दारा शिकोह (Dara Shikoh)




पुस्तक - दारा शिकोह (Dara Shikoh) 
लेखक - काका विधाते (Kaka Vidhate)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ८४०
ISBN - 978-81-87549-81-9
प्रकाशक -  प्रफुल्लता प्रकाशन (दुसरी आवृत्ती २०१६)
छापील किंमत - रु. ७८०/-

सर्वप्रथम हे पुस्तक मला वाचायला उपलबद्घ करून दिल्याबद्दल  "ग्रंथप्रेमी.कॉम" द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.

ऐतिहासिक लेखांत हे वाचलं होतं की औरंगजेबाने त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं, भावांची हत्या केली आणि गादी बळकावली. त्याने मारलेल्यापैकी
 दारा शिकोह हा त्याचा भाऊ विद्वान होता. ह्या कादंबरीच्या रूपाने दारा शिकोह, त्याचे वैचारिक धोरण आणि त्याला सामोऱ्या जावे लागलेल्या युद्धांबद्दल सविस्तर वाचायला मिळाले.

कादंबरीची सुरुवात होते दारा शिकोह चा आजोबाच्या - जहांगीराच्या - मृत्यूपासून. जहांगीरानंतर वारस कोण; पुढचा बादशहा कोण होणार हे ठरवण्यासाठी जहांगीराची बायको, मेव्हणा, मुलं, जावई ह्यांच्यात रससीखेच सुरू होते. त्यात बाजी मारतो शहाजहान. आपल्या भावंडानां, पुतण्यांना ठार मारून तो गादीच्या सगळ्या दावेदारांचा काटा काढतो. हे सर्व बघत होता त्याचा मोठा मुलगा दारा शिकोह. स्वभावाने धार्मिक, मनमिळावू दाराला बापाचं हे रूप धक्कादायक होतं. पण लहान वयातल्या दाराची शहाजहान ने कशीबशी समजूत काढतो.

दारा मोठा होताना त्याचा धार्मिक, अध्यात्मिक विशेषतः तत्त्वज्ञानात रस असणारा पिंड उघड होऊ लागला. घरच्या इस्लामची शिकवण त्याला मिळत होती. सूफी संप्रदायांतल्या ध्यानधारणा, नामस्मरण आणि अध्यात्म तो वेगाने आत्मसात करत होता. पण प्रजेतले, सरदारांतले बहुसंख्य हिंदू असल्यामुळे त्यांच्या धर्माबद्दलसुद्धा त्याला आकर्षण वाटू लागले. हिंदू पंडित, कवी, भाषातज्ज्ञ ह्यांच्याशीही त्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाषा वेगळ्या असल्या तरी अंतिम सत्य एकच आहे हे त्याला उमगू लागलं होतं. अंतिम सत्य साधण्याची पद्धत सुद्धा थोड्याफार फरकाने सारखीच आहे. हे जाणवून उपनिषदे, योगवासिष्ठ इ. हिंदू धर्म ग्रंथांचं फारसी मध्ये भाषांतर करवून घेतलं. स्वतः अध्यात्मावर ग्रंथ, भाष्य काव्य लिहिले.

राजदरबाराच्या कामात लक्ष घालायची संधी मिळाल्यावर राज्यधोरण हिंदूना जाचक नसावे, धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत अशी भूमिका तो घेऊ लागला. इस्लामच्या नावाने राज्य चालवणाऱ्या मुघलांच्या हे विरुद्ध होतं. त्यामुळे बादशहा, मुल्ला मौलवी, दरबारातले धर्मवेडे सरदार आणि औरंगजेब ह्याच्या मनात त्याच्या विरुद्ध चीड निर्माण होऊ लागली. भविष्यात होणाऱ्या संघर्षाची बीजे नियतीने पेरली होती.

शाहजहानच्या चार मुलांना वेगवेगळ्या जहागिरी मिळाल्या. आपल्याला दिलेली जहागीर संभाळायची प्रत्येकाची पद्धत वेगळी. दिलेली जहागिरी दारा चांगली सांभाळत होता. पण फार स्वाऱ्यांचा अनुभव त्याला आला नव्हता. मग त्याला मिळाली काबुल-कंदाहारची मोहीम. अशी मोहीम ज्यात स्वतः बादशहा तसंच योद्धा औरंगेजबसुद्धा पूर्वी दोनदा पराभूत झाले होते. दाराला मोहिमेवर जावे लागले पण अपयशी होऊन तोही परत आला. सरदारांमधला बेबनाव, राजकारणातली अनिश्चितता त्याने जवळून बघितली. पराभूत झाला तरी शहाजहानने त्याला वारस म्हणून त्याला नेमले आणि त्याच्या विरोधकांचे पित्त खवळले. औरंगजेबाकडे दख्खन, महाराष्ट्राचा सुभा होता. त्याचं कामकाज आपल्या मनाप्रमाणे दारा करू देत नाही; बादशाहा आता त्याच्या सल्ल्याने करतात ही जखम त्याला सतत खुपू लागली.

शाहजहान आजारी पडल्यावर औरंगजेब, मुराद आणि शुजा ह्या तिघांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. औरंगजेबाने त्यादोघांना आपल्याबरोबर घेतले आणि दाराच्या विरुद्ध फितवले. आणि सुरु झाली स्वार्थाची लढाई. कोणी सरदार ह्याच्या बाजूने, कोणी त्याच्या बाजूने; कोणी जड होणाऱ्या पारड्याकडे. असं करत करत लढायांमागे लढाया होऊ लागल्या. महत्त्वाच्या लढाईत पराभूत दारा झाला. पळून जाऊन पुन्हा लढाईसाठी तयार होत राहिला. औरंगजेबाचं सैन्य किंवा त्याचे सरदार त्याचा मागावर. माळवा, दिल्ली, पंजाब, सिंध, कच्छ, गुजरात, पुन्हा राजस्थान, सिंध, बलुचिस्तान अशी महिनोन्महिने परागंदा अवस्थेत काढून शेवटी एकदाचा तो पकडला गेला. औरंगजेबाने त्याची धिंड काढली. त्याचा शिरच्छेद केला.  त्याच्या बायका औरंग्याच्या बायका झाल्या. मुलगा सुद्धा तुरुंगात खितपत पडून मारला गेला.

"सुलह-इ-कुल" म्हणजे सर्वांशी सामोपचाराचं धोरण ठेवण्याची इच्छा असणाऱ्या ह्या ज्योतीचा अंत झाला आणि औरंग्याच्या रूपाने मुघली धर्मांधतेचा मूळचा अंधार अजूनच गडद झाला. शोकांतिका पूर्ण झाली.

काका विधाते ह्यांनी ही शोकांतिका तितक्याच ताकदीने आपल्यापुढे मांडली आहे. आठशे पानी कादंबरी वाचताना आपण अक्षरश: मुघल काळात वावरत असतो. प्रसंगांचे तपशीलवार वर्णन; योग्य संवाद ह्यातून आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभे राहते. पात्रांच्या तोंडात फारसी शब्दयुक्त मराठी भाषा आहे. त्यातल्या अनोळखी फारसी शब्दांचे शब्दार्थ शेवटी दिले आहेत. त्यामुळे वाचताना अडत नाही. वातावरण निर्मिती छान होते.

काही पाने वानगीदाखल वाचून बघा. 

शहाजहानच्या आज्ञेने इतर शहाजाद्यांचा खातमा करण्यात आला तो प्रसंग 


आपल्या सूफी पंथीय उस्तादाशी दाराची धार्मिक चर्चा


हिंदू तत्त्वज्ञानाच्या फारसी भाषांतराच्या महान कार्याबद्दलचा एक प्रसंग


दारा बद्दलची औरंगजेबाची बादशाहकडे तक्रार आणि पक्षपाती दरबारी राजकारणाची एक झलक 

दाराची धिंड 

कादंबरीच्या पूर्वार्धात दारा शिकोहला तत्त्वज्ञानात कसा रस वाटत होता; त्यात तो प्रगती करत होता, त्यामार्गावर जिज्ञासू वृत्तीने कसे प्रश्न विचारत होता हे दाखवणारे खूप प्रसंग आहेत. अध्यात्मातल्या जड-जड अमूर्त संकल्पनांवर चर्चा कशी चालली असेल हे अगदी सविस्तपणे उभे केले आहे. तसंच हिंदू-मुस्लिम तत्त्वज्ञानाच्या संकल्पना कशा सारख्या आहेत हे दाखवणारा सुद्धा खूप मजकूर आहे. त्यातून दारा ह्या पात्राच्या ज्ञानाची, गांभीर्याची आणि प्रामाणिकपणाची भूमिका वाचकाच्या मनावर निश्चितपणे ठसते. आपण सुद्धा त्याच्या बाजूने उभे राहतो. मात्र, हा भाग वाचायला खूप जड आहे. संस्कृत आणि फारसी शब्द खूप येतात. मूळ संकल्पनाच माहित नसल्यामुळे त्यांच्यावरची चर्चा डोक्यावरून जाते. ही चर्चा पुस्तकाचा मूळ उद्देश नाही. तो भाग थोडा कमी करायला हवा होता.

बाकी एका दीर्घ कादंबरीसाठी आवश्यक असा सगळा सविस्तारपणा त्यात आहे. दाराची प्रेमप्रकरणे, युद्धात चढाईतले डावपेच, दरबारी लोकांचे स्वार्थ, हिंदू राजांची साथ किंवा विरोध, दाराच्या भावभावनांचा कल्लोळ ह्यातून वाचकही कथेत समरसून जातो.

मुस्लिम समाजात चुलत भावांची लग्न होतात हे ऐकलं होतं. ह्या मुघल घराण्यात हे पदोपदी दिसतं. इतकंच काय बाईच्या पाहिल्या लग्नापासूनच्या मुलीचं दुसऱ्या लग्नापासूनच्या मुलाशी लग्न झालेलं दिसतं. त्यामुळे दोनजण एकमेकांचे भाऊ तेच व्याही कधी मेव्हणे तर कधी सासरे-जावई असली भलतीच गोंधळात टाकणारी नाती तयार होतात. पुस्तकाच्या शेवटी कादंबरीत आलेल्या पात्रांची थोडक्यात ओळख आणि परस्परसंबंध सांगितले आहेत त्याची मदत होते.

संदर्भ ग्रंथांची यादी, दाराच्या पलायनाचा पूर्ण मार्गाचा नकाशा, मुघल वंशावळ, जुनी चित्रे ह्यामुळे ही कादंबरी एक कल्पित कादंबरी राहत नाही तर कलात्मक पद्धतीने मांडलेला एक ऐतिहासिक अभ्यासग्रंथ ठरतो. 

दारा शिकोहचं आयुष्य हे दाखवतं की भारतातल्या सर्वधर्मसमभावाचा स्वीकार मुस्लिम धर्माभिमानी व्यक्तीनेसुद्धा करणं किती सोपं आहे. मात्र अश्याप्रकारे विचार करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या स्वधर्मियांकडून किती धोका आहे आणि झगडा किती मोठा आहे हे सुद्धा हे चरित्र दाखवतं. मुघलांना आक्रमक न मानणारे, त्यांचं गौरवगान करणारे लोक सुद्धा दारा शिकोहला सोयीस्करपणे विसरतात हेच आपलं दुर्दैव. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचून, विशेषतः मुस्लिम वाचकांनी वाचून आपला दृष्टिकोन विस्तारला पाहिजे. 

हे पुस्तक पुढील लिंकवर ऑनलाईन विकत घेता येईल 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...