ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)




पुस्तक - ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)
लेखिका - सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४२
प्रकाशन - डॉ. स्मृती निकुंभ - हावळ, सुकर्मयोगी. ऑक्टोबर २०२२
ISBN - 978-81-931362-4-9
छापील किंमत - रु. ३९९/-

जपान देश मला नेहमी आकर्षित करतो. जपानचे फोटो आणि व्हिडीओ बघताना तिथली प्रत्येक गोष्ट किती देखणी वाटते. आखीवरेखीव रस्ते, स्वच्छ इमारती, नीटनेटकी-शिस्तीत प्रवास करणारी माणसे, हिरवी शेते - निळेशार पाणी - प्रदूषण मुक्त हवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि तरी पारंपरिक पोशाख आणि देवळे ह्यांचा सहज अस्तित्व, आनंदी आणि कार्यरत वृद्ध ... काय काय लिहावं..किती पहावं..आणि किती किती वाचावं...म्हणून एका पुस्तकप्रदर्शनात हे पुस्तक बघितल्यावर हात आपोआप तिकडे वळले. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पण सोपं, ठसठशीत आणि आकर्षक. जपानी किल्ला, साकुरा (चेरी चा बहार), माउंट फुजी आणि प्रवासी स्त्रीची प्रतिमा. पुस्तक बघायला उद्युक्त करणारे.

लेखिका सुजाता गोखले गेली २२ वर्षे विविध स्तरावर जपानी भाषा शिकत आहेत. त्यांनी जपानी भाषेत बी.ए., एम. ए. पण केलं आहे. २००८, २०११, २०१७ आणि २०१९ असा चार वेळा त्या काही आठवडे, काही महिने जपानमध्ये राहिल्या होत्या. तेव्हा स्थानिक लोकांना भेटल्या, होम स्टे मध्ये राहिल्या, त्यांच्या जपानी सहकाऱ्यांबरोबर भरपूर फिरल्या, तिथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खाल्ले, अनवट ठिकाणांनाही भेटी दिल्या. ह्या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवनाचे दिलखुलास वर्णन पुस्तकात आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


नेहमीपेक्षा मोठ्या आकारातले हे पुस्तक आहे (लॉंगबुक / बहुतेक A4 साईज). एकेक ठिकाण, एकेक अनुभव किंवा एकेक भेट ह्यांच्यावर एक किंवा दोन पान असं वर्णनाचं स्वरूप आहे. टोकियो, माउंट फुजी, हिरोशिमा, योकोहामा अशी नेहमीची नावं आहेत. पण बरीच अनवट ठिकाणं आहेत. उदा.
ओमिया - बोन्साय (लघुवृक्षे)चे गाव. दोनदोनशे वर्षे जुनी बोन्सायची झाडे तिथे आहेत. बोन्साय शिकवणारे क्लासेस तिथे आहेत.
ओसाका किल्ला
गिओन - खास झगा, केसांचा मोठा आंबाडा, भरपूर मेकअप अशा बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जपानी सौंदर्यवती - गेईशा -चे गाव
शिंतो देवळे
समुद्रात बांधलेले कानसाई विमानतळ
हिमेजी किल्ला
कप नूडल्स म्युझियम
इ.

जपानी बुलेट ट्रेन ने प्रवास, गगनचुंबी इमारतीच्या उंचीवरून दर्शन आणि विविध जपानी बागांच्या भेटीचा अनुभव घेतलाच. पण जपानची शाळा, कचरा व्यवस्थापन केंद्र, इकेबाना पुष्परचना वर्ग , हानाबी (फटाक्यांची आतषबाजी), साइतामा गावाच्या मेयरशी भेट, "आंतरराष्ट्रीय मैत्री जत्रा आणि प्रदर्शनात" स्टॉल लावून भारतीय कलात्मक वस्तूंची विक्री हे सगळंही अनुभवलं.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की लक्षात अजून काय काय आहे हे.



ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य, सौंदर्यस्थळ थोडक्यात सांगितलं आहे. तिथे कसा प्रवास केला, जाता येता काय खाल्लं, आजूबाजूची माणसं कशी दिसली असं सगळं सांगत त्या पुढे पुढे गेल्या आहेत. एकटीने प्रवास करताना झालेली फजिती, अनोळखी पदार्थ चाखताना झालेला अपेक्षाभंग किंवा "खास जपानी स्वभावा"चा फटका सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितला आहे. त्यामुळे जपानची माहितीपुस्तिका किंवा गंभीर लेखमाला असं न होता लेखिकेच्या आपल्याशी गप्पा होतात. जणू आपण त्यांच्या घरी गेलो आहोत आणि त्या एकेक फोटो दाखवत, "तेव्हा आम्ही इकडे गेलो, आणि मग हे खाल्लं, हे असं असेल असं वाटलंच नव्हतं" असं सांगतायत !

काही पाने उदाहरणादाखल

जपानची शाळा
बोन्साय चे गाव
शिंतो देवळे 

स्थलवर्णन शब्दांत कितीही चांगलं केलं तरी a picture tells a thousand words ह्या उक्तीनुसार फोटो हवेतच. ह्या पुस्तकात भरपूर फोटो आहेत. ते रंगीत आहेत. आणि मोठ्या आकाराचे स्पष्ट आहेत. फोटो देताना काचकूच केली नाहीये हे बघून आनंद झाला. पुस्तकाची परिणामकारकता वाढली आहे. हे फोटो पुस्तकाच्या मध्ये मध्ये काही पाने एकत्र असे दिले आहेत. त्याऐवजी ते वर्णनाच्या सोबतच देता आले असते तर ... (ये दिल मांगे मोअर :) ). किमान फोटो कुठल्या पानावर आहे तो क्रमांक मजकुराच्या मध्ये दिला तरी अजून फायदा होईल. 

हे पुस्तक माहिती, वर्णन, फोटो ह्यांनी भरलेलं आहे. जपानबद्दल बरीच नवी माहिती कळेल. तिथल्या लोकांची विचारपद्धती आणि जीवनपद्धती कळेल. जपानबद्दलचं कुतूहल अजूनच वाढेल. लेखिकेच्या आगामी जपान प्रवासात आपल्यालाही सहप्रवासी होण्याची संधी मिळावी असं वाटायला लागेल. जपान भेटीची संधी मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत हा वाचनानंद चुकवू नका.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha)

पुस्तक - ऋणानुबंध पूर्वेचा (Runanubandh Purvecha) लेखिका - सुजाता गोखले (Sujata Gokhale) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४२ प्रकाशन - डॉ. स्म...