पुस्तक :- संपूर्ण कालिदास - कथा ( sampoorna kalidas - katha )
लेखक :- वि.वा.हडप (V.V. Hadap)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २२४
आज(२४ जून २०१७).. आषाढ प्रतिपदा.. आषाढाचा पहिला दिवस... महाकवी कालिदास दिन !!
संस्कृत भाषेबद्दल ज्यांना थोडीशीही माहिती आहे त्या प्रत्येकाने "कालिदास", "मेघदूत" हे शब्द निश्चितच ऐकलेले असतील. कालिदास हा संस्कृत भाषेतील सर्वांत लोकप्रिय कवी. इतका लोकप्रिय की त्याचा उल्लेख आदराने "कविकुलगुरु" असा केला जातो. त्याची नाटके आणि काव्ये फक्त भारतीयच नाहीत तर जगभरातील काव्यरसिक वाखाणतात. जर्मन भाषेतील महान कवी गटे याला देखील कालिदासाच्या काव्याने वेड लावले होते. आमच्या शाळेतल्या संस्कृतच्या बाई सांगायच्या की म्हणे कालिदासाचे "शाकुंतल" डोक्यावर घेऊन तो अक्षरशः नाचला होता. कालिदासाच्या "मेघदूत" या काव्यातील "आषाढस्य प्रथमे दिवसे.."; अर्थात "आषाढाच्या पहिल्या दिवशी..." या काव्यपंक्ती अजरामर आहेत. म्हणूनच या दिवसाला कलिदास दिन म्हटलं जातं
ज्यांना संस्कृत भाषा चांगली येते किंवा तिचा अभ्यास केला आहे अश्यांनी कालिदासाची नाटके, काव्ये थेट संस्कृतातूनच वाचली असतील. पण माझ्यासारख्या ज्यांना संस्कृतची केवळ तोंडओळख आहे;ज्याला कालिदासाच्या काव्याचा थेट संस्कृतातून आनंद घेणं शक्य नाही अशांसाठी त्याचं भाषंतर हाच पर्याय आहे. म्हणूनच "रिया पब्लिकेशन/अजब डिस्ट्रिब्युटर्स"च्या "कुठलेही पुस्तक फक्त ६० रुपयांत" अशी सवलत असलेल्या प्रदर्शनात जेव्हा मला "संपूर्ण कालिदास-कथा" हे पुस्तक दिसलं तेव्हा मी ते लगेच विकत घेतलं.
२२४ पानी पुस्तकात "मालविकाग्निमित्रम्", "अभिज्ञान शाकुन्तलम्", "विक्रमोर्वशीयम्" ही नाटके; "कुमारसंभवम्","रघुवंशम्" ही महाकाव्ये आणि "मेघदूतम्" हे खंडकाव्य यांच्या कथा आहेत. हे पुस्तक म्हणजे श्लोकशः भाषांतर नव्हेच पण स्वैर भाषांतरही नाही. तर या कलाकृतींच्या कथा सोप्या मराठी भाषेत सांगितल्या आहेत.
या पुस्तकात कालिदासाचा कालखंड आणि त्याच्या जीवनाबद्दलच्या काही आख्यायिका यांचीही माहिती आहे. ख्रिस्तपूर्व पहिले शतक हा कालिदासाचा कालखंड असावा असा अंदाज आहे. म्हणजे कालिदास साधारण दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला. पण दोनहजार वर्षांनंतरही भारतीय समाजाची अभिरुची अजून तशीच आहे याची गमतीदार जाणिव होते.
"रघुवंशा"त रघुकुलात उत्पन्न राजांचे - रघु, दिलीप, अज, दशरथ, राम, कुश-लव आणि पुढच्या पिढ्यांतील वर्णन आहे.
"अभिज्ञान शाकुन्तलम्" मध्ये राजा दुष्यंत आणि आश्रमवासी शकुंतला यांची भेट, प्रेम, विरह आणि पुनर्मिलन अशी कथा आहे.
मालविकाग्निमित्रम् मध्ये राजकन्या असूनही दुर्दैवाने एक आश्रित म्हणून राहावे लागलेल्या मालविकेची कथा आहे. अग्निमित्र राजाला ती आवडू लागते आणि तिचे प्रेम तो कसे मिळवतो हे या नाटकात आहे.
विक्रमोर्वशीयम् मध्ये राजा शंतनु आणि अप्सरा ऊर्वशी यांची प्रेमकथा आहे.
"कुमारसंभव" ही शिवपार्वती विवाह, भगवान कार्तिकेयाच्या जन्म आणि पराक्रमाची कथा आहे. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर "मेघदूत" आधारले आहे. यात त्या मेघाला वाटेत कुठले पर्वत, नद्या, शहरे, लोक दिसतील याचे सुंदर वर्णन आहे
सर्व कथा मनोरंजक तर आहेतच पण चमत्कृतीपूर्णही आहेत. देवलोक आणि मानवलोक, त्यांतील चमत्कार, शाप-उःशाप अश्या अनेक गोष्टी वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचताना सध्या गाजत असलेला "बाहुबली" चित्रपटाची आठवण झाली आणि फँटसी लँडचं माणसाचं आकर्षण कालिदासापासून आजपर्यंत टिकून आहे याची गंमत वाटली.
सध्याची हिंदी चित्रपट सृष्टी आणि या कथांचं दुसरं साधर्म्य म्हणजे "प्रेमकथा". हिन्दी चित्रपटांप्रमाणेच या सगळ्या देखील "लव्हस्टोरीच" आहेत. बहुतेक सर्व गोष्टी या राजांच्या "पाहताक्षणी प्रेम"-लव अॅट फर्स्ट साईट अशा प्रकारच्या आहेत. राजा कुणाच्या तरी प्रेमात पडतो आणि ते प्रेम मिळवण्यासाठी धडपडतो - सध्याच्या हीरोंसारखाच. फरक इतकाच की हे राजे आधीच्या बायका/पत्नी असूनही नव्याने कुणा तरुणीच्या प्रेमात पडतात. आणि आधीच्या बायका कधी रागाने तर कधी आनंदाने सवतीची आणि राजाची भेट घालून द्यायला मदत करतात. आजच्या सारकखं माझी Ex(माजी प्रेयसी), breakup (प्रेमभंग) अशी भानगड नाही.
हे राजे सगळे विलासी असले तरी प्रत्येकजण पूर्णपुरुषोत्तम-सर्वगुणसंपन्न-प्रजाहितदक्ष असेच आहेत. राज्याची-प्रजेची सगळी व्यवस्था चोख लावूनच आता प्रेमाचे उद्योग फुरसतीत करतायत असं जाणवतं. तर नायिका म्हणजे सौंदर्याचा अजोड नमुना; सौंदर्य-बुद्धिमत्ता-शालीनता यांचा त्रिवेणिसंगम अशा आहेत. एकूणच सगळा महाआदर्शवादी मामला आहे बुवा !
असो ! या साहित्यकृतींबद्दल मी इथे फार लिहित नाही. इंटरनेट वर तुम्हाला त्याबद्दल खूप विस्तृत वाचायला मिळेल.
पुस्तक वाचून कथांची ओळख झाली पण मूळ काव्य संस्कृतमधून वाचल्याशिवाय कालिदासाच्या भाषासौंदर्याची जाणीव होणार नाही हे खरंच. संस्कृत काव्यवाचन करून रसग्रहण करता येईपर्यंत तुम्हाला मला अशा भाषांतरावरच अवलंबून राहावं लागणार. पण भारताची ओळख जगभरात ज्यासाठी आहे अशा विविध नाममुद्रां(brands)पैकी कालिदास या नाममुद्रेची जवळून ओळख करून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे श्लोक आणि त्यांचा अर्थ
पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्टिकाधिष्ठित कालिदास: ।
अद्यापि ततुल्य कवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव ॥
पूर्वी कधीतरी कवींची मोजणी करण्याला सुरुवात झाली तेव्हां कालिदास पहिला म्हणून करंगळी उघडली. पण त्याच्याशी बरोबरी साधू शकेल असा दुसरा कोणी डोळ्यासमोर येईना. त्यामुळे पुढच्या बोटाला "अनामिका" हे नाव सार्थ ठरले.
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या ,
नादत्ते प्रिय मण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् |
आद्ये वः कुसुमुप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः ,
सेयं याति शकुन्तला पति-गृहं सर्वेरनुज्ञायताम् ||
कण्व मुनी आपल्या मुलीची - शकुंतलेची - ऋषिआश्रमातून पतिगृही पाठवणी करताना वृक्षवेलींना उद्देशून म्हणतायत :
जिने तुम्हाला पाणी घातल्याशिवाय कधी स्वतः पाणी प्यायले नाही;
जिला स्वतःला नटण्याची आवड असली तरी तुमच्यावरच्या प्रेमापोटी जिने कधी तुमचे पान-फूल तोडले नाही;
तुमचे पहिले फुलणे किंवा पहिली फलधारणा हा जिच्यासाठी उत्सव होता;
अशी शकुंतला आज पतिगृही चालली आहे; तुम्ही सगळे तिला अनुज्ञा द्या, निरोप द्या.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------