वास्तविक (vastavik)




पुस्तक : वास्तविक (vastavik)
लेखक : सुहास शिरवळकर (Suhas Shirvalkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९२
ISBN : दिलेला नाही

"सुशि..", "सुशि.." अर्थात सुहास शिरवळकर हे नाव पुस्तक वाचकांच्या फेसबुक गटावर बऱ्याचवेळा ऐकलं होतं. पण अजूनपर्यंत मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. म्हणून यावेळी वाचनलयातून "सुशी आणायची" असं ठरवूनच गेलो होतो. वाचनालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा होता. आणि कादंबऱ्यांचा रतीब घातलेला दिसला. त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीचं नाव माहीत होतं. त्यावरचा चित्रपट बघितला असल्यामुळे ती सोडून वेगळं पुस्तक घ्यायचा विचार केला. शेवटी हे पुस्तक घेतलं.

जाहिरात क्षेत्रात अभिनय किंवा रूपदर्शन ( मॉडेलिंग ला मी सुचवलेला शब्द) करणाऱ्या एका युवकाची ही गोष्ट आहे. प्रेमकथा आहे. या क्षेत्रातला नायक म्हटल्यावर साहजिकच कादंबरीला आवश्यक असा देखणा, उमदा तरूण नायक. त्याच्या भोवती अपेक्षितपणे सुंदर मुली घोटाळणारच. त्या मुली सुद्धा या क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा फक्त ओळख किंवा फक्त मैत्री या पातळीवर न राहता शरीरसंबध ठेवण्यास तयार किंवा उत्सुक किंवा त्याबद्दल फार काही न वाटणाऱ्या अश्या आहेत. हा नायक एकीचं प्रेम अव्हेरतो, दुसरीच्या प्रेमात ठरवून पडतो, परिस्थितीमुळे तिसरीशी लग्न करायला लागतं म्हणून दुसरीचा त्याग वगैरे करतो आणि शेवटी चौथीला जवळ करतो. त्याचवेळी त्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पहिल्या दुसऱ्या बरोबर ये जा करतात. असं एकूण लफड्यांचं कथानक आहे. आणि हे सगळं घडवण्यासाठी बेतलेल्या घटना आहेत.

काही वेळा पात्र आणि घटना पटतात तर काही वेळा "काहीही हं ... सुशी" असं म्हणावं लागतं. हे तरूण तरुणी त्यांच्या आजूबाजूल घरचेदारचे, समाजातले लोक नसल्यागत सगळ्यांचं स्वैर वागताना दाखवलं आहे. ती पात्रं बेफिकीर आहेत असं नाही पण कादंबरीसाठी लेखकाने सभोवतालच्या परिस्थितीची फार फिकीर केलेली नाही.

तरीही प्रसंग पटापट पुढे जातात, खटकेदार संवाद, अजिबात पाल्हाळ न लावता पुढे जाण्याची शैली यामुळे वाचायला कंटाळा येत नाही. पॉकेटबुक आकारात छोटी कादंबरी असल्यामुळे एका बैठकीत पूर्ण करू शकता. चार घटका हलकेफुलके मनोरंजन म्हणून ठीक आहे.

काही प्रसंग.
 उदा. नायक एका नायिकेला जाहिरात क्षेत्रातले धोके आणी त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वास्तववादी कसं वागायला पाहिजे ते सांगतो









नायकाला खोट्या गुन्ह्यात गुंतवायचा प्रयत्न होतो तो प्रसंग






"दुनियादारी" हा चित्रपट आणि हे पुस्तक दोन्ही काही भावलं नाही. सुशिंबद्दल पूर्वग्रह होऊ नये म्हणून त्यांचं सर्वोत्तम पुस्तक कुठलं सुचवाल ? खाली कमेंटमध्ये किंवा पेसबुक पोस्टवर कमेंट करून सांगा.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. सु शी चं 'थोडक्यात असं ' वाचावे

    ReplyDelete

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...