साखळीचे स्वातंत्र्य(Sakhaliche Swatantrya)




पुस्तक - साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya)
लेखक - गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २४५
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन, मे २०२२
ISBN - 978-81-95377-24-4

"ब्लॉकचेन" ह्या गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या आणि फोफावणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे हे इंग्रजीतून मराठीत भाषांतरित पुस्तक नाही तर ते स्वतंत्र मराठी पुस्तकच आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नेटवर उपलब्ध माहिती गोळाकरून ती मराठीत आणली आहे असंही नाही. तर मराठी वाचकाला, तंत्रज्ञानाशी जवळून संबंध नसणाऱ्या व्यक्तीला योग्य अश्या पद्धतीचा मूळ मराठी मजकूर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान नवं असूनही त्यावर प्रत्यक्ष काम केलेल्या लेखकाने स्वानुभवातून लिहिलं आहे. लोकसत्ता वृत्त्तपत्रात लेखकाने जी लेखमाला चालवली होती त्या लेखांचा हा लेखसंग्रह आहे. हे पुस्तक मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक नमुना ठरेल. त्यासाठी लेखक गौरव सोमवंशी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मधुश्री पब्लिकेशन व इतर सहभागी लोकांना मी सर्वप्रथम खूप धन्यवाद देतो.

पुस्तकात दिलेला लेखकाचा परिचय


"ब्लॉकचेन" हे तंत्रज्ञान सध्या "बिटकॉइन" आणि तत्सम आभासी चलनांमुळे नेहमी चर्चेत असते. एका बिटकॉइन ची किंमत अमुक अमुक रुपये वगैरे बातम्या ऐकायला येतात. पण म्हणजे "बिटकॉइन" नक्की काय, ते चलन कसं झालं, लोक त्यासाठी पैसे का देतायत हे समजून घेण्यासाठी पुस्तक अतिशय योग्य आहे. 




"बिटकॉइन" हे आभासी चलन आहे. म्हणजे आपल्या हातात नोटेसारखं येत नाही. पण नोट म्हटली तरी शेवटी तो कागदाचा तुकडाच.म्हणून नोटेला "किंमत" कशी प्राप्त होते हे समजलं की "बिटकॉइन" ला मूल्य कसं प्राप्त होतं ते कळतं. म्हणून लेखकाने अतिशय सध्या सोप्या भाषेत, दैनंदिन उदाहरणांतून "पैसा", "चलन", "बँक" ही संकल्पना पहिल्या काही प्रकरणांत समजावून सांगितली आहे.
नंतर "बिटकॉइन" मागचं तंत्रज्ञान, संगणक शास्त्रांतील संकल्पना (हॅश, एन्क्रिप्शन, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इ.) समजावून सांगितल्या आहेत. आयटी क्षेत्रात काम न करणाऱ्या लोकांनाही बरीच कल्पना त्यातून येईल. पुढच्या प्रकरणांसाठी वाचक तयार होईल.

मग प्रत्यक्ष "बिटकॉइन" चलनाची माहिती, गुणधर्म, त्याची सुरुवात कशी झाली हे सांगितलं आहे. "बिटकॉइन" प्रमाणेच इतर कूटचलने (क्रिप्टो करन्सी) कशी आली; हा इतिहास आणि त्यामागची सामाजिक कारणे विशद केली आहेत. एका कूटचलनातल्या तांत्रिक त्रुटींचा उपयोग करून एक मोठा घोटाळा कसा झाला आणि त्यावर काय तोडगा काढला गेला हे एका प्रकरणात आहे. "नवा गडी नवे राज्य" प्रमाणे "नव्याप्रकारचे चलन आणि नव्या नव्याप्रकारच्या चोऱ्या" असंच म्हणावं लागतं.

"ब्लॉकचेन" तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर "बिटकॉइन" रूपात झाला असला तरी. तो केवळ एकच एक उपयोग नाही. माहिती एकाच ठिकाणी न साठवता अनेक ठिकाणी साठवायची, एकाच एका मध्यवर्ती संस्थेकडे सगळी मालकी नाही तर माहितीवर सर्वांचा अधिकार; एकदा नोंद झाली की ती अपरिवर्तनीय इ. "ब्लॉकचेन"ची तत्त्वे आहेत. ह्या तत्वांचा वापर करून वेगवेगळ्या देशांत त्याचा वापर सुरु झाला आहे. फक्त आर्थिक नोंदणी नव्हे तर जमिनीच्या मालकीची नोंदणी, हिऱ्यांचा व्यापार, शेती व्यवस्थापन अश्या भिन्न भिन्न क्षेत्रांतल्या संगणकीकरणात "ब्लॉकचेन"चा वापर सुरु झाला आहे. ह्या वापरातून व्यवस्था अधिक पारदर्शी आणि विश्वासार्ह होतायत असं लेखकाचं प्रतिपादन आहे. भारतात तामिळनाडू राज्याने ब्लॉकचेन धोरण आखलं आहे. लेखकाने स्वतः छत्तीसगड राज्य सरकारच्या एका ब्लॉकचेन प्रकल्पावर काम केलं आहे. महाराष्ट्रात काही शेतकी कंपन्या हे वापरू लागल्या आहेत. ही सगळी उदाहरणं सविस्तपणे देऊन नव्या तंत्रज्ञानातून सामाजिक बदल कसा घडू शकण्याच्या सुखद शक्यता अधोरेखित केल्या आहेत.

अनुक्रमणिका

 

काही उदाहरणे बघूया.
"वितरित" आणि "विकेंद्रित" ह्या संकल्पना सोप्या शब्दांत




बिटकॉइन ची संख्या २.१ कोटी अशी पक्की ठरवलेली आहे. त्याबद्दल.




घाना देशात जमीन व्यवहार नोंदणी साठी ब्लॉकचेन वापरले गेले त्याबद्दल
 



पुस्तक वाचताना काही शंका मनात येतात. 
ब्लॉकचेन सिस्टीम मधले संगणक चालवण्यासाठी खूप मोठे संगणक लागतात. त्यासाठी खूप ऊर्जाही खर्च होते असं लेखकाने मांडलं आहे. पण मग ह्या विकेंद्रित रचनेमध्ये सहभागी संगणक सुद्धा असेच मोठे पैसेवाल्यांचे, कंपन्यांचे असणार किंवा सरकारचेच ना ? मग ज्या सामाजिक विकेंद्रीकरणाच्या उद्देशाचा उल्लेख वारंवार झाला ते कसं साध्य होणार हा गोंधळ मनात तयार झाला.

दुसरं म्हणजे ब्लॉकचेनच्या सामाजिक वापराची जी उदाहरणे दिली त्यात ती यंत्रणा सरकारची किंवा एखाद्या कंपनीने उभारली आहे. म्हणजे सगळा विदा (data) त्या कंपनीकडे आहे. त्यांच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल app वर ज्या सोयी असतील त्याच सोयी त्याचे वापरक (user) वापरणार. त्यांना तेवढाच data दिसणार. मग पारदर्शकता कशी?

आणि ज्या सिस्टीम ची उदाहरणे दिली आहेत ती नेहमीच्या संगणकीकरणाची वाटली. तिथे ब्लॉकचेनच का? इतर विदासाठा (डेटाबेस) तंत्रज्ञान का नाही हे स्पष्ट होत नाही. कदाचित हा तिसरा मुद्दा खूप तांत्रिक असल्यामुळे ह्या पुस्तकाच्या परिघाबाहेरचा आहे. पण पहिले दोन मुद्दे तरी पुढच्या आवृत्तीत विशद करावेत ही लेखकाला विनंती.

वरच्या शंका आणि पुस्तकातली पाने वाचून तुमच्या हे लक्षात आलं असेल की पुस्तकाने नव्या तंत्रज्ञानाची फार छान तोंडओळख करून देत, त्याची भीती घालवत उलट अजून जिज्ञासा जागवली आहे. तेही मराठीत. तांत्रिक संज्ञांना सोपे मराठी प्रतिशब्द वापरून. लेखनशैली अतिशय खेळकर आहे. किचकटपणा नाही. किचकट भाग छान छोटे छोटे घास करून भरावला आहे :)

लेखक, प्रकाशक आणि लोकसत्ता ह्या तिघांची
 ही अभिनव निर्मिती तुम्हालाही नक्की आवडेल. त्यांनी अजून ताज्या आणि तंत्रज्ञान-विज्ञाना बद्दल मराठीत लिहत राहावं ही त्यांना विनंती!


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

जरा जाउन येतो (jara jaun yeto)




पुस्तक - जरा जाउन येतो (jara jaun yeto)
लेखक - दि. बा. मोकाशी (D. B. Mokashi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९३
प्रकाशन - प्रतिमा प्रकाशन जून १९८७
ISBN - दिलेला नाही

दि. बा. मोकाशी हे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव. परंतु याआधी मी त्यांची पुस्तकं वाचली नव्हती. "देव चालले" ही त्यांची कादंबरी आणि "आमोद सुनासी आले" ही कथा; यांच्या बद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचनात आलं त्यामुळे यावेळी उत्सुकतेने मी मोकाशींचं पुस्तक घेतलं. हा त्यांचा कथासंग्रह आहे. सरोजिनी वैद्य आणि माधुरी पणशीकर यांनी कथांची निवड केली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी कथांचं रसग्रहणही केले आहे.

अनुक्रमणिका 


सगळ्याच कथा अतिशय छान गुंगवून ठेवणाऱ्या आहेत. एकेका विशिष्ट प्रसंगावर त्या कथा आधारलेल्या आहेत. प्रसंगात दृश्य स्वरूपात जे घडतं त्याचबरोबर त्यातल्या मुख्य पात्राच्या मनात काय करतो याचं चित्र मोकाशींनी रेखाटलं आहे. प्रसंग खूप नाट्यमय किंवा क्वचितच घडणारे असे नाहीत. अगदी साधे साधे आहेत. सर्वसामान्य मध्यमर्गीय लोकांचे आपले स्वतःचे अनुभव असतील तर काही आजूबाजूला पाहिलेले. प्रत्येक घटनेत त्यावेळी सामील असणाऱ्या माणसांच्या पिंडानुसार त्याचे मनात उठणारे तरंग निराळे. म्हणूनच प्रसंग साधे असले तरी अशा-अशा वेळी अशा-अशा स्वभावाची व्यक्ती असेल तर काय घडेल हे वाचणं रंजक ठरतं. 

काही गोष्टी मधल्या मुख्य प्रसंगांबद्दल सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

"गोष्टीची मोहिनी" - दोन सख्ख्या भावांची भांडण आणि त्यातून होणारा रुसवा,

"रोमच्या सुताराची गोष्ट", "काय रानटी लोक आहेत!" - नवीनच प्रेम जोडून आलेल्या जोडप्यांचा लाडिकपणा. एका गोष्टीत शारीरिक जवळीकीची उत्सुकता तर दुसऱ्या गोष्टीत अशा जवळची पेक्षा मनं जुळण्याची उत्सुकता.

"आपला तुपला चहा"- संसाराच्या रगाड्यात गुंतला गृहस्थ जेव्हा तासभर घरात कोणी नाही तेव्हा ती शांतता एन्जॉय करायची ठरवतो. पण शांततेची सवय नसल्यामुळे अधिकच अस्वस्थ होतो

"मजोर"- एका प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात हरणांच्या रूपात नवीन जन्मलेले पिल्लू मोठं होत आहे आणि प्रमुख नराशी स्पर्धा देऊ लागतं.

"लेणी"- एक जोडपं लेणी बघायला गेलं आहे. त्या लेण्यांचं सौंदर्य आणि त्याचा इतिहास तरुणाला इतकं मंत्रमुग्ध करतो आहे की त्याला आपली प्रेयसीचा सुद्धा क्षणभर विसर पडतो. आजूबाजूच्या गावातले लोक अपल्यासुरखे इतके भारावून कसे गेले नाहीत म्हणजे किती आरसिक आहेत असं वाटतं.

"आमोद सुनासी आले" - ह्या कथेवर "दिठी" नावाचा मराठी चित्रपट आला होता त्या कथेत मुलाचं अकाली निधन सोसणारा बाप गावातल्या गाईचं बाळंतपण करायला दुःख विसरून पुढे जातो हा जन्म मृत्यूचा खेळ रंगवला आहे.

"वास्तू"-एका व्यक्तीला स्वतःचं घर बांधायचं असतं वाटेत फिरताना त्याला रिकामा प्लॉट दिसतो आणि त्या प्लॉटवर घराचं बांधकाम चालू असतं. कोण घर बांधेल कसं घर बांधलेले याची उत्सुकता आणि दुसऱ्याचं घर पूर्ण होतंय याचा कुठेतरी हेवा. घर बांधताना खोदकामामध्ये मातीतली मुंग्यांची वारुळे, उंदरांची बिळे, सापांची बिळे, झाडावरची घरटी नष्ट होत आहेत म्हणजे प्राण्यांची घरे पाडून माणसाचं घर बनतय असा एक तात्विक भाग ही मनात आहे. अशा या भावभावनांचं सुंदर मिश्रण यात आहे.

"डोंगर चढण्याचा दिवस"- मुलं मुलं मिळून गावाजवळच्या डोंगरावर डोंगर चढाई करायला जातात जंगलाची वाट अवघड चढण हे सगळं अनुभवतात आणि परत येतात म्हटलं तर वेळोवेळी धडपडायची अगदी जीव जाण्याची शक्यता होती पण बालपणात ते कळत नाही मोठेपणी मात्र छोट्या छोट्या गोष्टीतही भीती वाटते याची गंमत दाखवणारी कथा.

"जरा जा
न येतो"- सगळं सुखवस्तू संसार असूनही अचानक विरक्ती येऊ नाहीसा झालेल्या माणसाची गोष्ट

"तिसरी हकीकत" - एक सिद्धहस्त, प्रसिद्ध असा लेखक पण स्वतःच्या बायकोच्या मनात डोकावायचं कधी त्याच्या लक्षात नाही आलं. पण "क्रिएटिव्ह ब्लॉक" आल्यावर जेव्हा तो बायकोकडे वळतो तेव्हा.

काही पाने वाचून बघा.
गावाजवळच्या डोंगरात वणवा लागला. गावकऱ्यांची धावपळ सुरु झाली. ती डोळ्यासमोर उभे करणारे वर्णन 





"लेणी" गोष्टीतला प्रसंग 




लहान मुलांचा डोंगर चढण्याचा अनुभव. आणि ह्याच अनुभवाकडे पोक्त झाल्यावर बघितलं की किती वेगळाच विचार डोक्यात येतो.




मोकाशींची भाषा साधी सरळ अर्थवाही आहे. पण तरीही प्रसंग चपखल डोळ्यासमोर उभा करणारी आहे. गुंतवून ठेवणारी आहे. सुखदुःख, आशा-निराशा, जन्म-मृत्यू,भूतकाळातल्या गोष्टींची आठवण तर येणाऱ्या काळाबद्दल हुरहुर, चुकांबद्दल पश्चाताप तर नवं काही करायची भीती.... अशा एक ना अनेक मानवी भावभावनांचं सुंदर चित्रण या सर्व कथांमधून घडतं. मराठी साहित्यप्रेमींना एकाच वेळी हलकंफुलकं पण त्याचवेळी अतिशय गहन जीवनदर्शन घडवणाऱ्या या गोष्टी आहेत. नक्की आवडतील.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- कथा आवडणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
                                         इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...