रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)



पुस्तक - रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)
लेखक - सचित जैन (Sachit Jain)
अनुवाद - शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan)
भाषा - मराठी
मूळ पुस्तक - Ready for take off (रेडी फॉर टेक ऑफ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २६१
प्रकाशन - मनोविकास प्रकाशन ऑगस्ट २०१२
छापील किंमत - रुपये २५०/-
ISBN 978- 93-81636-98-5

लहानपणी आपण पंचतंत्र, इसापाच्या गोष्टींमधून कसे वागावे, कसे वागू नये , कसे जगावे याचे धडे शिकत असतो. गोष्टीरुपात सांगितल्यामुळे आपल्याला वाचताना मजा येते आणि त्या गोष्टीचे तात्पर्य मनात उतरते. कुठलाही जड उपदेश असा गोष्टीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या वेष्टनात दिला की तो जास्त सुसह्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे. याचाच पुढचा प्रकार म्हणजे कथेच्या आडून उपदेश न देता प्रत्यक्ष कथेमध्येच दोन-तीन पात्रांच्या संवादातून एखादी गहन चर्चा घडवून आणली जाते. वाचकाला नीतिनियमांचं थेट शिक्षण दिलं जातं. भारतीय परंपरेमधील रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत काव्य किंवा ऐतिहासिक राजांनी लिहिलेले ग्रंथ बघितले तर दोन पात्रांच्या संवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गहन चर्चा झालेली आढळते. राजाने कसे वागावे, ऋषीमुनींनी कसे वागावे, संसारी माणसाने काय करावे काय टाळावे याची सूत्रे तिथे असतात. अगदी भगवद्गीता हा सुद्धा कृष्ण-अर्जुनाचा संवाद महाभारताच्या मध्ये आहे. भीष्म-युधिष्ठिर संवाद विदुराचे संवाद, रामायणातील वालीचा प्रसंग, रावणाच्या अंतिम वेळचे संवाद यातून वेगवेगळे विषय वाचकांसमोर मांडले आहेत. हीच परंपरा चालवत आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे धडे देण्याचे काम सचित जैन यांनी "रेडी फॉर टेक ऑफ" पुस्तकात केले आहे.

ही एक काल्पनिक कादंबरी आहे. पण त्याला लेखकाच्या स्वानुभवाची जोड आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार स्वतः सचित जैन उच्चविद्याविभूषित आहेत आणि त्यांनी वर्धमान ग्रुप नावाच्या कंपनीत व्यवस्थापन उत्पादन, मार्केटिंग, इ. आर. पी. इम्प्लिमेंटेशनअशा विविध विभागांचे नेतृत्व केले आहे. या स्वानुभवातून त्यांनी एका कंपनीच्या प्रमुखाची कथा आपल्यासमोर मांडली आहे.

या कथेचा नायक अनुराग हा आय आय एम अहमदाबाद मधून एमबीए केलेला, दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलेला आहे. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर. सिटी बँकेसारख्या नावाजलेल्या संस्थेत आर्थिक विश्लेषक, इन्व्हेस्टमेंट सल्लागार, मर्जर - टेक ओव्हर वगैरे करोडोंच्या उलाढाली मध्ये काम करणारा. पण त्याला प्रत्यक्षात एखादी कंपनी चालवण्याचा अनुभव नाही. तशी इच्छाही नाही. त्याची ओळख अरुण सेहगल नावाच्या प्रसिद्ध "टेक ओव्हर टायकून" यांच्याशी झाली आहे. यास हे गल्ली अजंता स्टील नावाची कंपनी विकत घेतली आहे. पूर्वी चांगली चालणारी पण आता व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अकार्यक्षमतेमुळे डबघाईला आलेली ही कंपनी चांगली चालवून ती नावारूपाला आणावी असा सेहगल यांचा मानस असतो. त्यासाठी योग्य माणूस म्हणून ते अनुरागची निवड करतात. कंपनी चालवण्यात सर्वस्वी नवखा असणारा अनुराग हो नाही करता करता एकदाची ती जबाबदारी स्वीकारतो. आपलं शिक्षण, इतक्या वर्षांचा अनुभव, जुन्या सहकाऱ्यांचा सल्ला व पत्नीचा सल्ला घेत घेत कंपनीचं नेतृत्व करायला लागतो. कंपनी हळूहळू सुधारू लागते .दीड दोन वर्षातच कंपनी तोट्यातून बाहेर येते आणि पुढे मोठी झेप घेण्यास सिद्ध होते. "रेडी फॉर टेक ऑफ" होते. हा प्रवास आपल्याला कादंबरीत दिसतो.

इथे अनुराग स्वतःच आपली गोष्ट सांगतोय. स्थिरस्थावर झालेल झालेलं करियर आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनोळखी भूमिका स्वीकारताना त्याची घालमेल होते. पण सेहगल, त्याची पत्नी ह्यांचा त्याच्यावरचा विश्वास व प्रोत्साहन; स्वतःचं चिंतन यातून शेवटी तो ही जोखीम स्वीकारायला तयार होतो. कंपनीचा प्रमुख म्हणून आता त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे. जबाबदारी आहे. तो म्हणेल तसं लोक आता वागणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तो सुरुवातीला ही कंपनी नक्की कशी चालते, स्टील उत्पादन कसं होतं हे सगळं आपल्या हाताखालच्या लोकांकडून समजून घेतो. आधीच्या व्यवस्थापनाने कशी कार्यशैली ठेवली आहे हे समजून घेतो. त्यात काय बदल करायला लागतील याची चाचणी करायला लागतो. आय एम मध्ये शिकताना घेतलेला पुस्तकी अनुभव, इतर मित्रांचे सल्ले आणि कंपनीतल्या लोकांची प्रत्यक्ष भेटीगाठी यातून धडपडत तो स्वतःचा मार्ग चोखाळतो. परिस्थिती वरती आपली मांड ठोकतो. हा प्रवास वाचणे रंजक आहे.

प्रसंगाच्या ओघात अनुराग वेगवेगळ्या विभाग प्रमुखांशी चर्चा करतो. कर्मचाऱ्यांशी मीटिंग घेतो. कंपनीत काय चांगलं चालू आहे, काय वेगळं करायला पाहिजे, मॅनेजमेंटची तत्त्व काय, ती कशी अमलात आणता येतील, त्यासाठीची आव्हाने काय अशी सगळी चर्चा होते. ही सगळी चर्चा म्हणजे; सुरुवातीला मी म्हटलं तसं, व्यवस्थापनशास्त्राचे धडे आहेत. एखाद्या कंपनीच्या मिनिट्स ऑफ मीटिंग असाव्यात त्या पद्धतीने मुद्दा क्रमांक एक, मुद्दा क्रमांक दोन, मुद्दा क्रमांक तीन असे मुद्दे क्रमवार मांडले आहेत. मग, "मी असं म्हणालो", "श्री शर्मा असं म्हणाले", "श्री अग्निहोत्री असं म्हणाले" , "अरुणने हा प्रश्न उपस्थित केला"; अशी ती चर्चा शब्दांकित केलेली आहे. अनुराग एखादी कल्पना सांगतो. इतर लोक त्याला प्रश्न विचारतात. असं लिहीत तो तो मुद्दा स्पष्ट केला आहे. अनुरागला जेव्हा एखादा निर्णय घेणे अवघड जातं, काय करावं याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होतो तेव्हा तो त्याची बायको, त्याची मित्रमंडळी यांच्याबरोबरही बोलतो. ती चर्चाही व्यवस्थापन शास्त्राच्या संकल्पनांभोवतीच घडते. तिथेही पुन्हा मुद्दा क्रमांक एक- दोन - तीन अशा पद्धतीने वर्णन आहे.

अनुरागला दोन मुली आहेत. त्या वयात येण्याच्या बेतात आहेत इतकी वर्षे करिअरच्या मागे धावताना मुलींना द्यायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याची चुटपुटही त्याला कधी कधी लागते. त्या प्रसंगात व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना घरगुती वातावरणातही कशा वापरता येतील असा विचार त्याच्या मनात येतो. बायकोशी झालेल्या संवादात तो भाग येतो.

कंपनीचा प्रमुख म्हणून काम करताना आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांबरोबरच मानसिक आव्हाने कशी असतात हे आपल्या लक्षात येतं. निर्णय घेताना होणारी घालमेल, अनोळखी परिस्थितीत जोखीम उचलताना होणारा त्रास, बॉस म्हणून लोकांशी जाणून-बुजून कठोरपणे कसं वागावं लागतं हे कळतं. "नवा गडी नवं राज्य" या उक्तीप्रमाणे बॉस बदलला की सगळ्या कंपनीचं वातावरण बदलतं, संस्कृती बदलते. लोक काही वेळा ती नाईलाजाने स्वीकारतात पण नंतर त्याचा उपयोग झालेला दिसल्यावर खुशही होतात. कंपनीच्या मालकीत झालेला हा बदल मध्यमस्तरीय आणि अगदी खालच्या कामगारवर्गात कसा झिरपतो हे कादंबरीत दाखवलं आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



कंपनीत आणि स्वतःत काय बदल केले ते अनुराग सेहगल ला सांगतो तो प्रसंग



अनुरागची मुलगी सहज सांगून जाते की "मला बॉयफ्रेंड आहे, हल्ली सगळ्यांनाच असतात", तेव्हा त्याचा आणि बायकोचा संवाद




वेळ, श्रम फुकट घालवणाऱ्या मूल्यरहित कामांबद्दलची चर्चा



एकूण कादंबरीची रचना मला आवडली. जिथे थेट शिकवण आहे तिथे सुद्धा ती ललित अंगाने, लोकांच्या भावभावना टिपत मांडल्यामुळे रुक्ष झालेली नाही. वाचायला चांगली वाटते. कंपनी मधल्या फॉर्मल मीटिंगमध्ये अशा पद्धतीने मुद्देसूच चर्चा होणं, लोकांना जबाबदारी देणं, पुनरावलोकन करणं हे सगळं अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे कादंबरीच्या फ्लोमध्ये ते व्यवस्थित बसतं. पण अनुराग आणि त्याची बायको किंवा अनुराग आणि त्याचे मित्र यांच्यातल्या चर्चा सुद्धा मुद्दा एक, मुद्दा दोन, मुद्दा तीन अशा पद्धतीने मांडल्या आहेत ते फारच ओढून ताणून बसवलेलं वाटतं. ते अजून थोडं अप्रत्यक्ष पद्धतीनेच लिहायला हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बॉस म्हणतोय म्हणून लोकांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं योग्यच आहे. पण इच्छा नसताना जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्यात टंगळमंगळ होणं, चुका होणं किंवा कामातल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या जाणंही स्वाभाविक आहे. पण पुस्तकात मात्र त्या पैलूचा फार विचार नाही. लोकांना बॉसचं म्हणणं पटतं ते पूर्ण क्षमतेने कामाला लागतात; काही छोटे मोठे बदल करतात आणि झटपट रिझल्ट मिळतात. असं फारच गुडी-गुडी वातावरण आहे. कादंबरीत असा उल्लेख आहे की पूर्वीचे व्यवस्थापन हे कामगारांशी कामगार संघटनेतल्या नेत्यांच्या माध्यमातून बोलायचं. त्यांना टाळून जाणं खूप कठीण आहे असा इशारा विभाग प्रमुख अनुरागला देतात. तरी अनुराग या पद्धतीत बदल करतो आणि थेट कामगारांशी संवाद साधतो. अशावेळी कामगार पुढाऱ्यांमध्ये नाराजी पसरणं; त्यांनी कामगारांना भडकवणं किंवा थेट अनुरागशी वाद घालणं अपेक्षित आहे पण पुस्तकात तसं काही दिसत नाही. सगळं सहजगत्या होतं. व्यवस्थापन शास्त्रातल्या संकल्पना प्रत्यक्ष राबवणं अतिशय सोपं आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल करणे सोपं आहे असाच आपला समज होईल.

योगायोगाने, मी जिथे काम करतो ती कंपनी सुद्धा दुसऱ्या कंपनीने अधिकग्रहीत केली. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मी अनुराग च्याजागी आमच्या कंपनीचे नवे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी पण असाच विचार केला असेल का? असेच निर्णय घेतले असतील का? अशी तुलना करत होतो. आमच्याही नव्या कंपनीप्रमुखाची व्यवस्थापनशैली खूप वेगळी आहे. ती राबवताना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागली. त्यामुळे लोकांच्या मनात कायम धाकधूक असते. दोन वर्षे झाली तरी नव्या संस्कृतीशी जुळून घेताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अडचणी आहेत. अधिग्रहणाची ही बाजू मांडण्यात पुस्तक कमी पडतं. इथे अनुरागचं आत्मनिवेदन असल्यामुळे इतरांच्या भावभावना मांडण्याची मुभा निवेदनाला नाही. त्याऐवजी त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून पुस्तक लिहिलं असतं तर हा पैलू ही जोरकसपणे मांडता आला असता असं मला वाटलं.

व्यवस्थापन शास्त्राबद्दल ललित प्रकारात लिहिलेलं मराठी पुस्तक दिसत नाहीत. त्यादृष्टीने हा अनुवाद मराठी साहित्यात वेगळी भर टाकतो आहे. शुभदा पटवर्धन ह्यांनी अनुवाद चांगला केला आहे. बहुतेक सर्व तांत्रिक संज्ञा मराठीतूनच लिहिल्या आहेत. पण सध्या तांत्रिक बाबतीत इंग्रजीच्या सवयीमुळे मनातल्या मनात उलट इंग्रजी भाषांतर केलं की ते लगेच लक्षात येतं. त्यात अनुवादिकेचा काही दोष नाही. शक्य तितक्या सोप्या मराठीतच त्यांनी लिहिलं आहे.

असं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक वाचून बघा. त्यातली काही तत्वे नवीन असतील तर काहींची उजळणी होईल. व्यवस्थापन विषयक काही वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक निवडून बघू शकता.

रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off)

पुस्तक - रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off) लेखक - सचित जैन (Sachit Jain) अनुवाद - शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan) भाषा - मराठी मूळ प...