द सीक्रेट - रहस्य (The Secret - Rahasya)




पुस्तक :- "द सीक्रेट - रहस्य"  
भाषा :- मराठी
मूळ भाषा :- इंग्रजी 
मूल पुस्तक :- The Secret
लेखक :- रॉंडा बर्न (Rhonda Byrne)
अनुवादक :- डॉ रमा मराठे  (Dr. Rama Marathe) 



"द सीक्रेट - रहस्य" हे एक स्व-मदत(सेल्फ-हेल्प) प्रकारातलं पुस्तक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या सर्व इच्छा पूर्तीसाठी कसं वागावं; कसा विचार करावा हे शिकवणारं पुस्तक आहे. 
"सकारात्मक विचार","तुम्हीच तुमचे नशीब घडवा","मन करा रे प्रसन्न.." अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. दृढ इच्छाशक्तीमुळे कठीण प्रसंगावर मात करून आपल्या क्षेत्रात यश मिळवलेल्या उद्योगपतींच्या, खेळाडूंच्या, समाजसेवकांच्या प्रेरक गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण हे पुस्तक या विचारांच्या शक्तीला अजून एक पायरी वर नेऊन ठेवते. विचार हे एक प्रकारची ऊर्जा आहे. आपण जसे विचार करतो तशी ऊर्जा/लहरी आपण प्रेरित करतो. आणि या वैश्विक ऊर्जेतून आपण त्या गोष्टी आकर्षित करत असतो. आणि जितका तीव्र विचार तितक्या वेगाने त्या गोष्टी आकर्षित होऊन आपली स्वप्नं सत्यात उतरतात. म्हणून आपण आपले विचार काय नको या पेक्षा काय हवं या वर केंद्रित करायला पाहिजेत. सश्रद्ध रितीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. साधारण असं या पुस्तकाचं म्हणणं आहे. त्याला आकर्षणाचा नियम - लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन (Law of attraction) अशी संज्ञा आहे.

पण हे सगळं नीट समजून घेण्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे त्यातले बारकावे कळतील. उद्योजक, गुंतवणून तज्ञ, तत्वज्ञ, या विषयावरचे लेखक अशा अनेकांचं म्हणणं यात उद्धृत केलं आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे, खऱ्या माणासांचे प्रसंग, क्वांटम फिस्जिक्स चा संदर्भ ई. वाचनीय आहे. 

पुस्तक वाचताना आपण थोडावेळ भारावून जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला पटतीलही. पण नंतर विचार केल्यावर खरंच नुसता विचार करून गोष्टी आकर्षित होत असतील का, यावर मनात प्रश्न उभा राहतोच. जगभरातले इतके गरीब लोक पैसा मिळण्याची प्रार्थना करत असतील, आजारी माणसं बरं होण्याची इच्छा बाळगत असतील, अनेक वृद्ध आईवडील आपली मुलं आपल्याशी बोलायला लागावी यासाठी झुरत असतील. पण असंख्य लोकांच्या पदरात शेवटी निराशाच येते. विचारंनी गोष्टी आकर्षित होत असत्या तर आज पर्यंत प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण झाली असती, नाही का? 

नेट वर शोधल्यास हे "सिक्रेट" कसं थोतांड आहे, क्वांटम फिजिक्स मधे असं काही तत्वज्ञान नाही इ. ही सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. 

असं असलं तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे. आपल्या विचारांबद्दल विचार करायला लावणारं आहे. आपल्यापाशी आहे त्या बद्दल कृतज्ञता बाळगायला शिकवणरं आणि त्याचे फायदे दाखवणारं आहे. 
आपल्या बाबतीत वाईटच घडेल असं सतत मनात आणून स्वतःची भीती, चिंता, चिडचिड आणि स्वतःच्या समस्यांत वाढ करण्यापेक्षा स्वप्नपूर्तीचं स्वप्नरंजन अधिक आनंददायी, उत्साहवर्धक ठरेल असा अशावाद यातून मिळतो.
मनात केवळ इच्छा बाळगून कदाचित स्वप्न सत्यात येणार नाहीत पण ध्येयाच्या दिशेने प्रयत्न चालू असताना मनातही तसेच इच्छापूर्तीचे विचार असतील तर अधिक आनंद, सहजता निर्माण होईल हे तरी या वाचनातून जाणवतं.

म्हणून पुस्तक नक्की वाचा, विचार करा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याचा, आपल्याकडे काय आहे याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन नक्की मिळेल. 

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...