पुस्तक : झाडाझडती (Jhadajhadati)
लेखक : विश्वास पाटील (Vishwas Patil)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४७७
ISBN : 978-81-7434-813-5
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित "झाडाझडती".
भारताचा विकास व्हायचा असेल तर रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी मोठमोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प - धरणे, महामार्ग, वीज निर्मिती केंद्र, कारखाने, शिक्षण संकुले इ. उभारणं आवश्यक आहे. पण हे ज्या ठिकाणी उभारलं जातं तिथल्या लोकांना मात्र विस्थापित व्हावं लागतं. देशाच्या भल्यासाठी हे लोक आपलं घरदार सोडतायत म्हटल्यावर त्यांचं पुनर्वसन तातडीने आणि योग्य रीतीने झालंच पाहिजे. पण आपल्याकडच्या सवयीनुसार प्रकल्प रखडत चालतात आणि पुनर्वसन त्याहून कूर्मगतीने. धरणग्रस्तांच्या दयनीय अवस्थेवर , स्वतःच्या हक्कासाठीच्याच्या लढ्यावर ही कादंबरी आधारित आहे.
पुनर्वसनाचे नियम छान दिसतात - जागेच्या बदल्यात जागा किंवा मोबदला, विस्थापितांच्या कुटुंबियांना नोकऱ्या, नवीन गावठाण सर्व सोयींनी युक्त आणि बरंच काही. पण हे सगळं राहतं कागदावरच. सरकारी नोकरांचा कारभार म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करणे, त्याचा सोयीचा अर्थ लावणे, टाळाटाळ करणे आणि खाबुगिरी करत गरीबाला नाडणे. आपली हक्काची जमीन, पैसे मिळवण्यासाठी गरीबांची धडपड. जमीन, उत्पन्नाचं साधन गमावलेल्या या घरांमध्ये सोयरीक तरी कशी जुळायची ? शिक्षणं कशी व्हायची ?
सुरुवातीची गोड गोड आश्वासने मिळण्याचा हा एक प्रसंग वाचा.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)
प्रत्यक्ष गाव उठेपर्यंतच पुनर्वसनाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे लक्षात येऊ लागतं. गाव उठणार म्हणून व्याकुळ झालेल्या गावकऱ्यांचा हा प्रसंग
विकासासाठी पिढ्यानपिढ्या भकास होतायत. अश्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार द्यायचा. पण सगळेच तसे नाहीत ना. त्यातलाच कोणी स्वार्थी "गोतास काळ" बनत खोटी कागदपत्र, खोट्या साक्षीपुराव्यातून स्वतःचं चांगभलं करतो. तलाठ्याला हाताशी धरून स्वतःच्या सावत्र आईची जमीन हडप करणाऱ्या गुन्ह्याचा हा प्रसंग
पुनर्वसन जिथे होणार तिथले लोकही एका अर्थी प्रकल्पग्रस्त. आपली जमीन या पुनर्वसनाच्या कामात जाऊ नये, गेली तरी तिच्यावरचा प्रत्यक्ष हक्क जाऊ नये म्हणून धडपड. आधीच पैसा-सत्ता ज्यांच्या हातात ते मात्र यातून कायद्याच्या पळवाटांतून सहीसलामत सुटतात. वर आपल्या गावाची बाजू घेऊन भांडतो म्हणून शेखी मिरवायला सुद्धा मोकळे. दोन माकडांच्या भांडणात बोक्याचा लाभ तसा हा प्रकार.
प्रकल्पग्रस्ताला जागा दिली , त्याने राबून त्यावर शेती पिकवली आणि आता मूळ मालकाला जमीन परत पाहिजे. गाववाल्यांची दादागिरी आणि विस्थापितांची कुचंबणा दाखवणारा हा प्रसंग
एखादा तडफदार अधिकारी काही बरं करायला बघतो. तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेली लागेबांध्यांची साखळी करतेच आपलं काम. अधिकाऱ्याचे हातपाय नियमाने बांधून पुन्हा "सिस्टीम" मध्ये ढकलायची तजवीज. ही साखळी गरीबाचा थेट गळा दाबून बंद आवाज बंद करायला मागेपुढे पाहत नाही आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या अब्रूवर घाला घालायला सुद्धा.
ह्या गुंडगिरीला विरोध करायची ताकद नाही आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन होत नाही. ह्या कात्रीत सापडलेल्यांचा हा करुण प्रसंग
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे हे धिंडवडे, स्वार्थाने अनैतिकतेने बुजबुजलेली ग्रामीण समाजव्यवस्था, त्यातूनच तयार झालेले राजकारणी आणि सरकारी नोकर हे सगळं चित्र यथार्थ मांडणारी ही कादंबरी आहे. सुन्न करणारी. सुन्न करणारी.
१९१९ साली ही कादंबरी प्रकाशित झाली. उद्या २०२१ साल उजाडेल. ३० वर्षं होतील. पण कादंबरी आजच्या काळाशीदेखील सुसंगत आहे हे तिचं मोठेपण आणि आपल्या समाजाचं खुजेपण... दुर्दैव.
म्हणून ही कादंबरी अवश्य वाचा. आणि ह्या सामाजिक कोड्यातील कुठल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल याचा विचार करा, जमेल तितकी कृती करा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-