पुस्तक : बारोमास (Baromas)
लेखक : सदानंद देशमुख (Sadanand Deshmukh)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६२
ISBN : दिलेला नाही
शेतकरी जीवनावरची "बारोमास" ही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. पिढीजात शेतकरी असणाऱ्या घरात एकनाथ जन्माला आला. त्याच्या आईवडिलांनी शेतीत कष्ट करून, काटकसरीने दिवस काढत त्याला बीए, बीएड शिकवलं या एका आशेपोटी की मुलगा शिकून मोठा अधिकारी होईल, नोकरदार, पगारदार होईल. पण नोकरी मिळवण्याचे सोपस्कार पार पाडूनही त्याला नोकरी मिळाली नाही कारण सरकारी अधिकारी लाच मागू लागले. लाच द्यायची तर घरी पैसा कुठे? नोकरीसाठी जमीन विकणं हे काही जमिनीशी प्रेमाचं नातं असणाऱ्या एकनाथच्या आई वडीलांना पटलं नाही. आणि शिकून सवरूनही नोकरी न मिळाल्याने एकनाथला शेतीत मातीतच राबावे लागले. एकनाथ शिकलेला आहे हे बघून त्याच्ये एका शहरातल्या मुलीशी लग्न होते. पण एकनाथाचा नोकरीचा पत्ता नाही आणि घरात सततचं दारिद्र्य याने कंटाळून त्याची बायकोही सतत माहेरीच राहू लागते. शिक्षण आहे पण नोकरी नाही, शेती आहे पण पिकत नाही, लग्न झालंय पण संसार नाही अशा परिस्थितीत अडकलेला एकनाथाची दिवसेंदिवस खालावणारी परिस्थिती हे कादंबरीचं कथानक आहे.
पण हे एका व्यक्तीचं कथानक नाही कारण यात एकनाथच्या गुणावगुणामुळे त्याच्यावर ओढवलेले प्रसंग नाहीत. तर शेतकरी म्हणून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, कुटुंबाची ही कथा आहे. पदरमोड करून, कर्ज काढून, पेरणी करावी तर नेमका पाऊस दगा देतो. गाठीशी असलेले पैसे संपतात. पुन्हा पेरणी करायची तर पैसे कुठून उभे करायचे? आधीच्या कर्जांसाठीच बॅंकानी तगादा लावलेला. मग पुढे काय होईल याची पूर्ण जाणीव ठेवून, आपण होऊन सावकारचं कर्ज काढून आपली मान त्याच्या हातात द्यावी लागते. पण शेती पिकणे हा बेभरवशी प्रकार. पाऊस, गारपीट आणि शेतांवरचे रोग याचं शुक्लकाष्ट मागेच असतं. त्याची नुकसान भरपाई मिळवायची, सातबारा काढायचा तर तलाठ्या पासून बँक अधिकाऱ्यापर्यंत कितीतरी जणांचे हात ओले करावे लागतात. पैसे नाहीत म्हणून हात पसरणाऱ्या शेतकऱ्याला हे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा पैसे चारावे लागतात अशी घृणास्पद परिस्थिती गावागावांत आहे. अशी परिस्थिती निर्माण करणारे कोण आहे तर स्वतःला "जनता" म्हणवणारे, राजकारण्यांच्या भ्रष्टतेबद्दल नावं ठेवणारे राजकारणाबाहेरचे सामान्य लोकच. निसर्गाची अवकृपा, सरकारी धोरणांची चुकीची दिशा आणि पावलोपावली रक्त शोषणारे आपल्यातलेच जळू यांचं विदारक चित्र कादंबरी आपल्यापुढे मांडते.
ऊस कारखानाच्या नावाने चालणारी फसवणूक:
बाजारात माल आल्यावर शेतकऱ्यांची कशी अडवणूक होते त्या घटनेतील एक पान
शेतकरी संघटनांचं काम पण मध्येमध्ये डोकावतं. शेती प्रश्नावर आंदोलन करायचं म्हणजे पोलीस केस अंगावर घेणं, कोर्टकचेऱ्यांत खेपा घालायला शेतीकाम सोडून जायला लागणं आणि त्यातून सुटण्यासाठी पुन्हा पैसे चारण्याची व्यवस्था करणं असाच प्रकार होतो.
अन्नदाता, बळीराजा असं म्हणून गोडगोड शब्दांत गौरवला जाणार शेतकरी प्रत्यक्षात मात्र उसासारखा चरकातून पिळला जातो आहे. आणि तो गांजून, नाईलाजाने आत्महत्या करण्याचा टोकाला का येतो हे भयाण वास्तव, कोलमडलेले अर्थशास्त्र ललित रूपात लेखकाने आपल्यासमोर मांडलं आहे. प्रत्येक सुबुद्ध व्यक्तीने हे वाचलंच पाहिजे. आणि यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल ते केलं पाहिजे. तरच या वाचनाला काही अर्थ मिळेल.
खरं म्हणजे दाहक प्रश्न मांडणारं इतकं करूण पुस्तक वाचल्यावर त्या मूळ प्रश्नानेच आपण इतके विचाराधीन होतो की लेखकाची लेखनशैली, मांडणी वगैरे चर्चा खूप तकलादू वाटतात. पण मग लक्षात येतं की हे वास्तव इतक्या प्रभावीपणे आपल्या मनात रुजतंय याचं कारण लेखकाची शैली आणि मांडणी आहे. त्यामुळे त्याबद्दल थोडं बोललंच पाहिजे. पुस्तकात निवेदक प्रमाण भाषेत बोलतोय तर सगळी पात्र उत्तर महाराष्ट्र-विदर्भाच्या मधल्या पट्ट्यातली अस्सल ग्रामीण बोली बोलतायत. शिकलेल्या एकनाथला लागलेली प्रमाण मराठीची सवय सोडून तो पुन्हा गावरान बोलीकडे वळतो; पुस्तकं वाचायची हौस हळूहळू मागे पडते यातून मनानेही शेतकरी कसा हवालदिल होतो आहे ही मानसिक तगमग्सुद्धा जाणवते. एकनाथची आई कष्ट करणाऱ्या पिढीची प्रतिनिधी. मुलांनी प्रगती करावी म्हणून हाडाची काडं करणारी पण अपेक्षाभंगामुळे उद्ध्वस्त झालेली, नवी सून - शहरातून आलेली - आपल्यासारखी नांदत नाही म्हणून फटकळ पणाने बोलणारी. तिचा त्रागासुद्धा पटतो. तिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या म्हणी, असभ्य वाक्प्रचार यातून तिच्या बोल्णायाला येणारी धार हा भाषेच्या द्रुष्टीने वाचायला मजेशीर भाग आहे. एकनाथचा भाऊ उनाडक्या करत, पटकन पैसा मिळवणऱ्या मार्गात जाऊन बापाला घोर लावतो. परिस्थिती एकच पण तिचा परिणाम आणि तिला प्रतिसाद हा प्रत्येकाच्या पिंडनुसार कसा टोकाचा वेगळा असू शकतो हे दाखवणारी उत्तम पात्रे रंगवली आहेत.
माईच्या तोंडाचा हा फटकारा बघा:
पुस्तकात एका ठिकाणी नव्या तंत्रज्ञानाच्या शेतीबद्दल, कमी खर्चातल्या शेतकऱ्यांची सभा होते असा प्रसंग आहे. पण शेतकरी तसं का वागत नाही याचा उल्लेख पुढे येत नाही. महाराष्ट्रातच खूप ठिकाणी तुकड्यातुकड्यात का होईना यशस्वी शेतीचे प्रयोग चालू आहेत. त्याबद्दल काही लिहून कादंबरीत एखादा आशेचा किरण दाखवायला हवा होता असं वाटतं.
लेखकाविषयी पुस्तकात दिलेली माहिती:
तर हे पुस्तक वाचा, विचार करा. आणि या प्रश्नावर काहितरी करूया.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment