Half Girlfriend हाफ गर्लफ्रेंड





पुस्तक :-Half Girlfriend हाफ गर्लफ्रेंड
भाषा :- इंग्रजी (English)
लेखक :- चेतन भगत (Chetan Bhagat)


चेतन भगत यांच्या सगळ्याच कादंबऱ्या प्रचंड खपाच्या ठरल्या आहेत. भारतीय वाचकवर्गात विशेषतः तरुणांमध्ये त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. २०१५ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचं भाषण ऐकायला झालेली तरुणांची गर्दी आणि उदंड प्रतिसाद मी स्वतः अनुभवला होता. 
तरुणांच्या अनुभवविश्वातले विषय किंवा स्वप्नविश्वातले विषय चेतन भागत कादंबरीच्या रूपात इतक्या सहज मांडतात की तरुणाईला हा आपला लेखक आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. 
हाच अनुभव मला त्यांची "हाफ गर्लफ्रेंड" ही आणि याआधी वाचलेली "टू स्टेट्स" कादंबरी वाचल्यावर आला. दोन्ही कादंबऱ्यांत विषय अतिशय सोपा तरुणांच्या आकर्षणाचा- एक मुलगा,एक मुलगी त्यांचं प्रेम, त्यांच्या संबंधातले चढउतार, मुलीचं प्रेम/विश्वास/संमती संपादन करण्यासाठी मुलाचे प्रयत्न.

हा विषय हजारो वेळा हाताळला गेलेला असेल अनेक कथा कादंबऱ्यांतून,चित्रपटांतून. पण विषय तोच असूनही चेतनच्या कादंबऱ्या ताज्या वाटतात. कंटाळवाण्या वाटत नाहीत.
पुस्तकाची भाषा इंग्रजी असली तरी इतर भारतीय लेखकांप्रमाणे ती पंडिती/अग्रलेखी भाषा नाही. सहज सोपी बोली भाषेचा लहेजा असणारी आहे. त्यामुळे इतर भारतीय लेखकाचं भारतीय पार्श्वभूमी असलेलं लिखाण वाचताना जो बोजडपणा वाटतो तो वाटत नाही. आपण मराठी/हिंदी मधूनच वाचतोय की काय असं वाटावं इतकं स्वाभाविक वाटतं. मनातल्या मनात मी कितीतरी संवादांचं मराठीत भाषांतर करत होतो.

दुसरं म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यामध्ये भेटणारी माणसं पूर्णपणे काल्पनिक नाहीत, अतार्किक नाहीत. या पुस्तकातला नायक माधव आणि नायिका रिया एकमेकांना दिल्लीतल्या एका हायफाय कॉलेजात एकमेकांना भेटतात. माधव एका चांगल्या घरातला मुलगा पण बिहार मधल्या एका खेडेगावातून दिल्लीत शिकायला आलेला. त्याला इंग्रजी समजत असलं,बोलता येत असलं तरी त्यात एक बिहारी बाज आहे, ते हायक्लास लोकांसारखं फाडफाड इंग्लिश नाही.  हा न्यूनगंड घेऊनच तो कॉलेजात वावरतो, रियाशी मैत्री करतो, तिच्या मनात आपली जागा मिळवायचा प्रयत्न करतो. 
हा विषय "आजचा" आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला आपली पहिली काही वर्षं, इंग्रजीच्या भीतीमुळे झालेली घालमेल आठवून देणारा आहे. शहरी,निमशहरी तरुण वाचकांना आपलसं करण्याची त्यात ताकद आहे.

रिया श्रीमंत घरातली असली तरी श्रीमंतीचा माज ना करणारी किंबहुना आपल्या घरच्यांचे लक्ष्मीप्रेम बघून या भापकेबाजीचा तिटकारा आलेली, अबोल, स्वतःला स्वतःच्या कोशात ठेवणारी अशी.
तिचं प्रेम मिळवायचे माधावचे प्रयत्न, मित्रांचे वेडे सल्ले यातून कादंरीत पुढे या दोघांची ओळख वाढते, मैत्री होते आणि दुरावा निर्माण होतो. आपलं प्रेम पुन्हा परत मिळवायची धडपड माधव करत असतो. त्याचा आयुष्यातले प्रसंग काही वेळा अनपेक्षित कलाटणी घेतात. वाचताना आपल्यालाही सुखद-दु:खद धक्के देतात. 
हे सगळं खूप मनोरंजक आहे, प्रत्यक्ष वाचण्यासारखंच आहे. इथे त्याचे तपशील देऊन तुमचा रसभंग करत नाही. वाचायला लागल्यावर पुढे काय होणार याची उत्सुकता सारखी तेवती राहते. आणि प्रसंग काय घडेल हे समजलं तरी तो प्रसंग कसा रंगवला असेल हे कधी एकदा वाचतो असं होतं.

कथानकात येणारे संदर्भ आजचे आहेत. त्यात मोबाईल, ईमेल, गुगल मॅप, कंपन्यांची नावं वगैरे खरी येतात.  उदा. नायक माधव हा HSBC च्या इंटरव्यू ला जातो;  त्याचा मित्र "गोल्डमन सॅक्स" मध्ये काम करत असतो, माधव चालवत असलेल्या शाळेला बिल गेट्स भेट देतो इ. त्यामुळे प्रसंग अधिक खरे वाटतात.

प्रसंगानुरूप पण तरीही जाता जाता केलेल्या "जनरल" टिप्पण्या खूप मजेशीर,खुसखुशीत आहेत.
उदा. अमेरिकेतल्या त्याच्या मित्रांचं मोठं घर बघून माधव मनात म्हणतो. 

The size of apartment told me the banks paid them well. Dark circles under his eyes told me they also made him work hard"
गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यावर विमनस्क परिस्थितीत रात्री घरी परतताना तिने दिलेल्य सगळ्या वस्तू टकून देतो पण चॉकलेट आणि बिस्किटं मात्र ठेवतो. कारण ... I was in pain,I remembered the golden rule: if you live in hostel,never throw away your food.. "Even though "
माधवच्या प्रेमाला हो किंवा नाही असा कुठलाही पक्का प्रतिसाद न देणऱ्या रियाला बघून तो म्हणतो 
An army of intellectual men can not solve the riddle created by an indecisive 

एकूणच या पुस्तकाचं वाचन मनोरंजक, हलकंफुलकं, ताजं करणारं आहे. जमल्यास वाचा. लवकरच या वरचा चित्रपटही येऊ घातलाय. तोही बघूया कसाय


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. चेतन भगत यांची पुस्तकं मलाही खूप आवडत होती... पण one indian girl वाचल्यापासून असं वाटतंय की ते फक्त आता एखाद्या entertainmaint फिल्म चा scrinplay लिहितायत...
    समीक्षण अतिशय उत्तम आणि योग्य केलंय तुम्ही...

    ReplyDelete

Deep state (डीप स्टेट)

पुस्तक - Deep state (डीप स्टेट) लेखक - मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar) भाषा -  इंग्रजी ( English) पाने - १६० प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, ड...