नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran)




पुस्तक - नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran)
लेखक - प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
प्रकाशन - राजहंस प्रकाशन. जुलै २०२४
छापील किंमत - रु. २४०/-
ISBN -978-81-19625-03-1

२०१४ साली नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून मोठ-मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. 370 कलम रद्द करणे, राममंदिर उभारणी, जीएसटी लागू करणे, जनधन योजना, नोटबंदी, डिजिटल इकॉनॉमी, रस्ते-महामार्ग-मेट्रो यांच्यात झालेली वाढ, रेल्वे सुधारणा... अशा कितीतरी निर्णयांची यादी आपल्याला देता येईल. या प्रत्येक निर्णयामागची पार्श्वभूमी, त्याची अंमलबजावणी आणि परिणाम याबद्दल बरंवाईट मत नक्की असू शकतं. पण हे सर्व निर्णय हे धाडसी, मूलगामी आणि त्यामुळेच दूरगामी परिणाम करणारे आहेत याबद्दल मात्र दुमत नसेल. याच यादीत अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे तो म्हणजे "नवीन शैक्षणिक धोरण २०२० / न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020". ह्या धोरणावर मात्र तितक्या मोठ्याप्रमाणावर चर्चा होत नाही. अर्थसंकल्प, वंदे-भारत गाडीची सुरुवात होणे किंवा नोटाबंदी इतकी ही गोष्ट सनसनाटी नसते. शिक्षणतज्ज्ञांनी काहीतरी ठरवलं असेल आणि आता "सिलॅबस बदलला असेल" इतपतच जाणीव बहुतांश लोकांमध्ये असेल. जेव्हा कॉलेजमध्ये जायचं असेल तेव्हा बघू..कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा बघू.. अशी सर्वसाधारण भूमिका असेल. पण ज्या देशाला खरंच प्रगतीशील राष्ट्र विकसित राष्ट्र बनायचं आहे त्याने आपली पुढची पिढी काय शिकणार आहे कशी शिकणार आहे याकडे खरंतर डोळसपणे बघायला हवं. त्यामुळे शिक्षण धोरणाची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा व्हायला हवी. त्यांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे.

मी जरी शिक्षक नसलो आणि सध्या विद्यार्थीही नसलो तरी शाळेत असताना अभ्यास आवडणारा विद्यार्थी होतो. त्यामुळे नव्या धोरणाद्वारे येणाऱ्या वर्षात मुलं कसा अभ्यास करतील हे समजून घ्यायची उत्सुकता होती. चार वर्षे इंजीनियरिंग मध्ये घेतलेलं शिक्षण आणि आयटी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना लागणारा लागणारे ज्ञान यामध्ये असलेली तफावत जाणवत असल्यामुळे येणाऱ्या पिढीच्या उच्च शिक्षणामध्ये काही बदल घडणार आहे का हे सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता होती. सरकारने असे काही धोरण जाहीर केले आहे हे समजल्यावर इंटरनेटवरती काही वेळा त्याबद्दल वाचलं. पण सविस्तर तरीही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालणारी सोपी मांडणी माझ्या वाचनात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी लेखिका मंगला गोडबोले यांची हे पुस्तक प्रकाशित झाल्याची फेसबुक पोस्ट वाचली आणि या पुस्तकातून नक्की काहीतरी माहिती हाती लागेल अशी खात्री वाटली आणि पुस्तक लगेच ऑनलाईन मागवले आणि हे पुस्तक वाचून माझा निर्णय योग्य होता हे मी नक्की सांगू शकतो. लेखक श्री. करमळकर ह्या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. तर सहलेखिका मंगला गोडबोले ह्या ख्यातनाम लेखिका आहेत.

पुस्तकात दिलेल्या दोघांच्या माहितीतला थोडा भाग




आधी या शिक्षण धोरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे पुस्तक का वाचावं हे लक्षात येईल.
इस्रोचे अध्यक्ष श्रीयुत कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक समिती नेमली होती. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ होते. त्यांनी देशभरातून मते मागवली. समितीकडे लाखोंनी सूचना आल्या. त्या सगळ्यांचा अभ्यास करून समितीने हे नवे धोरण जाहीर केले आहे. हे धोरण शिशुबालवर्ग म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून पदव्युत्तर पदवी /पोस्ट ग्रॅज्युएशन /पीएचडी इथपर्यंतच्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेबद्दल काही विशिष्ट रचना मांडते. अभ्यासक्रम कसा असावा परीक्षा कशा घ्याव्यात विद्यार्थ्यांना विषय निवडायचं स्वातंत्र्य कसं असावं मुख्य विषयाला पूरक विषय कसे असावेत आपल्या आवडीच्या विषयातलं ज्ञान सुद्धा कसं घेता यावं एखाद्याचे शिक्षण काही करण्यामुळे थांबले तर ते परत कसे सुरु करता येईल पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाची जोड कशी मिळेल माणसाचं कौशल्य कसं वाढेल रोजगार क्षमता कशी वाढेल अशा असंख्य मुद्द्यांचा परामर्श या धोरणात घेतला आहे आणि त्याबाबत निश्चित एक रचना सांगितली आहे.

या पुस्तकात सुरुवातीला या धोरणामाची भूमिका स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर काळात राबवलेली धोरण याबद्दल सांगून पार्श्वभूमी तयार केली आहे. त्यानंतर या धोरणाचा गोषवारा दिला आहे. मग प्रश्नोत्तरांच्या रूपात या धोरणाचे महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगितले आहेत धोरणातल्या एखाद्या मुद्द्याचा अर्थ काय हे समजावून सांगितले आहे किंवा तो मुद्दा वाचल्यावर आपल्या मनातल्या शंकांचे निरसन केले आहे.

या धोरणाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो म्हणजे या धोरणाबद्दलची तुमची उत्सुकता आणि म्हणूनच पुस्तकाबद्दलची उत्सुकता अजून वाढेल.

आतापर्यंत शिक्षण पद्धती ही घोकंपट्टीवर आधारित होती. वाचा, घोका आणि पेपरात ओका !! त्यामुळे अभ्यास करणं म्हणजे बहुतेकांसाठी कंटाळावाणे काम. अभ्यासात हुशार असणारा पदवीप्राप्त मुलगा सुद्धा प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करू शकेल का नाही याची आपल्याला खात्री नसते. दुसरे म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स अशी आपल्याकडे एक विनाकारण उतरंड तयार झाली आहे. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात हुशार विद्यार्थी न जाता काही विशिष्ट क्षेत्रातच जातात. त्यातून त्या विद्यार्थ्याचं आणि समाजाचंही नुकसान होतं. ह्या वैगुण्यांवर मात करण्यासाठी आता ठराविक एक अभ्यासक्रम असं न करता एक मुख्य विषय, एक सहविषय, प्रात्यक्षिक करून अनुभव घेण्याचा विषय, मग आवडीचा कलाविषय, एक दोन भाषा असा आपल्याला स्वतःला विषयांचा गुच्छ निवडायचा आहे. परदेशी विद्यापीठात आढळणारी मेजर मायनर सब्जेक्ट ची संकल्पना आता अशी रुजू होईल. हा खूप मोठा बदल आहे.

रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी जसं की सोपं सुतारकाम, इलेक्ट्रिकचं काम, इतर रिपेअरिंग पासून आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रातले प्रॅक्टिकल उपकरण हाताळायचं काम आलं पाहिजे. अशा पद्धतीची रचना शाळेपासून "पीजी"पर्यंत केलेली आहे. जेणेकरून व्यक्ती फक्त पुस्तकी कीडा होणार नाही तर तिच्या अंगात अशी थेट जगण्याला भिडण्याची कौशल्ये असतील. अशी काम करताना सुद्धा किती मेहनत आणि कुशलता लागते हे जाणवल्यामुळे साहजिकच श्रमप्रतिष्ठा मनात निर्माण होईल. नवीन शिक्षण पद्धतीमधला हा बदल खूप आश्वासक आहे.

एकीकडे आधुनिक शिक्षण पद्धती म्हटलं की आपल्याला पाश्चात्य शिक्षण पद्धती डोळ्यासमोर येते तर दुसरीकडे भारतामधल्या जुन्या ग्रंथांमध्ये सगळं ज्ञान होतं असंही मत असतं. ही दरी सांधण्याचा प्रयत्नदेखील या शिक्षण धोरणात केलेला आहे. भारतीय परंपरागत ज्ञान समजावून सांगणारे विषय आता उपलब्ध असतील. आणि "विषयगुच्छा"त असा एक विषय निवडावा लागेल. हे अभिनंदनीय.

एका परीक्षेवर सगळे गुण न आधारित ठेवता वर्षभर केलेल्या कामाच्या मूल्यमापनाचे श्रेयांक (क्रेडिट्स) जमा करून पुढे जायचं आहे . काही कारणांनी शिक्षण थांबलं तरी हे क्रेडिट्स भविष्यात ग्राह्य धरले जातील .आणि जिथून शिक्षण सोडलं तिथून पुन्हा नव्याने शिकायला सुरुवात करता येईल.

हे धोरण केंद्र सरकारचं असलं तरी शिक्षण हा राज्य सरकारचा विषय असल्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणी कशी करायची हे त्या त्या राज्य सरकारवर आहे. महाराष्ट्रात या योजनेच्या या धोरणाची अंमलबजावणी सुरू होते आहे.
आता पुस्तकातली काही पाने उदाहरणादाखल वाचा. फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा.

क्रमिक पुस्तकांच्या उपलब्धतेची अडचण ह्यावरचा एक प्रश्न, भाषा शिक्षणाबद्दल एक प्रश्न.



वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याबद्दलाचा प्रश्न.



इंटर्नशिप apprenticeship शी निगडित प्रश्न 



धोरणाची बरीच वैशिष्ट्ये आणि त्यामागची भूमिका मला पुस्तकातून कळली. ही रचना खूप आदर्श आहे. जशीच्या तशी प्रत्यक्षात उतरली तर खूप फायदेशीरही आहे. पण भारतासारखा खंडप्राय देश, स्थितीशील समाज, कुठले ना कुठले वाद उकरून काढण्याची राजकीय खुमखुमी, सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यात माजलेला भ्रष्टाचार, लोकांची "चलता है" वृत्ती, प्रत्यक्ष मेहनत करण्यापेक्षा झटपट रिझल्ट मिळण्याची वृत्ती अशा कितीतरी अडचणी या धोरणापुढे आहेत. पुस्तकातही लेखकाने अंमलबजावणी विषयीच्या शंका उपस्थित केल्या आहेत पण त्याचे उत्तर देताना लेखकांनी घेतलेली भूमिका काही वेळा अतिआदर्शवादी आणि गोड गोड झाली आहे. पण या पुस्तकाचा उद्देश धोरणावर साधकबाधक चर्चा किंवा धोरणाच्या अंमलबजावणी वरची चर्चा नसून ते धोरण काय आहे हे समजावून देणं असं असल्यामुळे तिकडे आपण थोडं दुर्लक्ष करू शकतो. प्रत्येक स्तरावरचे शिक्षण आणि त्यातले पैलू यांच्या बद्दल प्रश्न आहेत त्यामुळे पुस्तक वाचताना आपण एखाद्या तज्ञासमोर बसून हे धोरण समजून घेतोय असंच वाटतं. शंका दूर होतात. आपल्या कदाचित लक्षात न आलेले पैलू समोर येतात.

इतक्या मोठ्या धोरणासाठी नेमके प्रश्न निवडणे आणि त्याची योग्य उत्तरे थोडक्यात देणे हे कठीण काम लेखक द्वयीने केले आहे. त्याबद्दल दोघांना प्रणाम !

शिक्षण धोरण जसेच्या तसे वाचून समजून घेण्यापेक्षा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा पद्धतीने समजून घेणे नक्कीच रोचक आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक असाल किंवा समाजाबद्दल आस्था असणारे कोणीही असाल तर पुस्तक वाचा आणि "सावध ऐका पुढल्या हाका" !!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मेड इन चायना (Made in China)



पुस्तक - मेड इन चायना (Made in China)
लेखक - गिरीश कुबेर (Girish Kuber)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५५
प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे २०२४
छापील किंमत - रु. ४५०/-
ISBN - 97881119625178

"लोकसत्ता" वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर ह्यांची आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण ह्यावरची बरीच पुस्तके गाजली आहेत. त्याच मालिकेतील अजून एक ताजे पुस्तक "मेड इन चायना". भारताचा शेजारी देश चीन बद्दल भारतीयांच्या भावना संमिश्र असतात. जुना देश आणि संस्कृती म्हणून ते आपल्यासारखेच आहेत अशी भावना असते. तर चीनच्या युद्धखोरीमुळे शत्रुत्व वाटते. स्वस्त आणि उपयुक्त चिनी उत्पदनांचं आकर्षण. तर जगाची उत्पादनक्षमता ताब्यात घेऊन जगावर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेची धडकी. विज्ञान-तंत्रज्ञान-क्रीडा स्पर्धा ह्यांमध्ये चीनचा दबदबा निर्माण करण्यासाठी लहानपणापासून कठोर मेहनत करणाऱ्या चिनी लोकांबद्दल आदर. तर इंटरनेटचा वापरसुद्धा "सरकारी देखरेखीखाली" करायला लागतो असे आयुष्य जगणारे चिनी लोकांबद्दल सहानुभूती. अशा आपल्या संमिश्र भावना योग्यच आहेत. कारण चीन आहेच तसा. संमिश्र-व्यामिश्र. तो तसा का बनला ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक ""मेड इन चायना".

पुस्तकात सुरुवातील ऐतिहासिक चीन मध्ये कोणाची राजवट होती; कोणाचा पराभव करून कोण पुढे आले; काही शे-हजार वर्ष जुन्या काळात कुठले तत्वज्ञ होऊन गेले ह्याचा धावता आढावा घेतला आहे. मग माओंचा उदय कसा झाला ते थोडक्यात सांगितलं आहे. "कवी-क्रांतिकारी-क्रूरकर्मा" प्रकरणात माओंच्या व्यक्तिमत्त्वाचे परस्परविरोधी पैलू, चक्रमपणा ह्याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.

तिथपासून पुढचा पुस्तकाचा भाग म्हणजे माओंपासून आत्तापर्यंत कोण कोण राष्ट्रप्रमुख झाले, ते त्यापदापर्यंत कसे पोचले ह्याची तपशीलवार माहिती आहे. भारताप्रमाणे तिथे लोकशाही नाही. एकपक्षीय सत्ता आहे. त्यामुळे माझी कल्पना अशी होती की तिथे पक्षांतर्गत चर्चा, वादविवाद होऊन पुढचा सत्ताधीश ठरत असेल आणि किमान वरच्या स्तरावर तरी घाणेरडे राजकारण, एकमेकांचे पाय ओढणे हा प्रकार नसेल. पण हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की आपल्यापेक्षा भयंकर राजकारण तिथे चालतं. कारण जो राष्ट्रप्रमुख होतो तो सर्वसत्ताधीश हुकूमशहाच होतो. त्याच्या विरुद्ध काही मतप्रदर्शन केलं की सूडबुद्धीने कारवाई होणार. कधी तुरुंगवास, कधी दूर खेड्यात कष्टाचं जीवन जगण्याची शिक्षा तर कधी थेट मृत्युदंड. त्यामुळे विद्यमान राजा ऐन भरात असताना त्याची हांजी हांजी करणारे लोक उच्चपदांवर, मोक्याच्या पदांवर बसून माया गोळा करणार. विरोधी गट तोंडदेखलं समर्थन करून योग्य वेळेची वाट बघणार. राजाचा भर ओसरायला लागला की विरोधकांच्या कुरुबुरी सुरु. आणि काही वर्ष, काही बळी जात जात सत्तांतर झालं की पारडं दुसऱ्या बाजूला फिरणार. कालचे "राजनिष्ठ" आता "राजद्रोही" तर कालचे "क्रांतिकारी" आज "आदर्श कार्यकर्ते". जुन्या राष्ट्रप्रमुखाची सुद्धा तातडीने उचलबांगडी किंवा जाहीर अपमान सुद्धा ! मग तोच जुना खेळ पुन्हा सुरू.

माओंच्या काळात "डेंग शियाओपिंग" ह्यांना असा त्रास भोगायला लागला पण मागाहून ते सत्ताधीश झाले. आत्ताचे अध्यक्ष "क्षी जिन पिंग" ह्यांच्या वडिलांवर पण राज्यकर्त्यांची खप्पामर्जी झाली होती. त्यामुळे "क्षी जिन पिंग" तरुण असताना हालअपेष्टा आणि अपमान सोसत जगले. पण आता ते सत्तेत आहेत. आणि विरोधक त्रासात.

पुस्तकातला बराचसा भाग ह्या राजकीय खेळी, कोणी कोणी विरोध केला, कोणावर काय कारवाई झाली, किती लोक मारले गेले, कुठली आंदोलनं झाली, कशी चिरडली गेली, कशी फोफावली ह्याचे सुरस-चमत्कारिक किस्से आहेत. त्यामुळे चिनी राजकारणातली कितीतरी नावे ह्या विवेचनाच्या ओघात येतात.

चीन वाढत असताना अमेरिकेचं तिकडे लक्ष होतंच. रशिया तर कम्युनिस्ट म्हणून चीनला जवळचाच. ह्या देशांच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी चीनबद्दल घेतलेली भूमिका हा भाग सुद्धा निवेदनाच्या ओघात येतो. लेनिन, गोब्राचेव्ह, किसिंजर, क्लिंटन, हो ची मिन्ह वगैरेंचे दाखले आहेत. चीनला कधी पाठिंबा, कधी विरोध. चीनची उत्पादनक्षमता बघून व्यापाराच्या दृष्टीने सहकार्य तर मानवाधिकार डावलले जातायत ह्याबद्दल नक्राश्रू ढाळणे हे पूर्वीपासून चालू आहे. गंमत म्हणजे पुस्तकात सुरुवातीला उल्लेख आहे की युरोप पेक्षा चीन प्राचीनकाळी प्रगत असल्यामुळे ते स्वतःला उच्चभ्रू समजत तर युरोपियन लोकांना रानटी, अप्रगत, अडाणी. त्यामुळे तेव्हाच्या चीनच्या राजाने ब्रिटनच्या राजदूताचा अपमान केला होता आणि अगदी अलीकडे "डेंग शियाओपिंग" ह्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांचा. त्या इतक्या संतापल्या की ब्रिटनला परत आल्यावर म्हणाल्या "चीनच्या एकाही नेत्याला जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार कसा चालतो ह्याची काडीचीही अक्कल नाही !"

पुस्तकाच्या निवेदनात एक दोन प्रकरणं चीनच्या आर्थिक धोरणांवर आहेत. विशेषतः "डेंग शियाओपिंग" ह्यांच्या अर्थनीतीमुळे - नियंत्रित भांडवलशाही -मुळे आज दिसणाऱ्या चीनची पायाभरणी कशी झाली हे सांगितलं आहे. "विशेष आर्थिक क्षेत्र" - special economic zone (सेझ) ही कल्पना त्यांनी मंडळी. सेझ मध्ये लोकांना मुक्तद्वार दिलं. कामगार कायदे, मानवीहक्क वगैरेंची फारशी तमा ना बाळगता उत्पादन करायला प्रोत्साहन दिलं. उत्पादन करताना त्यामागचं तंत्र, मंत्र आणि रहस्य सुद्धा शिकून घ्यायला आणि चक्क त्याची चोरी करायला प्रोत्साहन दिलं. त्यातूनच सुरु झाला चीनच्या वस्तूंनी जग काबीज करायचा प्रवास. चांगली उत्पादने पण तिथे बनू लागली आणि "चाले तो चांद तक, नाही तो शाम तक" अशी नकली उत्पादने पण तिथलीच. इंटरनेटवर नियंत्रण ठेण्यासाठी गूगल ला बंदी पण चीनचं गूगल - "baidu" तयार झालं. स्वतःची "फायरवॉल" सारखी तंत्रे विकसित केली. असे कुठले महत्त्वाचे निर्णय चीनने घेतले ह्याबाद्दल पुस्तकात माहिती आहे. "क्षी जिनपिंग" ह्यांचा पण मोठा वाटा आहे. ते आता तहहयात अध्यक्ष झाले आहेत. आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर ते करतात. कोविड ची साथ, चीनचं "टाळेबंदी"चं कडक धोरण आणि त्यातून मंदावलेली अर्थव्यवस्था इथे पुस्तकाचा शेवट होतो. परिशिष्ठात चीनच्या व्यापाराबद्दल, संरक्षण धोरणाबद्दलची आकडेवारी आहे.

पुस्तकातला हा अर्थविषयक भाग थोडा गोंधळात टाकणारा वाटला. कारण एकीकडे सेझमुळे व्यापारवृद्धी झाली असं म्हटलं आहे तर दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था रसातळाला गेली; चलनवाढ, बेरोजगारी ह्यांनी कळस गाठला असं सुद्धा म्हटलं आहे. पुढे मध्येच चीनच्या आर्थिक प्रगतीबद्दल उदाहरणं आहेत तर मध्येच कशी अधोगती होते आहे ह्याचे. आता चीनची अर्थव्यवस्था उताराकडे लागली आहे असं लेखकाला वाटतं आहे. अर्थव्यवस्थेत चढउतार होत असतातच. पण पुस्तकातून १०६० ते २०२४ मधला आर्थिक प्रवास सलग डोळ्यासमोर उभा राहत नाही. भविष्याचा वेध घेतला जात नाही. लेखकाचे मुख्य लक्ष "राजकारण आणि सत्ताबदल" ह्याकडेच राहिले आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका


माओ आणि डेंग ह्यांच्यातला सुप्त संघर्ष



सेझ ची सुरुवात



मुक्त बाजारपेठेचे फायदे घेत स्वतःची बाजारपेठ मात्र नियंत्रित ठेवण्याचा चीनचा दुटप्पीपणा. परकीय गंगाजळीचा प्रचंड साठा ह्याबद्दल



भारत-चीन युद्ध ह्याविषयी बरंच लिखाण उपलब्ध आहे तर "डोकलाम- गलवान"वाद ह्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. म्हणून हे दोन्ही मुद्दे पुस्तकात घेतले नाहीयेत असं लेखकाने मनोगतात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पूर्ण पुस्तकात भारत फार क्वचित दिसतो.

माओंनी केलेली क्रांती, "ग्रेट लीप फॉरवर्ड", "सांस्कृतिक क्रांती" वगैरेचे संदर्भ पुस्तकात येतात. पण तो नक्की काय प्रकार होता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर पुस्तकातल्या वाक्याचं गांभीर्य कदाचित लक्षात येणार नाही असं मला वाटलं. त्याबद्दल थोडं इंटरनेटवर वाचून मग हे पुस्तक वाचलं तर जास्त फायदा होईल.

आपण चिनी नावांचे उच्चार त्याच्या रोमन स्पेलिंग प्रमाणे करतो. पण त्यांचे खरे उच्चार वेगळे आहे. Mao Zedong ह्या स्पेलिंगमुळे त्याचं मराठी लेखन "माओ त्से तुंग", "माओ झेडॉंग" असं केलं जतन. पण त्याचा मूळ उच्चार साधारण "माओ द्झ दोंग". परिशिष्टात अशा नावांची आणि त्यांचे मूळ उच्चार देवनागरीत दिले आहेत.

चीन म्हणजे माओ आणि त्यांच्या विचाराने चालणारा देश अशीच माझी कल्पना होती. पण पुस्तक वाचून तो समज बदलला. नव्या चीन च्या धोरणात "डेंग" ह्यांचे योगदान, माओंच्या पूर्णपणे विरुद्ध आर्थिक भूमिका, नंतरच्या राजकारण्यांनी वेळोवेळी बदललेले पवित्रे आणि तरीही आम्ही "माओ आमचं दैवतच" हे म्हणत राहायची मखलाशी वाचून आपल्या राजकारण्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

गिरीश कुबेरांचे वृत्तपत्रातले लेख किंवा अग्रलेख वाचणाऱ्यांना त्यांचा मोदीविरोध, भाजपविरोध परिचित आहे. पुस्तकात मोदी, भाजप येत नसले तरी तिकडची हुकूमशाही वृत्ती आणि मोदी ह्यांच्यात कसं साम्य आहे जाता जाता सुचवायची संधी लेखकाने सोडली नाहीये हे पण चतुर वाचकाच्या लक्षात येईल.

चीन हा देश आणि त्याचं भूत-भविष्य-वर्तमान ह्यावर कितीही लिहिलं तरी कमीच आहे. गिरीश कुबेरांच्या ह्या पुस्तकातून चीनचं अंतर्गत राजकारण आणि आर्थिक निर्णयांची मालिका ह्याचा अंदाज मराठी वाचकाला येईल. पुस्तकातली नावे, मुद्दे, प्रसंग अजून कुतूहल निर्माण करतील. त्यादृष्टीने एक सकस वाचनानुभव म्हणून सुजाण वाचकांनी अवश्य वाचावं.




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Heart bones (हार्ट बोन्स )



पुस्तक - Heart bones (हार्ट बोन्स )
लेखिका - Colleen Hoover (कॉलीन हूवर)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३२४
प्रकाशन - २०२०
ISBN - 9798671981742

"बेया" आणि "सॅमसन" अशा दोन तरुणांची ही प्रेमकहाणी आहे. बेया एक कॉलेज तरुणी तिच्या आईबरोबर राहते आहे. तिचे वडील परराज्यात राहतात. आईवडील एकत्र राहत नाहीयेत. बेयाची आई तरुण असताना घडलेल्या शरीरसंबंधातून - वन नाईट स्टॅन्ड मुळे - झालेली ही संतती. पण त्या तरुणाने आपली जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीही नाही आणि पूर्णपणे टाकलीही नाही. वर्षांतून काही वेळा तो मुलीला फोन करतो. वर्षातून एकदा दोन आठवडे स्वतःच्या घरी नेतो. पण मुलीचा आणि वडिलांचा प्रेमाचा धागा जुळला गेला नाहीये. तिची आई अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. किडूकमिडूक कामं करून कधी पुरुषांशी सलगी करून ती पैसे मिळवते. पण एकूण मुलीकडे दुर्लक्षच. बेया कशीबशी काम करून पैसे मिळवते आहे. शिक्षण थोडंफार चालू आहे.

एकेदिवशी अमली पदार्थाच्या अतिसेवनाने बेयाची आई मरण पावते. बेया निराधार होते. घराचं भाडं थकलेलं असल्यामुळे घरमालक सुद्धा तिला घर सोडायला सांगतो. मनाचा हिय्या करून ती वडिलांना फोन करते. काय झालं आहे हे न सांगता फक्त त्यांच्याबरोबर थोडे दिवस राहायचं आहे असं सांगते.

वडिलांचं लग्न एका घटस्फोटितेशी झालं आहे. वडील, त्यांची बायको आणि तिची पहिल्या लग्नाची मुलगी असे ते एकत्र राहतायत. हे तिघे बेयाचं चांगलं स्वागत करतात. वडील प्रेमाने वागत असले तरी त्यांनी तिचा वडिलांवर रागच असतो. तिची सावत्र बहीण आपल्या मित्रांशी ओळख करून देते. त्यातल्या "सॅमसन"ला बॉयफ्रेंड बनव म्हणून मागे लागते. बेयाला ह्या कशातही रस नसतो. आपलं उद्ध्वस्त आयुष्य कसं सावरायचं ह्याची तिला चिंता सतावत असते. प्रत्येक वेळी तिची आणि सॅमसन ची भेट होते तेव्हा काहीतरी गैरसमजच होतात. दुसरीकडे सॅमसन सुद्धा घुमा, आपलं आपलं काम करणारा, पण श्रीमंत, तरी मुलींशी संबंध ठेवणारा आणि बेयात रस न घेणारा असा.

आपल्याला एकमेकांत काही रस नाहीये हे एकमेकांना सुचवत असतात. सांगत असतात. पण त्यातूनच "असं का" अशी उत्सुकता पण निर्माण होते. ते बोलू लागतात. पुढे त्यातून प्रेमकहाणी कशी फुलते, सॅमसन चं एक गुपित अचानक कसं बाहेर येतं; आणि त्या गुपितामुळे प्रेम पुन्हा कोमेजतं का? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल.

काही पाने उदाहरणादाखल

बेयाचे वडील तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतानाचा संवाद



बेया आणि सॅमसन चा संवाद .. एकमेकांपासून थोडं लपवत, थोडं सांगत, थोडं विचारत चालणारं बोलणं




"ते दोघे भेटले, एकमेकांशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं" अशीच ही टिपिकल प्रेम कहाणी असली तरी भारतीय वाचकांसाठी थोडी वेगळी वाटेल. ह्याचं कारण ह्या कादंबरीत घडणाऱ्या घटना भारतीय समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत इतक्या सहजपणे घडणं शक्य नाही. लग्नाआधी होणारं मूल वाढवणं; ते पण लग्न न करता त्या पुरुषाकडून बालसंगोपनाचे पैसे घेऊन... एखादी बाई मेल्यावर तिच्या पोरक्या मुलीची चौकशी करायला नातेवाईक, शेजारीपाजारी, समाजसेवी संस्था कोणी येत नाही. किती भयाण एकटेपण आहे ह्या समाजात. एक महिना सुट्टीवर गेलेल्या मुलीला तिची बहीण लगेच "बॉयफ्रेंड" बनवायला सांगते; "महिनाभर तर महिनाभर कर की एन्जॉय !!". मुलींची आई त्यांना स्पष्टपणे विचारते; "तुम्ही गर्भनिरोधनाचे उपचार केले आहेत ना .. म्हणजे तुम्ही काही करायला मोकळ्या". ज्याला बॉयफ्रेंड "करायचं" आहे तो दुसऱ्या मुलीशी लगट करतोय; पण काही हरकत नाही कारण दुसरी मुलगी दोन दिवसांनी बाहेरगावीच जाणार आहे. मग तो "अव्हेलेबल"च आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच लेखिकेच्या "इट एन्ड्स विथ अस" कादंबरीत सुद्धा असेच अमेरिकन कुटुंब व्यवस्थेच्या थोड्या वेगळ्या समस्येचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मूळ कथेपेक्षा ही सामाजिक निरीक्षणं वाचायला मला जास्त उत्सुकता वाटली.

पुस्तक वाचताना खूप उत्सुकता लागून राहत नाही. अर्धं पुस्तक "बेया" च्या निराधारपणाचे व त्यातून स्वभावात आलेल्या काडवटपणाचे कंगोरे रंगवण्यात गेलं आहे. तो भाग जरा जास्तच ताणला गेलाय. त्यामानाने सॅमसन चं गुपित तितकं ठोसपणे पटण्यासारखं मांडलं नाहीये. तो भाग मी पटापट वाचून उरकला.

तुम्हाला प्रेमकथा आवडत असतील तर वाचून बघा.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...