हत्या (Hatya)





पुस्तक : हत्या (Hatya)
लेखक : श्री. ना. पेंडसे (Shri Na Pendse)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २८४
ISBN: दिलेला नाही

"हत्या" म्हणजे खून, वध नव्हे तर "हनुमंता" या नावाचं ते लघुरूप आहे. बाळ्या, पोऱ्या प्रमाणे. हनुमंता उर्फ हत्या या पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाच्या भावजीवनावर आधारित ही कादंबरी आहेत. त्यात हत्याच निवेदक आहे. कोकणातल्या दापोली जवळच्या एका ब्राह्मण कुटुंबाची ही कहाणी आहे. खाऊनपिऊन सुखी असं हे कुटुंब. कोकणचा निसर्ग, बागा आणि आपले कुटुंबीय यात हत्या मजेने बालपण घालवत असतो. पण एकत्र कुटुंबात जी भांडणं दिसतात तशी जबाबदाऱ्या आणि सामायिक कर्जं यांच्यावरून भांडणं इथेही होतात. हत्याचे वडील वाटण्या करून वेगळे होतात. गाव सोडून कुटुंबाला घेऊन दापोलीला स्थायिक व्ह्यायचंठर्वतात. हत्याच्या भावविश्वाला पहिला तडा इथे जातो. आपली माणसं तर त्याला दुरावतात. माणसांइतकीच प्रिय असणारी झाडं-कलमं, आवडती गायीगुरं यांच्यापासून त्याची ताटातूट होते. शहरातल्या जीवनात, शाळेत, नव्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यात तो कसा मिसळायचा प्रयत्न करतो याचं चित्र अनेक प्रसंगातून उभं केलं आहे.

पुढे त्यांच्या घरावर संकटांची मालिका येते. हत्याला शाळा सोडावी लागते आणि एका हॉटेलात नोकरी धरावी लागते. अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. ज्यांच्या पासून हत्याचे वाडील वेगळे झले असतात ते त्यांचे काका- हत्याचे आजोबा - झालं गेलं विसरून या कुटुंबाच्या मदतीला उभे राहतात. जमेल तशी मदत करतात. आजोबा-नातवाचं हे प्रेमळ नातं हळुवार उलगडलं आहे.

वर्ष सहा महिन्यांत इतके वाईट प्रसंग, अपमान, गरीबी आणि कश्ट हत्याच्या वाट्याला येतात की ती बाल कोवळीक अकालीच पोक्त होते. हा प्रवास म्हणजे हत्या कादंबरी.

"हत्या" या शब्दाच्या उच्चारावरून कादंबरीबद्दल वेगळाच समज होऊ शकतो. त्यामुळे या नायकाचं नाव हत्याच का ठेवलं असेल असा प्रश्न पडतो. कादंबरीत येणारे प्रसंग पाहून मला जी.एं.च्या "काजळमाया"ची आठवण झाली. त्या पुस्तकातल्या नायकांच्या मागे पण असेच दुर्दैवाचे दशावतार दाखवले आहेत. त्यामुळे कादंबरी वाचन जरा विषण्ण करणारंच आहे. पण काजळमाया एवढं हे भडक, भयानक नाही. 

हत्याचा बदलणारा स्वभाव, आजोबांची समंजस स्थितप्रज्ञ वृत्ती, आईचे प्रेम आणि मुलाची होणारी फरपट बघून होणारा कोंडमारा, शेजाऱ्यांची वरून गोड आणि आतून जळफळाट करण्याचा पिंड आणि गोष्टीत येऊन जाऊन असणाऱ्या पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये हे सगळं संवादांमधून आपल्यासमोर उभं राहतं. प्रसंग जिवंत होतात. कोकणच्या निसर्गाचं दर्शन होतं. हल्ली कमी ऐकू येणारी ब्राह्मणी बोलीचा गोडवाही चाखायला मिळतो. कादंबरीत अनेक नाट्य घडतात तरी कादंबरी नाट्यमय वाटत नाही ती संथ लयीत जात रहते. खूप उत्सुकताही लावत नाही आणि कंटाळाही आणत नाही.

हत्याची आजारी बहीण, सासरी त्रास भोगून त्यांच्या घरी राहायला येते तेव्हाचा प्रसंग :
(फोटोंवर क्लिक करून झूप करून वाचा.)






असं ललित वाचायला आवडत असेल तर वाचून बघायला हरकत नाही.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------



थर्ड अंपायर (Third Umpire)





पुस्तक : थर्ड अंपायर (Third Umpire)
लेखक : द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २७०
ISBN : दिलेला नाही

द्वारकानाथ संझगिरी (https://www.facebook.com/dwarkanath.sanzgiri/) यांना आपण कदाचित मराठी दूरदर्शन वाहिन्यांवरच्या क्रिकेट बद्दलच्या चर्चेत पाहिलं असेल. त्यांचे लेख सामना, लोकसत्ता किंवा इतर वृत्तपत्रांत वाचले असतील. हे पुस्तक त्यांच्या क्रिकेट बद्दलच्या पूर्वी प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचा संग्रह आहे. 

अनुक्रमणिका :
फोटोंवर क्लिक करून झुम करून वाचा



अनुक्रमणिका पाहून लक्षात आलंच असेल की लेखांचं ७ भागात वर्गीकरण केलं आहे. ते असे 
होम ग्राउंड - क्रिकेट खेळाडूंच्या घरांना संझगिरी यांनी भेट दिली आहे. अनेक खेळाडूंच्या परिवाराशीही त्यांची चांगली ओळख आहे. कुटुंबाने खेळाडूवर कसे संस्कार केले हे जाणून घ्यायलाही लेखकाला आवडतं. अशा अनुभवांवरचे हे लेख. उदा. व्हिव्हिअन रिचर्डस यांच्या घराला भेट दिली त्याचे वर्णन.





पालणा हलताना - यशस्वी खेळाडूंच्या क्रिकेट क्षेत्रात पदार्पण होत असताना ते कुठे खेळले, कसे खेळले, तो खेळ बघून तत्कालीन लोकांच्या प्रतिक्रिया आणि भकितं काय होती याचा मागोवा घेणारे लेख. उदा. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या रणजी पदार्पणाचा हा अनुभव.



माजी मास्टर्स - नावावरून्च लक्षात येत असेल की क्रिकेट मधल्या दिग्गज खेळाडूंचे गुणवर्णन करणारे हे लेख आहेत. ब्रॅडमन, विश्वनाथ, मेंडीस, कुंबळे, देवधर इ. वर लेख आहेत. 

विक्रमांच्या जगात - क्रिकेट जगतात धवा, बळी, शतके, विजय, पराजय यांमध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात असतात, जुने मोडले जात असतात. असे महत्त्वाचे विक्र्म जे गेल्या कही वर्षांत घडले त्या घटनांचे वर्णन करणारे लेख. उदा. मुरलीधरन वरचा "ऑफस्पिनचा राजा" य लेखातला काही भाग.



निवृत्तीचे लेख - महान खेळाडूंच्या निवृत्ती समयी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख.

आणि ही सक्तीची निवृत्ती - मॅच फिक्सिंगच्या कृत्यामुळे महंमद अझरुद्दीनाला क्रिकेटमधून बाहेर काढलं. सुरुवातीचा अझर ("पाळणा हलताना" भागातील लेख) आणि तो कसा बदलत वाहवत गेला याबद्दल एक लेख आहे. तर दुसरा लेख बीसीसीआयचे सर्वेसर्वा समजले जाणारे दालमिया यांना अध्यक्षप्दावरून पायउतार व्हावं लागलं, ते क्रिकेटमागचं राजकारण टिपणारा लेख.

मत्युलेख - हे सुद्धा खेळाडूंच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे, आठवणी जागवणारे लेख आहेत. पण यात वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता असूनही फार चमकू न शकलेल्या खेळाडूंवर, आणि पूर्वी प्रसिद्ध पण सध्याच्या पिढीला फार माहितीचे नसलेल्या खेळाडूंवरही लेख आहेत. दोन तीन क्रीडा पत्रकारांवरसुद्धा लेख आहेत. उदा. बॉबी तल्यारखान क्रिकेट समालोचक, पत्रकार यांच्या आठवणी :


पुस्तकात लेखांच्या प्रकाशनाच दिनांक आणि नियतकलिकाचे नाव द्यायला हवे होते. 

सगळे नियतकालिकांमधले लेख असल्यामुळे थोडेसेच तांत्रिक आहेत. बहुतेक लेख हे आठवणी, किस्से आणि एका क्रिकेट भक्ताने आपल्या "हिरों"वर केलेली शब्दफुलांची उधळण अशा स्वरूपातले आहेत. जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर हे लेख वाचायला आवडतील. नवीन किस्से कळतील. काही प्रसंगांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. विरंगुळा म्हणून वाचायला छानच आहे. क्रिकेट नसेल आवडत (माझ्यासारखं) तरी पुस्तक चाळा. "होम ग्राउंड", "माजी मास्टर्स" आणि "मृत्यूलेख" विभागातले काही लेख वाचायला आवडतील. एखाद्या क्षेत्रात महान व्यक्तिमत्त्व कसं तयार होतं हे वाचणंसुद्धा उद्बोधक आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electronic Matadar yantre)




पुस्तक : ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक :EVM - Electronic Voting Machines 
लेखक : आलोक शुक्ल (Alok Shukla)
मूळ भाषा : इंग्रजी (English)
अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
पाने : २२४
ISBN : 978-93-52011-19-3

लोकसभेच्या निवडणुका संपून जेमतेम पंधरा दिवस होतायत. त्यामुळे "निकालांमागे ईव्हीएम चा हात" हा विषय अजून ताजा आहे. त्यावरच्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद २३ एप्रिललाच प्रकाशित झालाय. त्यामुळे इतक ताजा विषय आणि इतके ताजे पुस्तक वाचायला मिळणे अलभ्यलाभ आहे. विशेष म्हणजे माझ्या वाचनालयात दाखल झाल्यावर पुस्तकाचा पहिला वाचक मीच आहे !

या पुस्तकाचे लेखक माजी आलोक शुक्ल हे सनदी अधिकारी(IAS) असून त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही निवडणूक प्रक्रियेत काम केले आहे. त्यांची पुस्तकात दिलेली ओळख बघून या विषयावर भाष्य करण्यास ते अगदी योग्य आहेत याची खात्री पटेल.



अनुक्रमणिका :

पुस्तकात निवडणुक प्रक्रियेत झालेल्या बदलांचा मागोवा घेतला आहे. उदा. अगदी पहिल्या निवडणुकांत प्रत्येक उमेदवारासाठी वेगळी पेटी असे. मतदार कोरी मतपत्रिका आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पेटीत टाकत असे. नंतर उमेदवारांची नावं असणारी मतपत्रिका आली. लाकडाच्या ऐवजी स्टीलच्या पेट्या आल्या. मतदानकेंद्र बळकावण्याच्या घटना कशा घडायच्या याचेही दाखले आहेत. त्या त्या वेळच्या प्रक्रियेत काय त्रुटी किंवा अडचणी आहेत याचा थोडा उल्लेख आहे. जुनी छायाचित्रे सुद्धा आहेत.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)


इलेक्ट्रिक यंत्र वापरण्याच्या कल्पनेचे श्रेय भारताचे सहावे निवडणुक आयुक्त एस. एल. शकधर यांना जाते. सत्तरच्या दशकात त्यांनी अशा यंत्राची आवश्यकता ओळखून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ला अशा यंत्राची रचना मांडायला सांगितली. आयोगाची ही भूमिका जाहीर झाल्यावर इतर खाजगी कंपन्या आणि व्यक्तींनीही अशा यंत्रांचा प्रस्तावित आराखडा आयोगाकडे पाठवला. कोणीकोणी आणि कधी आराखडा पाठवला याची माहिती पुस्तकात आहे. माझे आडनाव बंधू(किंवा आडनाव आजोबा) असणाऱ्या डी.व्ही.लेले या गुलबर्ग्याच्या व्यक्तीने सर्वप्रथम असा प्रस्ताव पाठवलेला. 



या तांत्रिक चर्चेतून यंत्रात काय सुधारणा करण्यात आला याची सविस्तर माहिती आहे. पुढेही वेळोवेळी यंत्रांत सुरक्षा आणि उपयुक्तता यांच्या दृष्टीने काय बदल केले गेले याची माहिती आहे.


यंत्र तर तयार होत होती. पण त्यांच्या वापराबद्दल उत्सुकता आणि शंका दोन्ही प्रथमपासून आहे. सगळ्या राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्यक्षिक कसे दाखवले गेले, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रत्यक्षिक कसे दाखवले गेले याचे "मिनिट्स ऑफ मीटिंग्स" प्रमाणे तपशीलवार माहिती दिली आहे. ईव्हीएमचे जनक ईसीआय मधील डॉ. अंबिका प्रसाद उपाध्याय यांची आणि त्या दिवसांचा अनुभव सांगणारी मुलाखत देखील आहे.

१९ मे १९८२ रोजी परूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत ५० मतदानकेंद्रात यंत्रांचा वापर सर्वप्रथम झाला आणि भारताने एका नव्या युगात प्रवेश केला. पण ईव्हीएम वरच्या खटल्यांनाही सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम वापरायला बंदी केली नाही पण कायद्यात योग्य ती दुरुस्ती न करता ईव्हीएम वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाला फटकारले. निवडणूक रद्द केली. पुढे संसदेत आवश्यक कायदासुधार करण्यात आला व ईव्हीएमचा मार्ग प्रशस्त झाला.

तरीही खटले चालूच होते. या खटल्यांची जंत्री दिली आहे. कुठल्या कुठल्या व्यक्तीने व राजकारण्यांनी काय काय आक्षेप घेतले आणि त्याला कसे उत्तर दिले याची जंत्री आहे. राजकारण्यांच्या बदलत्या भूमिकांवर स्वतंत्र प्रकरण आहे. अडवाणींसारखे ज्येष्ठ नेते सुरुवातीच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित आणि समाधानी होते. तरीही भाजपने ईव्हिएमवर शंका घेणं चालू ठेवलं. ज्या कँग्रेसच्या काळात ईव्हीएम आली त्यांनीही निवडणुका हरल्यावरच यंत्राकडे बोट दाखवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे "आमचे ईव्हीएक हॅक करून दाखवा" या आयोगाच्या आव्हानाला सामोरे जायला मात्र कुठलाही पक्ष कसा पुढे आला नाही हे तारीखवार सांगितले आहे. 

हरि के. प्रसाद या व्यक्तीने आयोगाची प्रत्यक्ष यंत्र मिळवली आणि दोन परदेशी तज्ञांच्या मदतीने त्यात छेडछाड करता येते असा व्हिडिओ बनवला होता. आपलं म्हणणं दखवण्यासाठी त्यांनी या यंत्राच्या हार्डवेअर मध्येच बदल केला होता. हार्डवेअर बदललं म्हणजे एका अर्थी दुसऱ्याच यंत्राचे दोष त्यांनी दाखवले असा अर्थ होतो. तरी असे बदल प्रत्यक्ष यंत्रात झाले तर ? याचाही ऊहापोह पुस्तकात आहे. यंत्रांची पुन्हा पुन्हा तपासणी, सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोर तपासणी आणि सीलबंद करणे यामुळे असा कुठलाही बदल लगेच लक्षात येतो आणि यंत्र वापरले जात नाही. तसेच एखाद्या मतदारसंघाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकायचा असेल तरी शेकडो यंत्रांमध्ये तो बदल करावा लागेल. हजारोंच्या नजरा ज्या यंत्रांवर रोखल्या असतात तिथे इतका मोठी छेडछाड शक्य आहे क? हे आणि असे अनेक मुद्दे मांडून कागदोपत्री शक्य पण प्रत्यक्ष नाही (थिअरिट्ट्कल्ल्य पोस्सिब्ले नोत प्रतिचल्ल्य) असं स्पष्ट केलं आहे. ईव्हीएम कुठल्याच यंत्राला किंवा इंटरनेटला जोडले नसल्यामुळे त्यात बाहेरून काही सॉफ्टवेअर घालताच येत नाही. अजुनही अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं वापरलं आहे याची यादी आहे. सगळा तांत्रिक भाग नीट कळला नाही तरी. आपला विश्वास भक्कम होतो हे निश्चित.



सर्वात शेवटी जगभरात कुठे कुठे इलेक्ट्रॉनिक मतपद्धती वापरल्या गेल्या आणि त्यांचं काय झालं याचा धावता आढावा घेतला आहे.

पुस्तक असं माहितीने भरलेलं आहे. पण पुस्तकाचं संपादन अजून चांगलं व्हायला हवं होतं. मुद्द्यांची, घटनांची बऱ्याच वेळा पुनरावृत्ती झाली आहे. तर काही वेळा एकच मुद्दा वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्या तुकड्यात आला आहे. सध्याच्या मतदान यंत्राची रचना कशी असते याची आकृती पाहिजे होती. यंत्रावरचे आक्षेप आणि त्याला तांत्रिक उत्तर हे सगळं एकत्र करून एक मुख्य प्रकरण सुरुवातीलाच हवं होतं कारण आजच्या घडीला ईव्हीएम च्या इतिहासापेक्षा लोकांना "ईव्हीएम हॅक होत नाहीत" यात जास्त रस आहे. त्यासाठी आवश्यक तो सगळा मजकूर पुस्तकात आहे तो अजून चांगला आणि सगळ्यात आधी मांडायला हवा होता. 

मराठी अनुवाद चांगला झाला आहे. तांत्रिक इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द यांचा वापर आणि समतोल साधला आहे.

जागरुक मतदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे; ईव्हीएमवर बिनबुडाची टिप्पणी टाळली पाहिजे आणि ज्याला अजूनही शंका आहे त्याने प्रत्यक्ष हॅकिंग करून सिद्ध करून दखवले पाहिजे. कारण केवळ शक्यतांचे आभासी बुडबुडे फोडण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Mrs. Funnybones (मिसेस. फनीबोन्स)




पुस्तक : Mrs. Funnybones (मिसेस. फनीबोन्स)
लेखिका : Twinkle Khanna (ट्विंकल खन्ना)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २३५
ISBN : 978-0-143-42446-8

ट्विंकल खन्ना या प्रसिद्ध हिंदी अभुनेत्रीने तिच्या नेहमीच्या आयुष्यातले प्रसंग जरा काल्पनिकतेची जोड देऊन विनोदी पद्धतीने सादर करायचा प्रयत्न केला आहे. ट्विंकल म्हणे पेपरात लिहिते. पण मी काही तिचे आधी काही व्चाचले नव्हते. त्यामुळे विनोदी पुस्तक आणि तेही वेगळ्याच लेखिकेने लिहिलेले म्हणून अपेक्षेने हातात घेतले. पण पुस्तकाने निराशा केली. मध्येच एखाददुसरं विनोदी वाक्य सोडलं तर वाचताना हसू येत नाही. प्रत्येक वाक्यावाक्याला तिरकस पद्धतीने लिहून विनोद करण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो. 
हा एक लेख वाचा. 





सासू-सुनांची वाद, तिच्या ऑफिसमधल्या लोकांनी घरी वाईट बातमी सांगून सुट्टी घेणं, उपास करायला न जमणं असा "टिपिकल" गोष्टी तशाच टिपिकल पद्धतीने मांडल्या आहेत. 

अनुक्रमणिका:



मी बरीच पानं वाचली. पुढची चाळली. आणि मग पुस्तक वाचायचं सोडून दिलं. पु.ल., मंगला गोडबोले यांचं मराठीतलं लेखन, "तारक मेहता का उल्ट चश्मा" मालिका, "रमणी व. रमणी" ही तमिळ मालिका यांमध्येपण तुमचं आमचं नेहमीचं जगणंच असतं पण ते कधीकधी खुदुखुदु हसायला लावणारं तर कधी खो खो हसायला लावणारं असतं. विचार करायला लावणारं असतं. तसं इथे काहीच होत नाही. त्यापेक्षा ट्विंकलने तिच्या आयुष्यातले प्रसंग खरे खरे, जसे घडले तसे लिहिले असते तरी ते खूप रोचक झाले असते. एक अभिनेत्री म्हणून वावरताना काय मजा आली, काय अडचणी आल्या हे वाचकांना नीट कळलं असतं.





----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

कालगणना (Kalganana)




पुस्तक : कालगणना   (Kalganana)
लेखक : मोहन आपटे (Mohan Apte)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २३८
ISBN : 978-81-7434-421-2

आज काय तारीख आहे? आजचा वार काय? किती वाजले आहेत? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कॅलेंडर आणि घड्याळ बघून देऊ शकता. पण त्यामागचं सामान्य ज्ञान आणि थोडं विज्ञान तुम्हाला माहिती आहे का? वर्षाचे १२ महिने अर्थात ३६५ दिवस असतात. आमावास्या, प्रतिपदा ते पौर्णिमा अशा तिथ्या असतात वगैरे ही माहिती असेलच. पण हे कॅलेंडर असंच का? या पद्धतीच्या कालगणानांची सुरुवात कशी झाली. इंग्रजी महिने, भारतीय महिने, इस्लामी कॅलेंडर, पारशी कॅलेंडर यांच्यात काय फरक आहे. "नेमेचि येणारा पावसाळा" जून-जुलैत येतो, डिसेंबरच्या आसपास थंडी पडते. या महिन्यांचं आणि ऋतूंचं नातं असं घट्ट कसं काय झालं. बातम्यांमध्ये ऐकू येतं ते "भारतीय सौर दिनांक" ही काय भानगड आहे. असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील. हे कुतूहल शमवणारं आणि कालगणना, पंचांग याबद्दल अजून कुतूहल निर्माण करणारं पुस्तक आहे मोहन आपटे लिखिल कालगणना.

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यातून दिवसरात्र होते. चंद्राच्या वेगवेगळ्या कलांमधून महिन्याची जाणीव होते. पृथ्वीची सूर्याभिवती एक प्रदक्षिणा झाली की एक वर्ष पूर्ण झाल्याची जाणीव होते. पण या प्रत्येक गोष्टीला लागणारा वेळ वेगळा आहे. आणि त्याच्यात सतत कमी जास्त वेळ लागतो. ३० दिवसांचा १ महिना म्हटलं तरी चंद्राच्या सर्व कला दिसायला २९.५ दिवस लागतात. सुर्याभोवती फिरायला ३६५.२४२२ दिवस लागतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कधी जोरात पुढे जाते तर कधी हळू. कुठलाही एक संदर्भ बिंदू घेतला - सूर्य, चंद्र किंवा आकाशातले तारे - तरी सगळ्याच गोष्टी अवकाशात फिरता आहेत, एकमेकांच्यातलं अंतर कमीजास्त होतंय या सगळ्यामुळे कलगणना करणं किचकट होतं. या पुस्तकात हे किचकट गणित सोप्यापद्धतीने सर्व सामान्यांना कळेल असा पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकल्यावर पुस्तकातल्या मुद्द्यांचा अंदाज येईलच. 




कालगणानेचं खगोलशास्त्र, गणितीय समीकरणं, परंपरा आणि इतिहास अशा चहुअंगांनी या विषयाचा वेध घेतला आहे. त्यामुळे काही गमतीशीर गोष्टीही कळतात. उदा. फार पूर्वी रोमन कॅलेंडर १०च महिन्यांचं होतं. मार्च ते डिसेंबर. नंतरचे दोन महिने इतकी थंडी असायची तिकडे, की लोकांना काही काम करणं शक्यांच व्हायचं नाही. त्यामुळे ते दिवस मोजलेच जायचे नाहीत. पुढे ज्युलियस सिझरच्या काळात कॅलेंडर मध्ये सुधारणा झाल्या आणि त्याच्या सन्मानार्थ जून नंतरच्या महिन्याला जुलै नाव देण्यात आलं. ३६५.२४२५ मधल्या वरच्या पाव दिवसाची व्यवस्था करण्यासाठी लीप वर्षात एक दिवस जादा द्यायला सुरुवात झाली. पोप ग्रेगरीने त्यात अजून सुधारणा केल्या. इस्टर चा सण वसंत ऋतूत आला पाहिजे; ज्यादिवशी दिवस-रात्र सारखी असते तो उहाळ्यातला दिवस पूर्वीप्रमाणे २२ मार्चच्या आसपास यावा अशा काही धार्मिक गरजा तेव्हा निर्माण झाल्या. ग्रगरीने एका साली कॅलेंडर मधले १० दिवस काढून टाकले, काही नवीन नियम बनवले आणि ग्रेगोरियन कॅलेंडरची- जे सध्या आपण इंग्रजी कॅलेंडर म्हणतो त्याची - सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचा गोंधळ त्यामुळेच आहे. तो असा :


कॅलेंडर मध्ये सुधारणा करण्यासाठी जागतिक कॅलेंडर प्रस्तावित करण्यात आलं होतं. जे बारगळलं. त्याची झलक बघा.



भारतीय कालगणना सुद्धा खूप प्राचिन आणि पुढारलेली आहे. ती कालगणना कशी चालते हे पुस्तकात सविस्तर दिलं आहे. वेदकाळात महिन्यांची नावं वेगळी होती ती पहा.

आठवड्याचे ७ वार. पण शनि, रवि, सोम.. असा क्रम कसा ठरवला गेला असेल. त्यामागचं गणित बघा.

महाराष्ट्रात काही कुटुबांमध्ये "टिळक पंचांग" वापरलं जातं. ते वेगळं कशामुळे आहे तो इतिहास आणि त्यामागचं खगोल शास्त्र पुस्तकात आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य राशीव्यवस्थेतला फरक समजावून सांगितला आहे.


चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या आधारे २७ स्थानांवरून २७ नक्षत्रांची संकल्पना आहे. तसेच सूर्याच्या स्थानांवरून १२ राशींची कल्पना आहे. ही सगळी गणिते सविस्तर सांगितली आहे

आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये सेकंद मोजण्यासाठी काही मूलद्रव्यांच्या अणू-रेणूंचा वापर केला जातो त्याचीही ओळख करून दिली आहे. पुस्तकाच्या शेवटी बरेच तक्ते, आकृत्या, पारिभाषिक शब्दांची सूची, संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे.

पुस्तक वाचताना खगोलशास्त्रातील काही अमूर्त संकल्पना डोळ्यासमोर आणणं अवघड वाटतं. तेव्हा नेटवर चित्र/व्हिडिओ च्या सहाय्याने ती संकल्पना थोडी समजावून घेतली की पुढचा भाग समजायला सोपा जातो. खूप मोठ्ठी समिकरणं दिली आहेत ती लक्षात नाही राहिली तरी चालू शकेल पण त्याच्या मागची थेअरी समजली पाहिजे. 

अशाप्रकारे हे पुस्तक खगोल, गणित आणि महिती यांनी परिपूर्ण आहे. ही सगळी माहिती एकादमात वाचून संपवण्य्सारखी नाही. हळूहळू वाचून विष्य समजावू घेतला पाहिजे त्या दृष्टीनेहे पुस्तक संग्राह्यसुद्धा आहे. या विषयात ज्यांना रस आहे ते तर आवर्जून वाचतीलच, पण ज्यांना रस नाही त्यांनाही कदाचित पुस्तक वाचनातून रस वाटणं सुरू होऊ शकेल. किमानपक्षी सामान्य ज्ञानात आणि आकलनात भर घालण्यासाठी अवश्य वाचा. 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

---------------------------------------------------------------------------------

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...