जडणघडण ( दिवाळी अंक २०१६ ) Jadanaghadan Diwali edition 2016



पुस्तक :- "जडणघडण" या मासिकाचा दिवाळी अंक २०१६
पृष्ठ संख्या :- २४८
किंमत  :- रु. १५०/-

या वर्षीच्या (२०१६च्या) दिवाळी अंकांमध्ये आणखी एक वाचनीय आणि संग्राह्य दिवाळी अंक वाचण्यात आला. "जडणघडण" या मासिकाचा दिवाळी अंक.
अंक मुख्यत्वे दोन संकल्पनांमध्ये तयार केलेला आहे. एक संकल्पना आहे "बापमाणसं" आणि दुसरी संकल्पना "स्पर्धा परीक्षांचे दिवस".

"बापमाणसं" एखाद्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याच्या आईबरोबर वडिलांचाही वाटा असतो. आई विषयीचं लेखन बऱ्याच वेळा केलं जातं पण "बाप"माणसाकडेही दुर्लक्षून चालणर नाही. या भूमिकेतून "बापमाणसं" ही लेखमाला घडली आहे. "बापमाणसं" या संकल्पनेत २४ लेख आहेत. यात काही नामवंतांनी आपल्या वडीलांबद्दल लिहिलं आहे उदा. जयंत नारळीकर, अभय बंग, माधव गाडगीळ, रवी परांजपे इ. तर बऱ्याच नामवंतांबद्दल त्यांच्या मुलांनी लिहिलं आहे. उदा. एस.एम.जोशी, रघुनाथ माशेलकर, ग.दि.माडगुळकर, व.पु.काळे इ.
पुढे दिलेल्या छायाचित्रांमधून पूर्ण यादी आपल्यासमोर उलगडेल. 





वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या वडीलांचा प्रभाव कसा होता हे यातून समजतं. तर यशस्वी व्यक्ती एक वडील म्हणून, एक माणूस म्हणून कश्या होत्या/आहेत हे पण आपल्या समोर उलगडतं. 
या व्यक्ती किंवा त्यांचे वडील हे प्रत्येक जण सर्वगुणसंपन्न व्यक्ती नव्हेत. कुणी रागीट आहे; कुणी विसराळू, कुणी फार कडक शिस्तीचे तर कुणी मुलांशी मित्रत्त्वाने वागणारे. म्हणून "यशस्वी बाप" असा काही साचा नाही. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" प्रमाणे प्रत्येकाने आपला मार्ग स्वतः शोधायचा आहे याची याची जाणीव होते. साहजिकच आपल्यातल्या "बापा"ला आत्मपरीक्षण करायला लावणारे हे लेख आहेत. मी एक "बाप" म्हणून माझ्या मुलांना असं समृद्ध करतो आहे का (किंवा करीन का) आणि माझ्या यशापयशात माझ्या वडीलांचा वाटा जाणतो आहे का असा दोन्ही अंगांनी विचार करायला लावणारे आहेत.


"स्पर्धा परीक्षांचे दिवस" ही सुद्धा १७ लेखांची लेखमाला आहे. आणि यात १७ यशस्वी आय.ए.एस. ,आय.पी.एस, आय.आर.एस. अधिकाऱ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षांच्या दिवसाबद्दल सांगितलं आहे. उदा. अविनाश धर्माधिकारी, लीना मेहेंदळे, अश्विनी भिडे इ. सर्व लेखकांची नावं पुढील छायाचित्रात दिसतील



जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे लेख खास मार्गदर्शनपर आहेतच पण इतरांनाही ते तितकेच रोचक वाटतील. कारण अधिकारी होण्यामागच्या प्रत्येकाच्या ऊर्मी वेगळ्या, प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी, यशापयशाची साखळीही वेगळी. परीक्षा/ध्येय एकच पण त्यापर्यंत पोचण्याचा प्रवास खूपच वेगळा. त्यामुळे दुसऱ्या यशस्वी व्यक्तीच्या आचार-विचाराची नक्कल करून यशस्वी होता येईलच असं नाही. तर त्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला, क्षमतेला साजेसा असा स्वतःचा मार्ग प्रयेकाने शोधला पाहिजेच. हा नवा बोध यातून होतो. फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे लागू पडेल. "’मृत्युंजयचे’ मंत्रभारले दिवस" या दीर्घ लेखात संपादक सागर देशपांडे यांनी ’मृत्युंजय’ कादंबरी कशी घडली, लेखक शिवाजी सावंत यांनी कशी तयारी/संशोधन केले, या कादंबरीचं स्वागत मराठीजनांनी कसं केलं हे सगळं विस्ताराने सांगितलं आहे. काही जुने फोटोही आहेत. कादंबरी मागची ही कथाही निश्चित वाचनीय.

मासिकाच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळाशी मोठीमोठी नावं जोडली गेली आहेत.



एकूणच मी सुरुवात करताना म्हटलं त्या प्रमाणे एक वाचनीय आणि संग्राह्य अशा दिवाळी अंक वाचण्यात आला. तुम्हीही वाचा; तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे.

हे परीक्षण त्या मासिकाच्या मार्चच्या अंकात वाचकांच्या प्रतिसादाअंतर्गत पूर्णपानभर प्रसिद्ध झालं आहे




------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

તત્ત્વમસિ / तत्त्वमसि / tattvamasi




पुस्तक :- तत्त्वमसि /તત્ત્વમસિ / tattvamasi 
लेखक :- ध्रुव भट्ट ધ્રુવ ભટ્ટ/ Dhruv Bhatt 
भाषा :- गुजराती / ગુજરાતી / Gujarati
पाने :- २३२

शहरात वाढलेला, अमेरिकेत शिकायला गेलेला एक तरूण आपल्या अमेरिकन प्रोफेसरांच्या सांगण्यावरून भारतातल्या आदिवासींबद्दल संशोधन करायला येतो. काहीसा अनिच्छेनेच. जरी भारतीय असला तरी त्याला भारताबद्दल विशेषतः या जंगलात राहणाऱ्या आदिवासींबद्दल काहीच आकर्षण वाटत नसतं. तरी काही महिने भारतात राहून आदिवासींमध्ये राहून फिरून माहिती गोळा करायची जबाबदारी त्याच्यावर येते. आता जातोच आहोत तर आदिवासींसाठी एखादी शाळा वगैरे सुरू करून त्या "अडाण्यांना" थोडं शिकवावं असा तो विचार करतो. 

सरांच्या ओळखीने तो नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातल्या आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो. आदिवासींचं जीवन त्याला जवळून पहायला मिळतं. 

आदिवासी दगडाला, झाडांना देव मानणारे. या अडाणीपणाचा त्याला राग येतो. पण या निबिड अरण्यात राहताना या श्रद्धाच कश्या बळ देतात हे त्याला उमगतं. आदिवासी एकेमेकांना कशी साथ देतात, प्रामाणिकपणे व्यवहार करतात, परंपरेने आखून दिलेल्या मार्गावर कसे निष्ठेने चालतात हे त्याला अनुभवायला मिळतं. 

हे आदिवासी नर्मेदेला देवी मानणारे. नर्मदेच्या जंगलात नर्मदा परिक्रमा करणऱ्या "परिकम्मा"वासींची जशी जमेल तशी सेवा करण्यात समाधान मानणारे. परिक्रमेबद्दल जेव्हा त्याला कळतं तेव्हा एका नदीला प्रदक्षिणा करणं म्हणजे त्याला मागासपc वाटतो. पण परिक्रमावासी आणि आदिवासी केंद्रातले काही जाणते लोक यांच्या मुळे त्याला कळतं की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाद्वारे सर्व प्रदेशातले लोक कसे परस्परांना भेटतात, ज्ञानाची देवाण्घेवाण होते. आसेतुहिमाचल पसरलेल्या या भूप्रदेशात आचार-विचार-उपासना पद्धती इतक्या भिन्न आहेत पण त्यामागचा आत्मा,मूल्य मात्र समान आहेत. 
नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांना नर्मदा भेटते म्हणे; पण ते भेटणं सांगून कळणारं नाही. दुसऱ्याला दाखवतो म्हणून दाखवता येणारं नाही. मनात श्रद्धा ठेवून परिक्रमा करतानाच ते अनुभवायला हवं हे त्यालाही उमगतं आणि त्यालाही अनुभवायला मिळतं.

असा एकूण पुस्तकाचा अवाका आहे. त्यातले प्रत्यक्ष प्रसंग सांगून तुमची मजा घालवत नाही. पण आदिवासींबद्दल आपल्यालाही वस्तुनिष्ठ विचार करायला लावणरी ही कादंबरी आहे. लेखक भारतीय संस्कृतीच्या, रीतीरिवाजांच्या आणि महानतेच्या प्रेमात आहे हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे पुस्तकात भारतीय संस्कृतीबद्दल महान, गोडगोड असंच वाचायला मिळतं. बऱ्यावाईटाचा साक्षेपी ऊहापोह नाही. तरी काही पैलू नव्याने सापडू शकतील.

एक कथा म्हणून कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. 

या पुस्तकाचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. अंजली नरवणे यांनी तो केला आहे. ------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------






----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...