता का; ते मला सांगा. 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...