लेखक - निनाद म्हात्रे (Ninad Mhantre)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - 126
ISBN - 978-93-5446-619-9
माझ्या अभिप्रायार्थ स्वतःहून पुस्तक पाठवल्याबद्दल सर्वप्रथम लेखक निनाद म्हात्रे ह्यांचे आभार.
हे पुस्तक एका दोन मित्रांच्या मनमोकळ्या गप्पांचं आहे. कॉलेजात एकत्र असणारे मित्र बऱ्याच वर्षांनी फिरायला जायचा प्लॅन करतात. एकत्र भेटतात. आणि निवांत गप्पा मारतात. गप्पांच्या ओघात जुना अबोला, गैरसमज निवळतात.
जुन्या आठवणी निघतात. नोकरी धंद्यानिमित्त काय अनुभव आले असतील त्याची देवाणघेवाण होते. विषयांतून विषय निघतात, थट्टामस्करी होते. शेवटी सहल संपल्यामुळे त्यांना थांबावं लागतं ...ह्या गप्पांचं चांदणं मनात रेंगाळत ठेवत. असं पुस्तकाचं स्वरूप आहे.
जुने मित्र हल्ली भेटत नाहीत, आणि त्यांच्याशी फोनवर बोलणं होत नाही हे सांगणारा प्रसंग.
क्रिकेट आवडतं म्हणून मैत्रीण थट्टा करते. मग क्रिकेट आणि खरं आयुष्य ह्यात कसं साम्य आहे हे मित्र तिला समजावून सांगतो.
एक गाणं सांगायचं आणि त्या गण्याबद्दलची एक आठवण सांगायची अश्या "आठवणींच्या भेंड्यां"चा अभिनव खेळ ते खेळतात. त्यातला एक प्रसंग.
ह्यातले मित्र हे साधारण सुखवस्तू मध्यमवर्गीय घरांतले आहेत. त्यांची आयुष्यही तशी सरधोपटच आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी प्रचंड वेगळ्या नाहीत. तुम्ही आम्ही जेव्हा जुन्या मित्रांशी गप्पा मारू त्या अश्याच होतील. म्हणून पुस्तकाशी आपण रिलेट करू शकतो. परंतु काही आगळं वेगळं वाचलंय असं होत नाही. आठवणींच्या गुंफणीतून काही कथा समोर ठेवायची आहे, "फ्लॅशबॅक" मध्ये रहस्य उलगडून दाखवायचं असं सुद्धा काही नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंग आपापल्या जागी वाचायला ठीक असला तरी ते सलग एकत्र वाचून पुस्तक वाचल्याचं समाधान वाटत नाही. छोट्या छोट्या ब्लॉगपोस्ट सलग वाचल्यासारखं वाटतं.
पुस्तकात मुद्रित शोधनाच्या आणि व्याकरणाच्या चुका बऱ्याच आढळल्या.
पण पहिल्याच पुस्तकाच्या मानाने निनाद म्हात्रे ह्यांचं लेखन चांगलं आहे. ते ते प्रसंग वाचायला चांगले वाटतात. पात्रांचे संवाद, शब्दांची निवड चांगली आहे. एकमेकांची थट्टामस्करीचा माहोल छान जमला आहे. निनाद म्हात्रे ह्यांच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा !
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment