प्रीत ही बावरी (Preet hi baawari)



पुस्तक - प्रीत ही बावरी (Preet hi baawari)
लेखक - अविनाश गडवे (Avinash Gadwe)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२२
प्रकाशन - युगंधरा प्रकाशन नोव्हेंबर २०२४
छापील किंमत - २००/- रु.
ISBN - 978-81-967821-5-3

मी "पुस्तकप्रेमी" या साहित्यविषयक व्हॉट्सॲप समूहाचा सदस्य आहे. त्याच समूहातील कथालेखक, कवी, उत्तम सूत्रसंचालक, खुसखुशीत बोलण्याने सर्वांना हसवणारे असे लोभस व्यक्तिमत्व म्हणजे अविनाश गडवे. ह्या वर्षीच्या(२०२५) जून महिन्यात कराडला झालेल्या पुस्तकप्रेमी समूहाच्या संमेलनात अविनाश गडवे यांनी मला त्यांचा हा कथासंग्रह भेट दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.



हा त्यांचा दुसरा कथासंग्रह. कथासंग्रहातल्या गोष्टी या प्रेमकथा आहेत. यशस्वीतप्रेम कथा म्हटलं की; मुलगा-मुलगी एकमेकांना भेटले, एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं, जवळीक वाढली, प्रेमात रूपांतर झालं, लग्न झालं आणि त्यानंतर ते सुखाने नांदू लागले. पण प्रत्येक गोष्ट तितकी सरळ नसते. किंवा ती तितकी सरळ झाली तर त्यात गोष्ट म्हणून सांगण्यासारखं काही विशेष असत नाही. "कहानी में ट्विस्ट" आला की मगच ते सांगावसं वाटतं. अविनाश यांच्या कथा या अशाच "कहाणीत ट्विस्ट" असणाऱ्या आहेत.

भेट,ओळख, प्रेम, लग्न, संसार या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही तरी वेगळं घडू शकतं ज्यामुळे या प्रवासातला पुढचा टप्पा खुंटतो, कधी पुढचा टप्पा फार दूर जातो, तर कधी पुढच्या टप्प्यावरून पुन्हा मागे यावसं वाटतं. अशा कितीतरी शक्यतांचा विचार अविनाशजींनी या कथांमध्ये केला आहे. इंजीनियरिंग च्या भाषेत बोलायचं तर बरीच "परम्युटेशन-कॉम्बिनेशन" ट्राय करून नवनवीन "सिनॅरिओ" त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत.

एकूण 25 कथा आहेत त्यामुळे प्रत्येक कथेबद्दल सांगणं कठीण आहे. त्यातून भावी वाचकाचा रसभंगही होऊ शकतो म्हणून साधारण गोषवारा देतो. आणि तीन-चार गोष्टींबद्दल सांगतो.

"असेच असावे हास्य ओठी " - निराधार महिलांच्या आश्रमात राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात त्या आश्रमाच्या संचालिकेचा मुलगा पडला आहे. मुलीचे गुण बघून मनापासून तिच्याबद्दल प्रेम वाटत आहे. त्याचं प्रेम तो कसा व्यक्त करेल ? ती ते स्वीकारेल का? समाज काय म्हणेल?

"गिफ्ट"- एका कॉलेजकुमाराला त्याची वर्गमैत्र आवडते आहे. ती खूप साधी, समंजस, लाघवी आहे आता तिच्या वाढदिवसाला इतरांपेक्षा वेगळं काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न त्याला पडला आहे. त्याचे आजोबा त्याला एक वस्तू सुचवतात. वस्तू भले साधी आणि जुन्या वळणाची. पण म्हणूनच इतर मित्रांपेक्षा वेगळी आणि अनोखी. त्या प्रसंगाची गंमत.

पुस्तकात बऱ्याच विरह कथा आहेत म्हणजे परिस्थितीमुळे प्रेमाचे रूपांतर लग्नात, संसारात होऊ शकले नाही किंवा अपघात, आजारपण यामुळे जोडीदाराचे निधन झाले .अशावेळी साध्या साध्या गोष्टीतून जोडीदाराची आठवण येते ते भावपूर्ण प्रसंग लेखकाने टिपले आहेत.

इतर बऱ्याच कथा हे "जुनं प्रेम पुन्हा परत येतं" अशा पद्धतीच्या आहेत. नायकनायिकेचे लग्न झालं असेल तर जुना प्रियकर परत भेटल्यावर मनात होणारी खळबळ; काही वेळा नायक/नायिका का अविवाहित राहून जुन्या प्रेमाच्या आठवणीवर जगत आहेत. अशावेळी अनपेक्षितरित्या प्रिय व्यक्ती पुन्हा भेटते. तर काही वेळा जाणूनबुजून लग्न न करून वेगळे राहत असतानाही पुन्हा पुन्हा गाठ पडणे अशा स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक वेळी उठणारे भावनांचे कल्लोळ लेखकाने एक दोन प्रसंगात आणि थोडक्यात शब्दात आपल्यासमोर चित्रित केले आहेत. "मधु", "सोन्याचे बिस्किट", "रानफूल ", "संकेत मिलनाचा" या गोष्टी तशाआहेत.

"मधु" या कथेत असेच दोन मित्र एका लग्नसमारंभात एकमेकांसमोर येतात. नजरा नजर होऊनही नजर चुकवतात. शेवटी नायिका जी आता मध्यमवहीन बाई झाली आहे, तीच पुढाकार घेऊन बोलते. सूचक शब्दांतून आपण एकत्र यायला पाहिजे होतं पण आलो नाही हे व्यक्त होतं आणि तरीही निरोप घेऊन दोघेजण परत जातात.

"आई", "पैंजण", "सावली" या कथा अजून थोड्या वेगळ्या आहेत. नायकनायिकेच्या यांच्या आई-वडिलांच्या भूतकाळामुळे त्यांच्या नात्यावर कसा परिणाम होतो हे दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. थरारक आणि अनपेक्षित प्रसंगांची गुंफण त्यात आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा म्हणजे निवेदनशैलीची कल्पना येईल.
अनुक्रमणिका 


"असेच पाहिजे असेच पाहिजे" गोष्ट. बायकोमुलं सोडून गेल्यावर त्यांचं महत्त्व नायकाला कळतं. एकटेपणा जाणवतो आणि पिंजऱ्यातल्या पोपटाच्या एकटेपणाची अनुभूती येते.


"मधू" - जुनं प्रेम लग्नाच्या जेवणात अचानक समोर येत तेव्हा



"स्वप्न" ही दोन पानीच कथा पण प्रत्येक परिच्छेदात गोष्ट इतके झोके घेते की शेवटी आपणही म्हणतो, "हुश्श ! झालं बरं एकदाचं !!".



एका कथेत लेखकाने शेवट वाचकांवर सोडला आहे. ते वाचल्यावर असं मनात आलं की ह्यातल्या बऱ्याच पात्रांचं शेवटचं वागणं योग्य का अयोग्य असाही प्रश्न वाचकांना विचारता येईल. "विक्रम वेताळ" कथांसारखं आपापल्या स्वभावानुसार आपलं आकलन वेगळं.

ह्या सर्व लघुकथा आहेत. दोन-तीन पानाच्या. एखाद दुसरीच कथा जरा मोठी चारेक पानांची असेल. त्यामुळे कमीत कमी शब्दात परिस्थिती समजेल अशा पद्धतीने संवादांची निवेदनाची रचना आहे. एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत फार झपाट्याने आपण जातो. पात्रांचं बोलणं हे साधं रोजच्या जगण्यातलं आहे. त्यात साहित्यिक तत्त्वज्ञानात्मक अशी शाब्दिक फुलोरा आणलेली वाक्ये नाहीत. त्यामुळे ती घटना आपल्या समोरच घडते आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण गोष्ट पुढे पुढे उत्सुकतेने वाचत राहतो. बऱ्याच वेळा आपल्याला अनपेक्षित असे प्रसंग त्यात घडतात आणि एक नवीन सिनेमा आपल्यासमोर उभा राहतो.

लघुकथा असल्यामुळे गोष्ट वाचून लगेच संपते; पण ती गोष्ट मनात नक्की रेंगाळते. पुढच्या गोष्टीकडे वळण्याआधी आपण दोन मिनिटं वाचलेल्या गोष्टीवर विचार करतो. असं झालं तर खरंच काय होईल? त्या त्या व्यक्तीची मानसिक अवस्था कशी होईल? हा विचार येतो. मनातल्या मनात त्या लघुकथेचं दीर्घकथेत आणि पाच वाक्यातल्या संवादांचं दीर्घ मानसिक द्वंद्वात रूपांतर आपण करतो. अविनाशजींच्या कथेची ही जमेची बाजू आहे असं मला वाटतं. अविनाशजींच्या लेखणीतून त्या दीर्घकथा किंवा यातल्या काही कथाबीजांवर आधारित एक छान कादंबरी वाचायला मला नक्की आवडेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)





पुस्तक - राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)
लेखक - श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२३
प्रकाशन - रोहन प्रकाशन, ऑगस्ट २०२४
ISBN - 978-93-89458-32-9

काही महिन्यांपूर्वी श्रीकांत बोजेवार ह्यांची दोन पुस्तके घेतली होती. "क्ष क्षुल्लकची कहाणी" आणि "राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा" हे दोन कथा संग्रह. अद्भुतता (फँटसी) आणि वास्तव ह्यांचा मेळ साधत एका रंजक परिस्थतीत घेऊन जाणाऱ्या गोष्टी "क्ष क्षुल्लक.." मध्ये होत्या. मला ते पुस्तक खूप आवडले. विशेष म्हणजे त्याचे मी लिहिलेले परीक्षण लेखकालाही आवडले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ते प्रकाशितही झाले होते. ते तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकाल https://learnmarathiwithkaushik.com/courses/ksha-kshullakachi-black-comedy/.
ते पुस्तक वाचल्यापासून दुसरे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण लागोपाठ त्याच प्रकारची किंवा त्याच लेखकाची पुस्तके न वाचण्याच्या माझ्या सवयीमुळे हे पुस्तक मुद्दाम बाजूला ठेवले आणि थोड्या दिवसांनी वाचायला घेतले.
हे पुस्तक नऊ कथांचा संग्रह आहे. आशय, विषय, मांडणी वेगवेगळी आहे. म्हणून आधी प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो.

राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा - एका मध्यमवयीन जोडप्याची ही गोष्ट आहे. नवरा म्हणतोय बायकोने माझ्या पायावर जोरात काठी मारली, मुद्दामून. बायको म्हणतेय मी झुरळ मारत होते ह्यांना चुकून लागली. इतके वर्ष ज्या बायकोला पुरुषी वर्चस्व दाखवत मुठीत ठेवली ती आज अशी जुमानत नाही बघून नवरा संतापलाय. कसला राग बायको काढत असेल? इतकी वर्ष दबून राहणारी बायको ह्या वयात अशी बंडखोर कशी झाली? गोष्ट पूर्ण वाचल्यावर कथेच्या नावाची गंमत अजून वाटेल.

शब्द - एक लेखक त्याच्या लॅपटॉपवर कथा लिहितो आहे. बरंच टाईप करून झालं आहे . पण अचानक पुढचा शब्द लिहिला तो आपोआप डिलीट झाला. पुन्हा लिहिला पुन्हा डिलीट. ही काय भुताटकी? तो शब्द योग्यच आहे त्यामुळे "ऑटो करेक्ट" ने तो चुकीचा ठरवायला नको. म्हणून शब्दकोशांत बघितला तर तो शब्द तिथेही नाही. त्याला माहिती असणारे अनेक शब्द कोशात पूर्वी दिसत होते आता तिथे जागा रिकाम्या. काय झालं शब्दाचं? भाषेचं बदलतं रूप सांगणारी अद्भुतरम्य गोष्ट आहे ही.

काळा गूळ आणि कावळा - एक नव्याने लग्न झालेलं जोडपं आहे. एकमेकांचा सहवास पुरेपूर उपभोगतायत. पण त्यांच्या खाजगी क्षणी कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय असं बायकोला वाटायला लागतं. मग तिच्या लक्षात येतं की एक कावळा नेमका त्यावेळी आपल्या गॅलरी समोर बसतो आणि एकटक पाहत राहतो. तिची आई तिला तोडगा सांगते "काळा गूळ ठेव". पण खरंच कावळा बघत असेल; का दुसरं कोणी? कोणाच्या अतृप्त इच्छा अपूर्ण असतील?

चेटकीणी - "चेटकीणी" म्हणजे घर संसारात राहून पण घराला हातभार म्हणून आपल्या शारीरिक आकर्षकतेच्या बळावरएखाद्या परपुरुषाला भुलवण्याची कला अवगत असणाऱ्या बायका.. ही कला ते आपल्या पुढच्या पिढीकडे कशा देतात त्याची ही गोष्ट.

झूओ - एका पुस्तकवेड्या माणसाकडचं एक पुस्तक अचानक नाहीसं होतं. पुस्तक होतं चिनी दंतकथेतील व्यक्तिरेखा "झूओ" बद्दलचं. हा झूओ म्हणे बुद्धिमान आणि रंगेल माणूस. त्याला सगळे ग्रंथ तोंडपाठ कसे होते, त्याने अनेक बायकांशी संबंध कसे ठेवले होते ह्याच्या लोककहाण्या प्रसिद्ध आहेत म्हणे. नेमकं तेच पुस्तक चोरीला गेलं. कोणी नेलं? नक्कीच मित्रांपैकी कोणी. म्हणून तो मित्रांकडे चौकशी करतो. मित्र नाही म्हणतात. पण त्याचा विश्वास बसत नाही. पुढे त्याहून अविश्वसनीय घटना घडते म्हणजे अनपेक्षितरित्या पुस्तक परत मिळतं. दंतकथा झालेल्या झूओ च्या पुस्तकाच्या बाबतीतही पुस्तक मिळणे, हरवणे, सापडणे च्या जणू नव्या दंतकथा अजूनही घडत आहेत.

एकांतभ्रम - मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात आपला डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड, आपली स्वतःची शेअर करण्याची वृत्ती यामुळे आपल्याबद्दल माहिती वेगवेगळ्या ॲपकडे किंवा सिस्टीम हॅकर कडे जाऊ शकते. अशी माहिती वापर वापरून आपल्या अगदी मनाचा वेध घेणार ॲप निघालं तर ? खरा एकांत मिळणं आता कठीणच होणार की काय? अशी शक्यता दाखवणारी गोष्ट आहे.

संवाद एकांताशी - एका माणसाला एकटेपणा छळतोय . त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण होते आहे. "नको हा एकांत" असं म्हणत असताना एकांतच जणू मूर्त स्वरूपात येऊन त्याच्याशी बोलायला लागला. एकांत माणसाला कधी आवडतो कधी नाही त्याचे काय फायदे काय तोटे अशी चर्चा त्यांच्यात रंगते. असे कल्पना रंजन करून लिहिलेली ही कथा आहे.

क...शो...ले - कथेच्या शोधात लेखक म्हणून "क...शो...ले". बसच्या प्रवासात असताना एका लेखकाला एक चमकदार कल्पना सुचते. ती कुठे लिहून ठेवायची म्हणून कागद शोधत असतानाच नेमका त्याचा उतरण्याचा स्टॉप येतो आणि तो उतरतो. झालं ! त्या गडबडीत काही क्षणापूर्वी सुचलेली कल्पना त्याच्या डोक्यातून निघून जाते. त्याला काही केल्या त्या आठवत नाही. मग तो जातो मेंदू तज्ञ डॉक्टरांकडे. त्यांना म्हणतो, माझ्या मेंदूत बघा आणि ती कल्पना शोधून द्या. खरंच, माणसाच्या डोक्यात बघण्याची त्यातले चालू विचार, जमा झालेल्या आठवणी यंत्राच्या साहाय्याने काढायची सोय असती तर? मेंदूत डोकावून बघितल्यावर काय काय दिसेल? जुन्या आठवणी चाळवल्यावर काय होईल? या कल्पनेवर पुढच्या गमती घडतात.

एव्हरी एडिट इज नॉट अ लाय - चित्रपटामध्ये संकलनाचं (एडिटिंगचं) काम करणाऱ्या एका माणसाकडे अचानक एक व्यक्ती येते आणि म्हणते "सध्या शूटिंग चालू असलेल्या चित्रपटात मी एका दृश्यात काही सेकंदात दिसणार आहे कृपया संकलन करताना ते दृश्य कापून टाकू नका". वरवर साधी वाटणारी मागणी आणि साधी वाटणारी ही व्यक्ती. पण दिग्दर्शकाशी बोलताना लक्षात येतं की हा माणूस काहीतरी काळी जादू करतो. संकलकालाही तसाच काही अनुभव येतो. म्हणून तो त्या व्यक्तीचा माग काढतो. एका छोट्या दृश्याचं इतकं का महत्व ? आणि त्यासाठी काळी जादू करण्यापर्यंत तो का गेला आहे याचं भावुक करणार कारण त्याला कळतं.

अशा या नऊ गोष्टी आहेत विषय वेगळे वेगळे आहेत. काही पाने उदाहरणादाखल वाचा.
"शब्द" हरवल्यावर काय झालं ??



"चेटकिणीं"चे संस्कार



पुस्तकाच्या नावात "ॲडल्ट कथा" असा उल्लेख आहे. ह्यातल्या गोष्टी "ॲडल्ट" गोष्टी नाहीत. काही गोष्टींचा गाभा स्त्रीपुरुष शरीरसंबंध ह्यावर आधारित आहे. पण इतर गोष्टींमध्ये त्याबद्दलची वाक्य, प्रसंग विनाकारण आली आहेत असं वाटलं. "झूओ" आणि "एकांतभ्रम" या गोष्टी छान रंगलेल्या असताना मध्येच थांबवल्या सारख्या वाटल्या (
"क...शो...ले" गोष्टीसारखं झालं होतं की काय). "एकांताशी संवाद" म्हणजे 'एकांत चांगला की वाईट' असा निबंध संवादस्वरूपात लिहिल्यासारखा झाला आहे. "काळा गूळ.." आणि "चेटकिणी" या दोन गोष्टींमधले प्रसंग थोडे ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात तरीही शेवटपर्यंत उत्सुकता आणि रंजकता टिकवून ठेवणाऱ्या आहेत.  "राक्षस..", "शब्द", "क...शो...ले", "एव्हरी एडिट... " ह्या चार गोष्टी भन्नाट आहेत. 

काही गोष्टींमध्ये फॅन्टसी/अद्भुततेचा आधार घेतला आहे तर काही वास्तविक जीवनात घडू शकतील अशा घटना आहेत. लेखकाची शैली आणि कथेतल्या प्रसंगांचा वेग यामुळे आपण उत्सुकतेने पुढे पुढे वाचत राहतो. काही ठिकाणी हलका विनोद, थेट आणि नेमके संवाद, वेगवान घडामोडी ह्यामुळे गंभीर विषय अंगावर येत नाही. नवनवीन शक्यता आपल्याही डोक्यात येतात. कौटुंबिक, सामाजिक कथांपेक्षा वेगळ्या बाजाच्या कथा मराठीत वाचायला मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जो जे वांछील (Jo je vancheel)

पुस्तक - जो जे वांछील (Jo je vancheel) लेखक - नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८८ प्रकाशन - नीम ट्री पब्लिशि...