क्रिककथा दिवाळी अंक २०२२(Crickatha Diwali Edition 2022)



पुस्तक - क्रिककथा दिवाळी अंक २०२२ (Crickatha Diwali Edition 2022)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११२
ISBN - दिलेला नाही

भारतीयांचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट बघायला; त्याच्या बातम्या वाचायला; कात्रणं गोळा करायला; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर भरभरून बोलायला बहुतेक लोकांना आवडतं. क्रिकेटशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याचं अजून एक साधन आता उपलब्ध होत आहेते म्हणजे क्रिकेट विषयक दिवाळी अंक- "क्रिककथा". या दिवाळी अंकात म्हटल्याप्रमाणे हा मराठीमधला क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक आहे. हे या अंकाचे दुसरे वर्ष आहे. क्रिकेट विषयक माहिती आणि मनोरंजक पैलूंनी भरगच्च असा हा दिवाळी अंक आहे. 
अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकूया.



लेखांमध्ये जुन्या क्रिकेटपटूंच्या आठवणींना, त्यांच्या विक्रमांना तसेच शैलींना उजाळा दिला आहे. तसेच सध्या गाजत असलेल्या क्रिकेटपटू बद्दलही लेख आहेत. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट, महाराष्ट्राची तरुण फळी, भारतीय महिला क्रिकेट मधल्या उभरत्या ताऱ्यांवरही लक्ष आहे. पाचगणी प्रीमियर लीग सारख्या हटके उपक्रमाची माहिती आहे.

क्रिकेटचा सामना यशस्वी होण्यासाठी खेळाडूंबरोबरीनेच अनेकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष क्रिकेट न खेळणारे पंच म्हणजे अंपायर, मॅच रेफ्री, खेळपट्टी तयार करणारे, स्कोर लिहिणारे, समालोचक इ. यातील मॅच रेफरी, क्रिकेट अंपायर आणि क्रिकेट स्कोरर यांच्या बद्दलचे, त्यांचं काम काय असतं हे सांगणारे छान लेख आहेत.

इतर दिवाळी अंकाप्रमाणे शब्दकोडे कविता सुद्धा यात आहेत.पण तेही क्रिकेटवर आधारित. गंमत म्हणजे भविष्य सांगणारा एक सदरही आहे. ह्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या फॉर्म बद्दल;आयपीएल मध्ये कोण जिंकेलइ. बद्दल भविष्यवाणी केली आहे.

क्रिकेट ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून पुण्यात चालवला जाणाऱ्या "क्रिककॅफे" ची सचित्र माहिती या मासिकात आहे. या मासिकाच्या निमित्ताने बऱ्याच व्यक्तींनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत त्या मुलाखती youtube वर उपलब्ध आहेत त्या बघण्यासाठीचे क्यूआर कोड मासिकात आहेत.

काही काही लेखांवर नजर टाकूया.
मॅचरेफ्रि च्या कामाबद्दलच्या लेख


उभारता तारा शार्दुल ठाकूर यांच्या वाटचालीबद्दल त्याच्या वडिलांची साधलेला संवाद


मागच्या पिढीतले कर्तृत्ववान पण कमी कालावधी क्रिकेट खेळू शकलेले सुभाष गुप्ते यांचं स्मरण

प्रत्यक्ष खेळापेक्षा क्रीडाबाह्य कारणांसाठी गाजणाऱ्या आयपीएलच्या नकारात्मक बाजूचा मागवा

तेंडुलकर वेंकसरकर, गावस्कर इत्यादी आडनाव नावात "कर" असणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटूंचा संघ तयार करायचा असेल तर त्यात कोणाला घेणार? अशा मजेशीर कल्पनेवर आधारित एक लेख त्यात लेखकाने 11 करांची निवड केली आहे आणि त्यांच्या कारकिर्दी बद्दल थोडक्यात सांगितलं आहे


असा हा अंक वैविध्यपूर्ण आणि क्रिकेट प्रेमींसाठी रोचक रंजक आहे.
हा अंक डिजिटल स्वरूपात ही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी https://crickatha.com/ ला भेट द्या.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-क्रिकेटप्रेमींनी आवा ( आवर्जून वाचा )
                            इतरांनी वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

ચાલો હસીએ( चालो हसीए ) Chalo Hasie




पुस्तक - ચાલો હસીએ( चालो हसीए ) Chalo Hasie
लेखक - नाही
अनुवादक -ધીરુબહેન પટેલ धीरूबहेन पटेल Dheerubahen Patel
भाषा - गुजराती
पाने - १७३
ISBN - 978-81-237-1465-3
प्रकाशन - नॅशनल बुक ट्रस्ट. पहिली आवृत्ती १९९५
छापील किंमत - ५०/-

दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथांचा हा संग्रह आहे. विनोदी स्वरूपाच्या हलक्याफुलक्या छोट्या गोष्टी ह्यात आहेत.

आपल्याकडे शेखचिल्ली नावाच्या माणसाच्या मूर्खपणाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. तश्याच प्रकारचे देशोदेशीचे "शेखचिल्ली"ह्यात बघायला मिळतात. आळस, कामचुकार, लोभी लोकांच्या वृत्तीमुळे घडणाऱ्या गमती आहेत. चतुराईने अडचणीतून बाहेर कसे पडता आले हे काही गोष्टींत आहे तर आपल्या हुशारीने लोकांना कसे ठकवले हे काही गोष्टींत आहे.




एका पाद्री ची फजिती ही कोरिया देशातली ची गोष्ट




मूर्ख माणसाची इराणी गोष्ट



राजाच्या चतुर मंत्र्याची व्हिएतनाम मधली गोष्ट




ह्या गोष्टी खळखळून हसवणाऱ्या नाहीत. पण वाचायला ठीक आहेत. काही गोष्टींत मूर्खपणा दाखवायचा अतिरेक केलाय. पण गोष्टी अगदी लहान आहेत, १,२ किंवा ३ पानाच्या त्यामुळे अश्या गोष्टीदेखील कंटाळा यायच्या आत संपतात.

दक्षिण आशियाचे देशांमध्ये समान सांस्कृतिक धागा आहे हे मात्र ह्यातून जाणवते. कारण काही परदेशांतल्या गोष्टी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत किंवा थोड्या वेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात. उदा. "शुक्रवारची कहाणी" ज्यात गरीब बहीण श्रीमंत भावाकडे जेवायला जावून अपमानित होते. ती आणि ही इराणी गोष्ट सारखीच वाटेल बघा.


पुस्तकात काही म्हणी आणि उखाण्यातली कोडी आहेत. बऱ्याच गोष्टींबरोबर रेखाचित्रे आहेत. आणि ज्या देशातली कथा त्याशैलीतले चित्र काढले आहे. त्यातून पुस्तक देखणे झाले आहे. 
प्रौढ वाचकांना खूप धमाल येईल अशा विनोदी गोष्टी नाहीत पण बालवाचकांसाठी छान आहेत. "तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे" ह्या म्हणीमागची मूर्ख मुलाची गोष्ट लहानपणी ऐकली तरी आयुष्यभर लक्षात राहते तश्या मजेशीर गोष्टी त्यांना आवडतील. त्यामुळे ह्या गोष्टी शब्दश: न घेता लाक्षणिक अर्थाने घेतल्या तर त्या बोधकथा सुद्धा ठरू शकतील.

अनुवाद अगदी छान झाला आहे. वाचताना परदेशी गोष्ट वाचतोय असं कुठेही वाटत नाही.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- बालवाचकांनी आवा ( आवर्जून वाचा )
                            प्रौढ वाचकांनी वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

भयातून निर्भयाकडे... संवाद सेतू (Bhayatun nirbhayatekade... sanvad setu)



पुस्तक - भयातून निर्भयाकडे... संवाद सेतू (Bhayatun nirbhayakade...sanvad setu)
लेखिका - डॉ. सुनिता चव्हाण (Dr. Sunita Chavhan)
भाषा - मराठी
पाने - १६८
प्रकाशन - डिंपल पब्लिकेशन. प्रथमावृत्ती - मार्च २०२२
छापील किंमत - २५०/- रु.
ISBN - 978-93-92419-09-6

"डिंपल पब्लिकेशन"चे कौतुक मुळे ह्यांनी आपणहून हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वप्रथ त्यांचे आभार मानतो. माझ्या हौशीने पण नियमित वाचन व परीक्षणलेखनाचे श्री. कौतुक मुळे ह्यांनी "कौतुक"च केले आहे असे मी समजतो.

डॉ. सुनिता चव्हाण यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव लेखांच्या रूपात सादर करून वेगवेगळ्या आरोग्य विषयक प्रश्नांवर वाचकांशी संवाद साधला आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली अश्या विषयांवर हे लेख आहेत. डॉक्टरांकडे एखादा पेशंट आला आहे; तो आपली समस्या सांगतो आहे आणि त्यावर डॉक्टरांचं समुपदेशन असं बहुतेक लेखांचं स्वरूप आहे. त्यातून ह्या समस्येकडे बघण्याचा सर्वसाधारण लोकांचा दृष्टीकोन, समज-गैरसमज दिसतात. तर समस्यांचा विचार कसा केला पाहिजे; त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हे डॉक्टरांच्या संवादातून, मनोगतातून दिसतं.

अनुक्रमणिकेवर एक दृष्टीक्षेप टाकूया.

बहुतेक लेखांचे विषय त्यांच्या नावावरून कळले असतीलच.

रजोनिवृत्ती, स्तनकॅन्सर, मासिकपाळी,प्रसूतिवेदना इ. लेख फक्त स्त्रियांचीच नाहीत तर पुरुषांनीही वाचून आपल्या जाणिवेत भर टाकली पाहिजे. जेणेकरून आपल्या घरातल्या महिला सदस्य असोत की सहविद्यार्थी, सहकारी किंवा आणि कोणीही स्त्री; एक स्त्री म्हणून त्यांना काही विशेष त्रास सहन करावे लागतात आणि त्यासाठी त्यांना आपल्या सहकार्याची गरज असते हे जाणवेल.

"स्पर्श : चांगला / वाईट" ह्यातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व आणि लहानपणापासून अनोळखी लोकांच्या स्पर्शाबद्दल लहान मुलांना समजावून सतर्क करण्याबद्दल सुचवले आहे. तसेच मुलांच्या वागण्यात काही फरक पडला असेल; ते बुजत असतील; निराश असतील तर घराबाहेर त्यांना कोणी काही वाईट अनुभव तर येत नाहीत ना ह्याबद्दल घराच्या मोठ्या माणसांनी सतर्क राहावे हे सुचवले आहे.

"हस्तमैथुन एक समस्या" ह्यात गैरसमजांचं निराकरण केलं आहे. बाकी लेखांत वजनवाढ, मुलांवरचे संस्कार, मुलांवरचा अभ्यासाचा बोजा; नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मानसिक व्यायाम, सासू-सून ह्यांचे नाते इ. नेहमी चर्चिले जाणारे विषयही आहेत. देहदान आणि त्याचा समाजाला होणार उपयोग ह्याविषयी प्राथमिक माहिती देणारा एक लेख आहे. "इमर्जन्सी केसेस" हाताळण्याचे त्यांचे अनुभव सुद्धा निवेदनाच्या ओघात येतात.


काही उदाहरणे बघूया

"मेनोपॉज मधील संभ्रमता"



रागीट, चिडचिडी मुले आणि त्यांचे पालक ह्यांचा संबंधांबद्दल



एका "इमर्जन्सी केस"चा अनुभव.



एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून सध्या आपल्यासमोर ज्या महत्त्वाचे आरोग्याविषयक प्रश्न आहेत त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक प्रश्न दिसायला सोपा असला तरी व्यक्तिगणिक त्याची कारणं, उपचार हे बदलत जाणार. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सखोलपणे मांडायचा तर प्रत्येकावर एक पुस्तक होऊ शकतं. त्यामुळे प्रश्नाकडे लक्ष वेधलं जाईल, त्याबद्दल विचार तरी सुरु होईल इतपत माहिती पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखिकेची निवेदन शैली सहज संवादी आहे. आपण समरसून वाचतो. पुस्तकाच्या वाचनातून ह्या समस्यांचं भय उत्पन्न न होता त्याबद्दल जाणीव वाढते हे विशेष. आपल्या कुटुंबियांशी, डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी संवाद साधून गैरसमज दूर केले पाहिजेत हा पुस्तकाचा संदेश पोचवणारं मुखपृष्ठसुद्धा तितकंच बोलकं आहे. 

विषय किंवा माहिती पूर्णपणे नवीन आहे असं म्हणता येणार नाही, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधले, पुरवण्यांमधले लेख, ब्लॉग, फेसबुक पोस्ट इ. मधून हे विषय चर्चिले जातातच. पण जितक्यांदा ते पुढे येतील तितकं चांगलंच. प्रत्येकवेळी कोणी ना कोणी नवीन वाचक सापडेलच. ज्यांनी आधी काही वाचलं आहे त्यांनासुद्धा काहीतरी नवीन सापडेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

बोलगप्पा (Bolgappa)




पुस्तक - बोलगप्पा (Bolgappa)
लेखक - शरद वर्दे (Sharad Varde) 
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१४
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
ISBN - 978-93-87453-32-6

शरद वर्दे ह्यांनी लिहिलेल्या आणि लोकसता (चतुरंग पुरवणी), प्रहार (कोलाज पुरवणी) आणि नवाकाळ ह्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेमुळे तीन-चार पानी लहान लेख आहेत. विषय खूप वेगवेगळे आहेत. सुशिक्षित, सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंब ह्या लेखांचे केंद्रस्थान आहे. अश्या कुटुंबांत नेहमी घडणारे प्रसंग, गमतीजमती, छोटे वादविवाद, जीवनशैलीत पडलेला प्रचंड बदल, दोन पिढ्यांमधलं विचारांचं अंतर, परदेशस्थ कुटुंबियांच्या वागण्यावर तिथल्या राहणीमानाचा प्रभाव, भारत आणि परदेशांची तुलना असे बरेच विषय आहेत. दोन तीन लोकांच्या गप्पांच्या रूपात लेखांची मांडणी आहे. सगळे थोड्या विनोदी, हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळले आहेत. खूप खळखळून हसायला लावणारे नसले तरी वाचायला छान आहेत. मनोरंजक आहेत.
काही उदाहरणे वाचूया

आंघोळ सकाळी करावी की संध्याकाळी ह्याबद्दल दोन पिढ्यांचे वेगळे विचार
बदलती, किंबहुना ढासळती शिक्षणपद्धती, शिक्षणाचा बाजार वगैरे
भारतीय असो की परदेशी, सगळी माणसं इथून तिथून सारखीच. रशियन माणसांच्या अंधश्रद्धा सांगणारा एक लेख

अनिवासी भारतीयांवरचा अमेरिकन खाद्य संस्कृतीचा परिणाम

अजून बऱ्याच विषयांवर हे लेख आहेत.

ह्या आधी शरद वर्दे ह्यांची तीन पूस्तके वाचली होती. ती अप्रतिम होती, त्यांची परीक्षणे पुढील लिंकवर वाचू शकाल.
वरची पुस्तके एका विशिष्ट विषयाला धरून आणि दीर्घलेखांची होती. त्यातून विषय व लेखकाची शैली, मांडणी ह्याची छान मजा घेता आली. "बोलगप्पा" पुस्तकाचं स्वरूप बरंच वेगळं. ते आधीच्या पुस्तकांइतकं भावलं नाही.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...