रारंग ढांग (rarang dhang)




पुस्तक : रारंग ढांग  (rarang dhang)
लेखक : प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १७५
ISBN : 81-7486-269-2


प्रस्तावनेच्या सुरुवातीच्या परिच्छेदात पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली आहे.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)



विश्वनाथ हा इंजिनीअर आपली मुंबईतली नोकरी सोडून बाॅर्डर रोड आॅर्गनायझेशन मध्ये मुलकी इंजिनियर म्हणून रूजू होतो. हिमालयातल्या उंचच उंच कड्यातून -ढांगातून - रस्ता काढायच्या कामावर त्याची नेमणूक होते. त्याच बदलणारे हवामान, दरडी कोसळणे, अपघात यांच्याशी त्याची ओळख होते. तशीच ओळख होते सैन्यातल्या करड्या शिस्तीशी. शिस्त पाळणं त्याला आवडत नाही असं नाही पण केवळ अांधळेपणे आज्ञा पाळणेही. त्याला जमत नही. आणि एक छुपा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष चांगला विरूध्द वाईट असा नाही. दोन्ही बाजू चांगल्याच. आपापल्या परीने निस्वार्थी प्रामाणिकच. हा संघर्ष, हे या कादंबरीचं मूळ कथानक. 

सैन्य किंवा सैनिक म्हटलं की आपल्याला देशभक्ती, धैर्य किंवा त्यांचा घरच्यांशी होणारा विरह याबद्दल आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं. पण त्या पलिकडे जाऊन लष्कर म्हणून काम करताना किती वेगवेगळी मानसिक अव्हानं पेलावी लागतात याची जाणीव होते. दिलेली आज्ञा तंतोतंत पाळणे पटो अथवा न पटो, हाताखालच्या लोकांवर योग्य वचक ठेवणे, प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागणे इ. शिस्त, धाडस, आज्ञाधारकपणा या सगळ्या बाबतीत "सिव्हिलियन"पेक्षा लष्करी माणूस वरचढ हा आत्मगौरवही जागोजागी दिसतो. उदा. हा प्रसंग वाचा


विश्वनाथ आणि त्याच्या वडिलांच्या पत्रव्यवहारातून, ज्या घटना घडतात त्यावर सुंदर तत्वचितंनही आहे.
तसं म्हटलं तर "रारंग ढांग" ही एका रस्तेबांधणीची गोष्ट आहे. पण ती साधी नाही. एखाद्या ठिकाणी रस्ता बांधला जाणं म्हणजे त्या भागात पोचणं आता सोपं करणं. निर्मितीचा आनंद त्यात आहे. हे काम दुर्गम पर्वतीय भागात होत आहे म्हणून त्याला निसर्गागशी घेतलेल्या झुंजीची, माणसाच्या महत्वाकांक्षेची जोड आहे. हा पर्वत  हिमालय असल्याने त्या कामाला भव्यतेची पार्श्वभूमी आहे. आणि हे काम लष्कर करतंय म्हणून त्याला सैनिकी शिस्तीचा आयाम आहे. लष्करातला अधिकारी ध्येयवादाने प्रेरित होऊन हे काम करत असल्याने या भौतिक कामाला एका तत्वचितंनाची जोड मिळाली आहे. हे सर्व स्वयंसिद्ध पैलू लेखनशैलीच्या कोंदणात सुरेख बसले आहेत. व्यक्ती, प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी वर्णन शैली, परिणामकारक संवाद, न रेंगाळणारे प्रसंग, कुठल्याही पात्रावर अन्याय न करणारं समतोल चित्रण याची सुरेख मेजवानी असं हे पुस्तक आहे. 

प्रसंगांची वर्णनं वाचून असं वाटत होतं की हातात कला पाहिजे होती. किती सुंदर स्केचेस काढता आली असती यांची. खरंच पुढच्या आवृत्त्यांमध्ये, प्रकाशकांनी कुणाकडून तरी पेन्सिल स्केचेस काढून सचित्र आवृत्ती काढली पाहिजे.

उदा. कामाच्या ठिकाणी दरड कोसळते तेव्हा तिथे मदत करायला पोचलेल्या विश्वनाथला हे दृश्य कसं दिसतं



पुस्तक ८१ साली पहिल्यांदा प्रकाशित झालं असलं तरी हिमालय, सैन्य, शिस्त, ध्येयवाद, स्वभावांचा टोकदारपाणा या कधीही जुन्या न होणाऱ्या गोष्टी. त्यामुळे पुस्तकही अजून जुने झालेले नाही. पुन्हा पुन्हा प्रकाशित झालेले आहे. मी वाचली ती प्रत २००३ सालची नववी आवृत्ती होती. लोकप्रिय पुस्तकांपैकी ते एक आहे यात नवल नाही. तुम्हालाही नक्कीच आवडेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. सुरेख परीक्षण !!

    ReplyDelete

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...