निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha)



पुस्तक - निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha)
लेखक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo) 
भाषा - मराठी 
पाने - 205
ISBN - 978-93-886493-54-5


प्रणव सखदेव या नव्या पिढीच्या लोकप्रिय लेखकाचा कथासंग्रह आहे. लेखकाबद्दल आणि पुस्तकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 


अनुक्रमणिका 


या कथांबद्दल थोडक्यात सांगतो


हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा
एक ऑफिस बॉय आपल्याशी बोलतो आहे ज्याला फेसबुक वर पोस्ट टाकून टाकता टाकता आपल्यात दडलेल्या लेखकाची जाणीव झाली आहे. तो आपल्याला गोष्ट सांगतोय त्याने निर्माण केलेल्या पात्रांची. या गोष्टीत एका माणसाची ओळख चोरले जाते म्हणजे दुसराच माणूस त्याचं रूप घेऊन वावरू लागतो वावरू लागतो.




कथा सांगण्याची गोष्ट 
यात दोन पात्र आहेत- नवरा-बायको. नवरा-बायको त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगतायत. लग्नानंतर सुरुवातीला मुल नको असं ठरवणारी; नंतर मूल हवं वाटू लागलं तेव्हा, होत नाही म्हणून झुरणारी आणि झाल्यावर त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या जोडप्याची ही गोष्ट आहे
पण दोघांचं वर्णन पूर्णपणे वेगळे आहे. मग नक्की काय खरं? असं वाचकाला कोड्यात टाकणारी कथा आहे.

कतरा कतरा जीते है 
एका विवाहित तरुणाच्या आयुष्यात एका दिवशी त्याची पूर्वीची प्रेयसी परत आली तर काय होऊ शकतं ?

पंख असलेल्या माणसाची गोष्ट 
पंख असलेला एक माणूस पृथ्वीवर वावरतो आहे तो खरा देवलोकातील शापित व्यक्ती आहे. देवलोकात त्यांनी असं काय केलं; ज्यामुळे त्याला हा शाप मिळाला मिळाला त्याची गोष्ट आहे.

निळ्या दाताची दंतकथा 
एक कल्पना कथा ज्यात एका माणसाच्या पापा साठी शिक्षा म्हणून त्याला निळा दात येतो. आणि तो दात कोणी बघितला की माणूस मारतो.

भूत. के. 
ज्याप्रमाणे सफाई कर्मचारी आपल्या घरातला गावातला कचरा गोळा करतात त्याप्रमाणे भूतकाळाच्या क्षणांचा कचरा गोळा करणारे "भूत. के." हे कर्मचारी आहेत अशी कल्पना मांडून सफाई कामगारांचे काम महत्त्वाचं असलं तरी त्यांना योग्य तो मान मिळत नाही हे सांगणारी कथा.

शे. उ. वा. ची अखेरची गोष्ट
"वाघ वाचवा, निसर्ग वाचवा" अशा घोषणा एकीकडे आणि निसर्गाचा ऱ्हास दुसरीकडे ह्या सद्यस्थितीवर बेतलेली ही कथा आहे.




डावे-उजवे पांडव
वेगवेगळ्या विचारधारांचे, पक्षांचे लोक एकमेकांविरुद्ध हिंसक पातळीवर उतरताना आपण पाहतो. आपल्या शरीरातले अवयव सुद्धा दोन विचारसरणीचे दोन गट बनून वागायला लागले, भांडायला लागले तर काय होईल !!

#मनकवडीनगरीडॉटएचटीएमएल
एक प्रियकर प्रेयसी स्वतःला हवं असलेलं जग कल्पनेत का होईना मिळावं; आपल्याला ज्या गोष्टी, जितक्या प्रमाणात, जेव्हा हव्या तेव्हा मिळाव्यात, म्हणून व्हिडीओगेम सारखं एक आभासी जग तयार करतात आणि त्यातच गुंगून जातात आणि हळूहळू त्याच्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात येतो असं कथाबीज आहे.



कथांच्या संक्षेपातल्या ओळखी वरून लक्षात आले असेल की ह्या कथा थोड्या फॅन्टसी/कल्पनारम्यते कडे झुकणाऱ्या आहेत. पण यातली फॅन्टसी ही तोंडी लावण्या पुरतीच आहे आहे. खरंतर लेखकाला सामाजिक वास्तव वगैरे मांडायचं आहे, त्यावर स्वतःची टीकाटिप्पणी करायची करायची आहे; त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार वाटतो.
उदाहरणार्थ "निळ्या दाताची दंतकथा" मध्ये लेखकाला राजकीय किंवा वैचारिक हिंसा कशी होते आणि ती पुढे पुढे कशी चालू राहते हे सांगायचं आहे त्यातल्या पात्राला स्वप्नात दिसतं की हिंसा करणाऱ्याला शिक्षा म्हणून निळा दात मिळालेला आहे. मग त्या पात्राच्या खऱ्या आयुष्यात काही गोष्टी घडतात. पण स्वप्नातला निळा दात, खऱ्या घटना, हिंसा ह्यांचा तसा काही अनोन्यसंबंध नाही.

"डावे-उजवे पांडव" या कथेत डावा भाग, उजवा भाग म्हणजे साधारणपणे डावी विचारसरणी व उजवी विचारसरणी किंवा दोन विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांच्यात होणारी हिंसा हा भाग स्पष्ट दिसतो. त्यामुळे ती फॅन्टसी ठरत नाही. तिला रूपककथा म्हणावं तर पंचतंत्र, हितोपदेशासारख्या गोष्टींमधून रूपकांचा वापर केला आहे तसा इथे दिसत नाही. जे सांगायचं, दाखवायचं आहे ते तसं स्पष्ट दाखवलं आहे. फक्त पात्रांची नावं वास्तव जगातली देण्याऐवजी काहीतरी बदल इतकंच.

"हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा" कथेमध्ये सुरुवात वेगळीच होते. एक माणूस फेसबुक वर काहीतरी लिहितोय आणि लोकांची आयडेंटिटी चोरतो. आधुनिक तंत्रज्ञानाशी, आधुनिक संकल्पनांशी निगडित अशा घटना घडतात. पण पुढे ती कथा टिपिकल परकायाप्रवेश वळणावर जाते. "व्यक्ती दिसते-वागते तशीच असते असे नाही. तिच्या मनात बरंच काय चाललेलं असतं. तिच्या वागण्यामागे बरीच कारणं असतात" इत्यादी नेहमीचे मुद्दे येतात. त्यामुळे सुरुवातीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भाचा पुढे विचकाच होतो.

"भूत. के." कथेमध्ये भूतकाळ वेचणारे लोक अशी भारी संकल्पना आहे पण पुढे त्या कल्पनेवर अचानक सफाई कामगारांच्या वास्तवाचं कलम होतं. लेखक आपली फॅण्टसी ची हॅट टाकून सामाजिक लेखनाची उबळ दाखवतो.

"मनकवडी नगरी"मध्ये ते जोडपं एक काल्पनिक जग तयार करतं आणि त्यात एका गोष्टीची कमतरता राहते. पण ती कमतरता का राहते? त्यांना ते का तयार करता आलं नाही? हे काही त्या गोष्टीत लेखक सांगत नाही. का ? तर, ती गोष्ट आयुष्यात महत्वाची आहे हे लेखकाला सांगायला सोयीचं जावं म्हणून.

गोष्टींमध्ये लैंगिक प्रसंगांची, अवयवांची उघड वर्णनं टाकून बोल्डपणा आणायचे प्रयत्न केला आहे. 

एखाद्या पाककृती प्रमाणे; दोन चमचे फँटसी, चार चमचे सामाजिक वास्तव, सेक्स "स्वादानुसार", वरून सामाजिक भाषेची फोडणी असं सगळं ठरवून केल्याप्रमाणे वाटतं. पण भट्टी काही जमत नाही. या कथा वाचताना सुरवात छान आणि पुढे निरस वाचन अशी अवस्था होते. कुठलीच कथा मला काही भावली नाही.

पुस्तकाच्या शेवटी लेखकाने स्वतः घेतलेली स्वतःची मुलाखत आणि माझा लेखन प्रवास, लेखनाच्या प्रेरणा वगैरे सांगितलं आहे. आत्मस्तुतीचा हा प्रकार पहिल्यांदाच वाचनात आला. 



पुस्तकाला बरेच पुरस्कार वगैरे मिळाले आहेत. त्यामुळे पुरस्कार प्राप्तपुस्तकांचं आणि काहीतरी वाकडं आहे हा "पॅटर्न" या पुस्तकाने सुद्धा चालू ठेवला ! गंमतच आहे !!



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

पांडेपुराण (Pandepuran)




पुस्तक - पांडेपुराण (Pandepuran)

लेखक - पीयूष पांडे  (Peeyush Pandey)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५५
मूळ पुस्तक - Pandeymonium (पांडेमोनिअम
)
मूळ पुस्तक भाषा - इंग्रजी (English
अनुवाद - प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
ISBN :978-93-86118-47-9

वाचनालयात हे पुस्तक बघितलं तेव्हा पीयूष पांडे कोण आहेत याबद्दल मी अज्ञानी होतो.

पण पुस्तकाच्या नावात "जाहिरात आणि मी" हा उल्लेख आणि मलपृष्ठावरची माहिती याच्यावरून जाहिरात विश्वाशी संबंधित ही एक मोठी व्यक्ती आहे आणि तिने आपले अनुभव पुस्तकात सांगितले आहेत हे कळलं. जाहिरातविश्वाशी माझा थेट संबंध नाही. म्हणूनच मला माहिती नसलेल्या या क्षेत्राबद्दल थोडेफार समजून घ्यायची संधी या पुस्तकातून मिळेल या अपेक्षेने हे पुस्तक घेतलं.

तुम्हाला पीयूष पांडे हे नाव माहिती असेल किंवा नसेल तरीही त्यांनी केलेल्या जाहिराती तुम्हाला नक्कीच माहिती असतील. फेविकॉल ची ती जाहिरात ज्यात राजस्थान मधला एका ट्रकवर सगळीकडे माणसं कोंबलेली आहेत ती पाहिली असेल.

फेविक्विची जाहिरात आठवतेय? एक माणूस गळ टाकून बसलाय पण मासे लागत नाहीत तेवढ्यात दुसरा येतो आणि काठीला फेविक्विक लावून एका मिनिटात मासे पकडून जातो. 


वोडाफोन झु झु !!
आठवल्या जाहिराती??

या सगळ्या मागचं कलात्मक डोकं पीयूष पांडे आणि त्यांच्या ऑगिल्वी कंपनीच्या टीमचं. अशा एकाहून एक सरस जाहिराती देणाऱ्या पांडे यांच्या बद्दल पुस्तकात दिलेली माहिती.


हे पुस्तक आत्मचरित्र नाही किंवा आठवणींचा प्रवास अशा पद्धतीने नाही. तर काही आठवणी, काही महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या कामावर परिणाम करणाऱ्या घटना, त्यातून शिकलेले धडे असं सरमिसळ पद्धतीचं आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.



पुस्तकाच्या पहिल्या भागात पांडे यांचे एकत्र कुटुंब; त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे त्यांचे भाऊ-बहिणी, भाचे, पुतणे इत्यादींमुळे लहानपणापासून आत्ता त्यांच्या पर्यंत त्यांचा अनुभवांचा आवाका आपोआप कसा वाढला हे आपल्याला दिसतं. आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार असा बहुरंगी असण्याचे फायदे त्यांनी सांगितले आहेत. आपला परिवार तसा नसेल तर किमान आपल्या मित्रपरिवार तरी आपण तसा तयार केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याशी संबंधित नसलेले, आपल्यापेक्षा अगदी वेगळेच वागणारे लोक यांच्याशी आपली गट्टी जमते आणि त्यांच्याशी बोलून आपल्याला नव्या संकल्पनांचा कस लावून बघता येतो असं ते म्हणतात.




पुस्तकाच्या पुढच्या भागात जाहिरात क्षेत्राशी संबंधित त्यांनी शिकलेले धडे आणि मार्गदर्शक सूत्र असे लेख आहेत. त्यातून वेळोवेळी केलेल्या जाहिराती आणि जाहिराती बनवण्याची प्रक्रिया यामध्ये आपल्यालाही तर डोकावून बघता येतं उदाहरणार्थ जाहिरात आपल्या दिसते तसेच ऐकू येते आणि तसे संगीत कसे आहे यावरून तिची परिणामकारकता कमी अधिक होत असते हे सोदाहरण सांगितलं आहे.




पुढचे लेख लाला कंपन्यांवर आहे. "लाला कंपनी" म्हणजे अशी कंपनी ज्यात सर्व कारभार कुटुंबीयांच्या हातात. तसं बघायला गेलं तर बिरला, रिलायन्स, पिडिलाइट या लाला कंपन्याच आहेत पण त्यांचा दृष्टिकोन बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखाच आहे असा पीयूष पांडे यांचा अनुभव आहे. त्यामुळे, कंपन्यांमध्ये अशी वर्गवारी लोक करतात आणि त्याचा कसा परिणाम होतो हे वाचणे मजेशीर आहे.

पुढच्या भागात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात कुठले गुण गुण असावेत याबद्दल सांगितलं आहे. या भागातल्या एका लेखात ते आपल्या मतांशी ठाम राहा असे म्हणतात तर आधीच्या प्रकरणात, आपली मतं दुसऱ्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यातून बदल घडवा असं सांगतात. बघायला गेलं तर हे परस्परविरोधी वाटतंय. पण यशस्वी व्हायचे असेल तर दोन्ही गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. तो त्यांना जमला म्हणूनच ते यशस्वी असे म्हणायला हरकत नाही.

जेव्हा चाकोरी मोडणारी काही संकल्पना आपण मांडतो तेव्हा त्याला विरोध होणे, त्यावर कोणी विश्वास न ठेवणे सहाजिक आहे. पण जर आपल्याला ती संकल्पना मनापासून आवडली असेल आणि तिचा पाठपुरावा केला तर लोक तोंडात बोट घालतीलअसे यश मिळू शकते. त्यामुळे जोखीम उचलण्याची तयारी सुद्धा पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांना ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ झु झु ची कल्पना मांडली गेली तेव्हा तिचा स्वागत कसं झालं पुढे त्याच्यावर काम कसं झालं त्याबद्दल हे वाचा.




व्यवसायिक काम करताना त्यातून मिळालेले व्यवसायिक यश,पैसा,प्रसिद्धी हे आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे मापदंड असतातच. पण जेव्हा या व्यावसायिक कामातून काहीतरी समाजोपयोगी घडतं तेव्हा त्याची मजा काही वेगळीच असते. पीयूष यांना राष्ट्रीय साक्षरता मिशन साठी पोलिओ अभियानासाठी काम करायची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी गायलेलं "मिले सुर मेरा तुम्हारा" या बहुसांस्कृतिक गीताची निर्मितीसुद्धा पांडे यांच्या टीमनेच केली आहे. अशी कुठली कामं त्यांना करायला मिळाली हे त्यांनी पुढच्या लेखात सांगितलं आहे

पुढचा विभाग "ऑगिल्वी आणि मी" हा त्यांची कंपनी, त्यातली नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा आहे.

प्रादेशिक बहुसांस्कृतिक वाद लेखात त्यांनी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांची टीम उत्कृष्ट काम करू शकते याची जाणीव करून करून दिली आहे. मल्टिनॅशनल कंपनी म्हणजे फक्त जगात अनेक ठिकाणी कचोर्‍या असणारी कंपनी नव्हे तर अनेक ठिकाणची माणसं अनेक संस्कृतीतली माणसं जिथे काम करतात अशी कंपनी. कारण एखादी जाहिरात एका देशात तुफान चालेल तर दुसऱ्या देशात ही संकल्पना वादग्रस्त ठरेल. एखादी गोष्ट एका राज्यात लोकांना भावेल दुसऱ्या राज्यात लोकांना त्याच्याशी रिलेट करता येणार नाही म्हणूनच बहुसंस्कृतिक टीम असेल तरच एका पठडीतला विचार होणार नाही.

२०१४ च्या निवडणुकीतली "आपकी बार मोदी सरकार", "अच्छे दिन आने वाले है" ह्या लक्षवेधी घोषणा सुद्धा पीयूष यांच्याच आहेत त्याबद्दल त्यांनी थोडे सांगितला आहे.

शेवटच्या भागात त्यांनी जाहिरात क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा वेध घेतला आहे. 



इतकं मोठं यश मिळवून सुद्धा त्यांनी स्वतःची कंपनी काढली नाही ogilvi शी एकनिष्ठ का राहिले राहिले याबद्दल स्वतःची प्रामाणिक व समाधानी भूमिका समोर ठेवली आहे. पत्रकारांच्या गोसीपिंगला उत्तर !!

असे एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत जाहिराती बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. कारण वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मथळ्याऐवजी पानभर जाहिरात असते आणि रात्री झोपताना मोबाईलवर फेसबूक चेक करताना जाहिरात बघत किंवा युट्युबवर गाणे ऐकताना ऐकताना सुद्धा शेवटची स्किप ऍड करूनच आपण झोपतो. या जाहिराती तयार होताना पडद्यामागे काय घडतं याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. पण पुस्तक फारच तुटक आणि त्रोटक पद्धतीने लिहिले आहे असं मला वाटलं.२०१४
 चा निवडणूक प्रचार आणि त्यात असलेला जाहिरातींचा वाटा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या जाहिराती कशा घडल्या; प्रत्यक्ष मोदींसह किंवा भाजपच्या दिग्गजांचे मार्गदर्शन कसे होते हे सविस्तर समजून घ्यायला आवडलं असतं. पण लेख तीन-साडेतीन पानांत गुंडाळला आहे. "मिले सुर मेरा तुम्हारा",फेविकॉल आणि इतर लक्षात राहिलेल्या जाहिरातींच्या अशा जन्मकथा सविस्तर वाचायला मिळतील ही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे एखाद्या उत्तम आचाऱ्याने आज स्वयंपाक काय केला आहे याचे नमुने आपल्याला दाखवावे, आपल्या तोंडाला पाणी सुटावं; आता जेवण कधी वाढतोय याची वाट बघावी तर पान पुढ्यात येतच नाही अशी भावना होते. ह्या विषयावर दुसरे पुस्तक त्यांनी लिहिलंय का हे बघायला पाहिजे. 

मराठी अनुवाद उत्तमच झाला आहे. अनुवादात कुठे ठेच लागत नाही. "पांडे"जी नव्हे तर "श्री. देशपांडे" आपल्याशी बोलतायत असंच वाटतं.

जाहिरातींच्या जुन्या आठवणींना उजाळा, कहाण्याची थोडीशी झलक, एका यशस्वी व्यक्तीच्या 'यशस्वी कसे व्हावे' व 'यशस्वी टीम कशी असावी' याबद्दलच्या टिप्स समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...