ययाति (Yayati)





पुस्तक : ययाति (Yayati)
लेखक : वि.स. खांडेकर (V.S. Khandekar) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४१९

मराठीतील श्रेष्ठ लेखक वि.स. खांडेकर यांच्या "ययाती" या कादंबरीला "साहित्य अकादमी" चा पुरस्कार मिळलेला आहे. ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पुस्तकातील माहितीनुसार प्रथमावृत्ती १९५९ सालची आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत कितीतरी वाचकांनी, मान्यवर लेखकांनी, समीक्षकांनी याबद्दल खूप काही लिहून ठेवलं असेल. आता त्यात नव्याने मी काही सांगावं अशी शक्यता नाही आणि तितका माझा अधिकारही नाही. तरी, मी पुस्तक वाचले, मला आवडले हे सांगायचा मोह आवरत नाही म्हणून हे परीक्षण. थोडक्यातच लिहिलेले. 

सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. 

संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक. आयुष्यभर कामवासनांचा भोग घेत ययाती जगतो आहे. एका शापामुळे त्याला वार्धक्क्य येतं तेव्हाही स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागून कामसुख मिळवत राहण्याइतका तो विषयांच्या आहारी गेलेला होता. इतकं होऊनंही जाणवणारी अतृप्ती, सगळ्या सुखसोयी हाताशी असूनही आपण सुखी नाही ही जाणीव आणि वार्धक्क्याची-मरणाची भीती ययातीला कुरतडते आहे.
स्वतःचे सौंदर्य आणि वडील शुक्राचार्य यांच्या तपःसामर्थ्याबद्दलचा अतिगर्व, अहंकार यामुळे स्वतः आणि दुसऱ्यालाही मानसिक त्रास, अपूर्णता वाटण्यात आयुष्य घालवणारी अशी देवयानी आहे. 
प्रेम हे फक्त शारिरिक नाही तर मनाने, बुद्धीनेही एकमेकांचा स्वीकार करणं आवश्यक आहे, प्रेमात दुसऱ्याकडून फक्त सुखं मिळवणं अपेक्षित नाही तर दुसऱ्यासाठी त्यागही करावा लागतो हे शर्मिष्ठेला कळतं म्हणून ययातीवरील प्रेमापोटी ती विरह-विजनवासही सहन करते. 

एका पौराणिक उपकथानकाचा आधार घेऊन लेखकाने स्वतः ही कादंबरी रचली आहेत. स्वप्रतिभेने असंख्य पात्रं रचली आहेत. कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत उत्सुकता कायम राहते. कादंबरीतील पात्रं स्वगत सांगताना परस्परविरोधी भूमिका मांडतात. त्यांच्या या वाद-संवादातून लेखक आपल्यासमोर एक तत्त्विक चर्चाच उभी करतो. जीवनातलं सुख-दुःख, प्रेम-वासना, आयुष्याचा आनंद घेणं- त्यामध्ये वाहून जाणं याबद्दल ही उद्बोधक चर्चा आहे. लेखकाचं वैशिष्ट्य असं की ही चर्चा कथेच्या ओघात येते, पात्रांच्या सहज संवादात येते, चर्चा नीरस होत नाहीच उलट कथानक पुढे घेऊन जायला, प्रसंगाची परिणामकारकता वाढवायलाच मदत करते.

पुस्तकाच्या शेवटी खांडेकरांनी या कादंबरीची कल्पना त्यांना कशी मिळली, अनेक वर्षं त्यावर विचार, अभ्यास करून शेवटी प्रत्यक्ष लेखनाकडे ते कसे वळले, कथा पौराणिक असली तरी ति आजच्या जगातली प्रासंगिकता याबद्दल भाष्य केलं आहे. 

पुस्तकातील कितीतरी वाक्य सुभाषितांसारखी किंवा नित्यसत्यवचनं असावीत अशी आहेत. अगदी टिपून ठेवावीत अशीच. 
मी काही वाक्य इथे देणार होतो. पण संदर्भाला सोडून वाक्य देण्यात स्वतःचा "गटणे" व्हायचा; म्हणून तो मोह टाळला आहे. ती वाक्ये, चर्चा आणि नाट्य प्रत्यक्ष कादंबरी वाचूनच अनुभवण्यात, समजण्यात मजा आहे. ती तुम्ही नक्की घ्या.


"ययाती" बद्दल हिंदी विकिपिडिया वर छान श्लोक मिळाला
विषय वासना से तृप्ति न मिलने पर उन्हें (ययाती)उनसे घृणा हो गई और उन्हों ने पुरु की युवावस्था वापस लौटा कर वैराग्य धारण कर लिया। ययाति को वास्तविकता का ज्ञान प्राप्त हुआ और उन्होने कहा-

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ॥
अर्थात, हमने भोग नहीं भुगते, बल्कि भोगों ने ही हमें भुगता है; हमने तप नहीं किया, बल्कि हम स्वयं ही तप्त हो गये हैं; काल समाप्त नहीं हुआ हम ही समाप्त हो गये; तृष्णा जीर्ण नहीं हुई, पर हम ही जीर्ण हुए हैं !


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...