५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा (5960 Ani itar chittchakshuchamatkarik katha)




पुस्तक - ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा (5960 Ani itar chittchakshuchamatkarik katha)
लेखक - इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर (Emanuel Vincent Sander)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १८७
प्रकाशन - सांगाती प्रकाशन, ऑगस्ट २०२३
छापील किंमत - रु. २७०/-
ISBN - 978-93-5768-417-0


"लोकसत्ता"च्या ५ नोव्हेंबर च्या लोकरंग पुरवणीत "निवडू आणि वाचू आनंदे" असा लेख आला होता. ज्यात अनेक नामवंत लेखक, पत्रकार, कलाकार ह्यांनी आपल्या आवडीची ५ पुस्तके दिली होती. त्यात हृषिकेश गुप्ते ह्या प्रसिद्ध लेखकाने दिलेल्या यादीत "५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा" हे पुस्तक होतं. नेटवर त्याबद्दल बघितलं तर फार माहिती मिळाली नाही. पण लक्षात आलं की पुस्तकाचा लेखक इमॅन्युअल माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्ट मध्ये आहे. एक तरुण लेखक आहे. बहुधा हे त्याचं पाहिलंच पुस्तक. त्याच्याशी कधी थेट भेट किंवा चॅट पण कधी झालं नव्हतं. पुस्तकाचं नाव आणि त्याचा पाठमजकूर (ब्लर्ब) वाचून काहीतरी वेगळं, फँटसी, भीतीकथा अशा स्वरूपाचं लेखन आहे हे कळलं आणि उत्सुकतेने पुस्तक ऑनलाईन विकत घेतलं.

पृथ्वी, ग्रह, तारे ह्यांनी बनलेलं आपलं विश्व आहे. पण असं एकच विश्व नाही तर कितीतरी समांतर विश्व असतील. त्यात आपल्या सारखेच किंबहुना आपलीच प्रतिकृती असणारे लोक असतील. त्यांचं जीवन आपलं जीवन एकमेकांशी निगडीत असेल. काही दुष्ट शक्ती - "डार्क गॉड" ह्यांच्याकडे असीम ताकद असेल आणि ते दुसऱ्या विश्वातल्या जीवांचे आयुष्य नियंत्रित करू शकत असतील. महाबलाढ्य शक्तीधारी देव/राक्षस चित्र
विचित्ररूपधारी जीव हे एकमेकांशी ह्या विश्वांच्या सत्तेवरून झगडत असतील. ते लोकांच्या मनात शिरून; त्यांना झपाटून एकमेकांचे खून करणं, त्रास देणं, आत्महत्या करणं ह्यासाठी प्रवृत्त करतील. ह्या जगातल्या सामान्य लोकांना आपल्याशी कोण खेळ खेळतंय, कठपुतळीसारखं नाचवतंय हे कळणार नाही. आणि मग काय काय "चित्तचक्षुचमत्कारिक" घटना घडतील... त्यांच्या ह्या गोष्टी.

पण... ही पूर्वपीठिका जितकी "चित्तचक्षुचमत्कारिक" आहे तितक्या ह्या कथा अजिबात नाहीत. कारण ह्या कथांमध्ये एखादा खून किंवा हत्या घडते. पण ती कशी घडते, त्याचं पुढे काय होतं, त्यातून महाशक्ती काय डाव साधतात हे चित्र उभं करण्याऐवजी लेखकाचा पूर्ण भर प्रसंगाची शब्दबंबाळ वर्णनं, एकमेकांशी संबंध नसलेले पात्रांचे संवाद, काहीतरी abstract वाक्यं (किंबहुना absurd वाक्यं); आजच्या पोरांची भाषा दाखवण्यासाठी "XXX" ऐवजी थेट शिव्या, लैंगिक क्रियांचा विनाकारण तपशील दाखवून बोल्डनेस आणण्याचा प्रयत्न असला सगळा फापटपसारा आहे. बरंच काही लिहायचं आहे, बरंच काही लिहिलं सुद्धा आहे पण वाचकाला काही पत्ता लागला नाही पाहिजे; त्याने हवे असल्यास काही कथाबिंदू गोष्टी लक्षात ठेवावेत आणि जमलं तर आपला आपण अर्थ काढावा; असला वेडगळपणा आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका


दुसरे विश्व आणि त्यातल्या शक्तींचा परिणाम अशी वातावरण निर्मिती करणाऱ्या सुरुवातीच्या मोजक्या काही पानांपैकी



दुसऱ्या गोष्टीत कॉलेजमधली मुलं एकांकिका बसवतायत तो प्रसंग. (काही कळलं तर मला सांगा)



हे वर्णन "बोल्ड" का शृंगारिक का ओंगळ हे ज्याचं त्याने ठरवावं. ह्या खास वर्णनाने कथा काही पुढे गेली असेल असं मला वाटलं नाही 



पहिल्या दोन गोष्टी मी प्रामाणिकपणे नीट वाचल्या. लेखक जी कल्पना करतोय ती मनात ठसत नसली तरी ती तशी आहे हे धरून वाचल्या. त्यानंतरच्या कथेत जे भरताड होतं ते भराभर वाचलं. पण ना शेंडा-ना-बुडखा. मग पुढच्या गोष्टी वरवर वाचल्या. त्यातही हाच पाणचटपणा बघून पुस्तक पुढे वाचणं म्हणजे वेळ फुकट घालवणं आहे असंच वाटत राहिलं
. ह्या सगळ्या कथा स्वतंत्र असल्या तरी एकमेकांशी निगडीत आहेत असं म्हटलं आहे. म्हणून "रोचक शेवटच" थेट वाचूया म्हणजे रहस्य तरी कळेल असं वाटलं. मग पुस्तक उलटं वाचायचा प्रयत्न केला. "तरी बी न्हाईच !"
एकूण ही लक्षणं "मानाचे साहित्यिक पुरस्कार" मिळलेल्या पण मला बंडल वाटलेल्या पुस्तकांशी जुळणारी दिसली.(गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, रेत समाधी, व्हाईट टायगर, हिंदू इ.). त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कादंबरी झाली तर मला नवल वाटणार नाही.

त्यामुळे तुम्ही वाचावं असं मी सुचवणार नाही. पण वरचं वर्णन वाचून तुम्हाला वाचावंसं वाटलं किंवा तुम्ही आधीच वाचलं असेल तर तुमचा अभिप्राय मला सांगा. माझ्या डोक्यावरून हे पुस्तक गेलंय पण तुम्हाला समजलं तर मला समजावून सांगा; निराळ्या पद्धतीने हे पुस्तक वाचलं पाहिजे का हे समजावून सांगा.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-







———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

गोल्पे विभोर (Golpe Vibhor)



पुस्तक - गोल्पे विभोर (Golpe Vibhor)
लेखिका - बाणी बसू (Bani Basu)
अनुवादक - सुमती जोशी (Sumati Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा - बंगाली
पाने - १९२
प्रकाशन - रोहन प्रकाशन, सप्टेंबर २०२३
छापील किंमत - २७५ /- रु.
ISBN - 978-93-92374-89-0

बाणी बसू लिखित बंगाली कथासंग्रहाचा हा मराठी अनुवाद आहे. बाणी बसू ह्या प्रथितयश बंगाली लेखिका आहेत. त्यांची आणि अनुवादिकेची पुस्तकात दिलेली माहिती वाचून घ्या.


सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंबात घडणाऱ्या किंवा घडू शकतील असे प्रसंग, नातेसंबंध, मानवी भावभावनांची नाना रूपे ह्यांच्या भोवती कथा गुंफलेल्या आहेत. प्रत्येक कथा वेगळी आहे. त्यामुळे पुस्तक थीमबेस्ड असं नाहीये. गोष्टी विनोदी नाहीत किंवा खूप रडक्या सुद्धा नाहीत. वाचायला मजा येते आणि शेवट काहीसा अनपेक्षित असा होतो. पण तो अशक्य किंवा अतर्क्य अशा प्रकारात जातात नाही; त्यामुळे "हं... असंही होऊ शकतं" अशा भावना मनात येतात.
प्रत्येक कथेबद्दल थोडक्यात सांगतो.

१) निळ्या रंगाचा चुडीदार - एका घरात दोन शाळकरी मुली आहेत. एक घरमालकाची मुलगी आणि दुसरी घरातली मोलकरीण. घरची गृहिणी मोलकरीण मुलीच्या वयाची जाणीव ठेवून चांगलं वागवते आहे. तरी घरातली मुलगी आणि नोकराणी ह्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये फरक तर पडणारच. आपली आई नोकराचं जास्त कौतुक करते असा मुलीचा आरोप असतो. तर मालकिणीच्या मुलीशी नोकर मुलीची स्पर्धा चालू असते. लहानपणाचे हे हेवेदावे पुढे काय वळण घेतात.
२) साळींदराचं गूढ - एका डॉक्टरकडे एक इमर्जन्सी केस येते. माणूस पूर्ण रक्तबंबाळ. पूर्णपणे काट्यांनी टोचल्यासारखा. उपचारांचा उपयोग होत नाही. काही दिवसांनी अजून एक केस. हळूहळू गावोगावी अशा घटना वाढत जातात. मारणारा माणूस म्हणतो साळींदराने हल्ला केला. पण साळींदर कोणाला दिसत नाही. भरवस्तीत सुद्धा झालेल्या मृत्यूत हीच लक्षणे. काय आहे हा प्रकार ? त्यासाठी गोष्ट वाचाच.
३) झिरो कॅपिटल - पारंपरिक लोखंडाचा, भंगाराचा मोठा व्यवसाय असणाऱ्या घरातली पुढची पिढी आता वेगळ्या पद्धतीने धंदा करू पाहतेय. शून्य गुंतवणुकीतून जास्त नफा कमावण्याचा फसवणुकीचा मार्ग कसा यशस्वी होतो. कोणाचा फायदा तर कोणाचं आर्थिक आणि भावनिक नुकसान.
४) लाडाची झुपली - एक वृद्ध जोडपं आयुष्यातला एकटेपणा, कंटाळलेपणा घालवण्यासाठी कुत्र्याचं पिल्लू पाळतात. जणू घरात नवं बाळच येत. दिसामाशी वाढू लागत. मोठं हो
तं. "मुलं मोठी झाली, त्यांना शिंग फुटली"की जे होतं ते इथेही झालं तर... हे चित्रित करणारी हृद्य गोष्ट आहे.
५) पिसिमा आत्याई - वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची चारपाच मुलं एकत्र जमली आहेत. संपत्तीची वाटणी तर होईलच पण वडिलांच्या वृद्ध बहिणीचा - आत्याईचा - सांभाळ कोणी करायचा ? त्याच्या नफ्यातोट्याची गणितं !
६) विकल्प की अविकल्प - एक सुतार आपल्या कामातले बारकावे एका तरुण मुलीला समजावून सांगतोय. जणू जीवनाचं तत्त्वज्ञानच सांगतोय.
७) जातीचा गर्व - दोन शेजारी मुलांमधली भांडणं आणि त्यात अनपेक्षितपणे डोकावणारी जात.
८) भविष्यातली एंजल सिटी - ही एक कल्पनारम्य (फँटसी) कथा आहे. भविष्यात कधीतरी असं घडतं आहे की .. अमेरिकेसारख्या लांबवरच्या एंजल सिटीतले तरुण पुन्हा एकदा दुर्गापूजा साजरी करतायत जुने व्हिडीओ, जुनी डॉक्युमेंट्स बघून मूर्ती आणि प्रथांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत. कसा विचार करतील ते !
९) विझून गेलेली चंद्रकोर - दुसऱ्याचं दुःख बघून कळवळणारी, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांना मदत करायला
 धावणारी बायको सुरुवातीला हळव्या मनाची प्रेमळ वाटली होती. पण "अति झालं" की तेही त्रासदायकच. त्याचा उपाय जर आणखी त्रासदायक झाला तर.
१०) उपेक्षित गंगाजल - दुसऱ्या जातीची असल्यामुळे नव्या सूनबाईचं स्वागत सासरी फार मनापासून झालं नाही. पण शेजारच्या आदरणीय ब्राह्मण आजोबांनी तिचे उच्चशिक्षण आणि चांगली वागणूक बघून तिला मानाने वागवायला सुरुवात केली. मग त्याचा परिणाम सासरच्यांवर होईल का ? हा मान कायमस्वरूपी राहील का ?
११) प्रेमातली रिस्क - नाकासमोर चालणारा तरुण. आणि अनपेक्षितपणे त्याला करतंय कोणीतरी "प्रपोज". घेईल का तो "हो" म्हणण्याची "रिस्क"
१२) शमलेली शलाका - कॉलेज तरुण तरुणींचं एकतर्फी प्रेम, नकार, त्याचा सल आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा गाठ.

काही गोष्टींची पानं वाचा म्हणजे लेखनशैलीची, अनुवादाची कल्पना येईल

"साळींदराचं गूढ" मधील एक प्रसंग



"उपेक्षित गंगाजल" मधील एक प्रसंग




"विकल्प की अविकल्प" मधील संवाद



अशा ह्या १२ गोष्टी. कथांचा रहस्यभेद न करता थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. "साळींदराचं गूढ" , "लाडाची झुपली", "उपेक्षित गंगाजल" विशेष आवडल्या. "विकल्प की अविकल्प" मधला शेवट समजला नाही. तर "जातीचा गर्व" अर्धवटच संपली आहे असं वाटलं. बाकी गोष्टींचे विषय फार भारी असे नाहीत पण वाचायला रंजक आहेत. व्यक्ती आणि प्रसंग वर्णनं उत्सुकता वाढवणारी आहेत. योग्य शब्दांत वर्णन आहे, फापटपसारा नाही.

ह्या आधी मी ज्या बंगाली गोष्टी वाचल्या होत्या त्या रवींद्रनाथ किंवा त्याकाळातील लेखकांच्या होत्या. त्यामुळे बंगाली गोष्ट म्हटल्यावर
 १०० वर्षांपूर्वीचा बंगाल डोळ्यांसमोर ठेवून मी वाचायला सुरुवात केली आणि एकदम आधुनिक उल्लेख आल्यावर लक्षात आलं की ह्या चालू काळातल्या गोष्टी आहेत. मग एक फरक जाणवला कि जुन्या गोष्टींतून जसा त्यावेळच्या बंगालचं चित्र एक चित्र - धूसर का होईना - पण उभं राहत होतं. तेव्हाचा निसर्ग, खास जीवनपद्धती, समाजव्यवस्था समजत होती. तसं ह्या पुस्तकात झालं नाही. "बंगाली गोष्टींमधला बंगाल" बघण्याच्या माझ्या पूर्वग्रहामुळे माझा थोडा हिरमोड झाला. तसं म्हटलं तर ही जमेची बाजू आहे. वर्णनात थोडाफार फरक करून ह्याच गोष्टी पुणे, मुंबई, मद्रास, कुठेही दाखवता आल्या असत्या. कारण हे लिखाण "प्रांत-संकुचित"नाही. कुठलाही रसिक त्याच्याशी जोडून घेऊ शकतो.

बहुतांश अनुवाद चांगला झाला आहे. काही काही ठिकाणी अगदी शब्दश: भाषांतर झालं आहे. आमच्या गल्लीतले किंवा आमच्या परिसरातले लोक म्हणण्याऐवजी "पाड्यातले" लोक असा उल्लेख आहे. कदाचित हा शब्द बंगालीत वापरला जात असावा. पण मराठीत आपण "पाडा" म्हटलं कि "आदिवासी पाडा", गावाबाहेरची छोटी वस्ती असं दृश्य समोर येतं. पण इथे शहरांतलं वर्णन आहे. "मुखर्जी गृहिणीने लोकरीचा गोळा उचलला". असं वाक्य आहे. "मुखर्जी गृहिणी" ? त्या ऐवजी "सौ. मुखर्जींनी" किंवा "मुखर्जीबाईंनी" असं जास्त चांगलं वाटलं असतं का ? बंगाली लोक एकेमेकांना टोपणनावाने फार हाक मारतात. पण आपल्याला त्याची सवय नसल्यामुळे हे कोण नवीन पात्र गोष्टीत आलं असा गोंधळ क्षणभर उडतो. एका गोष्टीत "बुढीमाची आठवण आली" असं वाचल्यावर त्या बाईंना आपल्या आईची, आजीची आठवण आली असेल असा माझा समाज झाला. पण पुढे वाचत राहिल्यावर कळलं. त्यांच्या लहान मुलीचं हे टोपणनाव आहे! काही तळटीप देऊन 
किंवा अनुवादस्वांतत्र्य घेऊन "गंपू, चंपू, गोट्या, राजू" अशी आपल्या सवयीची टोपणनावं वापरता आली असती का 😄? आणि हो, गंमत म्हणजे "गोल्पे विभोर" म्हणजे काय हे काही पूर्ण पुस्तकात कळलं नाही.

तर असं हे पुस्तकाचं एकूण स्वरूप आहे. इतर भाषांतले प्रसिद्ध लेखन कसं आहे हे समजून घ्यायला चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल.




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-







———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

एबीपी माझा दिवाळी अंक २०२३ (ABP Majha Diwali special edition 2023)




पुस्तक - एबीपी माझा दिवाळी अंक २०२३ (ABP Majha Diwali Ank 2023)
संपादक - राजीव खांडेकर (Rajeev Khandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २००
छापील किंमत - रु. २५०/-

एक नोव्हेंबर पासून माझ्या वाचनालयात दिवाळी अंक मिळायला सुरुवात झाली. शंभरच्या वर दिवाळी अंक. एकाहून एक दर्जेदार. त्यामुळे काय घेऊ काय नाही असं होतं. त्यात दिवाळी अंक खूप मोठाले असतात. घेतलेला अंक पूर्ण वाचायचा म्हटला तर फारच थोडे अंक वाचून होतील. मग पुढचा अंक वाचायच्या उत्सुकतेपोटी अंक चाळला जातो, आवडीचं वाचलं जातं, महत्त्चाचं वाचलं जातं आणि उरलेलं पुढच्या वेळी वाचू असं होतं. त्यामुळे एखाद्या अंकाचं अर्धवट वाचून परीक्षण लिहिण्यात अर्थ नाही. तसंच दिवाळी अंकात कथा, कविता, व्यंगचित्र, नाना प्रकारचे लेख असं सगळं असल्यामुळे पुस्तकासारखा त्याचा गोळीबंद परिचय/परीक्षण मला देता येत नाही. मग शक्यतो ते लिहिणं टाळतो. म्हणूनच ह्या वर्षी "उत्तम अनुवाद" आणि "मौज" असेच चाळून-वाचून झाले. पण त्याविषयी लिहिलं नाही. पण "एबीपी माझा" चा दिवाळी अंक बहुतांश वाचून झाला. आवडला. इतरांना त्याबद्दल सांगावं असं वाटलं म्हणून थोडक्यात परिचय.

कथा-कविता-लेख असं ह्याचं स्वरूप आहे. एकाच एक संकल्पनेभोवती(थीम बेस्ड) असा अंक नाहीये. त्यामुळे सगळ्यांत विविधता आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.
 


ह्यातल्या निवडक मजकूराबद्दल लिहितो.
"कथा" विभागात रवींद्र शोभणे ह्यांची "कूस" कथा आहे. "सरोगेट मदर" अर्थात कायदेशीर कराराद्वारे गर्भाशय भाड्याने देऊन दुसऱ्याचं मूल आपल्या पोटात वाढवणे. ह्याचं अनुभव विश्व मांडणारी ही छान गोष्ट आहे.
लक्ष्मीकांत देशमुख हयांची "बाबुल की दुवाए लेती जा" ही एका राजकीय पुढाऱ्याची दोन रूपे दाखवते. एक समाजापुढे दिसणारे रूप आणि दुसरे घरात. बाहेर कुटुंबसंस्थेचा आदर करणारा हिंदुत्त्ववादी पुढारी पण वैयक्तिक आयुष्यात फार चांगले कौटुंबिक संबंध नाहीत. असं का झालं, "समलिंगी विवाहाला"विरोध करण्याच्या आंदोलनाचा घरगुती आयुष्यावर काय परिणाम झाला.
अजूनही काही गोष्टी अंकात आहेत.
"कूस" मधली पाने उदाहरणादाखल.


मराठीचा शब्दकोश बनवण्यासाठी १८३० च्या सुमारास इंग्रज अधिकारी मोल्सवर्थने किती कष्ट घेतले ह्यावरचा लेख आहे. मधू दंडवते ह्यांचे व्यक्तिचित्रण आहे. विनोद तावडे ह्यांनी "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे" काम करताना आलेले मदनदासजी देवी ह्यांचे अनुभव लिहिले आहेत.

"ललित" विभाग सुद्धा छान आहे. प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन ह्यांनी त्यांच्या काही पेंटिंगच्या जन्मकथा सांगितल्या आहेत. पेंटिंग का काढावंसं वाटलं, काय भावना मनात आल्या हे सांगून त्यांनी चित्रकाराच्या मनात-डोक्यात डोकावण्याची संधी आपल्याला दिली आहे. प्रसाद खांडेकर आणि सचिन मोटे ही नवे "महाराष्ट्राची हास्यजत्रा"मुळे घराघरात पोचली आहेत. त्यांचे आणि वृंदा भार्गवे ह्यांचे मजेशीर लेख आहेत. इंस्टाग्राम वर रील टाकण्याचा सोस, कोरोना काळात "ऑनलाईन" शिक्षण पद्धतीत अभ्यास टाळण्याचे मुलांचे बहाणे, थायलंडला जाऊन "खास मसाज" घेण्याची स्वप्नं बघणारा माणसाची फजिती असे खुसखुशीत विषय आहेत.

अन्वर हुसेन ह्यांच्या लेखातली दोन पाने


मी कवितांच्या फार नदी लागत नाही. त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. अनुक्रमणिकेवरून कोणाच्या कविता आहेत हे तुम्हाला कळलं असेल.

"लेख" विभागसुद्धा माहितीपूर्ण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वरचा दीर्घ लेख आहे. ज्यांना ह्या विषयाबद्दल माहिती नाही त्यांना ह्याची चांगली तोंडओळख होईल. किल्लारी भूकंपानंतर झालेल्या पुनर्वसनातील त्रुटींवर अतुल देऊळगावकर ह्यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही वर्षांत चांगले मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. चांगले चालतायत. "झी टॉकीज", "जियो सिनेमा" कंपनीच्या माध्यमातून निखिल साने ह्यांनी अशा चित्रपटांच्या निर्मितीत मोलाचा वाटा दिला आहे. त्यांच्या अशी कोट्यांची कमाई करणाऱ्या चित्रपटांचा आढावा सान्यांनी घेतला आहे. अजून काही लेख आहेत.
AI बद्दलच्या लेखाचा शेवट


खाद्ययात्रा विभागात महाराष्ट्रातल्या ५ लोकप्रिय पदार्थांची माहिती आहे जे त्या त्या ठिकाणी ठिकाणी खूप प्रसिद्ध आहेत; पण इतरत्र फारसे मिळत नाहीत. ते वाचून लवकर तिकडे खायला जायची इच्छा होईल.


तर असा हा वैविध्यपूर्ण, वाचनीय, रंगीत, गुळगुळीत दिवाळी अंक तुम्हालाही वाचायला आवडेल.




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-







———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

Going Viral (गोइंग व्हायरल)



पुस्तक - Going Viral (गोइंग व्हायरल)
लेखक - Balram Bhargava (बलराम भार्गव)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १९७
प्रकाशन - रूपा पब्लिकेशन, २०२१
ISBN - 978-93-5520-022-8
छापील किंमत - रु. २९५/-

२०२० साली भारतात आलेल्या कोरोना साथीने प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. अनेकांचे निधन झाले, कोणी आप्त स्वकीय गमावले, व्यवसाय उद्योग ठप्प झाले. लॉकडाऊन सारख्या अभूतपूर्व परिस्थितीचा अनुभव सर्वांना घ्यावा लागला. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून काम केले. पण डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि सुरक्षाव्यवस्था, शेतकरी, मालाची ने-आण करणारे वाहतूकदार, अत्यावश्यक कर्मचारी हे मात्र घरून काम करू शकत नाहीत. त्यांना आपल्या कार्यस्थळी जावंच लागत होतं. पुढे लसीचा शोध लागला. भारतीय लस बाजारात आली. सरकारद्वारे मोठ्याप्रमाणावर लसीकरण राबवण्यात आले. त्यातून दीडेक वर्षांनी साथीचा प्रभाव कमी झाला. निर्बंध शिथिल झाले. परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. ह्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती लसीकरणाने आणि ती निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी. म्हणूनच कोरोनाकाळात पडद्यामागे राहून आपले कर्तव्य निभावणाऱ्या ह्या शास्त्रज्ञांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल आपली समज वाढवणे हे आपले कर्तव्यच ठरते. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद चे मॅनेजिंग डायरेक्टर असणाऱ्या बलराम भार्गव ह्यांनी लिहिलेले "गोइंग व्हायरल" पुस्तक त्यात आपल्याला चांगले उपयोगी आहे.

२०१९ साली चीन मध्ये कोरोना आला त्या बातम्या आपण ऐकत होतो. मग युरोपात उडालेल्या हाहाकाराच्या बातम्या आपण ऐकल्या. भारतीयांना थेट फटका तेव्हा बसला जेव्हा देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली गेली. पण आपल्या सरकारी यंत्रणा, ICMR आणि संबंधित संशोधन संस्था आधीपासूनच कामाला लागल्या होत्या. युद्धपातळीवर काम करत होत्या. ते काम कसं कसं झालं, कुठल्या अडचणी येत होत्या, त्यावर शास्त्रज्ञांनी कशी मात केली, सरकार-प्रशासन कसं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं होतं ह्या वस्तुस्थितीचं वर्णन पुस्तकात केलं आहे. "सरकारी काम आणि सहा महिने थांब" हा आपला पिढ्यांपिढ्यांचा अनुभव. पण कोरोनायुद्धात सहा महिनेच काय सहा दिवसही न थांबता ही प्रणाली धडाक्याने काम करत होती. हे ह्या पुस्तकाने अधोरेखित केलं आहे. महामारीत झालेले मृत्यू, त्रास हे कोणीच नाकारणार नाही. पण पूर्ण यंत्रणा अशी राबली म्हणून इतक्यावरच निभावलं अन्यथा अतिभयंकर स्थिती उद्भवली असती; हे जाणवून आपल्या वेदनांवर नक्कीच फुंकर मारली जाईल.

आता ह्या पुस्तकातल्या प्रकरणांबद्दल एकेक करून बघूया.

Preparing for apocalypse - चीन आणि इतर देशांतल्या कोरोना स्थितीवर पहिल्यापासून भारत सरकार आणि ICMR लक्ष ठेवून होते. त्यातूनच बाहेरून आलेल्यांची चाचणी करणं सुरु झालं. विषाणूवर संशोधन सुद्धा सुरु झालं. सरकार तज्ज्ञांची मदत घेत होतं आणि मत विचारत होतं. संपूर्ण टाळेबंदी आणि परदेशी प्रवासावर बंदीचे डॉ उपाय तज्ज्ञांनीच सुचवले. अशा सुरुवातीच्या दिवसांबद्दल काही पानं ह्या प्रकरणात आहेत.

Coronavirus the science explained - विषाणू म्हणजे काय, तो कसा पसरतो ह्याचं सामान्य विज्ञान आधी सोप्या शब्दांत समजावून सांगितलं आहे. संशयित रुग्ण्याच्या रक्तातून किंवा इतर स्रावांत दिसणारे विषाणू वेगळे काढले जातात. मग प्रयोगशाळेतल्या रसायनात त्याची मुद्दामून वाढ केली जाते. असं "व्हायरस सूप" मग पुढच्या टप्प्यावर तपासणीसाठी पाठवलं जातं. "वर्णनाशी मिळत जुळता" गुन्हेगार विषाणू हाच आहे का हे बघितलं जातं. विषाणूला वेगळं काढणं- "isolating"- एकदा जमलं की मग त्याची कंबख्ती भरलीच समजा. आपल्या शास्त्रज्ञांनी ही करामत मार्च २०२० मध्येच केली. पण Its easier said than done. शास्त्रज्ञ कसे दिवसरात्र एक करत होते आणि तो "युरेका क्षण" कसा होता त्याबद्दल ह्या प्रकरणात वाचा.

"Testing Times" आणि "The Game Changer" - कोरोना टाळण्याचा उपाय सापडला नव्हता. त्यामुळे साथ रोखण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे साथ पसरू न देणे. म्हणजेच ज्याला कोरोना झालाय त्याला इतरांपासून वेगळे काढणे. पण विषाणूच नवीन, तर त्याला शोधून काढायचं तंत्र तर समजायला हवं. ते समजलं की तशा तपासण्या करणारी उपकरणं आणि यंत्र तयार व्हायला हवीत. (आठवतायत ना नाकात घातलेल्या काड्या !). ती कारखान्यात तयार होणार कशी ? कारण देशभर टाळेबंदी. त्यासाठी लागणारा कच्चा माल परदेशातून येणार कसा ? कारण प्रवासावर निर्बंध ? यंत्र तयार झाली तरी देशभर पोचणार कशी ? कारण देशभर टाळेबंदी. पोचली तरी ती वापरून "सॅम्पल" गोळा करणारे कुशल मनुष्यबळ गावोगावी कसे तयार होणार ? अभूतपूर्व चक्रव्यूहात आपण सगळे होतो. पण शास्त्रज्ञ-कारखानदार-कच्चा माल पुरवठादार-वितरक-सरकार सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर कशी मात केली. innovative पद्धती शोधल्या गेल्या. RT-PCR हा आपल्या ओळखीचा झालेला शब्द त्यातलाच एक अभिनव प्रकार. सरकारने भराभर परवानग्या दिल्या, भारतातच त्या काड्या आणि रसायनं तयार झाली. सुरुवातीला फक्त पुण्यातल्या "विषाणू संस्थेत" तपासणी व्हायची तशा अनेक लॅब्स देशात उघडल्या. कोट्यवधी लोकांची तपासणी झाली. हे तपशील, अडचणी आणि त्यावर शोधलेले मार्ग तुम्ही ह्या प्रकरणात वाचू शकाल.

Why research matters - उपचार असो वा लस ते ठरवण्यासाठी प्रयोग आणि संशोघन आवश्यक आहे. टाळेबंदीच्या काळात "काळाशी स्पर्धा" करत संशोधन व्यवस्था कशी वाढवली, शास्त्रज्ञांनी कसे काम केले ह्याबद्दल थोडंसं आहे. साथ चालू असताना मध्यंतरी "प्लाझ्मा थेरपी" चा वापर सुरु झाला. हा वापर सुद्धा एक तर्कशुद्ध असा पर्याय होता. पण तो नक्की काम करतो का हे सिद्ध करण्याइतपत वेळ आपल्या हातात नव्हता. तरी त्यावर कसे संशोधन झाले ह्याचे ओझरते वर्णन आहे.

An Indian Vaccine : From dream to roll out - एखाद्या रोगावरची लस कशी काम करते; लसीचे वेगवेगळे प्रकार कोणते ह्याचं सामान्य विज्ञान आधी समजावलं आहे. मग भारताने "निष्क्रिय विषाणू" - inactive virus प्रकार का निवडला, लस कशी तयार केली, त्याचे आधी उंदरांसारख्या लहान प्राण्यांवर आणि मग माकडांवर प्रयोग झाले हे सांगितलं आहे. "भारत बायोटेक" नावाच्या खाजगी पण नावाजलेल्या कंपनीशी करार करून संशोधक व उद्योजक एकत्र कामाला लागले. अर्थात "पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप" मधला सुसंवाद कसा साधला गेला त्याविषयी सुद्धा लिहिलं आहे.

The moment of Truth - माकडांवर झालेल्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसल्यावर "फेज ३" अर्थात माणसांवर प्रयोग सुरु झाले. पण हे सगळे प्रयोग पूर्ण होऊन निकाल हाती येईपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. म्हणून सरकारने "आपत्कालीन परिस्थिती" नियमानुसार लस माणसांना द्यायला परवानगी दिली. पण हा देशवासीयांच्या जीवाशी खेळ नव्हता तर "साईड इफेक्ट" नाहीत किंवा गंभीर नाहीत; पण फायदा होण्याची शक्यता जास्त आहे हे शास्त्रज्ञांनी पटवून दिल्यामुळेच सार्वत्रिक लसीकरणाचा. पुढे माणसांवर झालेल्या प्रयोगांचे निष्कर्ष सुद्धा सकारात्मक आले. ही प्रक्रिया कशी झाली ते ह्या प्रकरणात आहे.

Rise of a vaccine Superpower - देशी लशीची मोठ्या प्रमामानावर निर्मिती करण्यात आली. कोट्यवधी लोकांना मोफत अथवा स्वस्तदरात लस दिली गेली. जगभरात ती निर्यात करण्यात आली. आणि "लस महासत्ता"म्हणून आपला उदय झाला. ह्या आधीही आपण कुठल्या लसी बनवत होतो, लस निर्मितीत, निर्यातीत व इतर देशांतल्या वापरात भारतीय लसींचं प्रमाण मोठं आहे. त्याबद्दल थोडी माहिती आहे. लसीकरण सुरु झाल्यावर सुरुवातीला लोकांनी अविश्वास दाखवला तेव्हा लोकांचे शंकानिरसन करण्यासाठी ICMR ला योग्य माहिती देण्यासाठी सुद्धा पुढे यावं लागलं. साथीच्या काळात वेगवेगळे उपचारपद्धती पुढे आल्या. ज्या उपायांचा फायदा दिसतोय पण तोटा दिसत नाही अशा उपचारांना मान्यता देण्यात आले. पण पुढच्या प्रयोगांतून, निरीक्षणांतून ते प्रकार उपयुक्त सिद्ध झाले नाहीत तर ते मागे घेण्यात आले. लसीचे डेल्टा आणि इतर व्हेरियंट बद्दलचे निष्कर्ष सुद्धा प्रकाशित करण्यात आले. एकूणच शास्त्रज्ञांना ह्यावेळी "संवाद साधक" सुद्धा व्हावं लागलं.

उरलेल्या पानांत तळटीपांबद्दल माहिती (नोट्स) आणि "index" आहे.

आता काही पाने वाचा

अनुक्रमणिका


लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


Isolating the Virus




"भारत बायोटेक"शी सहकार्य




लस निर्मितीचा काळानुक्रम



पुस्तकाची भाषा सोपी आहे. वैज्ञानिक तपशील सहज समतील अशा भाषेत आणि थोडक्यात मांडले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य आणि संशोधकांची धावपळ, तारांबळ नैतिक द्विधा अवस्था वाचकांपर्यंत टोकदारपणे पोचेल असं वर्णन आहे. पण ते कुठेही सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा "आम्ही किती महान" हे दाखवण्यासाठी लिहिलेलं वाटत नाही. त्यातून ह्या महान संशोधकांबद्दल आदर दुणावतो. केंद्र सरकार आणि प्रशासन ह्यांनी केलेल्या सहकार्याची उदाहरणे आहेत. पण "पंतप्रधान" असा उल्लेख एक दोनदाच आला आहे. "मोदी" असा उल्लेख मला आढळला नाही. त्यादृष्टीने हे सरकार किंवा भाजप ह्यांचा "प्रोपगंडा" वाटत नाही. परदेशी लस कंपन्या, औषध कंपन्या ह्यांचं सहकार्य किंवा विरोध; त्यातलं राजकारण, काही किस्से; आतल्या खबरी, गौप्यस्फोट, आरोप असा ही काही भाग नाही. त्यादृष्टीने अजिबात सनसनाटी नाही. सर्वसामान्यांना माहिती देणारं शुद्ध-सात्विक "academic" पुस्तक आहे. भारतातल्या सामाजिक-राजकीय समस्या, त्रास, भ्रष्टाचार ह्यांच्याबद्दल आपण नेहमीच लिहत , वाचत असतो. सरकारला-प्रशासनाला शिव्या घालत असतो. जे योग्यच आहे. पण कोरोना काळात ह्याच व्यवस्थेने अभूतपूर्व काम केलं त्याचं कौतुकही आपण केलं पाहिजे. "युद्ध काळात" एकत्र येऊन देदीप्यमान कामगिरी करणारे आपण "शांततेच्या काळात" इतके विस्कळीत आणि विचित्र का वागतो? ह्या रोगावरची लस कुठला शास्त्रज्ञ शोधून काढेल का ? असा प्रश्न हे पुस्तक वाचताना मनात आला.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-







———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...