इन्स्टॉलेशन्स(Installations)




पुस्तक - इन्स्टॉलेशन्स (Installations)
लेखक - गणेश मतकरी (Ganesh Matkari)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६८
ISBN - दिलेला नाही 
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती ऑगस्ट २०१६
छापील किंमत - २२०

मुंबई सारख्या महानगरात सुस्थितीतील मध्यमवर्गीय व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या कथा आहेत. ह्यात नायक/नायिकेच्या आसपास काहीतरी घटना घडतात आणि त्याचं प्रतिबिंब नायक/नायिकेच्या मनात कसं पडतं हे ह्या कथांचं मुख्य सूत्र आहे असं मला जाणवलं. दुसऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात अकाली मृत्यू, अपघात, नोकरी जाणं, भास होणं, आजारी पडणं इ. घडतं. एक कथेत मुंबई च्या ९२ च्या दंगलींचा संदर्भ देखील आला आहे.

प्रत्येक गोष्टीच्या विषयाबद्दल एका वाक्यात सांगतो

"इन्स्टॉलेशन्स" - ह्यात एका व्यक्तीला असं वाटत राहतं की बिल्डिंगच्या जिन्यामध्ये कुणीतरी रोज अडगळ किंवा भंगार वस्तू आणून ठेवतं आणि त्या वस्तूंच्या रचनेतून(इन्स्टॉलेशनमधून) काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. तो असे निरनिराळे आपले अनुभव नायकाला सांगतो. आणि कथानायक ह्या सांगण्याला प्रतिसाद देतो.


"शूट" - चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने एका इस्पितळात आल्यावर बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच इस्पितळात आल्याची आठवण जागी होते.

"गेम" - ह्यात एका शाळकरी मुलाची आई घर सोडून निघून जाते आणि त्याच वेळी शाळेत त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांचं बरं वाईट होतं. ह्या सगळ्याला हा मुलगा कसा प्रतिसाद देतो.

"घाई" - रस्त्यावर गाडी चालवताना इतरांनी ओव्हरटेक करायचा केलेला प्रयत्न, रस्त्यावर दिसणारे अपघात आणि स्वतःच्या आयुष्यातली वादळं ह्यांचा संमिश्र परिणाम

"क्रांती" - हॉटेल मालकाचा शाळकरी मुलगा त्या हॉटेलात काम करणाऱ्या नोकराच्या आयुष्यात आलेलं मोठं संकट पाहतो. आणि त्याबद्दल काहीतरी करावं असं वाटतं.

"पास्ट" - पुन्हा एकदा एका स्मरणरंजन .. एका आठवणीतून दुसरी आठवण , दुसरीतून तिसरी ..

"फोटो" - एका फोटो स्टुडिओला त्याने काढलेल्या फोटोंपैकी एका दिवंगत व्यक्तीच्या जुन्या फोटोची मागणी होते. पण त्याच्याकडे तसा नेमका फोटो नसतो. पण हयात व्यक्तीचाच फोटो घेऊन तो वापरण्याचं ठरतं.


"रिमाइंडर" - पुन्हा एकदा एक अपघात, अकाली मृत्यू आणि त्या व्यक्तीशी संबंधितांच्या मनावर वेगवेगळे परिणाम

"वाट" - कथा नायकाच्या सहकाऱ्याला स्मृतिभ्रंश होतो. त्याला बघायला नायक जात असताना. आपल्याला सुद्धा असं काही झालं नाही ना असं वाटायला लागणारे प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतात.

"ट्रॉमा" - ९२ सालच्या मुंबईतल्या दंगलीत दंगलखोरांकडून कोणाची हत्या होताना बघणं; नंतरचे १२ मार्चच्या साखळी बॉम्बस्फोटाचा अनुभव घेणं

ह्या कथांमधून लेखकाला निश्चित असं काही सांगायचं नाहीये तर वर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद कथेतल्या लोकांच्या मनात कसे उमटले; कधी भीती वाटले; कधी जुनं आठवलं; कधी "मन चिंती ते वैरी ना चिंती" झालं इ. त्यामुळे गोष्टींमध्ये वर्तमानात आणि भूतकाळात खूप प्रसंग घडतात. मन त्यातून निश्चित असं काही हाती लागत नाही. नुसतीच प्रसंगबंबाळ वर्णनं. बऱ्याच वेळा त्या प्रसंगाच्या नेपथ्याचे विनाकारण तपशील आहेत. काढे कथा गूढ कथा होते आहे असं वाटतं पण पुढे तसं काही घडत नाहीत. कधी "माणसाचं मन" ह्यावर चिंतन करणारी गोष्ट आहे असं वाटतं पण तेही धड नाही. तर कधी गोष्टीतून काही एक तत्त्वज्ञान पुढे आणायचं असेल असं वाटतं पण तसंही काही होत नाही.

लिहलंय भरपूर; सुटे सुटे परिच्छेद, किंवा वाक्य छान वाटतील पण शेवटी गोष्ट वाचताना ; "अरे भाई, कहना क्या चाहते हो !!" असं म्हणावसं वाटतं.

पुस्तकाची भाषा आंग्लप्रचुर मराठी आहे. मुंबईच्या श्रीमंत मध्यमवर्गीयांची, उच्च मध्यमवर्गीयांची वाटावी म्हणून लेखकाने तसं केलं असेल असं वाटतं. पात्रांच्या तोंडची भाषा तशी असायला हरकत नव्हती पण त्रयस्थ निवेदकाचीही तीच शैली आहे. त्यामुळे जरा अतिरेकच झाला आहे. 

असो; एकूण मला काही हे पुस्तक आवडलं नाही. तुम्ही जर चुकून वाचलंत तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

शिन्झेन किस (Shinzen Kiss)


पुस्तक - शिन्झेन किस (Shinzen Kiss)
लेखक - शिन्इची होशी 
Shinichi Hoshi (星 新一 Hoshi Shin'ichi)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ भाषा - जपानी (Japanese)
अनुवादक - निस्सीम बेडेकर (Nissim Bedekar)
पाने - १६८
ISBN - 978-93-86493-48-4
प्रकाशन - रोहन प्रकाशन.  ऑगस्ट २०१८
छापील किंमत - १९५/- रु. 

शिन्इची होशी ह्या जपानी लेखकांच्या २१ कथांच्या अनुवादाचं हे पुस्तक आहे. अजूनपर्यंत "होशी" ह्यांचं काही लेखन किंवा त्यांच्याबद्दल काही वाचलं नव्हतं पण त्यांची आणि अनुवादकाची ओळख पुस्तकात पुढीलप्रमाणे करून दिली आहे.




ही ओळख वाचून आणि वेगळ्या संस्कृतीतील काही वाचायला मिळेल म्हणून उत्सुकतेने पुस्तक हातात घेतलं. आणि हे पुस्तक वाचताना निवड अगदी १००%खरी ठरली ह्याचा आनंद झाला.

अनुक्रमणिका


ह्या कथा लघुकथा आहेत. ह्यात १९ लघुकथा आहेत तर २ दीर्घ कथा. लघुकथा म्हणजे काही ४ पानांच्या, ३ पानांच्या काही अगदी दीडदोन पानांच्या. पण प्रत्येक कथा दोन पानांत प्रसंग डोळ्यासमोर उभे करते. नाट्य समोर घडवते आणि पुढे ह्या काय घडेल ह्याची उत्सुकता निर्माण करते. अगदी रहस्य कथा नाही. प्रसंग साधेच पण तरी आकर्षक. म्हणूनच आपणही एका ठराविक, सध्या पद्धतीने विचार करतो आणि लेखक आपल्याला बेसावध गाठतो. गोष्टीचा शेवट वेगळाच होतो. तो शेवट वेगळा झाला तरी अतार्किक किंवा ओढूनताणून आणलेला वाटत नाही. त्यामुळे आपली फसगत झाली मजा येते.

सुरुवातीला काही गोष्टी वाचल्यावर लेखकाचं हे चकवणं लक्षात आल्यावर साहजिकच आपणही पुढच्या गोष्टी वाचताना अजून सावध, "हुशार" होतो. पण तरी लेखक आपल्यापेक्षा दोन पावलं पुढेच राहतो. आणि चकवाचकवी सुरूच राहते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेगळी, रंजक आहे.

ह्यातल्या बऱ्याच गोष्टी वैज्ञानिक कल्पनारंजन (फँटसी) प्रकारच्या आहेत. म्हणजे प्रग्रहावरचे जीवन, मानवाव्यतिरिक्त इतर जीवांची संस्कृती,अचाट शोध इ. अश्या कथांमध्ये अद्भुततेची गंमत आणि अनपेक्षित शेवट अशी दुप्पट मजा आहे. "परग्रहावरचे शर्विलक" ही दीर्घ कथाही त्याच प्रकारची आहे.

"प्रेत हवं, प्रेत" ह्या दीर्घ कथेत एक शव वाहिनी एक प्रेत घेऊन जात असते आणि त्याच एकमेकांशी दुरान्वये संबंध नसलेल्या वक्तींच्या आयुष्यात समांतर घटना घडतात की सगळ्यांना त्या प्रेताला हात लावावा लागतो. आणि गोष्ट अनपेक्षित वळणावर संपते. खरंच इतकी कथाबीजे एकत्र गुंफण्याच्या लेखकाच्या सृजनशीलतेला दाद द्यायला हवी.

प्रत्येक कथा वेगळी आणि त्यातही त्या लघुकथा. त्यामुळे एकदोन गोष्टीबद्दल थोडं सांगून अंदाज येणार नाही आणि जास्त सांगितलं तर गोष्टीचा शेवट समजून भावी वाचकांचा रसभंग होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल ना लिहिता काही गोष्टींची उदाहरणे देतो.

"कंपनीचं रहस्य" - एका मोठ्या कंपनीला प्रतिस्पर्धी कंपनीचं रहस्य मिळवायचं असतं. म्हणून हेरगिरी करण्यासाठी एका हुशार व्यक्तीला खास दुसऱ्या कंपनीत घुसवतात. तो कंपनीत प्रगती करून महत्त्वाची माहिती मिळवत राहतो. आणि पुढे काय होतं ? 

"रागीट काका" - मुलांना शिस्त लावण्यासाठी मुलांना धाक दाखवावा लागतो. पण आईवडिलांना शिस्त लावायला वेळ नसेल तर धाक दाखवण्यासाठी "रागीट काका" ही सेवा पुरवणारी कंपनी आलीये. 

"डिलक्स तिजोरी", "साक्षीदाराचा धंदा" -  चोरावर मोर प्रकारच्या घटना 

"अफलातून औषध", "शैक्षणिक उशी" - ह्यात शास्त्रज्ञ अनोखे शोध लावतात. माणसाच्या स्वभावात बदल घडवणारे औषध आणि उशी बनवतात. आणि त्याचा परिणाम कसा धमाल होतो. 

"परग्रहावरचे शर्विलक" - "अल्फा" नावाच्या परग्रहावर आता मनुष्याने वस्ती केली आहे.  पृथ्वीवरून "अल्फा"ग्रहावर जायला यानातून बसून दोन मित्र निघतात. आणि त्यांना वाटेत अजून एक अपघात ग्रस्त यान दिसतं. 

"सिहांचा छावा" ह्यात एक हुकूमशहा एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावतो. टी कशी तर त्याला एका सिंहाच्या छाव्याबरोबर एकत्र ठेवलं जातं. त्याने त्याला वाढवायचं. म्हणजे हळूहळू तो सिंह मोठा होऊन एक दिवस त्याला खाऊन टाकेल. आपल्याच हाताने आपलं मरण वाढवायचं. पण हा गुन्हेगार सुटू शकतो का ?

"शिन्झेन किस" - मध्ये पृथ्वीवरचे लोक परग्रहावर जातात. तिथल्या सुंदरी बघून "चुंबन" घेऊन पाश्चात्त्य पद्धतीने अभिवादन करण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत. आणि मग काय गोंधळ उडतो. 

निस्सीम ह्यांनी केलेला निर्दोष अनुवाद. जराही बोजडपणा नाही. मूळ मराठीतलं पुस्तक वाचत असल्यासारखंच वाटलं. अनोख्या शैलीच्या ह्या गोष्टी मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल निस्सीम बेडेकर ह्यांचे खूप आभार !


पुस्तकाची शैली तर मराठी लेखनाच्या दृष्टीने खूपच वेगळी आहे. ह्या गोष्टी "नीतीकथा" नाहीत. त्यांना काही संदेश द्यायचा आहे असा आग्रह नाही. कुठला विचार पुढे रेटायचा नाही. त्यामुळे निखळ कल्पनारंजनातला, आणि "असंही घडू शकतं" ची मजा घेणाऱ्या निखळ कथा आहेत. हे मला जास्त आवडलं. आबालवृद्धांना आवडतील खिळवून ठेवतील अश्या ह्या गोष्टी आहेत. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

वन डे मॅरेज (one day marriage)




पुस्तक - वन डे मॅरेज (one day marriage)
लेखक - दयानंद निवृत्ती लोणे (Dayanad Nivrutti Lone)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
ISBN - 978-93-89834-81-9

दयानंद लोणे ह्यांची ही पहिलीच कादंबरी. त्यांनी स्वतः भेटून मला ही अभिप्रायार्थ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.


ही ग्रामीण प्रेमकथा आहे. एक तरुण तरुणी कॉलेजमध्ये एकमेकांच्या संपर्कात येतात आणि प्रेमात पडतात. पुन्हा पुन्हा भेटत त्यांचं प्रेम फुलत राहतं. पण मुलाला नोकरी नाही म्हणून मुलीच्या घरचे लग्नाला नकार देतात. आपलं प्रेम सफल व्हावं म्हणून मुलगा जीव तोडून नोकरी मिळवायचा प्रयत्न करतो.

त्याला नोकरी मिळेल का? तो पर्यंत ती मुलगी, तिच्या घरचे थांबतील का? मुलाच्या घरच्यांना हा अपमान वाटला तर? ते पळून गेले तर? पळण्यात यशस्वी होतील का? एकमेकांना विसरायचा प्रयत्न केला तर?... हे समजण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल; ते सांगून तुमचा रसभंग करत नाही.

पुस्तकातले एकदोन प्रसंग उदाहरणादाखल.

दोन्ही घराच्या लोकांचा वादाचा प्रसंग - 


पळून जाऊन लग्न करण्याचा प्रसंग



प्रेम, प्रेमाला विरोध आणि त्याचा बरा वाईट शेवट हा असंख्य चित्रपटांचा, पुस्तकांचा घासून गुळगुळीत झालेला विषय. त्यादृष्टीने कथानकात काही नावीन्य नाही. त्यामुळे तेच कथानक आकर्षक पद्धतीने मंडता आलं तरच अश्या कादंबरी वाचनीय ठरतात. त्या बाबतीत ही कादंबरी कमी पडते.

ह्यातले प्रसंग "माहितीपर" वाटतात. ते व्यवस्थित पूर्ण खुलले नाहीत, खिळवून ठेवत नाहीत. अनेक प्रसंग असे आहेत की त्यात मुला मुलीची जाहीर सलगी इतकी दिसते की नक्की ह्यांच्या लग्नाला विरोध आहे की नाही असा प्रश्न पडतो.

निवेदन प्रथमपुरुषी असल्यामुळे इतर व्यक्तींच्या मनाचा वेध घेता येत नाही. त्यामुळे ती पात्रं ठसत नाहीत.

प्रमाणलेखनात खूप चुका आहेत. मध्येच "मी म्हणालो" च्या ऐवजी "दया म्हणाला" असे उल्लेख येतात. ते खटकतात. थोडक्यात पुस्तकाचं मुद्रितशोधन नीट झालं नाहीये.

पुस्तकाच्या सुरुवातीला नायकाला बरेच वर्षांनी नायिका संपर्क साधते असा प्रसंग आहे. फ्लॅशबॅक मध्ये प्रसंग घडतात. पण पुस्तकाच्या शेवटी ह्या पहिल्या प्रसंगाची तड लागत नाही. शीर्षकाला "वन डे मॅरेज" का म्हटलं असेल कळत नाही.

प्रस्तावनेत लेखक म्हणतो "नायकाचं आणि 
सागरचं प्रेम".. सागर हे मुलाचं नाव असल्यामुळे मला वाटलं समलैंगिकतेवर आधारित कादंबरी आहे की काय. पण पुढे वाचताना कळलं की ह्यात "सागर" हे मुलीचं नाव आहे आणि "दया" हे मुलाचं; अशी गंमत.

असो, दयानंद ह्यांनी एक कादंबरी लिहून आपला लेखन प्रवास जोमाने सुरू केला आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनंतानुभव (Anantanubhav)





पुस्तक - अनंतानुभव (Anantanubhav)
लेखक - डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni)
शब्दांकन - सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५२
प्रकाशन - स्नेहल प्रकाशन. पहिली आवृत्ती सप्टेंबर २०२०
छापील किंमत - ३०० रु.


सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचायला दिल्याबद्दल मी श्री. सुधीर जोगळेकर ह्यांचे आभार मानतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशभर असंख्य सेवा प्रकल्प राबवते. त्यातल्या वनवासी समाजासाठीच्या आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्या डॉ. अनंत कुलकर्णी ह्यांचे हे अनुभव कथन आहे.
पुस्तकात दिलेली त्यांची माहिती


पुस्तकात दिलेली श्री. जोगळेकर ह्यांची माहिती


अनंत कुलकर्णी ह्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या तरुण वयातच स्वतःला ह्या कामात झोकून दिलं. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी समाजासाठी प्राथमिक आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. डोंगराळ, दुर्गम ठिकाणे, दळणवळणाची साधने कमी, लोकांमध्ये साक्षरतेचा अभाव, गरीबी अशी कितीतरी आव्हाने. संघविरोधी कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा विरोध हेही होतंच. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना कधीकधी मारहाणीचा सामनासुद्धा करावा लागला. अश्या थरारक अनुभवांचं वर्णन अनंतरावांनी पुस्तकात केलं आहे. ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत डगमगून ना जाता उभं राहण्याची ताकद त्यांना संघाच्या वरिष्ठांनी कशी कशी दिली ह्याचंही सविस्तर वर्णन त्यात आहे.

वनवासी क्षेत्रात काम केल्यावर सांसारिक जबाबदारी आणि संघाचं सामाजिक काम दोन्ही करता यावं म्हणून त्यांना नाशिक कार्यक्षेत्र देण्यात आलं. महिंद्र कामपणी मधली नोकरी सांभाळून ते काम करत होते. काही वर्षांनी महिंद्र कंपनी सोडून ते पुन्हा एकदा पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरले. "जनकल्याण समिती" आणि इतर संस्थांच्या माध्यमातून रक्तपेढी, रुग्णालये, आरोग्य प्रशिक्षण केंद्रे ह्यांचे जाळे त्यांनी महाराष्ट्रभर उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतर राज्यातल्या लोकांना, संस्थांना व्हावा म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. ३३ वर्षे काम पूर्ण करून त्यांनी ठरवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. अलिप्तपणे बाजूला झाले.

अनंत अनुभव घेतलेल्या अनंतरावांचं हे कथन म्हणून ... "अनंता"नुभव. अगदी सार्थ शीर्षक.

अनुक्रमणिका



डॉक्टरकी चं शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी त्यांनी आदिवासी भागातल्या आरोग्य केंद्रातच स्वतःहून मागून घेतली. तेव्हाचा विदारक अनुभव.




दुर्गम भाग आणि अपुऱ्या सुविधा असल्यामुळे डॉक्टर, नर्स हवंय त्या प्रमाणात हव्या तेव्हा उपलब्ध नसत. त्यामुळे प्राथमिक उपचारांसाठी तिथल्याच लोकांना प्रशिक्षण देऊन; "आरोग्यपेटी"तून औषधे पुरवून कामाला गती दिली गेली. त्याच धर्तीवरचा "दाई प्रशिक्षण" चा अनुभव.




राजकीय विरोधाचा मुकाबला; प्रेमाने, संयमाने तरीही खंबीरपणे




रक्तपेढीचं काम जोरात सुरु होतंच. त्यातून पुढे आलं एड्स विषयी जनजागृतीचं काम. ते सुद्धा खास संघविचारानुसार भारतीय संस्कृतीततल्या संस्कारांचा आधार घेऊन.





अनंतरावांच्या कामाचं दस्तऐवजीकरण हा संघ परिवारातल्या व्यक्तींसाठी मोठा ठेवा आहेच. पण त्या वर्तुळाबाहेरच्या पण समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या कोणालाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल; ह्यात शंका नाही. संघाबद्दल कुतूहल, आक्षेप आणि शंका असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्या पुस्तकाच्या वाचनातून संघाच्या विचारपद्धतीचं कार्यान्वयन प्रत्यक्ष कसं होतं हे बघणं नक्कीच आवडेल.

शब्दांकन आणि पुस्तकाची मांडणी करताना ती कालानुक्रमे केली आहे. तरी काही वेळा प्रसंगांची पुनरुक्ती झालेली आढळते. आरोग्याच्या कामाच्या विस्ताराची माहिती देताना व्यक्तींची नावे, संस्थांची नावे, त्यांच्या वाढीतले छोटे टप्पे ह्यांचा तपशील जरा जास्त झाला आहे असं वाटतं. पण मूळ कामाचं हे दस्तऐवजीकरण असल्यामुळे ते अनिवार्य देखील आहे. त्यामुळे त्रयस्थ वाचकाने तो तो भाग थोडा झरझर वाचून पुढे जायला हरकत नाही.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade) लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashika...