Saturday, 24 December 2016

आवरण (AavaraN)
पुस्तक :- आवरण (AavaraN)
भाषा :- मराठी  (Marathi) 
मूळ भाषा :- कन्नड (Kannada) 
लेखक :- डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )
मराठी अनुवाद :- उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)


साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची हिंदू-मुस्लीम संबंध विशेषतः मुस्लीम राजवटीत झालेल्या निंद्य-क्रूर घटनांचा मागोवा घेणारी ही कादंबरी आहे.

बाबरी मशीद पाडल्यावर देशात पुन्हा एकदा धार्मिक सलोखा वाढावा यासाठी प्रचारकी ढंगाची माहितीपट (डॉक्युमेंटरी) करायचं काम एका टीमला दिलं जातं. त्यातले लेखन-दिग्दर्शन करणारे नवरा बायको मुस्लीम जोडपं असतं. त्यातली बायको- रझिया ही लग्नाआधीची हिंदू -लक्ष्मी. कर्नाटकातल्या एका गंधिवादी कुटुंबात वाधलेली एक हिंदू मुलगी. ती बुद्धीवादी, उच्चशिक्षित असते. कॉलेजमध्ये तिच्या वर्गातल्या एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते. घरच्यांचा विरोध झुगारून त्या मुलाशी लग्न करते. एक प्राध्यापक तिला पाठिंबा देतात.ते जन्माने हिंदू पण धर्म न मानणारे, स्वततःला समाजवादी, पुरोगामी म्हणणारे असतात. जीर्णवादी हिंदू धर्म सोडून ती कशी समानतेचा मुस्लिम धर्म स्वीकारते आहे हे पटवतात. लग्नामुळे घरच्यांशी संबंध तुटतात ते कायमचेच.

 लग्नानंतर तिला दोन्ही धर्मातले चांगले वाईट फरक जाणवू लागतात. बुरखा घालायची सक्ती, कुंकू लावयला विरोध, बाहेर पडायला विरोध, अशा सासरकडच्यांच्या आणि मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला तोंड देत ती आपला कलेचा प्रवास सुरू ठेवते.

माहितीपटात मुस्लीम राजवट कशी चांगली होती, सर्वधर्मीय कसे सुखेनैव नांदत होते, हिंदूंमधल्या शैव-वैष्णव आणि इतर पंथांच्या वादातून त्यांनीच मुसलमानांकरवी दुसऱ्या पंथांची देवळं कशी फोडून घेतली असं खोटंनाटं पसरवण्याचा प्रय्त्न सुरू असतो. तिचं बुद्धीवादी मन त्याने अस्वस्थ होतं. अशात तिच्या वडीलांचं निधन होतं आणि तिला पुन्हा आपल्या गावी जायला मिळतं. तिला कळतं की आपल्या लग्नामुळे अस्वस्थ झालेले वडील आपल्या लग्नापासून आज पर्यंत इस्लामचा, इस्लामच्या इतिहासाचा, मुसलमान राजवटीचा प्रचंड अभ्यास करत होते. त्यांनी खूप ग्रंथसंपदा वाचली आहे, टिपणं काढली आहेत. यामुळे अवाक्‌ झालेली तीही हा सगळा अभ्यास स्वतः करायचं ठरवते. त्या अभ्यासातून तिला भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची सत्यता कळते. हा इतिहास ती एका कादंबरीच्या रूपाने आणायचं ती ठरवते. तिच्या कादंबरीतल्या प्रकरणांतून आपल्याला दिसतो काळाकुट्ट इतिहास - मुस्लीम आक्रमण आणि त्यात झालेले अत्याचार. असंख्य हिंदूचे जबरदस्तीने केलेल धर्मांतरण. लाखोंच्या कत्तली. लाखो हिंदू स्त्रीयांची विटंबना, गुलाम आणि वेश्या म्हणून जनानखान्यात भरती. कोवळ्या मुलांचे जबरदस्ती निर्बीजिकरण करून त्यांना हिजडे बनवून जनानखान्यावर झालेल्या नेमणूका. मुस्लिमेतरांवर लादलेला जिझीया कर. राज्य टिकवण्यासाठी सुलतानाला हिंदू राजकन्या देण्याच्या घटना तर कुठे शीलारक्षणासाठी केलेला जोहार. आणि सहस्त्रावधी देवळांचा विध्वंस. 

रझियाच्या कादंबरीचं मुख्य पात्र आहे एक रजपूत राजकुमार जो एका युद्धात मुसलमानांकडून पकडला जातो. त्याच्या डोळ्यादेखत राजाचं विष्णूमंदीर पाडलं जातं. त्याला नबरदस्तीने खोजा(हिजडा) बनवलं जातं. मुसलमान बनवलं जातं. आधी मुस्लीम सुलतानाच्या वासना विकृतीचा बळी तो पडतो आणि जनानखान्यात नोकरीला नेमला जातो. पुढे त्याच्या डोळ्यादेखत घडतो औरंगजेबाच्या आदेशाने  काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस. त्याच्या डोळ्यांनी बघिततलेला वृत्तांत तो सांगतो. पुजारी आधल्या रात्रीच शंकरांची पिंड विहिरीत विसर्जित करतात. दुसऱ्या दिवशी तोफा डागून मदीराच्या भिंती पाडल्या जातात. मुख्य रचना तशीच ठेवून तिचं मशिदीत रूपांतर होतं. पुढे मथुरा आणि सर्वत्र मंदिरंचा नाश करण्याचा सपाटा सुरू होतो.

कादंबरी एकिकडे लिहीत असताना रझियाच्या आयुष्यातही वेगवेगळ्या घटना घडतात. आपल्या आजी-आजोबांपाशी जास्त वाढलेला तिचा मुलगा कट्टर मुसलमान होतो. नवरा तलाक देऊन दुसरी बायको करतो. ती ज्या बुद्धीजीवी वर्गातल्या परीषदांमध्ये जाते तिथे कुणिही मुलसमान कालखंडाची सत्य परिस्थिती मांडत नाही. सगळं कसं अलबेल होतं, इंग्रजांनी दुही माजवली हेच जनतेला कसं पटवलं पाहिजे याचा खल करतात. तिला लग्नासाठी पाठिंबा देणारे प्राध्यापक शास्त्री सुद्धा कसे सत्याशी अप्रामणिक आणि स्वार्थी बुद्धीवादी आहेत हे प्रत्ययाला येतं.

तिला धर्माविषयी विषेशतः मुस्लीम धर्माविषयी प्रश्नचिन्ह उभी रहतात. आपलाच धर्म सर्वश्रेष्ट असा अहंकार का ? तो दुसऱ्यावर लादायची जबरदस्ती का ? त्याला इस्लामच्या इतिहासातच कसा आधार आहे. आणि हा विध्वंस आम्ही केला इथल्या लोकांना आमच्या धर्मात कसं ओढलं, मंदिरं कशी पाडली हे सर्व मुस्लिम राजेच आपल्या चरित्रात, बखरीत अगदी अभिमनाने सांगतात तर ते नाकारण्याचा दुटप्पी पणा हे तथाकथित पुरोगामी का करतात. या चुका मान्य करून इतिहासातून धडा घेऊन त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत. खोटेपणाच्या पायावर उभं केलेलं असं सामंजस्य किती टिकणार.

असं हे पुस्तक खऱ्या गोष्टी निर्भीडपणे आणि तरीही कलात्मकतेने मांडतं. विध्वंस आपल्या डोळ्यासमोर उभं करतं कुठलीही बटबटीत, जहाल भाषा न वापरता. धर्मश्रद्धांवर प्रश्न उपस्थित करतं उपहास-चेष्टा न करता. धर्मश्रद्धा आणि त्यांची सुरुवात झाली तेव्हाच्या समाजाची नैतिकतआ याची तात्त्विक चर्चा करतं. 

ही कादंबरी असली तरी कल्पित नाही. कादंबरीच्या शेवटी दहा पानी संदर्भग्रंथांची सूची दिली आहे. त्यात मोगलकाळातील पुस्तकं आहेत; इंग्रजांची आहेत; इस्लामवर अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत. हे पुस्तक भाषांतर आहे असं कुठेच जाणवत नाही इतका सहजपणा भाषांतरात आहे. 

खरंच प्रत्येक हिंदूने हे वाचलंच पाहिजे पण मुसलमानानेही हे वाचलंच पाहिजे. खरा इतिहास समजून घेतलाच पाहिजे. तेव्हा काय झालं ? का झालं ? ते पुन्हा होऊ शकेल का ? ते पुन्हा होऊ द्यायचं आहे का? नसेल तर काय करायला पाहिजे ? आपल्या धर्मश्रद्धांचा फेर-विचार मुस्लिम धर्मियांनी केला पाहिजे. मायेचं आवरण भेदून निखालस सत्य ओळखलं पाहिजे. 

इतकं परखड लिहिणारं पुस्तक आपल्या तथाकथित "सेक्युलर" देशात प्रसिद्ध कसं होऊ शकलं, त्यावर बंदी कशी आली नाही हेच विशेष. उलट दोन वर्षांत वीस आवृत्त्यांचा पल्ला मूळ कन्नड कादंबरी ने गाठला आहे

या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही "Aavarana The Veil" या नावाने  उपलब्ध आहे 
http://www.amazon.in/Aavarana-Veil-S-L-Bhyrappa/dp/8129124882


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Sunday, 18 December 2016

भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh)पुस्तक :- भोकरवाडीतील रसवंतीगृह (BhokarawadItIl RasavantIgruh)
भाषा :- मराठी (Marathi)
लेखक :- द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
पाने :- १४८

द.मा. मिरासदार हे मराठीतले प्रसिद्ध आणि लोकप्रिय कथालेखक. त्यांच्या ग्रामिण विनोदी कथा तर खूपच मनोरंजक आहेत. त्यामुळे त्यांच्या कथासंग्रहाचं परीक्षण लिहिण्याची गरज नाही. फक्त हे पुस्तक मी वाचलं याची नोंद म्हणून ही ब्लॉगपोस्ट.

कथांमधे भोकरवाडी गावातली बाबू पैलवान, नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, शिवा जमदाडे, आनशी, बाबूची बायको, गणामास्तराची बायको, बंडू पुजारी अशी पात्रं आणि वल्ली आपल्याला भेटतात. दोनतीन कथा वाचल्या की आपलीपण त्यांच्याशी चांगलीच ओळख होते आणि पुढच्या कथेत ही मंडळी काय गमती जमती करतात याची उत्सुकता लागते.
कथांमध्ये वेगवेगळे प्रसंग आहेत - आणिबाणीतला गणेशोत्सव, गणपती दूध पितो तो चमत्कार, भूकंप होणार अशी अफवा उठते तेव्हा, बाबू गवाला बिबट्या वाघाची भिती दाखवतो  गावाच्या तालमीची दुरुस्ती इ.

जास्त काही सांगण्यात काही मजा नाही. वाचण्यातच मजा आहे. ------------------------------------------------------------

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Sunday, 4 December 2016

દોઢ ડાહ્યા તારક મહેતાની ડાયરી (dodh dahya tarak mahetani diary)


पुस्तक :- દોઢ ડાહ્યા તારક મહેતાની ડાયરી ( दोढ डाह्या तारक महेतानी डायरी /dodh dahya tarak mahetani diary)
लेखक :- તારક મહેતા (तारक महेता /Tarak Mehta)
भाषा :- ગુજરાતી (गुजराती / Gujarati)
पाने :- २८८

---------------------------------------------------------

તારક મહેતાની અડતાલીસ હાસ્યકથાનું આ સંગ્રહ છે. કથાના મુખ્ય પાત્રનું નામ પણ તારક મહેતા જ છે. આ તારક પોતાના જીવનમાં થનારા કિસ્સાઓ વિશે આપણી સાથે વાત કરે છે. 

તારક એક કથાલેખક છે. એ ઘરે બેસી માત્ર કથા જ લખે છે, બીજું કંઈ કરતા નથી, નકામા છે એમ માનનારી એની પત્ની, ચંડિકા જેવી સાસુજી, ફિલ્મ લાઈનમાં જવા માટે ગાંડી થયેલી સાળી, અને બે નાના દીકરાઓ પ્રમુખ કૌટુંબિક પાત્રો છે. સૌથી મહત્ત્વપૂર્ણ પાત્ર છે તારકના મિત્ર ધીરજનું. ધીરજ વિનાકારણ તારકને જાતજાતની પ્રવૃત્તિઓમાં ફસાવે છે.

આ બધાંના અમુક રમૂજી કિસ્સાઓ અહીં કહું છું.

ધીરજ એક વાર તારકને પટાવે છે કે એક તાંત્રિક બાબા એને પૈસાવાળો થવા મદદ કરવાનો છે. ધીરજ બીજા માલદાર વ્યક્તિઓ સાથે જુગાર રમશે. આ બાબા કાળા જાદૂ કરી એ લોકેને હરાવશે અને ધીરજને ઘણા પૈસા મળશે. તારકે ફક્ત આ બાબતની બધી વ્યવસ્થા ગોઠવવી. હા..ના.. કરતાં કરતાં તારક રાજી થાય છે. નક્કી કર્યાપ્રમાણે એ દિવસે ધીરજ જીતતો રહે છે પણ દારૂની નશામાં બાબા ક્યાંક ચાલો જાય છે. અને ત્યાં જે અફરાતફરી થાય છે એ વાંચીને તમે હસવું રોકી શકશો નહીં.

તારકના સાસૂજી અમદાવાદથી મુંબઈ આવે છે; એમની નાની દિકરી માટે સારો મુરતિયો ગોતવા. તારકની આ સાળીને એક યુવાન સાથે મળવાનું નક્કી થાય છે. એ યુવાન ભોટ નીવડે છે, અને સાળી ઓવરસ્માર્ટ. આ બન્નેની વાતચીત બીજા લોકો છાનીમાની રીતે સાંભળે છે. આ વિનોદી સંવાદ એક કથામાં છે. 

ધીરજનો એક ઓળખીતો યુવાન કશી ચળવળમાં ભાગ લીધા પછી પોલીસથી બચવા માટે ભૂગર્ભમાં જવાનો હતો. ધીરજ એને લઈને તારકની ઘરે આવે છે અને યુવાનને તારકના ત્યાં સંતાડે છે. દોસ્તી માટે તારક ઠીક કહે છે. એ ગભરાયેલો યુવાન આચાનક "પોલીસ પોલીસ" કરીનો ચીસ પાડે છે. આ યુવાનને લીધે તારક અને એના પરીવારને બહુ જહેમત કરવી પડે છે. છેવટે એમ સમઝે છે કે આ યુવાન ઘરથી ભાગેલો એક પ્રેમભંગી છે.


એવો જ એક કિસ્સો થાય છે જ્યારે ધીરજનો કૂતરો સંભાળવા માટે તારકના ઘરે મુકાય છે. પરીવારના બધાને કૂતરો ગમે છે પણ તારક સાથે માત્ર એ હરીફાઈ કરે છે. આ ત્રાસ ઓછો હતો કે વધારવા સાસૂજી પધારે છે. એમના આવ્યા પછીની ભાગાભાગી.. શું કહેવાય !!

હિન્દી ટીવી શ્રેણી "તારક મેહતા કા ઊલ્ટા ચશ્મા" મુજબ અહીં સોસાયટી/ચાલીમાંના વ્યક્તિઓ વધારે દેખાતાં નથી. આ કથાઓ "દોઢ ડાહ્યાની ડાયરી" હેઠળ પ્રગટ થઈ હતી.


આ પુસ્તકનો કોઈ પણ પાનું ખોલીનો વાંચો, સમય ક્યારે પસાર થયો એ તમને ખબર જ નહીં પડે !

---------------------------------------------------------

तारक मेहतांच्या नर्म विनोदी ४८ कथांचा हा कथा संग्रह आहे. कथांच्या मुख्य पात्राचे नावही तारक मेहताच आहे. आणि तो आपल्याला त्याच्या आयुष्यात घडाणारे किस्से सांगतोय. 

तारक मेहता हा एक कथालेखक आहे. आपला नवरा फार काही करत नाही; घरी बसून कथाच लिहित असतो; व्यवहार काही कळत नाही अशी समजूत असणारी त्यांची पत्नी, त्यांची जहांबाज सासू, सिनेमावेडी लहान मेहुणी, दोन लहान मुलं; ही कौटुंबिक पात्र आहेत. आणि तारकला नाना उपद्व्यापात पाडणारा, काही ना काही झोल करून ठेवणारा मित्र आहे - धीरज. 

या सगळ्यांचे काही धमाल किस्से वानगी दाखल इथे सांगतो.

धीरज तारकला पटवतो की एक तांत्रिक बाबा त्याला पैसे कमवून देण्यात मदत करणार आहेत. धीरज एका लॉजमध्ये मालदार लोकांना बोलवून त्यांच्याशी जुगार खेळेल. तो बाबा काळी जादू करून इतरांना हरायला लावेल आणि धीरजला खूप पैसा मिळेल. तारकने एवढंच करायचं की त्या बाबाची व्यवस्था बघायची. हो-नाही करता तारक ते मानतो. ठरल्या प्रमाणे सगळं घडतं, धीरज जिंकायला लागतो आणि बाबा दारूच्या नशेत अचानक निघून जातो. आणि जी काय धमाल येते ती वाचायलाही धमाल येते. 

तारकच्या सासूबाई अहमदाबादहून येतात आपल्या धाकट्या मुलीसाठी स्थळं शोधायला. तारकच्या मेव्हणीची आणि एका मुलाची भेट घालून दिली जाते. तो मुलगा मात्र अगदीच बावळट निघतो. तो बावळट आणि ही अति-शहाणी. त्यांच्या गप्पा हे चोरून ऐकतात. काय गमतीदार संवाद घडतात.ते एका कथेत आहे.

धीरजचा एक ओळखीचा माणूस कुठल्याशा आंदोलनात भाग घेतला म्हणून पोलिसांना हवा असतो. त्याला भूमिगत करण्यासाठी - लपण्यासाठी - धीरज अहमदाबादहून मुंबईला आणतो. आणि नेहमीप्रमाणेच तारकला भरीस पाडतो त्याला आश्रय द्यायला. मित्राखातर तो त्या तरुणाला आपल्या घरी ठेवतो. तो तरूण घाबरलेला, भेदरलेला मध्येच "पोलीस पोलीस" करून ओरडून हैराण करतो. त्याला संभाळण्यापायी तारकच्या कुटुंबाला नाही नाही ते उपद्व्याप करायला लागतात. आणि शेवटी कळतं की तो कोणी चळवळ्या नाही तर प्रेमभंग झाल्याने पळून आलेला आहे.

आसाच किस्सा धीरजचा कुत्रा जेव्हा तारकच्या घरी सांभाळायला ठेवला जातो तेव्हाचा. सगळ्या कुटुंबाला कुत्र्याचा लळा आणि तारकला मात्र तिटकारा. त्यातून घडणारा मनस्ताप आणि किस्से. दुष्काळात तेरावा महिना अशी त्याची सासू अहमदाबादहून मुंबईला येते आणि तिच्या मागे कुत्रा लागतो. मग घडणारी पाळापाळ आणि गोंधळ. हा हा हा !

"तारक मेहता का ऊल्टा चश्मा" मालिके प्रमाणे इथे मात्र सोसायटीतली/चाळीतली पात्र मात्र या कथांत दिसत नाहीत. ह्या वेगळ्या सदरात प्रकाशित झालेल्या कथा आहेत. 

पुस्तकाचं कुठलीही पान उघडून कुठलीही गोष्ट काढून वाचायला सुरू करा; वेळ कसा मजेत गेला कळणार नाही.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Friday, 2 December 2016

आहार सूत्र-भाग ३ (Aahar sutra : Part3)
पुस्तक :- आहार सूत्र-भाग ३  (गाथा आहारशास्त्रातल्या शोधांची)  (Aahar sutra : Part3)
लेखिका :- डॉ. मालती कारवारकर (Dr. Malati Karwarkar )
भाषा:- मराठी (Marathi)
पाने :- १३४

पुस्तकाचं आणि लेखिकेचं नाव वाचूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे आहारशास्त्रावरचं पुस्तक आहे.

आहाराचा शरीरावर, मनावर काय आणि कसा परिणाम होतो; कुठलं अन्न खाण्याचा काय परिणाम होतो; कश्या पद्धतीने शिजवलेलं, वाढलेलं, खाल्लेलं अन्न याचा कसा परिणाम होतो या बाबत पाशात्त्यांनी वेगवेगळं संशोधन आणि सर्वेक्षण केलं आहे. अश्या विविध संशोधनांची माहिती शक्य तितकी तांत्रिकता टाळून सोप्या शब्दात देण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. अनुक्रमणिकेवर लक्ष टाकलं तर यात आलेल्या विषयाची कल्पना येईल.


पुस्तकात जीवनसत्त्वे आणि त्यांचे परिणाम, शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची (हार्मोन्सची) माहिती मिळते. आपलं शरीर किती जटिल यंत्र आहे; नाना प्रकारच्या रसायनांची निर्मिती करणारा जिवंत कारखाना आहे हे लक्षात आलं की अचंबित व्हायला होतं. अश्या या अफाट यंत्राची निगा राखायची तर तर आहार कधी, कुठे, कसा, किती घ्यायचा हे समजलंच पाहिजे.

पुस्तका अमुक एक आहाराच्चा तक्ता, प्लॅन दिलेला नाही. त्यामुळे पुस्तक वाचुन तुम्हाला तुमचा आहार "रेडीमेड" मिळणार नाही. पण आपण करत असलेल्या चुका जाणवतील. ज्या गोष्टी योग्य करतोय त्या बद्दल पुस्तकात वाचून स्वतःचे कौतुक करण्याचे क्षण येतील. काही "टीप्स" मिळतील. सगळ्यात मह्त्त्वाचं म्हणजे आपल्या आहाराकडे डोळे उघडे ठेवून बघायला सुरूवात होईल. आरोग्याकडे एक पाऊल पुढे पडेल. हेच या पुस्तकाच्या वाचनाचं फलित.

"खाल तसे व्हाल", "खाल तसे दिसाल", "अन्न  हे पूर्णब्रह्म" ही आपल्या नेहमीच्या बोलण्यातली वाक्यं. चौरस आहाराचं महत्त्व आपण शाळेत असल्यापासून शिकतो. माहीत असतं तरीही कळतं पण वळत नाही अशी अवस्था आपली असते. कदाचित "अजून" कळलं तर आपण "वळायला" लागू या उद्देशानेच हे पुस्तक वाचलं पाहिजे.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)


----------------------------------------------------------------------------------