पुस्तक - काळी (Kali)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - द गुड अर्थ (The Good Earth)
लेखिका - पर्ल बक (Pearl Buck)
अनुवाद - भारती पांडे (Bharati Pande)
पाने - २८६
ISBN - 978-81-8498-331-9
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती फेब २०१२
अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिकेची ही एक नावाजलेली आणि पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. लिहिलेबद्दल आणि ह्या मूळ कादंबरी बद्दल ह्या पुस्तकात दिलेली माहिती.
चीनमधल्या शेतकरी कुटुंबाची ही कहाणी आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी चीनमधल्या खेड्यात शेतकरी कुटुंब कसं राहत असेल; अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देत स्वतःची प्रगती कशी करत असेल याचं चित्रमय वर्णन या पुस्तकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला ह्या कथेचं मुख्यपात्र - एका शेतकऱ्याचा मुलगा - वांगलुंग तारुण्यात पदार्पण करतो आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक मुलगी पत्नी म्हणून निवडली आहे. ही मुलगी एका श्रीमंत घरात दासी म्हणून काम करते आहे. वांगलुंग काही रक्कम देऊन त्या श्रीमंत कुटुंबाकडून तिला पत्नी म्हणून विकत घेणार आहे ! ही मुलगी दिसायला फारशी सुरेख नसली तरी "कामाला वाघ" अशी आहे. तिच्याबरोबर वांगलुंगचा संसार फुलतो. तिच्या आणि वांगलुंगच्या एकत्र कष्टामुळे त्यांचं शेतीचे उत्पन्नही वाढतं आणि दरवर्षी मुलं होऊन पोरांची संख्याही वाढते. पण दुष्काळामुळे या कुटुंबावर परागंदा व्हायची वेळ येते. शहरात मोलमजुरी करून; प्रसंगी भीक मागून हे कुटुंब तगतं. पण वांगलुंगच्या मनातला सच्चा शेतकरी सतत आपल्या जमिनीची आठवण काढत असतो. त्यामुळे मिळेल तेव्हा, मिळेल तसे पैसे मिळवून तो पुन्हा आपल्या घरी परत येतो.
तो कष्टाने आपली शेती वाढवतो. दैवही त्याच्यावर पसंत होतं आणि तो एक मोठा जमीनदार होतो. ज्या जमीनदाराकडून त्याने आपली पत्नी विकत घेतली होती त्या जमीनदाराच्या बरोबरीचा होतो. पण श्रीमंत होता होता श्रीमंती शौकही त्याच्या मनात शिरतात. एकीकडे गरीब शेतकरी हा पिंड तर दुसरीकडे नव्याने मिळालेली आर्थिक सुबत्ता व सामाजिक स्थान याचा अनुभव घ्यायची ओढ! आपण जमीन टिकवली, कष्ट करून शेती वाढवली हा अभिमान एकीकडे तर गरीब, अडाणी असल्यामुळे कधी स्वप्नातही बघितली नव्हती अशी सुख हापापल्यासारखी मिळवायची वृत्ती ! अशा दोन विसंगत वृत्तींनी त्याचं वागणं-बोलणं घडतंय बिघडतंय. त्याची मुलं सुद्धा आता शेतकऱ्याची मुलं राहिली नाहीत तर जमीनदाराची मुलं आहेत साहजिकच त्यांच्या वागण्यातही बदल आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे नातेवाईक सुद्धा आता त्याला लुबाडायला उत्सुक आहेत. अशावेळी त्याच्यावर पुन्हा एकदा संकट येतं. वांगलुंगला म्हातारा होई पर्यंतचे प्रसंग ह्यात आहेत.
एकूणच गरिबी-श्रीमंतीचा खेळ; दैव-सुदैवाचा खेळ आणि त्या त्या परिस्थितीनुसार बदलत जाणारी मानवी वृत्तीचा आविष्कार याचं अतिशय सुंदर दर्शन या पुस्तकातून आपल्याला घडतं. त्यावेळच्या चीनची सामाजिक परिस्थिती सुद्धा आपल्या लक्षात येते. आजही आपल्या समाजात मुलींना योग्य तो सन्मान मिळत नाही. शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती फारच भीषण होती. या पुस्तकात तर असं दिसतं की मुलगी झाली म्हणजे ती एकतर लग्न करून पाठवण्यासाठी किंवा दासी म्हणून कोणाला विकण्यासाठी हेच जणू गरिबांचं धोरण. म्हणून दासी विकत घेतली, मुलगी दासी म्हणून विकली असे प्रसंग आपल्याला पुस्तकात दिसतात. सर्व कुटुंबीयांची काळजी घेण्याची जबाबदारी जशी कुटुंबप्रमुखाची त्याच बरोबर सगळे कुटुंबीय ही त्याची मालमत्ता सुद्दा असायचे. त्यामुळे आपल्या मुलांनी काय शिकावं, काय शिकू नये, कोणाशी लग्न करावं हे सगळं आपल्या व्यव्यसायाला पूरक ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुटुंबप्रमुखाच. आजच्यासारखं प्रत्येकाची आवडनिवड असली भानगड नाही.
दुष्काळामुळे लोक अन्नाच्या कणाकणासाठी एकमेकांवर तुटून पडतात. अगदी आपली जनावरही त्यांना खावी लागतात. दरोडेखोर बनून लूटमारही होते. याचं भीषण वर्णन पुस्तकात आहे. कष्टकऱ्यांचं दुःखदायक आयुष्य, श्रीमंतांची ऐष. दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन परस्पर तिरस्काराचा. गरिबाला श्रीमंत व्हायची अनिवार इच्छा आणि ते जमत नसेल तर प्रसंग मिळेल तेव्हा श्रीमंताला शब्दशः लुटण्याची त्यांची तयारी. हा सत्ता संघर्ष सुद्धा या कादंबरीत अतिशय परिणामकारकपणे मांडला आहे.
कादंबरीचा कालपट मोठा आहे. वांगलुंगचं पूर्ण जीवन त्यात येतं. तरीही प्रसंगांचा झपाटा चांगला आहे. त्यामुळे आपण खिळून राहतो पुढे काय होईल याची उत्सुकता सतत राहते. असं असूनही प्रत्येक प्रसंग मात्र योग्य तितक्या तपशिलात, अतिशय शांतपणे वर्णन करून सांगितला आहे. जेणेकरून त्या प्रसंगाचं गांभीर्य म्हणा किंवा त्या पात्रांच्या मनात उठणारे तरंग आपल्यापर्यंत अगदी स्पष्ट पोहोचतात.
वांगलुंगची पत्नी "ओ लान" ही एक दासी आणि त्यानंतर एक पत्नी असूनही तिचं स्थान दासी सारखंच. हे त्यावेळच्या पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेचं अगदी परिणामकारक चित्र. तर त्याचवेळी शौक म्हणून; एक खेळणं म्हणून अंगवस्त्र बाळगणं ही कशी पुरुषी वृत्ती आहे हा सुद्धा भाग त्यात येतो.
चीनी समाजातले चमत्कारिक काही रीतिरिवाज सुद्धा ह्यात आपल्याला दिसतात. एक उदा. माणूस मरायला टेकला की त्याची शवपेटी आधीच बनवून घेतली जाते. ती घरी पण आणून ठवतात. आणि मारणारा माणूस पण आपल्या कुटुंबाने आपली किती छान काळजी घेतली हे बघून कृतकृत्य होतात.
काही प्रसंग बघूया.
वांगलुंग आपल्या पत्नीला आणायला जातो तो सुरुवातीचा प्रसंग.
श्रीमंत झाल्यावर वांगलूंच्या वागण्यातला बदल
वांगलुंगचा चुलत भाऊ सैनिक म्हणून जातो आणि काही वर्षांनी वांगलूंच्या घरी येतो तेव्हा त्याच्या वासनापूर्तीसाठी एक दासी त्याला दिली जाते तो प्रसंग.
अजून खूप छोट्या मोठ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. लक्षात राहण्यासारख्या आहेत. पण त्या सगळ्या सांगितल्या तर भावी वाचकांना रसभंग होईल. म्हणून अधिक ना लिहिता थांबतो.
पुस्तकाच्या मागील बाजूस म्हटलं आहे त्याप्रमाणे ही गोष्ट जरी चीन मध्ये घडत असली तरी ती जगात कुठेही घडू शकेल अशी आहे. शेतकरी, त्यांचं आपल्या मातीवर प्रेम, ओला-सुका दुष्काळ, गरीबांना श्रीमंतांबद्दल वाटणारी असूया, श्रीमंतीची स्वप्ने, कष्ट करून श्रीमंत होणाऱ्या माणसाचे वर्तन आणि श्रीमंती आयती मिळालेल्या त्याच्या पुढच्या पिढ्यांचे वर्तन, कुटुंबासाठी झिजणारी गृहिणी ... ह्या सगळ्या वैश्विक गोष्टी आहेत. त्यामुळे ही कादंबरी परकी अजिबात वाटत नाही. अनुवादही तितकाच सहज, सुंदर आणि ताकदीचा आहे. चिनी पार्श्वभूमी, मूळ पुस्तकाची इंग्रजी भाषा, अमेरिकन लेखिका, त्याचा मराठी अनुवाद (आणि सध्या चिनी भाषा शिकणारा मी) असा जगप्रवास पुस्तकाने केला आहे.
पुस्तकाच्या मागील बाजूस म्हटलं आहे त्याप्रमाणे ही गोष्ट जरी चीन मध्ये घडत असली तरी ती जगात कुठेही घडू शकेल अशी आहे. शेतकरी, त्यांचं आपल्या मातीवर प्रेम, ओला-सुका दुष्काळ, गरीबांना श्रीमंतांबद्दल वाटणारी असूया, श्रीमंतीची स्वप्ने, कष्ट करून श्रीमंत होणाऱ्या माणसाचे वर्तन आणि श्रीमंती आयती मिळालेल्या त्याच्या पुढच्या पिढ्यांचे वर्तन, कुटुंबासाठी झिजणारी गृहिणी ... ह्या सगळ्या वैश्विक गोष्टी आहेत. त्यामुळे ही कादंबरी परकी अजिबात वाटत नाही. अनुवादही तितकाच सहज, सुंदर आणि ताकदीचा आहे. चिनी पार्श्वभूमी, मूळ पुस्तकाची इंग्रजी भाषा, अमेरिकन लेखिका, त्याचा मराठी अनुवाद (आणि सध्या चिनी भाषा शिकणारा मी) असा जगप्रवास पुस्तकाने केला आहे.
वांगलुंगच्या आयुष्याचे सहप्रवासी नक्की व्हा. एक गंभीर, रंजक, सकस, अर्थपूर्ण कादंबरी वाचल्याचं समाधान नक्की लाभेल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————