एम आणि हूमराव (Em Ani Humrao)

पुस्तक : एम आणि हूमराव  (Em Ani Humrao)

भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक : एम अँड बिग हूम (Em and Big Hoom)
मूळ लेखक : जेरी पिंटो (Jerry Pinto)
मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी  (English)
अनुवाद : शांता गोखले (Shanta Gokhale)
पाने : १८६
ISBN : 978-81-7185-515-5

ही मुंबईत राहणाऱ्या एका कुटंबाची गोष्ट आहे. आई-वडील-मुलगा-मुलगी असं चौकोनी कुटुंब आहे ते. या कुटुंबातला मुलगा गोष्टीचा निवेदक आहे. त्याची आई मनोविकारग्रस्त आहे. तिला मधून मधून या आजाराचे झटके येत असतात. कोणीतरी आपल्याला, आपल्या घरच्यांना अपाय करणार आहे अशा भीतीने ती सैरभैर होत असते. आरडाओरडा करते; स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्नही करते. थोडी निवळली की स्वतःच्या आयुष्याबद्दल बरंच लिहिते. कधी झटक्यामध्ये खूप बोलतेही आपल्या आयुष्याबद्दल. विशेष म्हणजे आपल्या मुलांशीच ती तिचे आणि नवऱ्याचे शरीरसंबंध, स्वतः केलेले गर्भपात अशा खाजगी विषयांबद्दल बोलते. तर या पुस्तकभर त्या बाईचं बोलणं आणि तिचं लिखाण यातून तिचं गत आयुष्य पुढे येतं. तर तिने केलेले आत्महत्येचे किंवा विध्वंसक कृती याबद्दल तिचा मुलगा सांगतो. 


हा या कथेचा सारांश आहे. पण कादंबरीच्या ब्लर्ब मध्ये लिहिल्याप्रमाणे, हलवून सोडणारी, दिपवून टाकणारी काही मला वाटली नाही. मुख्य पात्र असलेल्या बाईचं गत आयुष्य सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलीप्रमाणेच आहे त्यात वाचण्यासारखं विशेष नाही. आणि सध्याच्या विकारग्रस्त अवस्थेत दिसते ते तिचे वरवरचे वागणेच फक्त आप्ल्या समोर येते. तिचा तिला काय त्रास होत असेल हा परकायाप्रवेश नाही कारण निवेदक मुलगा आहे. हा मुलगा बहिणीच्या, वडीलांच्या आयुष्याबद्दल ओझरते उल्लेख करतो. त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम, "वेड्या बाईचा" मुलगा म्हणून काहीवेळा झालेली हेटाळणी किंवा या सगळ्या त्रासातून सुटका व्हावी असं वाटणं इ. थोडंसं सांगतो. पण त्यात सखोलता नाही. आजारी माणसाच्या कुटुंबाला काय त्रास काढावा लागत असेल याची कल्पना आपल्याला असतेच. त्याला आजारी माणसाची काळजी वाटते, तो बरा व्हावं असं वाटतं, त्याची सेवा करून करून जखडून गेलोय, आपलं आयुष्यच रहिलं नाही असं वाटतं, या आजारातून मरणच त्याची सुटका करेल असं वाटतं आणि असा सुटकेचा विचार करणं स्वार्थीपणाचं आहे असंही त्याला वाटतं. इ. या पुस्तकात इतपतच किंवा याहूनही कमी भावना दिसतात. दिसतात त्याही फिक्या, चोरटेपणे. त्यामुळे शिल्लक राहते ती त्या बाईचं सरधोपट जगणं आणि आजारात केलेली ओंगळवाणी बडबड. हा एक प्रसंग पहा.


(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)
त्यामुळे हे पुस्तक मला काही भावलं नाही. गंमत म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर कळालं की मूळ इंग्रजी पुस्तक "साहित्य अकदमी पुरस्कार" विजेतं आहे. पुरस्कारप्राप्त पुस्तक आणि आणि मी यांचं काही जमत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. दोन-तीन गोष्टी मला या "पुरस्कारप्राप्त" पुस्तकांच्या जाणवल्या. पहिलं, लैंगिक संबंधांबद्दल लिहिणं, त्यातल्या विकृतींबद्दल किंवा व्यभिचारांबद्दल लिहिणं म्हणजे बोल्ड लिहिणं. दुसरं म्हणजे कुठलंही कथानक सरळ सांगायचं नाही. थोडं आत्ता, थोडं भूतकाळात, थोडं कल्पनेत. तिसरं पात्रांची ओळख न करून देता तो माणूस, ती साडीतली बाई, किंवा नुसतं नावाने लिहायचं आणि मग वाचकाने - पण हा बाबा किंवा ही बाई नक्की कोण - हे शोधत राहायचं. गोष्टीचे तुकडे गोळा करायचे आणि जमेल तसे जुळवत राहायचे. हे असलं लिहिलं की मिळतो वाटतं पुरस्कार. असो !

अनुवादासाठी मात्र १००% गुण. भावनांची तीव्रता आणि शिव्या, शब्दांची निवाद यातून इतकं सहज आणि ओघवतं भाषांतर आहे की मूळ पुस्तक हेच आहे असंच वाटतं. भाषांतर असल्याचा संशयही येत नाही, इतकं अस्सल. त्यामुळे शांता गोखले यांनी अनुवादित केलेली इतर पुस्तकं वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.


------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...