तिमिरपंथी (Timirapanthi)


पुस्तक - तिमिरपंथी (Timirapanthi)
लेखक - ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)
अनुवाद - सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - तिमिरपंथी 
(Timirapanthi)
मूळ पुस्तकाची भाषा - गुजराती
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस 
जुलै २०१८.
ISBN - 9789387789951
छापील किंमत - ३२० रु. 

चोरीच्या दरोड्याच्या बातम्या ऐकल्या की आपल्याला त्या चोरांचा राग येतो.
 दरोडेखरांची भीती वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना पकडावं फटकवावं, अशी जबरदस्त शिक्षा करावी की पुन्हा कधी कोणी चोरी करू नये. असं मनात येतं. पोलीस चोरांना पकडतातही. मुद्देमाल काही वेळा परत मिळतो. पण चोरीच्या घटना मात्र थांबत नाहीत. उलट प्रत्येक वेळी चोरी करण्याचं तंत्र प्रगत होत जातं आणि चोर पोलिसांचा खेळ रंगतच जातो. हा खेळ आजचा नाही तर अनादी कालापासून चालत आलेला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत जिथे एक काम म्हणजे एक जात/समाज अशी वर्गवारी झाली. तिथे चोरी हे सुद्धा एक काम आहे, एक हस्तकला आहे आणि ती वापरून उपजीविका चालवणे हे सुद्धा योग्यच आहे असे मानणारा एक समाज निर्माण झाला. अशाच समाजाची कहाणी म्हणजे "तिमिरपंथी" हे पुस्तक.

चोरी करणं, दरोडा घालणं याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. लोकांच्या घरात शिरून चोरी करणे, शेतातले धान्य चोरणे, लोकांची गायईगुरे चोरणे, वाटसरूचे दागिने पैसे लुटणे, दुकान किंवा सावकारी पेढ्यांवर दरोडा घालून माल लुटणे असे कितीतरी प्रकार. गंमत म्हणजे ह्या प्रत्येक प्रकाराने चोरी करणारे लोक हे पुन्हा या चोरांच्या उपजाती. म्हणजे एका उपजातीत फक्त घरात आणि शेतीत चोरी करून धान्य चोरणार. पैशांना हात लावणार नाही. स्वतःच्या आवश्यकते पुरतंच वस्तू चोरणार जास्ती चोरणार नाही. फक्त रात्री चोरी करणार दिवसाढवळ्या चोरी करणार नाहीत. अशा एका "अडोडीया" नावाच्या उपजातीतल्या एका कुटुंबावर आधारित तिमिरपंथी ही कादंबरी आहे. ब्रिटिश काळातला किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावरच्या पहिल्या काही वर्षातला काळ ह्यात आहे. गुजरात राजस्थानचा परिसर आहे.

"सती" या मुलीच्या लहानपणापासून ती थोडी मध्यमवयीन होईपर्यंतच्या घटना यात आहेत. सतीच्या आजीच्या तोंडून आधीच्या काळातले किस्से, चोरीच्या घटना सतीपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोहोचतात. सतीच्या स्वतःच्या चोरीच्या सहसामधून समकालीन चोरीच्या गोष्टी कळतात. चोरीची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सुपूर्त होते हे पण दिसतं.

या जाती भटक्या-विमुक्त म्हणाव्या अशा. त्यांचा तांडा आज एका गावात तर उद्या दुसऱ्या गावात, काही दिवसांनी पुढच्या गावात असा सतत फिरत असे. गावाच्या बाहेर राहायचं वेगवेगळ्या रूपात गावात फिरायचं. कधी विक्रेता म्हणून; कधी सुरीला धार लावणारा म्हणून किंवा काही काम काढून. फेरफटका मारताना सावज हेरून ठेवायचं आणि मग रात्रीच्या अंधारात कार्यभाग उरकायचा. लोकांना कळायच्या आत तांडा दुसरीकडे गेलेला. लोकांना संशय आलाच तरी लोक तांड्याकडे वळेपर्यंत चोरलेल्या वस्तू बाजारात कुठेतरी विकल्या जाणार. सोनं वितळवलं जाणार. मुद्देमालाचा मागमूसही राहणार नाही इतकी सफाई.

ब्रिटिशांनी अशा जातींना ओळखून त्यांना गावाच्या बाहेर कुंपणाच्या आत स्वतंत्र वस्ती अर्थात सेटलमेंट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या सेटलमेंट मध्ये राहायचं आणि रोज सकाळ संध्याकाळी पोलीस स्टेशनवर हजेरी लावायची.  जेणेकरून कोणी चोरी करून फरार झाला नाहीये हे स्पष्ट व्हावे. तरीसुद्धा गावात चोरी झाली तर पोलीस येऊन या सेटलमेंट मधल्या लोकांना पकडून बेदम मारून चौकशी करायचे. सतीचे कुटुंबीय अशा सेटलमेंट मध्ये नव्हते. अजूनही गावोगावी तांडा घेऊन भटकतच होते पण त्यांचे काही नातेवाईक मात्र सेटलमेंट मध्ये राहत होते. सतीपण लग्नानंतर सेटलमेंट मध्ये राहायला लागते. त्यामुळे या कादंबरीत तांड्यातलं आणि सेटलमेंटमधलं दोन्हीकडचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं.

लेखक मनोगतात म्हणतो
"नगरात वस्त्यांवर पाड्या-तांड्यात राहणाऱ्या कित्येकांना भेटून मी त्यांच्या कहाण्या ऐकल्या. ज्या काळातल्या गोष्टी मला कळत गेल्या त्या काळाप्रमाणेच या लिखाणातही वेगवेगळ्या काळाचा समावेश आहे. अगदी अलीकडचा उल्लेख १९९३ च्या जवळपासचा थोडा पुढे मागे आहे. त्यानंतर कथा आजच्या घडी पर्यंत आणण्याचा प्रयत्न मी केला नाही. नवलाची गोष्ट अशी की ज्यावेळी ज्या कोणापाशी आजच्या काळाचा विषय निघाला त्या प्रत्येकाने मला एकच विचारलं "अब तो विद्या कडे? - आज आता विद्या कुठे आहे"

चोरी करणे यात काही पाप नाही. जसं जंगलामध्ये वाघ- सिंह हरिण, ससे यांची शिकार करतात त्याप्रमाणे आपण चोर सुद्धा आपली कला वापरून दुसऱ्याकडचं सामान चोरतो. त्यात त्याला त्रास द्यायचा उद्देश नसतो. पण हेच आपलं पारंपारिक काम आहे. अशी निखळ भावना त्यांच्या मनात दृढ आहे . जातीचे स्वतःचे काही नीतिनियमही आहेत. चित्रपटात म्हणतात तसं "बेईमानी का काम इमानदारी से करनेका". गावातलं सावज ज्याने हेरलं आहे त्याला म्हणायचं या कामातला "मालक". त्याने या कामासाठी लोक निवडायचे. चोरी कधी, कुठे, कशी करायची हे सगळं मालक ठरवणार. बाकीच्यांनी फक्त त्याबरहुकूम काम करायचं. चोरीच्या ऐवजातला मुख्य वाटा मालकाला मिळणार. घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणत भागीदारांना वाटा मिळणार. चोरीबद्दल कोणी कुणाला सांगायचं नाही. ना आपल्या मित्रमंडळीत ना आपल्या घरी. ना त्याची कोणी चौकशी करायची. सगळा मामला गुप्ततेवर आणि परस्पर विश्वासावर अवलंबून.

पण... चोरी करता करताना लोकांना जाग आली आणि लोकांनी पकडलं तर मात्र बेदम मारहाण. संतापाच्या भरात केलेल्या मारहाणीत चोराचा जीवही जायचा. या भीतीमुळेच सतत सावध राहावं लागतं आणि लोकांची चाहूल लागली तर काम अर्धवट टाकून पळावं लागतं. सतीची आजी "नानकी" आणि तिच्या आजूबाजूच्या बायका यांच्या संवादातून असे घडलेले किस्से सतीला कळतात आणि त्यातून चोराने कसं वागलं पाहिजे; काय केले पाहिजे; काय नाही केलं पाहिजे याचे "सुसंस्कार" तिच्यावर होत असतात. तिच्यातली चोर घडत असते.. नव्हे नव्हे चोर नव्हे... कलाकार !!

सेटलमेंट चा कायदा, नव्याने होता असलेला शिक्षणाचा प्रसार ह्यामुळे सतीच्या मनातही आपल्या वस्तीतल्या मुलांनी शिकावं, काही वेगळा काम धंदा शिकावा अशी इच्छा मनात उमटू लागते. पण वंशपरंपरेने चोरी करणाऱ्या या लोकांवर बाहेरच्या समाजाचा सहज विश्वास बसत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी चोरीचा शिक्का पुसला जात नाही याची जाणीवही तिला होत असते. तर दुसरीकडे; हा शिक्का पुसण्याची तयारी तिच्याच समाजात नसते. "चोरी सोडून पुस्तकं शिकणं, दुसरं काम करणं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या कलेचा कामाचा अपमान करतो आहोत; आपल्या मुलांनी आपली कलाच चालवली पाहिजे" हे त्यांचं म्हणणं असतं. हेही वास्तव पुस्तकात दिसतं.

पुस्तकामध्ये चोरांच्या प्रकारांचे, त्यांच्या "विद्ये"बद्दलचे संस्कृत शब्द पण दिले आहेत. काही वाक्य बघा.

... सती स्वतः "मालक" होती विठ्ठल केवळ 'वटाविक' ( भागीदार चोर) होता.
... शास्त्रात सुद्धा हेच सांगितले की ' त्रप'ने (स्वतःच्या निष्काळाचीपणामुळे अचानक अडचणीत सापडलेला चोर) कुठेही थांबायचं नसतं.
... शिवाय आत शिरलेला 'कुसुमाल'(फुलांसारखी लोभस वस्तू चोरणारा) आपला कार्यभाग साधत असतो.
... तायु (चोर)
.. लट (लांडीलाबडी करून लुटणारा)
... कसबी वर्गानुनं(चोरांनं) ही कला साध्य केली असेल, नाही असं नाही. पण खिसेकापू म्हणवणारा प्रत्येक पटच्चर (सार्वजनिक जागी लुटणारा) खिसा कापतो हे खोटं.
आयुर्वेद, धनुर्वेद ह्या सारखा कुठला "चौर्यवेद" ग्रंथ आहे ज्यातून हे शब्द घेतले आहेत कल्पना नाही.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 


कुठल्या जातीच्या घरी चोरताना कशी काळजी घ्यावी याबद्दलचं लोकगीत

एका दरोड्याची तयारी आणि तो करता करता जुना एक किस्सा.


सती पोलिसांशी भांडून आली, मुलांना शिकवायचं म्हणतेय..त्यावर जात पंचायतीत चर्चा


पुस्तकाची निवेदन शैली म्हणजे फक्त किश्श्यांची जंत्री नाही तर एक सलग कथानक आहे. सतीच्या आयुष्यातला प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या वेळी झालेल्या बोलण्यातून भूतकाळातल्या घटना कळतात. मग पुन्हा आत्ताची घटना व पुन्हा मागे. असा काळ पुढे मागे सरकत राहतो. पुस्तक वाचताना आपण चोरांच्या बाजूचे होतो.. आता हे "कलाकार" कशी "कला" दाखवतात याची उत्सुकता आपल्याला लागते. ते यशस्वी व्हावेत, मारहाण न होता त्यांना पळता यावं अशी आपली इच्छा होते ह्याची गंमत वाटते. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा, पोलीसकथा ह्यांपेक्षा पुस्तकाचा बाज वेगळा आहे हे लक्षात आलं असेलच. म्हणून हे पुस्तक म्हणजे "जावे चोरांचीया वंशा तेव्हा कळे" असा अनुभव देणारं आहे. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)



पुस्तक - काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - द्यादुश्किन सोन (Dyadushkin son)
मूळ लेखक - फ्योदर दस्तयेवस्की (Fyodor Dostoevsky )
मूळ पुस्तकाची भाषा - रशियन (Russian)
अनुवाद - अविनाश बिनीवाले (Avinash Biniwale)
पाने - २०३
प्रकाशन - काँटिनेंटल प्रकाशन १९८७. दुसरी आवृत्ती २०१३
छापील किंमत - रु. १७५/-
ISBN - दिलेला नाही

फ्योदर दस्तयेवस्की - ज्याचा बहुतेक वेळा उल्लेख डोटोव्हस्की असाही केला जातो - हा गाजलेला रशियन लेखक, कादंबरीकार. त्याची कादंबरी थेट रशियन भाषेतून मराठीत आणण्याचं मोठं काम श्री. अविनाश बिनीवाले ह्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रत थेट त्यांच्याकडून मला भेट म्हणून मिळाली ही अजून आनंदाची गोष्ट.

कादंबरीचे कथानक १९व्या शतकातल्या रशियातल्या समाजात घडणारे आहे. मुख्य शहरांपासून दूर एका छोट्या गावात घटना घडतात. मोठमोठ्या जमिनी असणारे जमीनदार, त्यांच्या शेतात राबण्यासाठी शेकडो गुलाम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न पिढीजात वाढत जाऊन जणू अतिश्रीमंत स्थानिक राजेच झालेले लोक तेव्हा होते. असेच एक व्यक्तिमत्त्व इथे नायक आहेत; ते म्हणजे "प्रिन्स". आता उतारवयाला लागलेले, केस-डोळे-पाय-कान ह्या सगळ्यातला जोम गेलेला. पण खोट्या केसांपासून खोट्या लाकडी पायांपर्यंत सगळं वापरून अजून आपण उत्साही तरुण आहोत असं दाखवणारी ही वल्ली आहे. ऐकू कमी येतंय म्हणून मोघम काहीतरी बोलून हो हो करायचं, खोटं हसायचं. तरुणपणी केलेल्या आणि ना केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी लोकांना ऐकवत राहायचं अशी विनोदी वल्ली.

ह्या म्हातारबुवांची काळजी करतोय हे दाखवण्याची चढाओढ त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या इतर लोकांमध्ये सुद्धा आहे. सगळ्यांचा डोळा प्रिन्सच्या संपत्तीवर आहे. तर काही नातेवाईक त्याला आता असहाय्य, डोक्यावर परिणाम झालेला म्हातारा असं दाखवून संपत्तीचा सांभाळ ते करू शकत नाहीत असं दाखवून संपत्ती हडप करायचा प्रयत्न सुद्धा करतायत.

तर असे हे प्रिन्स प्रवास करता करता एका गावात येतात. बऱ्याच वर्षानंतर त्या गावात त्यांचं येणं होतं त्यामुळे त्या गावातले, त्यातल्या त्यात प्रतिष्ठित, मोठी घर असणारे लोक प्रिन्सचे स्वागत आपल्याला करायला मिळो; त्यांच्याशी सलगी वाढायला मिळो आणि त्यातून काहीतरी फायदा आपल्याला मिळो अशा लोभाने हुरळून जातात. प्रिन्स बरोबर त्यांच्या लांबच्या नात्यातला एक पुतण्या -मझग्ल्यागोफ - सुद्धा असतो जो याच गावात राहत असतो. या गावातल्या जहांबाज बाई मार्या ची मुलगी झिना वर तो प्रेम करत असतो. एकतर्फी प्रेमच. हा पुतण्या आपल्या काकाला मार्याच्या घरी घेऊन येतो. मार्या ही संधी साधून प्रिन्सचं आपल्या मुलीवर लक्ष जावं, त्यांनी तिच्याशी लग्न करावं असा बेत रचते. पण म्हाताऱ्या माणसाशी लग्न करायला झिना कशी तयार होणार? त्यामुळे मार्या तिला वेगवेगळ्या मार्गाने पटवायचा प्रयत्न करते. "त्याच्याशी लग्न कर आणि राणी सारखी रहा. थोडेच दिवसात तो मरून गेला की तू पुन्हा तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न कर" असं आमीष दाखवते आणि बरीच वेगळी वेगळी कारण तिला देते. झिनाच्या मनात अजून पहिला प्रियकर असतो; ज्याच्याबरोबर लग्न करणं घरच्यांच्या विरोधामुळे शक्य झालेलं नसतं. मर्याचा डाव मझग्ल्यागोफला कळल्यावर तोही अस्वस्थ होतो; तर मार्या त्याला उलटसुलट सांगून त्यालाही घोळात घेते. पण झिना आपल्या हातून जाणार की काय असं त्याला वाटत राहतं. नोकर मंडळींकडून जेव्हा गावातल्या इतर बायकांना ही गोष्ट कळते तेव्हा काही अस्वस्थ होतात कारण प्रिन्स आपल्या हातून जाणार की काय असं त्यांना वाटतं. त्याची ही गोष्ट.

मार्या, झिना, पुतण्या इतर बायका ह्यांचा एकेमकांशी बोलत बोलत कसा शह-काटशह देतात ; त्यांच्या वागण्याचा-बोलण्याचा फार्स हा या कादंबरीचा मुख्य भाग आहे एकूण कथानक खूप विनोदी नाही पण हलकफुलक आहे. काही वेळा प्रसंग गमतीशीर आहेत तर काही वेळा ते जरा ओढून काढून आणल्यासारखे वाटतात. एकूण संवादाची भाषा खूपच नाटकी आहे पूर्वीच्या मराठी नाटकांमध्ये जसे नाटकी संवाद होते तशीच परिस्थिती पूर्वी रशियन कथानगांमध्येही रशियन कथनशैलीमध्येही असावं असं दिसतंय. पात्रांचं गुपित गोष्टी पण मोठयाने बोलणं आणि दुसऱ्याच्या कानावर पडणं, एखाद्या पात्राने घरातच लपून राहून प्रसंग ऐकणं असले प्रसंग आहेत. चक्रम-विसराळू-गोंधळलेला म्हातारा आहेच जोडीला. प्रिन्स, मझग्ल्यागोफ, मार्या, झिना, मार्याचा नवरा, झिनाचा पहिला प्रियकर ही पात्र चांगली रंगवली आहेत. मार्याचे संवाद छान आहेत. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. कादंबरीच्या शेवटी सगळ्यांचेच डावपेच फसल्यावरती पुढे काय झालं हे लेखकाने उपसंहार पद्धतीने सांगितलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

प्रिन्सचं वर्णन




मार्याचा झिनाला पटवायचा प्रयत्न



गावातल्या बायका मार्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तिच्या घरीच ठिय्या मारतात तेव्हा



अविनाश बिनीवाले ह्यांनी अनुवादाला पूर्ण न्याय दिला आहे. व्यक्तींची आणि जागांची रशियन नावे सोडल्यास सगळं मराठी आहे आणि मराठमोळं आहे. म्हणी, वाक्प्रचार ह्यांच्या वापरातून सहज संवादी अनुवाद झाला आहे. त्यामुळे रशियन वातावरण आणि मराठी निवेदन हातात हात घालून जातं. त्यामुळेच पुस्तक वाचनीय झालं आहे. जर भाषांतर बोजड झालं असतं तर वाचण्यातला रस फार लवकर निघून गेला असता.


ही कादंबरी वाचताना २०० वर्षांपूर्वीचा रशिया, तेव्हाची परिस्थिती, लोक कसे विचार करत होते, लग्न संस्थेकडे बघण्याचा रशियन दृष्टिकोन इ. आपल्याला कळतं त्यामुळे रंजक कथानकाच्या ओढीपेक्षा या पैलूंची माहितीसाठी पुस्तक वाचता येईल. एका प्रथितयश कादंबरीकाराची कादंबरी कशी होती, तेव्हा कादंबरीची शैली कशी असायची हे आपल्याला कळेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अनुभाषिते (Anubhashite)



पुस्तक - अनुभाषिते (Anubhashite)
लेखिका - मंजिरी धामणकर (Manjiri Dhamankar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४८
प्रकाशन - अल्टिमेट असोसिएट्स. मी २०२५
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-93-91763-61-9

भारताची प्राचीन भाषा संस्कृत अतिशय समृद्ध आहे. वेद-उपनिषदे, रामायण, महाभारत, आयुर्वेद, काव्य, अर्थशास्त्र, स्थापत्यशात्र अशा हजारो ग्रंथांनी आपले पारंपरिक ज्ञान जतन केले आहे. मोठमोठी काव्ये आणि ग्रंथ जसे प्रसिद्ध आहेत तसा अजून एक प्रकार लोकप्रिय आहे तो म्हणजे "सुभाषित". एक मोठा आशय, संदेश, आयुष्याबद्दल मार्गदर्शन करणारा दोन किंवा चार ओळींच्या श्लोक म्हणजे सुभाषित असं ढोबळमानाने म्हणता येईल. वेगवेगळ्या उपमा देऊन मुद्दा स्पष्ट करणे, शब्द-अक्षरं ह्यांच्या पुनरुक्तीतून नादमाधुर्य साधणे, दोन ओळींची शेवटची अक्षरे समान ठेवणे (यमक जुळवणे) अशा नाना प्रकारांनी ही सुभाषिते आपल्यापर्यंत ज्ञान व भाषासौंदर्य पोचवतात. ज्यांनी शाळेत संस्कृतचा थोडा अभ्यास केला असेल त्यांना ही सुभाषिते थोडी आठवत असतील. अजूनही काही पाठ असतील. म्हणी, वाक्प्रचारांप्रमाणे सहज बोलता बोलता सुभाषितांचा वापरही कोणी करत असेल. काहीवेळा तर चारपाच शब्दांची एखादी संस्कृत ओळ आपण म्हणीसारखी वापरतो. पण ती ओळ एका श्लोकाचा - सुभाषिताचा - भाग आहे हे आपल्या लक्षात येत नाही. "अतिपरिचयादवज्ञा", "बादरायण संबंध", "वसुधैव कुटुंबकम्" हे ऐकल्यासारखं वाटतंय ना? हे शब्द सुभाषितांचे भाग आहेत. त्यामुळे सुभाषिते वाचणे व ती आचरणात आणणे हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. सुभाषितांच्या शब्दांचा, रचेनचा आस्वाद घेत 
ती वाचली तर गंमत अजूनच वेगळी. परीक्षेच्या दडपणाखाली पाठांतर केलं असेलही आणि आता विसरालाही असाल. पण आता निखळ आनंदासाठी सुभाषितं वाचून बघा, समजून बघा, पाठ करून बघा. त्यासाठी वाचा हे पुस्तक "अनुभाषिते".

लेखिका मंजिरी धामणकर ह्यांनी आपल्यासाठी उत्तमोत्तम सुभाषिते निवडून त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे. त्याचबरोबर मराठीतही श्लोक स्वरूपात त्याचं भाषांतर दिलं आहे. त्या सुभाषिताची गंमत, शब्दांचं वेगळेपण सांगितलं आहे. आणि हे सगळं निवेदन लेखिका आपल्याशी संवाद साधते आहे अशा पद्धतीने लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा येत असो वा नसो, तुम्हाला ह्या पुस्तकाचा आनंद घेता येईल.

पुस्तकात २८ प्रकरणे आहेत. एकेक विषय घेऊन त्या त्या विषयांशी संबंधित सुभाषिते दिली आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एक संदेश किती वेगवेगळ्याप्रकारे आपल्याला सांगितला आहे हे समजतं. तर काही वेळा काही शब्द, उपमा, साहित्यिक संकेत पुन्हापुन्हा येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पूर्वी किती रूढ झाल्या होत्या हे ही जाणवतं. सुभाषितांचा संदेश गांभीर्याने घ्यायचा असला तरी ते सांगताना काही वेळा विनोदी शैली सुद्धा दिसते. त्यासाठी मूर्खांची लक्षणे बघण्यासारखी आहेत.

काही पाने उदाहरणादाख
ल...

अनुक्रमणिका


मित्र ह्या विषयी सुभाषित


कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे "कोकिळेला" सांगणारी सुभाषितं.. "लेकी बोले सुने" लागे ह्या न्यायाने आपल्यालाच सांगतायत.


प्रहेलिका अर्थात कोडी सुद्धा आहेत.


पुढची लक्षणे आणि स्वतःचे वागणे ताडून बघूया. काही साम्य आढळलं तर "सावर रे !"


वरील उदाहरणे वाचून ही सुभाषितं किती अर्थगर्भ आहेत, लेखिकेने त्याचा अर्थ कसा थोडक्या आणि सोप्या शब्दांत सांगितला आहे हे लक्षात आलं असेलच. मराठीतले श्लोक सुद्धा मराठीतली सुभाषितेच झाली आहेत. त्यामुळे "अनुभाषिते" हे नाव सार्थ आहे.

भाषा हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे पुस्तक मला आवडलेच. लेखिका मंजिरीताई आणि मी एकाच "पुस्तकप्रेमी" नावाच्या व्हॉट्सअप आधारित साहित्यिक चळवळीचे सदस्य आहोत. आणि ह्या समूहाच्या संमेलनात पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन काही सदस्यांच्या हस्ते झाले त्यातला मी एक होतो. त्यामुळे पुस्तक अधिकच जवळचे झाले. 
पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले त्यालाही मी उपस्थित होतो.

तर असे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वाचनीय आणि आचरणीय आहे. संग्राह्य आहे.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)

पुस्तक - शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!) 
लेखिका - वसुंधरा काशीकर भागवत (Vasundhara Kashikar - Bhagwat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन ऑक्टो २०१६
 
छापील - किंमत दोनशे रुपये
ISBN 978-81-7434-978-6

शेतकऱ्यांची आंदोलने, आत्महत्या, हमीभावाचा प्रश्न याबद्दलच्या बातम्या आणि चर्चांमध्ये एक नाव नेहमी ऐकण्यात येतं ते म्हणजे - शरद जोशी. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा किंबहुना मुक्त बाजारपेठेचा फायदा त्यांना घेता यावा अशी त्यांची भूमिका होती हे साधारण ऐकून मला माहिती होतं. "इंडिया विरुद्ध भारत" ही संकल्पना सुद्धा त्यांनी मांडली आहे असही ऐकलं होतं . या तीन शब्दातून खूप मोठा आशय, सामाजिक दरी, विकासाचं दुभंग चित्र आपल्यासमोर उभे राहतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता होती. म्हणून ह्या पुस्तकाचा फोटो फेसबुकवर बघितल्यावर ते विकत घेऊन वाचून काढले.

पुस्तक लेखनेच्या प्रेरणे बद्दल लेखिका मनोगतात म्हणते "... शेतकरी संघटक, आंदोलक, नेता, अर्थशास्त्री ही शरद जोशींची ओळख इतिहासात राहीलच पण हे हिमनगाचं वर दिसणार एक टोक आहे असं शरद जोशींच्या व्यक्तिमत्वाबाबत म्हणता येईल. यापलीकडचे तीन चतुर्थांश शरद जोशी लोकांसमोर आणले पाहिजेत असं वाटलं. शरद जोशींची ज्ञानलालसा, अनुभव घेण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची तयारी, जोखीम पत्करण्यासाठी लागणारे अचाट साहस, जीवनाचा शोध घेण्याची धडपड, अखंड कार्यमग्नता, विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याला भेदण्याची वृत्ती, तर्कभक्ती, भाषेच्या शुद्धतेचा आग्रह हे सगळं लोकांना कळलं पाहिजे असं कळकळीने वाटलं..."

लेखिका वसुंधरा काशीकर या शरद जोशींच्या संघटनेच्या कार्यकर्त्या किंवा आंदोलनकर्त्या नव्हेत. त्या दोघांची घरगुती ओळख होती. वयाने त्या जोशींपेक्षा बऱ्याच लहान तरीही पुस्तके वाचणे, सामाजिक चिंतन करणे, गझल, कविता अशा अनेक आवडीनिवडी जुळल्या. छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या निमित्ताने भेटी झाल्या आणि चर्चाही झाल्या. त्या वेगवेगळ्या भेटींचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. शरद जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविधांगी अंगाने कशी ओळख झाली हे आपल्याला कळतं आणि ते पैलूही कळतात. बरीच वर्षे लेखिका शरद जोशींच्या संपर्कात असल्यामुळे वयाच्या आणि कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्यात झालेले बदल, त्यांच्या अभिव्यक्तीत झालेले बदल आणि तरीही त्यामागे एका वैचारिक अधिष्ठानाचं सातत्य सुद्धा या पुस्तकातून आपल्याला दिसतं. जोशींनी मांडलेले मुद्दे आणि त्यावर लेखिकेचे स्वतःचे विचार मंथन लेखिकेने पुस्तकात मांडले आहे. जोशींच्या शब्दांमागची त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.

पुस्तक कालानुक्रमे असे मांडलेले वर्णन नाही . तर १८ लेखांचा संग्रह आहे. एकेक मध्यवर्ती संकल्पना घेऊन त्याबाबत जोशींचे अनुभव, त्यांच्या लिखाणातून त्यांनी मांडलेले विचार, त्यावर लेखिकाचे भाष्य असे लेखाचे स्वरूप आहे. काही निवडक लेखांबद्दल सांगतो म्हणजे स्वरूप साधारण लक्षात येईल.

"साहित्य, भाषा आणि शरद जोशी" नावावरून लक्षात आलं असेल की शरद जोशींचे वाचन प्रेम साहित्यप्रेम याबद्दलचा हा लेख आहे. "दुनिया की नसीहत पर भी" या लेखात उत्तरआयुष्यात त्यांना सतावणारा एकाकीपणा जाणवतो. बुद्धिवादी तर्कनिष्ठ अशा भूमिकेतून भक्तीयोगाचा अभ्यास करायचा तो अनुभवायचा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतो.

"योगदान" या लेखामध्ये त्यांनी मांडलेली वैचारिक भूमिका व तत्त्वज्ञान याचा वेध घेतला आहे. एखादं आंदोलन हे विशिष्ट विषयापुरतं असतं. तो विषय मार्गी लागला की आंदोलन संपतं. पण विचारधारा व तत्त्वज्ञान हे दीर्घकाळ टिकणारं असतं. येणाऱ्या काळात कशी वाटचाल करावी याचं मार्गदर्शक ठरतं. त्यामुळे असं संचित आपल्या अनुयायांना देऊ शकणारा नेता हा खरा द्रष्टा, लोकोत्तर नेता. त्याबाबतीत शरद जोशी कसे उजवे ठरतात या लेखातून आपल्याला कळतं.

तरुणपणी शरद जोशी हे युनायटेड नेशन्स मध्ये स्वित्झर्लंड मध्ये काम करत होते पण शेती विषयक प्रश्नाच्या तळमळीतून त्यांनी ती नोकरी सोडली पत्नी आणि दोन मुलींसह ते भारतात आले महाराष्ट्रात कोरडवाहू शेती घेऊन स्वतः शेतीत त्यांनी प्रयोग केले प्रचंड ज्ञान आणि विद्वत्तेला अशा प्रकारे प्रत्यक्ष अनुभवाची जोड देऊन ते शेतकरी प्रश्नाकडे उतरले. म्हणूनच जीन्स शर्ट घालणारा हा नेता, ब्राह्मण नेता बहुजन समाजाने आपला मानला. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, त्यांच्या मृत्यूपश्चात दिसलेले अनुयायांमध्ये दिसलेले भावुक क्षण हे सुद्धा लेखांमध्ये दिसतात.

आता काही पाने
 उदाहरणादाखल

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती 
अनुक्रमणिका

स्वातंत्र्य हे शरद जोशींसाठी सर्वोच्च मूल्य कसं होतं हे सांगणारा लेख

परदेशातली नोकरी सोडून भारतात येण्याच्या निर्णयावर लेखिकेच्या मनातले विचारतरंग

शरद जोशींचं वक्तृत्व कसं होतं ह्याबद्दल.


सतत चिंतन करणे; प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे; त्यासाठी नवनवीन प्रयोग करणे ही एका अर्थाने सकारात्मक अस्वस्थता. शरद जोशींनी ती आयुष्यभर जोपासली असे या पुस्तकातून जाणवते. म्हणून "शोध अस्वस्थ कल्लोळाचा" हे उपशीर्षक पटते.

या पुस्तकांची रचना लेखसंग्रह स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक लेख स्वतंत्र स्वयंपूर्ण ठेवण्याचा लेखिकाचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे कुठल्याही क्रमाने लेख वाचले तरी आपल्याला काही अडचण नाही. पण त्यामुळे बऱ्याच लेखांमध्ये मुद्द्यांची पुनरावृत्ती होते. विश्लेषणाच्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तपशील जात नाही.

मी जेव्हा पुस्तक विकत घेतलं तेव्हा मला असं वाटलं की हे शरद जोशींचं चरित्र आहे. किमान त्यांच्या कामाची माहिती देणारे आणि त्याचे विश्लेषण करणारे पुस्तक असेल. पण पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की ते तसं नाही. हे लेखिकेचं अनुभवकथन आहे. तिचं स्वतःचं त्यावरचं भाष्य आहे. लेखिका प्रत्यक्ष कार्यकर्ती किंवा आंदोलनकर्ती नसल्यामुळे तिचे अनुभव थेट त्या कार्याच्या गाभ्याला भिडणारे नाहीत. ही या लेखनाची मर्यादा आहे. त्या कार्यकर्त्यांचे अनुभव, शरद जोशींच्या कुटुंबीयांचे अनुभव, समकालीनांचे विचार हे जर मांडता आले असते तर पुस्तक अजून प्रभावी झालं असतं.

माझ्यासारख्याला ज्याला शरद जोशींच्या आयुष्याची, कामाची आणि त्याच्या परिणामांची झालेल्या परिणामांची फारच जुजबी माहिती आहे त्याला हे पुस्तक तितकं रिलेट करता येत नाही. हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं की आधी आपण शरद जोशींचं चरित्र वाचावं किंवा थेट त्यांनी केलेलं लिखाण वाचावं. असं वाटायला लावणं हेच कदाचित ह्या पुस्तकाचं यश म्हणावं लागेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जॅपनीझ रोझ (Japanese Rose)

पुस्तक - जॅपनीझ रोझ (Japanese Rose) लेखिका - रेई किमुरा (Rei Kimura) अनुवाद - स्नेहल जोशी (Snehal Joshi) भाषा - मराठी (Marathi) मूळ पुस्तक ...