शिल्पकथा (Shilpkatha)





पुस्तक - शिल्पकथा (Shilpkatha)
लेखक - पुरुषोत्तम विठ्ठल लेले (Purushottam Viththal Lele)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १००
ISBN - 978-81-947274-7-7
छापील किंमत - २००/- रु.

हे पुस्तक मला वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक पुरुषोत्तम लेले ह्यांचे सर्वप्रथम आभार मानतो.

भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत गावोगावी मिळून लाखो देवळे आहेत. त्यातली हजारो देवळे ही ऐतिहासिक आणि प्राचीन आहेत. या प्राचीन देवळांचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवळे फक्त प्रार्थनास्थळे नाहीत तर दगडात कोरलेली शिल्पे व नक्षीकाम यामुळे अतिशय प्रेक्षणीय वास्तू देखील आहेत. या शिल्पांचा उपयोग जसा देवळाचा सौंदर्य वाढवण्यासाठी केलेला आहे तसाच पौराणिक गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा केलेला आहे. रामायण, महाभारत, पुराणे व संस्कृत महाकाव्ये यातले प्रसंग शिल्पकारांनी आपल्या शिल्पांतून चितारलेले आहेत. आपले हे प्राचीन साहित्य व संस्कार परंपरा मौखिक पद्धतीने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचले त्याचबरोबर नाटके, नृत्य, चित्र आणि शिल्पे यांचाही त्यात खूप हातभार लागला.
एखादे शिल्प बघितल्यावर त्यातल्या सौंदर्याची जाणीव आपल्याला होतेच पण त्या शिल्पामागची गोष्ट माहिती असेल तर ते शिल्प अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येते. पुराण कथांमध्ये खूप वेगवेगळे चमत्कार, अचाट पद्धतीचे पराक्रम, मानव आणि प्राणी ह्यांच्या मिश्रणातून तयार झालेले वेगळेच जीव अशी कल्पनेची भरारी असते. त्यामुळे जेव्हा गोष्ट आपल्याला समजते तेव्हा ते चित्र ते शिल्प दोन-तीन विनाकारण जोडलेले तुकडे आहे असे न वाटता त्याचा अर्थ उमगतो.
पुरुषोत्तम लेले यांनी अशाच काही शिल्पांच्या कथा ह्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. त्यांच्या पर्यटनाच्या आवडीमुळे त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिल्या. सुंदर वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांबद्दलची माहिती इंटरनेटवरून, इतर माध्यमातून मिळवली. ही माहिती आपल्या मित्रमंडळी परिचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक पोस्ट लिहायला सुरुवात केली. त्याचे चांगले स्वागत झाले. त्यातल्या निवडक पोस्टचे संकलन पुस्तक स्वरूपात त्यांनी आता प्रकाशित केले आहे.
पुस्तकात एका शिल्पाचे एक कृष्णधवल चित्र किंवा त्याच प्रकारच्या शिल्पाच्या वेगवेगळ्या देवळांमध्ये आढळणाऱ्या आवृत्तींची चित्रे आणि त्या शिल्पा मागची कथा एक दीड पानात असे स्वरूप आहे. यात 25 शिल्पे आहेत. पुस्तकाचा फोकस हा शिल्पांवर जास्ती नाही तर कथांवर आहे. म्हणजे शिल्पाचे रसग्रहण नाही. त्या शिल्पाचं सविस्तर वर्णन; ते शिल्प सुंदर का आहे; त्यातल्या वेगवेगळ्या भागांचे वैशिष्ट्य, दगडाचं वैशिष्ट्य, शैलीचं वैशिष्ट्य असा प्रकार नाही. तर त्या शिल्पातून प्रथमदर्शनी आपल्याला जे दिसतं त्या मागची पौराणिक कथा सांगण्यावरती भर आहे. त्यातल्या काही कथा या सर्वश्रुत रामायणातल्या गोष्टी आहेत तर काही कमी माहिती असणाऱ्या पौराणिक गोष्टी आहेत. एक दोन उदाहरणे बघूया म्हणजे आपल्याला समजेल.

रामायणातली गोष्ट सेतुबंधनावरील शिल्प आणि त्याची माहिती.



बळीराजा आणि वामन अवताराची गोष्ट.
 

चित्र विचित्र पक्षी - गंडभेरुंड
 

तीन पायांच्या भृंगी ऋषींची कथा


अनुक्रमणिका बघितल्यावर अजून कुठली शिल्पे ह्यात आहे ते लक्षात येईल. बहुतेक देवळे दक्षिण भारतातली आहेत.
हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला काही नवीन कथा कळतील. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या देवळात जाऊ तेव्हा त्यातल्या शिल्पामागची कथा आपल्याला समजते का हे जाणण्याचा आपण प्रयत्न करू. नसेल तर त्याचा फोटो काढून जाणकारांना विचारायचा प्रयत्न करू.

या पुस्तकातले फोटो हे कृष्णधवल आहेत त्यामुळे सगळेच फोटो खूप सुस्पष्ट आहेत असं नाही. ते जर रंगीत आणि अजून स्पष्ट छापता आले असते तर पुस्तकाचा प्रभाव वाढला असता( पण मुद्रणखर्चही वाढला असता आणि पुस्तकाची किंमतही). शिल्पा बद्दलची थोडी अधिक माहिती असती तर शिल्पकलेबद्दलची जाण वाढण्यात हातभार लागला असता.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...