रणांगण (ranangan)





पुस्तक :- रणांगण (ranangan)
लेखक :- विश्राम बेडेकर (Vishram Bedekar)
भाषा :- मराठी (Marathi) 
पाने :- ११४

विश्राम बेडेकर लिखित "रणांगण" ही छोटेखानी कादंबरी किंबहुना दीर्घकथा आहे. 

पहिलं महायुद्ध होऊन गेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले आहेत. आणि युरोपात राहिलेला एक भारतीय तरूण बोटीचा प्रवास करून भारतात परत येतो आहे. तिकडे जाण्याच्या आधी झालेल्या प्रेमभंगामुळे स्त्रीजातीविषयी त्याच्या मनात अढी आहे; त्यांच्या प्रेमभावनेविषयी शंका आहे. तरीही विषयोपभोग करत युरोपात या तरूणाने बरीच चैन केली आहे. त्याच्या बोटीवरच जर्मनीतून परगंदा झालेले, नाझी छळापासून सुटका करून पळालेली बरीच दरिद्री ज्यू मंडळीही आहेत. अशाच एका यहुदी तरुणीशी बोटीवर त्याची दृष्टभेट होते. एकेमेकांकडे ते आकर्षिले जातात. 

या बोटीमधल्या त्यांच्या प्रेमभावनेची ही छोटी कहाणी आहे. आपल्या मागे राहिलेल्या प्रियकराची आठवण, ज्यू म्हणून मिळलेल्या अमानुष वागणुकीनंतर कुणितरी तिला आपलं म्हणतं आहे यामुळे ती वेडावून जाते. तरीही हे नातं क्षणभंगुर आहे; या प्रवासाबरोबर संपणार आहे याची जाणीव तिला आहे. अश्या वेगवेगळ्या भावकल्लोळात ती तरुणी आहे. आणि तो तरुणही हे आकर्षण, की प्रेम, की सहानुभूती; या नात्याचं नेमकं भविष्य काय अशा गोंधळात ! 

ज्यूंना मिळालेली वागणूक, तेव्हाच्या काही लोकांचे ज्यूंबद्दल ते कंजूष, नफेखोर आहेत असं झालं होतं हे काही प्रसंगात कळतं. त्यावेळच्या बोटीवरच्या प्रवाशांची रोडरोमियोगिरीही वाचून ७०-८० वर्षांपूर्वी देखील लोक असे वागत होते याचं आश्चर्य वाटतं. 

कादंबरी अशाच प्रसंगात घडते संपते. मुख्य विषयाची खोली लक्षात घेता मात्र खूप वरवर लिहिली आहे असं वाटतं. व्यक्तिचित्रे फार परिणाम कारक वाटली नाहीत. ही कादंबरी १९३९ साली सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि तेव्हा खूप गाजली व साहित्याचा मानदंड ठरली असा उल्लेख मलपृष्टावर आहे. तितकी "ग्रेट" काही मला वाटली नाही. इतपत कथा दिवाळी अंकातही वाचायला मिळतात. ७०-८० वर्षांपूर्वीची असली तरी भाषा जुनाट वाटत नाही. म्हणजे पल्लेदार वाक्य, बोजड शब्द, उपमांच्या भडिमाराचा कृत्रिमपणा असा प्रकार नाही. आजच्याच भाषेतली वाटते. म्हणजे तेव्हा ती खूप नवी वाटली असेल. दुसरं महायुद्ध होऊ घातलेलं असताना ही कादंबरी प्रकाशित झाली या प्रासंगिकतेचा वाटा कादंबरीच्या प्रसिद्धीत असेल. भिन्नधर्मिय स्त्री-पुरुषसंबंध हे सुद्धा तेव्हा खूप "बोल्ड" वाटलं असेल.

कादंबरी किंबहुना दीर्घकथा वाचायला कंटाळवाणी नाही पण आत्ता खूप लक्षात राहीलशी वाटली नाही.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

---------------------------------------------------------------------------------- 

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...