कुल्फी दिवाळी अंक २०२३ Kulfi Diwali Ank 2023



पुस्तक - कुल्फी दिवाळी अंक २०२३ (Kulfi Diwali Ank 2023)
संपादक - ऋषिकेश दाभोळकर (Rushikesh Dabholkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ८२
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - २२०

वाचनालयात दिवाळी अंक चाळताना नजर गेली ह्या अंकावर. नाव वेगळंच... कुल्फी. आकार वेगळा चौरसाकर..आणि वर कार्टून/अर्कचित्र. धमाल करणारी मुलं. ते बघूनच हसू आलं आणि आत काय आहे बघूया म्हणून मासिक हातात घेतलं. सहज पानं चाळली. तर पानोपानी रंगीबेरंगी पेंटिंग्ज. काही वास्तवदर्शी तर काही अर्कचित्र. डोळ्यात भरणारे रंग, मनोवेधक मांडणी आणि उच्च दर्जाची कला बघून मन मोहून गेलं. लहान मुलांसाठीचा दिवाळी अंक आहे हे कळत होतं पण इतका सुबक, सुंदर की मोठ्यांनाही त्याचं रूपडं आकर्षित करेल असं दिसलं.

मुलांसाठी इतकी मेहनत घेऊन, विचार करून, खर्च करून बनवलेला हा दिवाळी अंक बघून माझ्यातलं लहान मूल जागं झालं. आणि मी अंक घरी आणला.

आता तुम्हीच ही काही पानं बघा म्हणजे तुम्हाला सुध्दा माझं म्हणणं पटेल.













ह्या मासिकात गोष्टी आहेत. प्रवास वर्णन आहे. एक विज्ञान कथा आहे. मुलांसाठी गुलाजारांनी लिहिलेल्या पुस्तक संचाची ओळख करून दिली आहे. प्रमाण भाषेप्रमाणे मराठीच्या बोलींतल्या गोष्टी आहेत. मुलांचा एक ग्रुप पोटात शिरतो आणि आपली पचनसंस्था एखाद्या "फॅक्टरी व्हिजिट" प्रमाणे बघतो अशी कल्पना करून माहितीपर लेख आहे. कुमार गंधर्व ह्यांच्या गाण्याची ओळख लहानपणी कशी झाली असा एक लेख आहे.

एक मला आवडलं की नेहमीप्रमाणे प्राण्यांच्या गोष्टी - माणसांच्या ऐवजी प्राणी पात्र म्हणून दाखवायच्या - असा प्रकार इथे नाही. तर खऱ्याखुऱ्या माणसांच्या खऱ्याखुऱ्या घटनांच्या गोष्टी आहेत. सुपर हिरो आणि कार्टून नाहीत. थेट "तात्पर्य" सांगणाऱ्या नीतीकथा नाहीत. तरी काहीतरी सांगणाऱ्या गोष्टी आहेत. आपलं आपण ते शोधायचं आहे.

सगळाच मजकूर खूप धमाल आहेत असं नाही. पण वेगवेगळी भावविश्वे नवे अनुभव मुलांसमोर सादर करणारा आहे. पाचवी-सातवी पुढच्या मुलांना स्वतःला नीट समजेल. लहान मुलांना मात्र मोठ्या व्यक्तीने वाचून दाखवून, थोडं समजावून सांगायला लागेल. थोडं गंभीर, थोडं डोक्याला चालना देणारं वेगळ्या धाटणीचं हे लेखन आहे.

मासिकात दिलेल्या माहितीनुसार ह्या नियतकालिकाचे वर्षात तीन अंक निघतात (उन्हाळी, पावसाळी आणि दिवाळी). हल्ली कोणी वाचत नाही, इंग्लिश मिडीयम मुळे मुलांना मराठी वाचता येत नाही, समजत नाही; अशी रड सगळीकडे चालू असताना मराठी भाषेत मुलांसाठी इतके उच्च निर्मितीमूल्य असणारा दिवाळी अंक काढणाऱ्या कुल्फीच्या निर्मात्यांच्या धाडसाला वंदन. त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रभर पोचो, त्यांना चांगला प्रतिसाद मिळो आणि हा उपक्रम दीर्घायुषी ठरो ही माझी प्रार्थना. परिचय लिहून ही माहिती प्रसारित करण्यात माझा खारीचा वाटा.

मला अंक वाचनालयात मिळाला. तुम्हाला कुठे उपलब्ध होतो आहे का पहा. नाहीतर पुढे दिलेल्या माहितीनुसार "कुल्फी"च्या टीमशी संपर्क साधून थेट त्यांच्याकडून मिळतोय का बघा.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

रुळानुबंध (Rulanubandh)



पुस्तक - रुळानुबंध (Rulanubandh)
लेखक - गणेश मनोहर कुलकर्णी (Ganesh Manohar Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४६
प्रकाशन - शब्दमल्हार प्रकाशन. ऑक्टोबर २०२३
ISBN - 978-93-91807-24-5
छापील किंमत - २६०/-

"झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी... पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया !" हे सगळ्यांचं आवडतं बालगीत. रेल्वे प्रवास करताना खिडकीच्या बाहेरून पळती झाडे, नवनवीन गावे, बदलती स्टेशने, त्याच्यावरची माणसे व विक्रेते, वल्ली सहप्रवासी, त्यांच्याशी गप्पा, गर्दी-गोंधळ अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण रेल्वे प्रवासाचा आनंद घेत असतो. खिडकीतून बाहेर बघताना इतकी मजा येते, तर थेट इंजिनात बसल्यावर कसं वाटत असेल? हा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावला असेलच. रेल्वेमध्ये ज्यांच्या ओळखी असतील किंवा काही खास परवानगी मिळवून हा अनुभव घेणे शक्य असेल अशा लोकांनी रेल्वे ड्रायव्हर बरोबर प्रवास करूनही बघितला असेल. पण असे फार कमीच ऐकू येते. त्यामुळे प्रत्यक्ष बसायला मिळाले नाही तरी इंजिनात बसण्याचा अनुभव कसा असतो ह्याची उत्सुकता नक्कीच असेल. आपली हीच उत्सुकता पूर्ण करण्याचं काम हे पुस्तक करत आहे.

पुस्तकाचे लेखक गणेश कुलकर्णी हे पश्चिम रेल्वेच्या पश्चिम रेल्वेत जलदगती गाड्या (एक्सप्रेस) यांचे इंजिन चालक आहेत. गाडी चालवताना कसं सतर्क रहावं लागतं, काय काय गोष्टी समोर दिसतात, काय घटना घडतात, कशा प्रकारचा मानसिक ताणतणाव झेलावा लागतो इ. चं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. वेगवेगळ्या नियतकालिकांत लेखकाने आपले अनुभवविश्व मांडणारे लेख लिहिले आहेत. असे हे पूर्वप्रसिद्ध लेख या पुस्तकात संग्रहित करून वाचकांसमोर सादर झाले आहेत.

इंजिनचालक गाडी चालवतो म्हणजे हिरवा सिग्नल दिसला की वेग वाढवायचा, लाल सिग्नल दिसला की गाडी थांबवायची आणि कोणी रूळ ओलांडताना समोर दिसलं की हॉर्न वाजवून त्याला सावध करायचं अशी या कामाबद्दलची माझी साधी सोपी कल्पना. पण जितकं हे साधं वाटतं तितकं ते साधं नाही. कारण सतत सिग्नल कडे लक्ष ठेवणं, त्यानुसार गाडीचा वेग कमी जास्त करणं, आजूबाजूला रेल्वे संबंधित जी चिन्ह असतात ते वाचून त्याप्रमाणे कृतीणं कर हे खूप एकाग्रतेचं काम आहे. त्यातही इंजिनात इंधन सतत जळत असतं त्यामुळे इंजिन तापलेलं असतं. दिवसाचा प्रवास असेल तर उन्हामुळे ते आणखी तापणार. अशा परिस्थितीत आपल्या ड्युटीच्या वेळेत पूर्ण वेळ शरीर आणि मन सतर्क ठेवून काम करायचं, जर त्यात काही चूक झाली तर स्वतःचे आणि गाडीतल्या हजारो प्रवासांचे प्राण धोक्यात. असं हे कामाचं अतिशय आव्हानात्मक स्वरूप लेखकाने आपल्यासमोर प्रभावीपणे मांडलं आहे.

रेल्वेच्या गाडीखाली येऊन होणाऱ्या अपघाताच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. ते वाचून आपण हळहळतो. पण ज्या गाडीखाली हा अपघात होतो त्या गाडीच्या चालकाची अवस्था कशी होत असेल? समोर व्यक्तीचे मरण दिसतंय पण काहीच करू शकत नाही. गाडीचा ब्रेक अचानक दाबला तर गाडी रुळावरून घसरेल आणि एका व्यक्तीला वाचवायच्या नादात शेकडो लोक मृत्युमुखी पडतील. त्यामुळे मनावर दगड ठेवून गाडी पुढे हाकावीच लागते आणि गाडीचा वेग कमी होऊन गाडी पुढे थांबवली जाते. आणि मग त्या छिन्नविछिन्न झालेल्या देहाची वर्दी पोलिसात द्यायची. रुग्णवाहिका बोलवायची. जर इंजिनामध्ये त्यामुळे काही अडकले असेल तर ते स्वतःच्या हातानेच काढायचे. असला भयंकर, भीतीदायक, नकोसा अनुभव दुर्दैवाने इंजिनचालकाला पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. असे स्वतःचे आणि इतर चालकांचे अनुभव लेखकाने सांगितले आहेत. अपघातांचीच दुसरी बाजू आहे आत्महत्या. आत्महत्या करायला आलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे काही यशस्वी आणि काही यशस्वी प्रयत्न लेखकाने दिले आहेत. ते वाचताना अंगावर शहरा येतो; डोळ्यात पाणी येतं.

काम संपलं की इंजिनचालकांसाठी काय सोयी असतात, तिथे वल्ली ड्रायव्हर कसे भेटतात, कामाच्या स्वरूपाचा शरीरावर कसा परिणाम होतो, कटुंबिक आयुष्यही "डिस्टर्ब" असतं, मग हे ताण-तणाव लेखक कसे घालवतो ह्याचे पण अनुभव आहेत. इंजिनचालकालाच्या कामाची ही गंभीर बाजू जशी आहे तशीच या कामात येणारे आनंददायक अनुभव सुद्धा आहेत. इंजिनमधून दिसणारी सुंदर निसर्ग दृश्ये व बदलणारे हवामान ह्यांचा अनुभव येत असतो. त्याचे छान वर्णन लेखकाने केले आहे.

फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रेल्वे लेखकाच्या आयुष्यात नाही तर रेल्वे हा त्याच्या अभ्यासाचा, आकर्षणाचा आणि आनंदाचा सुद्धा भाग आहे हे पुस्तकातले काही लेख वाचून कळतं. "युद्ध आणि रेल्वे" या लेखात रेल्वेच्या जागतिक इतिहासावरती एक नजर टाकली आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक आणि त्यातही लष्करी साधनसामग्री, कुमक आणि सैन्य यांची नेआण करण्यासाठी रेल्वे लाईन टाकल्या गेल्या हे लेखकाने स्पष्ट केलं आहे. युरोपियन युद्धांमध्ये व महायुद्धांमध्ये रेल्वेचा सामारिक वापर कसा केला गेला, त्यात झालेल्या त्रुटी किंवा गडबडीमुळे युद्धही हरलं गेलं अशी अपरिचित उदाहरणं लेखकाने दिली आहेत.

"चित्रपट आणि रेल्वे" या लेखात मराठी हिंदी चित्रपटांमध्ये रेल्वेचा कसा वापर झाला आहे, दृश्यांमध्ये रेल्वे कशी दिसते, काही वेळा रेल्वेच्या आजूबाजूला कथानक कसं घडतं, रेल्वेत काय काय चित्रित झालं आहे याचा मागवा घेतला आहे.

"यात्रेतली गुन्हेगारी" मध्ये रेल्वेत घडणाऱ्या चोऱ्यामाऱ्या व त्यासाठी चोर वापरत असलेल्या क्लृप्त्या, प्रवाशांचा निष्काळजीपणा तर कधीकधी भोळेपणा याचे किस्से सांगितले आहेत. ज्याच्या वस्तूंची चोरी झाली त्याच्यासाठी ते निश्चित त्रासदायक आहेत पण वाचकांसाठी ते थोडे गमतीशीर आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने जागरूक करणारे आहेत.

"चकवा" आणि "एका काठीचा प्रवास" हे लेखकाचे स्वतःचे एक प्रवासी या भूमिकेत आलेले अनुभव आहेत. एक प्रवास तसा लहानसा पण गाड्यांचा गोंधळ, अपुरी माहिती आणि चुकीचे मार्गदर्शन यामुळे काही तासांचा प्रवास चार-पाचपट कसा झाला हे "चकवा" या लेखात आहे. एकदा लेखकाने दुसऱ्या गावात एक काठी( पोलिसांचा दंडुका असतो तशी) विकत घेतली आणि परत येताना ती गाडीत विसरला. रेल्वे कर्मचारी असल्यामुळे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ती काठी मिळवायचा प्रयत्न केला. आणि ती काठी सुद्धा मजल दरमजल करीत मजेशीर घटना घडवत लेखकापर्यंत येऊन पोचली. त्याची धमाल लेखकाने "एका काठीचा प्रवास" सांगितली आहे.

कामाचा ताण घालवण्यासाठी श्री. कुलकर्णी ह्यांनी कला व साहित्य यांची आवड जाणीवपूर्वक जोपासली. त्यांच्या या प्रगल्भतेची आणि व्यासंगाची जाणीव पुस्तक वाचताना आपल्याला पदोपदी होते. लेखकाचं संवेदनशील मन दिसतं तसंच खुसखुशीत लेखनशैली दिसते. शेरोशायरी किंवा गाण्यांचा वापर त्यांनी केला आहे. शब्दांची निवड व वाक्यरचना यातून आपण लेखक आपल्याला खिळवून ठेवतो. त्यामुळे मुळातच इंटरेस्टिंग असणारा हा विषय अजून वाचनीय होतो. पुस्तकाच्या उच्च अभिरुचीची ओळख मुखपृष्ठावरच्या मोहक रेल्वे तालचित्राने होते. मला हे चित्र खूप आवडलं. विजय बिस्वाल ह्यांचं पेंटींग आहे.

आता काही पानं उदाहरणादाखल

अनुक्रमणिका


चालकाच्या कामातला किचकटपणा आणि अष्टावधानी राहण्याची गरज
काम संपल्यावर


अपघात आणि आत्महत्या यांबद्दल



रेल्वेच्या युद्धकालीन महत्त्वाचे एक उदाहरण


सिने-रेल्वे


परिस्थितीच्या रेट्यामुळे लेखकाला ही नोकरी स्वीकारावी लागली असली तरी मूळचा पिंड हा लेखकाचा-कलाकाराचा आहे ते आपल्याला नक्की जाणवतं. त्यामुळे ह्या अनुभवांचं शब्दांकन करण्याची दुसऱ्या कोणी गरज भासली नाही.
त्यांच्या या व्यसंगाचा अनुभव मला त्यांच्या मुलाखतीत आला. डोंबिवलीत ध्रुव नॉलेज अकॅडमीने त्यांची मुलाखत आयोजित केली होती. श्री माधव जोशी यांनी ती मुलाखत घेतली. हे पुस्तक, त्यांचे अनुभव, कलाप्रियता अशा विविध विषयांना मुलाखतीत स्पर्श करण्यात आला. मी प्रत्यक्ष त्या मुलाखतीला उपस्थित होतो. ती मुलाखत तुम्ही युट्युब वर ऐकू शकाल. मग तर तुमची उत्सुकता अजूनच वाढेल.




Youtube video link - https://www.youtube.com/watch?v=xjdg2NNFWl0

पुस्तक ऑनलाईन विकत घ्यायला उपलब्ध दिसतंय. या पुस्तकाद्वारे गणेश कुलकर्णी इंजिनचालकाच्या अनुभव विश्वात घेऊन जातायत. चालकाच्याच्या खुर्चीवर बसवतायत. समोरच्या काचेतून दिसणारी दृश्य आपल्याला बघायला देतायत. मग अशी ही संधी तुम्ही आम्ही का बरं सोडायची? पुस्तक विकत घेण्याचं तिकीट काढायचं की दिलाच आपल्याला रेल्वेने हिरवा झेंडा. तेव्हा द्या शिट्टी आणि सुरू करा प्रवास सुरू करा "कू..... कू..."



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

क्रिककथा दिवाळी अंक २०२३ (Crickatha Diwali Ank 2023)



पुस्तक - क्रिककथा दिवाळी अंक २०२३ (Crickatha Diwali Ank 2023)
संपादक - कौस्तुभ चाटे (Kaustubh Chate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२४
प्रकाशन - अतुल गद्रे. crickatha.com २०२३
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - ३००/- रु.

क्रिकेट ह्या विषयाला वाहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचं हे तिसरं वर्ष. भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेट बद्दल हा अंक असल्यामुळे नियमित वाचक नसणाऱ्यांनाही वाचायला आवडेल अशी ही संकल्पना आहे. ह्यात बरेच लेख आहेत, मुलाखती आहेत इतकंच काय शब्दकोडे आणि व्यंगचित्रं पण आहेत. सर्व काही क्रिकेट भोवती गुंफलेलं. त्यातही वैशिष्टय म्हणजे क्रिकेटविश्वाचा विविधअंगानी वेध घेतला आहे. आजच्या क्रिकेट बद्दल आहे तसंच जुन्या काळातल्या क्रिकेटबद्दल आहे. एकदिवसीय, वीसवीस, कसोटी ह्या प्रकारांबद्दलचे लेख आहेत. आंतरराष्ट्रीय, रणजी पासून शिवाजी पार्क सारख्या क्लब पर्यंतच्या क्रिकेटबद्दल आहे. महिला क्रिकेट बद्दल आहे. जुन्या प्रथितयश खेळाडूंबद्दल लिहिलं आहे तसंच उगवत्या ताऱ्यांबद्दल सुद्धा. क्रिकेट मध्ये वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक उपकरणांबद्दल लेख आहे. ह्या अंकाची अजून एक जमेची फक्त खेळ आणि खेळाडू ह्यांपुरतं लेखन सीमित नाही. खेळाडूंना मदत करणारे फिटनेस ट्रेनर, समालोचक, क्रिकेट संघटना पदाधिकारी ह्यांच्याशी सुद्धा संवाद साधला आहे. त्यातून पडद्यामागच्या लोकांचे कर्तृत्व, महत्त्व आणि त्यांचे अनुभव आपल्याला वाचता येतात.
पुण्यात एक क्रिकेट संग्रहालय सुरु आहे. त्याबद्दल माहिती आहे 
क्रिकेटचा देव - सचिन तेंडुलकर - वयाची ५० वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त एका खास विभागात सचिनच्या आठवणी, त्याच्या बद्दलच्या भावना अनेकांनी लेखांतून मांडल्या आहेत.

ह्या अंकात घेतलेल्या काही मुलाखती आणि काही जादाचा मजकूर क्रिककथा च्या वेबसाईटवर आहे. त्याचे QR कोड देण्याचा वेगळा प्रयोग ह्यात केला आहे.

अंकात भरपूर लेख आहेत. त्यामुळे सगळ्यांबद्दल सांगणं कठीण आहे. पण अनुक्रमणिकेवरून तुमच्या लक्षात येईलच. काही लेखांची उदाहरणेही देतो.


१)

२)

३)
४)
५)

६)



क्रिकेटवेडे असाल तर हे सगळं वाचायला, त्याबद्दल बोलायला , चर्चा करायला आवडेलच. फार क्रिकेट न बघणारे असाल -  माझ्यासारखे - तरी ह्या क्षेत्रातले किस्से, तांत्रिक माहिती, मुलाखती, पूरक माहिती सुद्धा रंजक आणि ज्ञानवर्धक आहे. 

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
क्रिकेटप्रेमी असाल तर - आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी - जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...