पुस्तक - निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha)
लेखक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo)
भाषा - मराठी
पाने - 205
ISBN - 978-93-886493-54-5
प्रणव सखदेव या नव्या पिढीच्या लोकप्रिय लेखकाचा कथासंग्रह आहे. लेखकाबद्दल आणि पुस्तकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
अनुक्रमणिका
या कथांबद्दल थोडक्यात सांगतो
हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा
एक ऑफिस बॉय आपल्याशी बोलतो आहे ज्याला फेसबुक वर पोस्ट टाकून टाकता टाकता आपल्यात दडलेल्या लेखकाची जाणीव झाली आहे. तो आपल्याला गोष्ट सांगतोय त्याने निर्माण केलेल्या पात्रांची. या गोष्टीत एका माणसाची ओळख चोरले जाते म्हणजे दुसराच माणूस त्याचं रूप घेऊन वावरू लागतो वावरू लागतो.
कथा सांगण्याची गोष्ट
यात दोन पात्र आहेत- नवरा-बायको. नवरा-बायको त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगतायत. लग्नानंतर सुरुवातीला मुल नको असं ठरवणारी; नंतर मूल हवं वाटू लागलं तेव्हा, होत नाही म्हणून झुरणारी आणि झाल्यावर त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या जोडप्याची ही गोष्ट आहे
पण दोघांचं वर्णन पूर्णपणे वेगळे आहे. मग नक्की काय खरं? असं वाचकाला कोड्यात टाकणारी कथा आहे.
कतरा कतरा जीते है
एका विवाहित तरुणाच्या आयुष्यात एका दिवशी त्याची पूर्वीची प्रेयसी परत आली तर काय होऊ शकतं ?
पंख असलेल्या माणसाची गोष्ट
पंख असलेला एक माणूस पृथ्वीवर वावरतो आहे तो खरा देवलोकातील शापित व्यक्ती आहे. देवलोकात त्यांनी असं काय केलं; ज्यामुळे त्याला हा शाप मिळाला मिळाला त्याची गोष्ट आहे.
निळ्या दाताची दंतकथा
एक कल्पना कथा ज्यात एका माणसाच्या पापा साठी शिक्षा म्हणून त्याला निळा दात येतो. आणि तो दात कोणी बघितला की माणूस मारतो.
भूत. के.
ज्याप्रमाणे सफाई कर्मचारी आपल्या घरातला गावातला कचरा गोळा करतात त्याप्रमाणे भूतकाळाच्या क्षणांचा कचरा गोळा करणारे "भूत. के." हे कर्मचारी आहेत अशी कल्पना मांडून सफाई कामगारांचे काम महत्त्वाचं असलं तरी त्यांना योग्य तो मान मिळत नाही हे सांगणारी कथा.
शे. उ. वा. ची अखेरची गोष्ट
"वाघ वाचवा, निसर्ग वाचवा" अशा घोषणा एकीकडे आणि निसर्गाचा ऱ्हास दुसरीकडे ह्या सद्यस्थितीवर बेतलेली ही कथा आहे.
डावे-उजवे पांडव
वेगवेगळ्या विचारधारांचे, पक्षांचे लोक एकमेकांविरुद्ध हिंसक पातळीवर उतरताना आपण पाहतो. आपल्या शरीरातले अवयव सुद्धा दोन विचारसरणीचे दोन गट बनून वागायला लागले, भांडायला लागले तर काय होईल !!
#मनकवडीनगरीडॉटएचटीएमएल
एक प्रियकर प्रेयसी स्वतःला हवं असलेलं जग कल्पनेत का होईना मिळावं; आपल्याला ज्या गोष्टी, जितक्या प्रमाणात, जेव्हा हव्या तेव्हा मिळाव्यात, म्हणून व्हिडीओगेम सारखं एक आभासी जग तयार करतात आणि त्यातच गुंगून जातात आणि हळूहळू त्याच्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात येतो असं कथाबीज आहे.
कथांच्या संक्षेपातल्या ओळखी वरून लक्षात आले असेल की ह्या कथा थोड्या फॅन्टसी/कल्पनारम्यते कडे झुकणाऱ्या आहेत. पण यातली फॅन्टसी ही तोंडी लावण्या पुरतीच आहे आहे. खरंतर लेखकाला सामाजिक वास्तव वगैरे मांडायचं आहे, त्यावर स्वतःची टीकाटिप्पणी करायची करायची आहे; त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार वाटतो.
उदाहरणार्थ "निळ्या दाताची दंतकथा" मध्ये लेखकाला राजकीय किंवा वैचारिक हिंसा कशी होते आणि ती पुढे पुढे कशी चालू राहते हे सांगायचं आहे त्यातल्या पात्राला स्वप्नात दिसतं की हिंसा करणाऱ्याला शिक्षा म्हणून निळा दात मिळालेला आहे. मग त्या पात्राच्या खऱ्या आयुष्यात काही गोष्टी घडतात. पण स्वप्नातला निळा दात, खऱ्या घटना, हिंसा ह्यांचा तसा काही अनोन्यसंबंध नाही.
"डावे-उजवे पांडव" या कथेत डावा भाग, उजवा भाग म्हणजे साधारणपणे डावी विचारसरणी व उजवी विचारसरणी किंवा दोन विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांच्यात होणारी हिंसा हा भाग स्पष्ट दिसतो. त्यामुळे ती फॅन्टसी ठरत नाही. तिला रूपककथा म्हणावं तर पंचतंत्र, हितोपदेशासारख्या गोष्टींमधून रूपकांचा वापर केला आहे तसा इथे दिसत नाही. जे सांगायचं, दाखवायचं आहे ते तसं स्पष्ट दाखवलं आहे. फक्त पात्रांची नावं वास्तव जगातली देण्याऐवजी काहीतरी बदल इतकंच.
"हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा" कथेमध्ये सुरुवात वेगळीच होते. एक माणूस फेसबुक वर काहीतरी लिहितोय आणि लोकांची आयडेंटिटी चोरतो. आधुनिक तंत्रज्ञानाशी, आधुनिक संकल्पनांशी निगडित अशा घटना घडतात. पण पुढे ती कथा टिपिकल परकायाप्रवेश वळणावर जाते. "व्यक्ती दिसते-वागते तशीच असते असे नाही. तिच्या मनात बरंच काय चाललेलं असतं. तिच्या वागण्यामागे बरीच कारणं असतात" इत्यादी नेहमीचे मुद्दे येतात. त्यामुळे सुरुवातीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भाचा पुढे विचकाच होतो.
"भूत. के." कथेमध्ये भूतकाळ वेचणारे लोक अशी भारी संकल्पना आहे पण पुढे त्या कल्पनेवर अचानक सफाई कामगारांच्या वास्तवाचं कलम होतं. लेखक आपली फॅण्टसी ची हॅट टाकून सामाजिक लेखनाची उबळ दाखवतो.
"मनकवडी नगरी"मध्ये ते जोडपं एक काल्पनिक जग तयार करतं आणि त्यात एका गोष्टीची कमतरता राहते. पण ती कमतरता का राहते? त्यांना ते का तयार करता आलं नाही? हे काही त्या गोष्टीत लेखक सांगत नाही. का ? तर, ती गोष्ट आयुष्यात महत्वाची आहे हे लेखकाला सांगायला सोयीचं जावं म्हणून.
गोष्टींमध्ये लैंगिक प्रसंगांची, अवयवांची उघड वर्णनं टाकून बोल्डपणा आणायचे प्रयत्न केला आहे.
एखाद्या पाककृती प्रमाणे; दोन चमचे फँटसी, चार चमचे सामाजिक वास्तव, सेक्स "स्वादानुसार", वरून सामाजिक भाषेची फोडणी असं सगळं ठरवून केल्याप्रमाणे वाटतं. पण भट्टी काही जमत नाही. या कथा वाचताना सुरवात छान आणि पुढे निरस वाचन अशी अवस्था होते. कुठलीच कथा मला काही भावली नाही.
पुस्तकाच्या शेवटी लेखकाने स्वतः घेतलेली स्वतःची मुलाखत आणि माझा लेखन प्रवास, लेखनाच्या प्रेरणा वगैरे सांगितलं आहे. आत्मस्तुतीचा हा प्रकार पहिल्यांदाच वाचनात आला.
पुस्तकाला बरेच पुरस्कार वगैरे मिळाले आहेत. त्यामुळे पुरस्कार प्राप्तपुस्तकांचं आणि काहीतरी वाकडं आहे हा "पॅटर्न" या पुस्तकाने सुद्धा चालू ठेवला ! गंमतच आहे !!
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------