विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas)



पुस्तक - विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas)
लेखक - दिलीप महाजन (Dilip Mahajan)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २४८
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, डिसेंबर २०२२
छापील किंमत - रु. २५०/-

गेल्या शुक्रवारी ९ डिसेंबरला डोंबिवलीत ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याला मी उपस्थित होतो.

प्रकाशनस्थळी पुस्तक विकत घेऊन आठवडाभरात हे परीक्षण लिहितो आहे. इतक्या ताज्या पुस्तकावर इतकं लगेच लिहिण्याची ही माझी बहुतेक दुसरीच वेळ. ह्याआधी माधव जोशी ह्यांच्या कॉर्पोरेट दिंडी बद्दल असे लिहिले होते. ते तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकाल. लिंक 

दोघेही लेखक डोंबिवलीकरच. दोन्ही पुस्तकांची मूळ संकल्पना सारखीच आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न आयुष्यातील बरेच अनुभव त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिले होते. ते लोकांना आवडले आणि पुस्तकरूपाने त्यांचं दीर्घकालीन दस्तऐवजीकरण व्हावे असा रास्त विचार पुढे आला. दिलीप महाजन ह्यांनी तरुणपणी ६ वर्षे "विवेकानंद केंद्र" ह्या देशव्यापी संस्थेत कामी केले. त्यातले अनुभव ह्या लेखनात होते. म्हणून हा अनुभवसंच आता विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

अनुक्रमणिका


पुस्तकात सुरुवाती
ला लेखकाने आपल्या बालपणाबद्दल सांगितले आहे. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची ओळख कशी झाली, कुठले प्रचारक त्यांना भेटले हा भाग आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांना विवेकानंद केंद्रात सहभागी व्हायचे होते - जे तेव्हा नुकतेच सुरु झाले होते. उच्चशिक्षित आणि ध्येयासाठी, देशासाठी आपली काही वर्षे देऊ इच्छिणाऱ्या युवकांना केंद्र बोलवत होतं. महाजनांनी तिथे जाण्यासाठी अर्ज केला. रीतसर मुलाखत होऊन त्यांची निवड देखील झाली. पण घरच्या अडचणींमुळे ते जाऊ शकले नाही. पुढे काही महिने दुसऱ्या सेवाभावी संस्थेत काम केल्यावर पुन्हा एकदा एकनाथजी रानडे ह्यांची भेट झाली. आणि ह्यावेळी केंद्रात प्रवेश झालाच.

त्यांच्या कामाची सुरुवात अरुणाचल प्रदेशमध्ये केंद्राने पाठवलेल्या शिक्षकाच्या रूपात झाली. दुर्गम भागातल्या खेड्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव त्यांना आला. तिकडे असतानाच त्यांचे लग्न झाले. आणि लग्नानंतर चौथ्या दिवशी हे नवविवाहित जोडपे पुन्हा अरुणाचलच्या खेड्यात दाखल. ही कार्यावरची निष्ठा आणि त्याला पत्नी सुरेखा महाजन ह्यांच्याकडून मिळालेली पहिल्यापासून कायम मिळत आलेली साथ !! मोठं समाजकाम उभं करण्यासाठी असे समरसून काम करणारे कार्यकर्ते तयार असावे लागतात हे ह्यातून जाणवतं.

दीडेक वर्षाने केंद्राने त्यांना कन्याकुमारीला यायला सांगितलं. थोडे दिवसच ट्रेनिंग झालं आणि त्यांची बदली झाली कलकत्त्याला. बंगाल, ओरिसा आणि बिहार ह्या प्रांतांचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून. गंमत म्हणजे त्यांच्या पत्नी कन्याकुमारीलाच ट्रेनिंग पूर्ण करणार होतया. पुढे त्याही आता पूर्णवेळ कार्यकर्त्या झाल्या होत्या. श्री. महाजन ह्यांनी केंद्रप्रतिनिधी म्हणून केंद्रासाठी निधी मिळवणे, केंद्राच्या नियतकालिकांसाठी वर्गणीदार मिळवणे, लोकांना केंद्र परिचय करून देणे ही कामे केली. त्यासाठी नवनवीन लोकांच्या भेटी कशा घेतल्या, कोण कोण सदगृहस्थ भेटले ह्याचा वृत्तांत पुढील प्रकरणांत आहे.

त्यांच्या कामाचा झपाटा लक्षात घेऊन काही वर्षांनी एकनाथजींनानी त्यांना कन्याकुमारीला बोलावले. आता बढती होऊन ते "assistant all india representitive" झाले. मुख्य कचेरी कन्याकुमारी असली तरी देशभर जाऊन लोकांच्या भेटी घेणं, निधी जमा करणं हे मुख्य काम असल्यामुळे प्रवास सतत चालूच. त्यांच्या कामाचे पुढचे पर्व मुंबईला सुरु झाले. ह्या सर्व प्रकरणांत महत्त्वाचे प्रवास, कुठल्या प्रसंगात कोण लोक भेटले, कोण उद्योगपती किंवा राजकारणी भेटले, कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला, कोणी मदत केली असे असंख्य नामोल्लेख आहेत.

एकनाथजींशी प्रसंगोपात भेटी होतच असत. त्यातून त्यांच्या स्वभावाचे लेखकाला दिसलेले कंगोरे आपल्यासमोर येतात. लोकांशी सतत संपर्क ठेवणे, पैशाच्या हिशेबापासून पत्रांमधल्या स्पेलिंग पर्यंत प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणा, घरातली एक व्यक्ती असावी अशी वावरण्यातली सहजता, दैनंदिन जीवनातला साधेपणा, निस्पृहता असे अनेक पैलू त्यातून मला दिसले.

श्री. महाजनांना प्रापंचिक आणि आर्थिक अडचणींमुळे विवेकानंद केंद्र सोडून नोकरी धरावी लागली. हा निर्णय किती जड अंतःकरणाने आणि नाईलाजाने घेतला असेल ह्या भावना आपल्यापर्यंत पोचतात. आणि पुस्तक पूर्ण होते.

आता काही पाने वाचून बघा.
केंद्राचे ट्रेनिंग




विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते म्हणून मिळणाऱ्या लोकांच्या स्नेहाचे आणि स्वागताचे एक उदाहरण



केंद्राला उद्योगपती, राजकारणी आणि प्रथितयश व्यक्तींनी मदत केली. त्यातले एक उदाहरण. उद्योजक श्री. मफतलाल ह्यांच्याशी झालेल्या भेटी.




कार्यकर्ता म्हणून राहायचं तर गरजा आणि खर्च कमीत कमी ठेवणं अनिवार्य ! त्यामुळे मुंबईत बदली झाल्यावर एका छोट्याशा जागेत संसार कसा थाटला. पण ह्या अडीअडचणींवर मात करता आली ती इतर कार्यकर्ते, स्नेही आणि कुटुंबीय ह्यांच्या मदतीमुळेच. त्या बद्दलचा एक प्रसंग.





पुस्तक काही अंशी एकसुरी होतं. प्रत्येक प्रसंगात कुठे गेलो, कोण भेटलं, कोण कार्यकर्ते आले होते, काय मदत केली... ह्या साच्यात बहुतांश प्रसंग आहेत. एका संस्थेच्या कामाचे दस्तऐवजीकरण म्हणून हे तपशील ठीक आहेत. पण त्रयस्थ वाचकाला थोडे कंटाळवाणे आहेत. 
त्यातही सगळे चांगले अनुभवच लिहिले आहेत. कुठे नकार मिळाला असेल, अपेक्षाभंग असेल, प्रसंगी अवहेलना झाली असेल ("संघा"चा माणूस म्हणून तरी असे अनुभव आले असतील ना?) ते लिहिलं नाहीये.
दुसरं म्हणजे म्हणजे दोन प्रसंगांमध्ये नक्की किती काळ गेला हे नीट कळत नव्हतं.

पुस्तकाची सर्वात मोठी उणीव ही वाटली की; ह्या सर्व कालावधीत विवेकानंद केंद्र काय काम करत होतं हे नीट उमगत नाही. योग वर्ग आणि एक मासिक इतपतच मला समजलं. ह्या उपक्रमांचा समाजावर काय परिणाम होत होता; त्यातून संस्थेची वाढ कशी झाली; संस्था वाढण्यात काही संघर्ष करावा लागला का ? हे काहीच समजत नाही. प्रसंगोपात ते सांगायला हवं होतं. पुढच्या आवृत्तीत असे प्रकरणे पुस्तकाच्या सुरवातीला जोडावे जेणेकरून अनुभवांचं महत्त्व अजून समजेल.

सामाजिक कार्यकर्त्यांचं पुस्तक म्हटल्यावर "सामाजिक संघर्ष", "अन्यायाविरुद्ध लढा" असा भाग असतो. तसं काही ह्या पुस्तकात नाही. पण संस्था चालवायची तर "पैसा /निधी" हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तो सन्मार्गाने, लोकवर्गणीतून मिळवणंही सोपं नाही. हा "आर्थिक संघर्षाचा" भाग पुढे आणणं हे मला ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य वाटतं. तसंच सामाजिक कार्य करणे म्हणजे प्रत्येक वेळी आंदोलन करायचे किंवा लाठ्याकाठ्या खायची तयारी ठेवायची असे नाही. त्या कामाच्या व्यवस्थापनाचे काम सुद्धा तितकेच महत्त्वाचे, क्लिष्ट असते. ते करूनसुद्धा आपण मोठा हातभार लावू शकतो हे जाणवतं. एक सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठी आपली मनोभूमिका कशी असली पाहिजे, काय तडजोडी कराव्या लागतात; त्यात इतरांची साथ मिळाली तर वाटचाल कमी त्रासदायक होऊ शकते हे पुस्तकातून दिसतं. त्यामुळे हे प्रांजळ आत्मनिवेदन वाचकांना आवडेल.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...