पुस्तक :-In the line of fire (इन द लाईन ऑफ फायर)
लेखक :- Pervez Musharraph (परवेझ मुशर्रफ)
भाषा :- इंग्रजी
पाकिस्तानचा माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ याने आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक २००६ साली प्रकाशित झालेलं असल्याने तिथपर्यंतच्याच घटना यात आहेत. तोपर्यंत मुशर्रफ ह पाकिस्तानचा लष्करशहा होता.
फाळणीच्या वेळी मुशर्रफचे कुटुंब भारतातून पाकिस्तानात गेले. तिथून वडीलांच्या नोकरीमुळे ते कुटुंब तुर्कस्तानात गेले. लहानपणाची काही वर्ष तुर्कस्तानात घालवली. पाकिस्तानात परत आल्यावर ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिक्षण झालं. हे वाचल्यावर, तेव्हाच्या आधुनिक विचाराच्या तुर्कीत बालपण आणि गैर-इस्लामिक शाळेत शिक्षण होऊनही मुशर्रफचे आचार-विचार सर्वसमावेशक कसे बनले नाहीत याचं नवल वाटतं.
पुढे त्याने शिक्षणासाठी लष्करात प्रवेश घेतला. लष्करातल्या वर्षांबद्दल त्याने अतिशय आत्मियतेने लिहिलं आहे. अतिशय धट्टाकट्टा, सर्व खेळात पुढे, शस्त्र चालवण्यात पटाईत पण खोडकर, नाठाळ असं त्याने स्वतः बद्दल म्हटलं आहेत. शिस्त मोडल्याचे अनेक किस्से आणि त्याबद्दल झालेली शिक्षा याबद्दल लिहिलं आहे.
या दरम्यान त्याने भारताविरुद्ध च्या दोन युद्धांत भागही घेतला. या युद्धाचे अनुभव त्याने लिहिले आहेत. ७१ च्या युद्धात भारतानेच बांग्लादेशी लोकांना कशी फूस दिली, पाकिस्तान कसा तोडला, अमेरिकेने कशी साथ दिली नाही हा कांगावाही बराच केला आहे.
या संदर्भातच त्याने पाकिस्तानचा १९४७ पासून त्या दिवसापर्यंतचा राजकीय इतिहासही सांगितला आहे. हे प्रकरण वाचण्यासारखं आहे. बंगाली मुस्लीमांना मिळाणारी सापत्न वागणूक, अफगाण सीमेवरील प्रांतात राहणाऱ्या स्वायत्त टोळ्या, सत्तेचे भुकेले लष्करशहा, संविधान बनवण्याचे प्रयोग आणि संविधान स्थगित करून वर्षानुवर्षं चालणारा "मार्शल लॉ", आणि "मार्शल लॉ" च्या नावाखाली सामान्यांची पिळवणूक यांचं ही वर्णन आहे.
त्याचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानात राष्ट्रपती-पंतप्रधान,सत्ताधारी-विरोधीपक्ष,पंतप्रधान-न्यायपालिका,सत्ताधारी-जनता असा सतत सत्ता संघर्ष चालू असतो. रस्सीखेच चालू असते. आणि एखादं पारडं जड झालं, हाताबाहेर जाऊ लागलं की लष्कराला हस्तक्षेप करण्याची मागणी वाढू लागते आणि नाईलाजाने सत्ता घ्यावी लागते.
नंतरचं महत्त्वाचं प्रकरण "कारगिल"चं. अपेक्षेप्रमाणे मुशर्रफने आगळीक भारतानेच केली, पाकिस्तान स्वसंरक्षण करण्यासाठी तयार राहिला, आणि भारताला आत येण्यापासून रोखले, नुकसान भारतीय सैन्याचेच झाले इ. विचार मांडले आहेत.
"कारगिल" नंतर नवाझ शरीफचे मुशर्रफशी संबंध बिघडले आणि श्रीलंकेतून येताना मुशर्रफचे विमान कराचीत उतरताना अचानक परवानगी नाकारली आणि तात्काळ देश सोडून जायला सांगितले. विमानातले इंधन कमी, जवळचे विमानतळ भारतात-शत्रू राष्ट्रात- अशी जीवनमरणाची परिस्थिती. या आणिबाणिच्या परिस्थितीत लष्कराने उठव करून नवाझ शरीफला पदच्युत केले, आणि काही तासांत सत्ता हस्तगत केली हा सगळा थरारपट वाचण्यासारखा आहे.
लष्करशहा झाल्यावर पाकिस्तानी राजकारणाची आणि अर्थव्यवस्थेची घडी लावण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे ही वाचण्यासारखे आहे. एखादी व्यक्ती धार्मिक/सांप्रदायिक उन्माद वापरून सत्ता हस्तगत करू शकते पण सत्ता चालवायची, देश पुढे न्यायचा तर सर्वसमावेशक असावं लागतं आणि शेजारी देशाची भीती लोकांना घालत राहून देशाचं कल्याण होत नाही तर आर्थिक घडी नीट बसवावी लागते. हे शहाणपण मुशर्रफला आलेलं दिसतं.
९/११ चा हल्ला, त्यानंतर पाकिस्तानात झालेले अतिरेकी हल्ले, मुशर्रफला मारायचे प्रयत्न आणि या सगळ्या अतिरेक्यांना शोधण्याचे प्रयत्न याचा खूप मोठा भाग यात आहे. मुशर्रफच्या प्रामाणिकपणावर थोडा वेळ विश्वास ठेवून वाचल्यास एक एक हल्ला आणि शोध एकेका थरारपटापेक्षा कमी नाही.
शेवटच्या काही प्रकरणात "सौ चुहे खाके बिल्ली हज को चली" या उक्तीचा प्रत्यय येतो. धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा आणि अतिरेकाचा पाकिस्तान बळी कसा पडतो आहे, मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायामुळे कसा असंतोष पसरतो आहे, मुशर्रफ स्वतः कसा मध्यम मार्गी आहे, दहशतवाद कुठलाही असला तरी तो वाईट कसा अशी सगळी मल्लिनाथी आहे. आणि तरीही काश्मिरात घडणारी हिंसा मात्र स्वातंत्र्य लढा आहे आणि त्याला पाकिस्तानची कशी सहानुभुती आहे हे म्हणत आपले खरे रंग दाखवतो.
एकूण हे पुस्तक वेगवेगळ्या टप्प्यांनी, किश्श्यांनी, माहितीने भरलेलं आहे. पाकिस्तानचा इतिहास व धार्मिक उन्मादावर आधारलेल्या राष्ट्राची अधोगती, लष्करातले अनुभव, एक नेता या नात्याने निर्णय कसे घ्यावे लागतात याचं वर्णन, आत्मघातकी हल्ल्यात सापडल्यावर कसं वाटतं याचे अनुभव, एकेका अतिरेक्याचा माग काढण्यातला थरार, "युद्धस्य रम्य कथा" हे सगळं अवश्य वाचण्यासारखं आहे.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------