स्त्री : व्यक्त-अव्यक्त Stree : Vyakta-Avyakta



पुस्तक - स्त्री : व्यक्त-अव्यक्त Stree : Vyakta-Avyakta
लेखिका - ऋता पंडित Ruta Pandit
भाषा - मराठी
पाने - २५२
प्रकाशन - अमलताश बुक्स, नोव्हेंबर २०२३
छापील किंमत - रु. २५०/-
ISBN - 978-93-6013-740-3

पुरुषप्रधान समाजात एक स्त्री म्हणून जगताना लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत, शाळा-कॉलेज पासून नोकरीपर्यंत, घरगुती जबाबदाऱ्यांपासून नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यापर्यंत अनेक वैशिट्यपूर्ण परिस्थितून जावं लागतं. स्त्रीचं कुटुंबातलं व घरातलं स्थान आणि काम अर्थात "चूल-मूल हीच प्राथमिक जबाबदारी" ही विचारसरणी मानवी व्यवस्थेचा एक भाग आहे. पुरुषसमोर स्त्रीने दुय्यम भूमिका घेतली पाहिजे ही धारणा सुद्धा मानवी समाजव्यवस्थेचा भाग आहे. ह्याची तीव्रता आणि लवचिकपणा ह्यात देश, धर्म, राज्य, जात, आर्थिक वर्ग ह्यानुसार कमीजास्त फरक पडत असेल. पण लसावि मात्र सारखाच आहे. ह्या लसाविला तोंड देत, कधी सांभाळत, कधी दुर्लक्ष करत स्त्रिया आपली वाट चोखाळत आहेत. त्यांनी ह्या वाटेवर पुढे जावं ह्यासाठी संवेदनशील मनाचे पुरुषही त्यात हातभार लावत आहेत. मग खरंच कशी आहे आजची परिस्थिती ? बदलाच्या ह्या टप्प्यावर आपण कुठपर्यंत पोचलो आहोत; सध्या कुठल्या समस्या आहेत; काय बदल घडत आहेत ? ह्याचा मागोवा घेणारं "स्त्री : व्यक्त-अव्यक्त" पुस्तक आहे.

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती




स्त्रियांच्या अनुभवविश्वाचे असंख्य पैलू मांडणाऱ्या लेखांचा हा संग्रह आहे. "मन", "जीवनाचा अनुभव" आणि "शरीर" अशा तीन भागांत हे लेख विभागले आहेत. एकूण ४३ लेख आहेत त्यामुळे प्रत्येकाबद्दल सांगणं कठीण आहे. पण थोडक्यात गोषवारा द्यायचा प्रयत्न करतो.

लेखिकेने एकेक प्रश्न किंवा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती घेतली आहे. त्यामध्ये स्त्री/मुलगी कसा विचार करते; आपली समाजव्यवस्था नकळतपणे कशी प्रभाव टाकते, त्यातून होणारं नुकसान, आव्हाने आणि त्यावर थोडक्यात उपाय असं साधारण लेखांचं स्वरूप मला वाटलं. ह्यातल्या काही काही गोष्टी पुरुष व्यक्तींच्या समस्या सुद्धा असू शकतील. तर काही गोष्टी खास स्त्रियांनाच अनुभवायला येतील अशा आहेत.

अनुक्रमणिका




काही लेखांबद्दल सांगतो

"डिप्रेशन : एक कटू वास्तव" - कोरोना काळात सगळे घरी बसले तेव्हा बायकांना स्वयंपाकपाणी, आवराआवरी सांभाळून ऑफिसकाम करावं लागलं. त्याचा नेहमीपेक्षा जास्त ताण आला. तसाच काही वेळा प्रसूती नंतर काहींना नैराश्याचा आजार होऊ शकतो.

"आली (स्वतःशी) लग्न घडी समीप" - sologamy म्हणजे स्वतःशीच लग्न करणे. ही विचित्र कल्पना काही लोकांनी म्हणे परदेशात आणि भारतातही प्रत्यक्षात आणली. नंतर स्वतःशी घटस्फोटसुद्धा घेतला ! ह्या नव्या येऊ घातलेल्या ट्रेंड बद्दल.

"एकटी परी नाही एकाकी" - अविवाहित, घटस्फोटित किंवा परित्यक्ता अशा "एकट्या" महिलांना येणारे अनुभव. एकटी स्त्री - स्वतःहून स्वीकारलेलं एकटेपण असेल तर आनंदी राहू शकते ना ? तिचं आनंदी असणं समाजाने का स्वीकारू नये ?

"नैतिक चौकटीच्या अल्याड-पल्याड" - विवाहबाह्य संबंध; विवाहपूर्व शारीरिक संबंध ह्याबद्दल काय नैतिक आणि काय अनैतिक हे विचार प्रत्येक समाजात वेगळे आहेत. ते समाजाने न ठरवता त्या त्या स्त्रीने-पुरुषाने ठरवावं, एकाच नात्यातून सगळं मिळत नसेल तर इतर पर्याय शोधण्याची मुभा असली पाहिजे असा धाडसी विचार लेखिका मांडते.

"अप्रेझलच्या निमित्ताने" - कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना फक्त कामाची गुणवत्ता बघितली जाते का ? महिला कर्मचारी असेल तर कळतनकळतपणे इतर बाबी मनात येत असतील ना ? घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला वाढीव कामासाठी जास्त वेळ देणं जमेल का? बाई म्हणजे हळवी; मग तिला कठोर निर्णय घेता येतील का ? त्यातून मार्ग कसा काढता येईल ?

"तकरार के दरवाजे : खुले या बंद" - कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, मिळणारे टोमणे, दिसण्यावरून दिल्या जाणाऱ्या कमेंट्स किंवा "आडून आडून सूचना". ह्याबद्दल कुठला कायदा आहे, आवाज का उठवला पाहिजे ह्याबद्दल

"उणे-अधिक माझ्यात" - imposter phenomenon म्हणजे स्वतःबद्दल विनाकारण शंका घेणं. यश मिळूनही हे आपल्याला योगायोगाने मिळालं असेल, आपली खरी एवढी लायकी नाही असं वाटण. हे पुरुष व्यक्तीलाही वाटू शकतं. पण बायकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे असं एका सर्वेक्षणाच्या आधारे म्हटलं आहे.

"दिवाळी दडपण आणि ती" - दिवाळीच्या आधीची साफसफाई, मग घरी फराळ करणं, आलंगेलं बघणं आणि हे सगळं कामाचा व्याप सांभाळून करण्यात बायकांचा पिट्ट्या पडतो. म्हणून कुटुंबीयांनी हातभार लावला पाहिजे किंवा सरळ बाहेरून विकत पदार्थ आणणे, साफसफाई पैसे देऊन करवून घेतली पाहिजे हे सुचवणारा लेख.

"आईपणाचा काटेरी मुकुट" - आदर्श माता म्हणजे ती जिने अपत्यांसाठी सर्वस्व अर्पण केलं; ही आपली व्याख्या. पण आई होऊनही स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवू शकली ती खरी आदर्श माता म्हटली पाहिजे. त्यात "मुलाबाळांचं सगळं करून" मग "स्वतःला वेळ" अशी अपेक्षा नाही तर, तिच्या जबाबदाऱ्या इतरांनी वाटून घेऊन तिला "स्वतःचा वेळ" देणं अपेक्षित आहे.

"ये जवानी है दिवानी" - वयात आलेल्या मुलांच्या लैंगिक भावनांना, समस्यांना, प्रश्नांना उत्तर देताना.

"पिरियड लिव्ह" - टाटा स्टील, झोमॅटो इ. काही कंपन्यांत मासिक पाळीसाठी महिला कर्मचाऱ्यांना रजेची खास सोय करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी काय मतं मांडली गेली ह्याबद्दल.


काही पाने उदाहरणादाखल
लादलेली नाती 

स्त्रीने महत्त्वाकांक्षी का असू नये ?


What Women Want


हे लेख पूर्वप्रकाशित आहेत. वृत्तपत्र मासिकांत येणाऱ्या लेखांना शब्दसंख्येची मर्यादा असते. तेवढ्याच शब्दांत एखादी समस्या, तिचं कारण-निराकरण, दुसरी बाजू, तिसरी बाजू ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून लेख समतोल, सुडौल बनवावा लागतो. पण त्यातून कशातही खोलात जात येत नाही. लेखांची ही मर्यादा पण एक पुस्तक म्हणून वाचताना सतत जाणवते. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचूनही खूप भरीव असं हाताला लागल्याचं समाधान मिळत नाही. लेखिकेला मांडायच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तिचं ज्ञानसुद्धा झळकतं आहे पण ते तितक्या ताकदीने पुस्तकातून पोचत नाहीये असं मला वाटलं. लेखसंग्रह करण्याऐवजी मजकुराचं पुनर्लेखन केलं असतं तर छान झालं असतं; असं मला वाटलं. मग लेख एकत्र करून, मुद्द्यांची पुनरावृत्ती टाळून, काही भाग गाळून, काही भागावर खोलात जाऊन लिहिता आलं असतं.

पण हे पुस्तक जो वाचेल तो आपल्या घरातल्या आणि कामाच्या ठिकाणच्या महिलांबद्दल अधिक संवेदनशील होईल, सजग होईल हे मात्र नक्की. खूप जड, खूप दीर्घ असं वाचण्याची सवय नसणाऱ्या लोकांना सुद्धा एकेक लेख सुटा सुटा वाचायची सोय असल्यामुळे दडपण न घेता वाचता येईल. ह्या पुस्तकाची जमेच्या बाजू.

एखाद्या चालू व्हिडिओचा स्क्रिनशॉट घेऊन - तो क्षण कॅप्चर करावा आणि त्याचं वर्णन करावं त्याप्रमाणे तसा बदलत्या समाजाच्या ह्या व्हिडिओचा आजचा "स्क्रिनशॉट" घेतलाय असं मला वाटलं. आज आपण सगळे ती परिस्थिती बघतोय , जगतोय त्यामुळे वाचताना खूप वेगळं, धक्कादायक वाटणार नाही. पण अजून पन्नास शंभर वर्षांनी मागे वळून बघताना हे पुस्तक खूप रंजक वाटेल. काय फरक असेल तेव्हा ? खरंच; तेव्हा परिस्थिती फार वेगळी असेल हे नक्की पण ती चांगल्या अर्थाने वेगळी असावी हीच अपेक्षा. अशी अपेक्षा पूर्ण व्हायची असेल तर स्त्री-पुरुष प्रत्येकालाच अजून संवेदनशील आणि परिपक्व व्हावे लागेल. ऋता पंडित ह्यांचं हे पुस्तक त्यात निश्चित मदतरूप ठरेल !

लेखिका ऋता पंडित ह्यांनी स्वतः हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिले ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आणि त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा !

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...